सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१३

मोदी दंगलीबद्दल माफ़ी का मागत नाहीत?


  अशा प्रकारे आपली कडव्या हिंदू नेत्याची प्रतिमा उभी राहिली, तर आघाडीच्या राजकारणात अन्य पक्ष सोबत येणार नाहीत व आपल्याला विरोध करतील; हा धोका मोदींनाही कळत होता व कळतो आहे. पण त्यांना आघाडीचे राजकारण करायचेच नसेल तर त्यांनी मित्रपक्षांची पर्वा कशाला करायची? त्यांना भाजपावरच कब्जा मिळवायचा असेल आणि त्यात पक्षातलेच प्रतिस्पर्धी आडवे येत असतील तर? म्हणूनच पाच वर्षापुर्वी राजनाथ सिंग पक्षाध्यक्ष झाले; तेव्हा त्यांनी मोदीसारख्या लोकप्रिय नेत्याला राष्ट्रीय कार्यकारीणीतून वगळले होते. कुठल्याही अधिकृत राष्ट्रीय संघटनेमध्ये मोदींना महत्वाची भूमिका पक्षाने नाकारली होती. कारण हा महत्वाकांक्षी माणूस दिल्लीत आल्यास आपल्या डोक्यावर चढून बसेल; याची दिल्लीतल्या ‘श्रेष्ठींनाही’ पुरेपुर कल्पना होती. सेक्युलर पक्ष, विचारवंत व माध्यमांना मोदी नको होते, त्यापेक्षा अधिक भाजपामधल्याच बड्य़ा लोकांना मोदी नको होते. कारण कानामागून आलेला नवखा राजकारणी तिखट होत चालला होता. जोवर दंगलीचे आरोप मोदी यांच्यावर होत राहिले व खटल्यांसह चौकशांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागलेला होता; तोपर्यंत भाजपाचे नेते उपकार केल्याप्रमाणे मोदींची अनिच्छेने पाठराखण करताना दिसत होते. पण मन:पुर्वक कोणी मोदींचे समर्थन केले, असे कधीच दिसले नाही. उलट पदोपदी मोदी हा भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणावरचा बोजा आहे; असे दाखवायची कुठलीही संधी भाजपाच्या दिल्लीतील राष्ट्रीय नेत्यांनी सोडली नाही. मोहिमा चालवा, आंदोलन करा व संघटनात्मक कामाचे ओझे उचला; याचा कंटाळा असलेले ऐदी लोक आज भाजपाचे श्रेष्ठी बनलेले आहेत. त्यांना मोदीसारखे आक्रमक नेतृत्व किंवा राजकारण नको आहे. सरकार कुठलेही असो, त्याने विरोधातल्या भाजपाच्या नेत्यांचे आर्थिक व व्यावसायिक हित जपावे एवढीच; अपेक्षा असलेले हे लोक आहेत. त्यांना सत्तेच्या स्पर्धेत ओढून कामाला जुंपणारा कोणी नको आहे. त्यामुळेच मोदींच्या दिल्लीत येण्यास तिथे बसलेले बहुतांश नेते विरोधातच होते. पण सेक्युलर मंडळी मात्र मोदींची पाठ सोडायला तयार नव्हती. भाजपाला देशभर बदनाम करण्यासाठी त्यांनी मोदीचा गवगवा चालूच ठेवला होता. मोदींना शिक्षा झालीच पाहिजे, मोदींनी माफ़ी मागितलीच पाहिजे, मोदी म्हणजेच हिंदू आक्रमकता, हिंदु दहशतवाद ही विशेषणे चिकटवली जात असताना, आपण अनवधानाने मोदींना देशाच्या कानाकोपर्‍यात घेऊन जातो आहोत, त्यांची कडवा हिंदू नेता अशी आयती प्रतिमा निर्माण करून देत आहोत; याचे भान सेक्युलर मंडळींनी अजिबात ठेवले नाही.

   यातला एक भाग समजून घेण्याची गरज आहे. भाजपा कितीही हिंदूत्ववादी असला तरी कायद्याचे साखळदंड पायात असल्याने; धर्माच्या नावावर हिंदू मताचा जोगवा तो मागू शकत नाही आणि मोदीसुद्धा तसे करू शकत नाहीत. पण जो अपप्रचार झाला, त्यातुन जी कडव्या हिंदू नेत्याची प्रतिमा निर्माण झाली, तिने कडव्या हिंदूत्ववादी लोकांना नेता घरबसल्या मिळवून दिला. मोदी यांना मतांचा जोगवा मागताना, आता हिंदू हा शब्दही बोलायची गरज उरलेली नाही. त्यांचे काम सेक्युलर पक्ष व माध्यमांनी सोपे करून टाकले आहे. या देशातला बहूसंख्य हिंदू, धर्मासाठी मतदान करणार नाही, यात शंका घेण्याचे अजिबात कारण नाही. पण त्यातला काही अंशी म्हणजे दहा पंधरा टक्के तर हिंदू तसा असु शकतो ना? त्याला असा नेता हवा असू शकतो ना? पण सत्ता हाती येण्यासाठी बहुतांश भाजपा नेत्यांनी व पक्षाने हिंदूत्वाचा मुद्दा सोडून दिल्यामुळे असा हिंदू भाजपावर नाराज झाला होता. त्या्चा कडव्या हिंदू नेत्याचा शोध मात्र चालू होता. त्याच्या या शोधकामात सेक्युलर लोकांनी अमूल्य हातभार लावला. अधिक शोध न घेता घरबसल्या अशा कडव्या हिंदूला मोदी यांच्या कडव्या हिंदूत्वाचे दाखले सेक्युलर माध्यमांनी आणून दिलेच. पण सत्ता हाती असली तर हा माणूस किती ‘कठोर’ वागू शकतो, त्याची रसभरीत वर्णनेही ऐकवली. ज्या गोष्टी मोदी उघडपणे बोलायला धजावणार नाहीत, इतक्या स्फ़ोटक प्रक्षोभक गोष्टी सेक्युलर लोकांनी हिंदूंच्या मनात भरवल्या. अर्थात त्या सेक्युलरांना मोदींचे कौतुक करायचे नव्हते; तर मोदींच्या हिंदूत्वाचे भय घालून मुस्लिमांना कॉग्रेस वा अन्य सेक्युलर पक्षांच्या दावणीला आणून बांधायचे होते. पण अशा प्रचाराचा साईड इफ़ेक्ट मोदी यांच्या पथ्यावर पडला. आणि तो बघायचा असेल तर तटस्थपणे बघावा लागतो, दिसू शकतो. परवा ‘टाईम्स नाऊ’ वाहिनीवर चर्चेत भाग घेताना ब्रिटीश संसदेतले लॉर्ड मेघनाद देसाई यांनी त्यावरच नेमके बोट ठेवले, पण त्याच चर्चेत सहभागी झालेल्या अनेक सहकार्‍यांच्या डोक्यात मात्र प्रकाश पडू शकला नाही.

   अर्णब गोस्वामी हा संयोजक मोदींच्या पंतप्रधानकीच्या शक्यतेवर चर्चा घडवून आणत होता. तेव्हा मोदींनी घडल्या दंगलीबद्दल माफ़ी मागितली तर त्यांच्या बाबतीतले बनलेले विरोधी मