सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१२

युक्तिवादातून दिशाभूल करण्याचे उत्तम उदाहरण


   युक्तीवाद हा मुळात आपल्या भूमिका व बाजू दुसर्‍याला पटवून देण्यासाठी असतो. तसेच दुसर्‍याच्या भूमिका व बाजू कुठे चुकीची, खोटी वा निराधार असेल, तर ते सिद्ध करण्यासाठीच युक्तिवाद केला जात असतो. मी इथे जी मुस्लिम विषयक लेखमाला लिहितो आहे, ती वाचून अनेक मुस्लिमांनी मी मुस्लिमांचे दोष का दाखवतो असा सवाल केला. त्यांनी तसे विचारण्यात गैर काहीच नाही. आपल्या मनात शंका आल्यास जरुर तपास करावा. पण मी मुस्लिमेतर असल्याने मी मुस्लिमांबद्दल लिहूच नये, असा आग्रह कशाला? मी तोही एकवेळ मान्य करीन. पण मग त्याच नव्हेतर समस्त मुस्लिमांनी मुस्लिमांकडून जी अन्य धर्मांची चिकित्सा चालते तीही तेवढ्याच आग्रहाने बंद करण्यात पुढाकार घ्यायला हवा. पण तसे कधीच होत नाही. तसे असते तर डॉ. झाकीर नाईक यांच्या प्रवचने किंवा कार्यक्रमांना मुस्लिमांची इतकी झुंबड उडाली नसती. आणि जर अन्य धर्मियांच्या श्रद्धा व भावनांची खिल्ली उडवताना आपण टाळ्या पिटणार असू; तर आपल्याही धर्मश्रद्धांची चिकित्सा ऐकण्याची सहिष्णुता अंगी बाणवायला हवी. पण असे कितीदा बघायला मिळते? अगदी सामान्य मुस्लिमाचे सोडा. जे मुस्लिम विचारवंत किंवा त्यातले उदारमतवादी आहेत, त्यांच्यात तरी ही सहिष्णुता दिसते काय? मला लेखवजा पत्र पाठवणार्‍या नौशादभाई उस्मान यांचेच युक्तीवाद तपासून बघू. झाकीर नाईक यांच्या संबंधाने मी लिहिलेल्या लेखाबाबत ते काय म्हणतात?

   डॉ. नाईक यांनी हिंदू देवतांविषयी प्रश्न उपस्थित करताना कदाचित त्यांची शैली उपहासात्मक वाटत असेल तर त्यांनी नक्कीच त्यात सुधारणा करावी. पण त्यांनी कोणतेही नवे प्रश्न उपस्थित केलेले नाहीत. तर दस्तुरखुद्द ब्राहमण हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील पुराणांना शौचकूप संबोधले आहे त्याचे काय? ( संदर्भ: देवळांचा धर्म व धर्माची देवळे, पान क्र,१६). एवढेच नव्हेतर भागवताला चक्क "छीं भागवत" ही शिवी दिलेली आहे. (संदर्भ: देवाचा धर्म व धर्माची देवळे पान क्र. १५) आता बाळासाहेबांच्या वडीलांच्या विरोधात बोलण्याची हिंमत तोरसेकरांनी दाखवावी. 

   इथे प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा हवाला देऊन झाकीर नाईक कुठली नवी गोष्ट सांगत नाहीत; असा युक्तीवाद उस्मान करतात. तेव्हा कुठल्या तरी पुस्तकात जो मजकूर आधीच प्रसिद्ध झाला आहे, ते सत्य म्हणुन ग्राह्य धरावे आणि त्याबद्दल तक्रार करू नये, असा त्यांचा दावा आहे काय? हाच त्यांचा आक्षेप घेण्यासाठीचा निकष व नियम आहे काय? असेल तर मला त्यांचे नियम मान्य आहेत. मग त्यांच्याच नियमानुसार त्यांनी सलमान रश्दी किंवा तस्लिमा नसरीन यांच्या पुस्तक वा लिखाणातील मजकूर बिनतक्रार मान्य करावा. त्यात सुद्धा नवे काहीच नाही. जर कोणी आज त्या दोन मुस्लिम लेखकांच्या पुस्तकातील उतारे पुनर्मुद्रित केले किंवा उधृत केले; तर स्विकारार्ह सत्य म्हणुन उस्मान मान्य करतील काय? त्याबद्दल कुठलीही तक्रार न करता गप्प बसतील काय? त्यांनी प्रबोधनकार यांच्या पुस्तकाचा जो आधार घेऊन युक्तीवाद केला आहे; तोच युक्तीवाद अन्य कोणी रश्दी वा तस्लिमा यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन करू शकतो. पण ते नौशाद उस्मान यांनाही सहन होणार नाही. म्हणूनच त्यांच्या त्या पत्रातही तस्लिमाचा तिरस्कारपुर्ण उल्लेख अगत्याने आलेला आहे. म्हणजेच आपल्याला नावडणारे किंवा दुखावणारे कितीही जुने असले; म्हणून मान्य करता येत नाही, याचीच साक्ष खुद्द उस्मानच देतात ना? मग झाकीर नाईक यांनी गणपतीची खिल्ली उडवण्याचा व्हिडीओ खुप जुना आहे किंवा त्याला प्रबोधनकार यांच्या पुस्तकाचा आधार आहे, असे म्हणायचे कारण काय?

   दुसरा मुद्दा नौशाद यांच्याच पत्रातला आहे. त्यांनी नाईक यांचा गणपती विषयक व्हिडीओ खुप जुना असल्याचे सांगत व त्याचा प्रतिवाद तोरसेकरांनी जरूर करावा असे सांगत; थेट प्रबोधनकारांच्या पुस्तकाचा हवाला देऊन नाईक यांची वकीली करणारा युक्तीवादच मांडला आहे. एकीकडे म्हणायचे, ‘डॉ. नाईक किंवा त्याच्या आय. आर. एफ़. (इस्लामिक रिसर्च फ़ाऊंडेशन)चे आम्ही कार्यकर्ते नाहीत. डॉ. नाईक यांची एकूण प्रचार पद्धत, त्यांची शैली व त्यांच्या सर्वच विचारांशी आम्ही सहमत असूच असे अनिवार्य नाही.’ पण दुसरीकडे प्रबोधनकारांच्या पुस्तकाचा हवाला देऊन नाईक यांचा बचावही मांडायचा. याला दुटप्पीपणा म्हणता येईल. पण वादासाठी मी नौशादभाईंचा हा सुद्धा युक्तीवाद मान्य करतो. पण मग त्यांनी उघडपणे नाईक यांचा बचाव मांडायला पुढे यावे. माझ्या नाईक संबंधातील त्याच लिखाणामध्ये मी आणखी एका व्हिडीओचा संदर्भ दिलेला आहे. नाईक धडाधडा जे संदर्भ किंवा तपशील देऊन श्रोतृवर्गाला थक्क करून सोडतात, त्यात ते बेछूट किती खोटे बोलतात, त्याच्याही एका यु ट्यूबवरील व्हिडीओचा उल्लेख केलेला आहे. अवघ्या पाच मिनिटाच्या भाषणात डॉ. झाकीर नाईक पंचविस वेळा धडधडीत खोटे बोलत असल्याचे पुराव्यानिशी सांगणारा तो व्हिडीओ आहे. पण त्याबद्दल नौशादभाई संपुर्ण मौन पाळतात. नाईक यांना खरे ठरवण्यासाठी प्रबोधनकारांच्या पुस्तकाचे हवाले देणार्‍या नौशादभाईंनी, त्या दुसर्‍या व्हिडीओबद्दल गप्प का बसावे? जिथे आपल्या सोयीचे आहे तिथे तावातावाने बोलायचे आणि अडचणीचे असेल तर काणाडोळा करायचा, असा बुद्धीवाद असू शकत नाही.

   आपण नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फ़ाउंडेशनचे कार्यकर्ते नाहीत, असे सांगत असताना नौशादभाई हल्ली नाईक सौम्य भाषेत विवेचन करतात; असेही नमूद करतात. म्हणजेच नाईक जे काही करत असतात, त्याबद्दल नौशादभाई अनभिज्ञ नाहीत हे उघड आहे. मग त्यांनी जगभरच्या आपल्या दोनशे कोटी मुस्लिम बांधवांपैकीच एक असलेल्या झाकीर नाईक यांच्या वर्तनाची जबाबदारी पत्करून स्पष्टीकरण द्यायला काय हरकत होती? पण सहसा तसे होत नाही. मला अनुभव आहे तो नेमका तसाच आहे. इथे या पत्रात देखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख उपहासात्मक आहे. त्यांचे पाठीराखे त्यांना हिंदूहृदयसम्राट असे म्हणतात. तसे सर्वानीच म्हणायचे बंधन नाही. त्यामुळेच नौशादभाईंनी त्यांना बाळासाहेब ठाकरे इतके म्हटले असते तरी बिघडले नसते. पण त्यांनी दोन ठिकाणी जाणीवपुर्वक ‘हिंदू’च्या जागी ‘ब्राह्मण’ असा शब्दप्रयोग केला आहे. त्याचे कारण काय? ठाकरे हे ब्राह्मणांचे नेते आहेत, असेच त्यांना सुचवायचे नाही काय? बाळासाहेब स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात तर त्यांचा उल्लेख ब्राह्मणांशी संबंधित करण्याचे कारण काय? कारण स्वत: ठाकरे ब्राह्मण नाहीत. दुसरीकडे तेच नौशादभाई झाकीर नाईक यांना गैरहिंदू न म्हणता ‘ब्राह्मणेतर’ अशी शब्दयोजना का करतात? हिंदू म्हणून जे कोणी बोलतील त्यांच्यासाठी ब्राह्मणवादी ही शब्दयोजना मुस्लिम लेखक कधीपासून वापरू लागले? कशासाठी वापरू लागले? की संभाजी ब्रिगेडला आपल्या पंखाखाली घेतल्यापासून जाणिवपुर्वक अशी शब्दयोजना वापरण्याची काळजी घेतली जात आहे?

   बुद्धीवाद आणि बुद्धीभेद यात मोठाच फ़रक असतो. नौशादभाई जाणिवपुर्वक बुद्धीभेद केल्यासारखे लिहितात, असेच मला वाटते. त्यासाठी सोयीचे असेल तेवढेच घ्यायचे आणि अडचणीचे होईल त्यावर पडदा टाकायचा, अशी चिकित्सा होत नाही. अणि हाच प्रकार सरसकट मुस्लिम विचारवंत करताना दिसतील. पण त्यांच्याप्रमाणे हिंदू समाजात चिकित्सेला प्रतिबंध नसल्याने उघड चर्चा होऊ शकते. मतभेद वा प्रतिवाद दडपला जात नाही. मतभिन्नता दर्शवणार्‍याचा सलमान रश्दी वा तस्लिमा नसरिन केली जात नाही. म्हणूनच मला प्रबोधनकार किंवा बाळासाहेब यांची मते पटली नाहीत, तर ती मी मांडू शकत असतो. ती ऐकण्याची क्षमता अगदी ठाकरे यांच्यातही असते. पण तेवढी सहिष्णूता किती मुस्लिम दाखवू शकतील? ज्याला तर्कशास्त्र म्हणतात, बुद्धीवाद व विवेकबुद्धी म्हणतात, त्यानुसार इस्लामी धर्मशास्त्र किंवा धर्मग्रंथांची चिकित्सा होऊ शकली आहे काय? तसे कुठे झाले असेल तर त्यावर वर्णवादी ज्यूंचा अपप्रचार असा शिक्का मारायला नौशादभाई मोकळे आहेतच. म्हणजे इस्लामच्या बाबतीत जे कोणी ‘मुस्लिमेतर डॉ. नाईक’ असतात ते वर्णवादी ज्य़ु असतात. मला त्या आक्षेपाची खात्री आहेच, म्हणुन तर मी या एकूण लेखमालेमध्ये कुठल्याही मुस्लिमेतर विचारवंत किंवा तत्ववेत्त्याचे संदर्भ घेण्याचे मोठ्या कटाक्षाने टाळले आहे. मागली पाच वर्षे मुद्दाम इस्लाम व मुस्लिम संबंधाने विविध मुस्लिम विचारवंतांनी इस्लामवरील टिकेला दिलेली उत्तरे व स्पष्टीकरणे, यांचाच जास्त अभ्यास केला आहे. आपल्याकडून अन्याय होऊ नये यासाठी अशी काळजी घ्यावीच लागते.    ( क्रमश:)
भाग  ( ५४ )   ९/१०/१२

२ टिप्पण्या:

  1. विषयावर प्रतिवाद करता आला नाही तर वैक्तिक चिखलफेक करून बामनवादी कशी दिशाभूल करतात याचे उदाहरण म्हणजे भाऊ तोरसेकर यांचा हा लेख आहे. नंगाट एम.एफ. हुसैनच्या आम्हीही विरोधात आहोत. 'सरकार' म्हणजे फक्त केंद्र सरकार नव्हे तर न्याय्व्य्पालीका, कार्यपालिका, पोलीस आणि राजकारणी अशी एकंदर संपूर्ण व्यवस्था या अर्थाने मी ''सरकार'' हा शब्द वापरला होता. अगदी शासकीय फर्मान काढून हुसैनला हाकलले नसले तरी त्याला पुरेशी सुरक्षा नादेता जगणे हराम करून या व्यवस्थेने त्याला एकप्रकारे हाकाललेच आहे. त्यामुळे मी दिशाभूल केलेली नसून भाऊच dhulfek करत आहेत. आजच्या लेखात तर त्यांनी ''ध' चा ''मा'' करुन्माझ्या एका वाक्याचा विपर्यास्त करून आपली पेशवाई मानसिकता सिद्ध केली आहे. अशा माणसाच्या विचारांना (?) किती गांभीर्याने घ्यायचे ते वाचकांनीच ठरवायचे आहे.

    प्रत्युत्तर द्याहटवा
  2. Wah! Naushadji.I have carefully read the article.I do not see any personal reference.And your Bamanwadi words shows your true colours.

    प्रत्युत्तर द्याहटवा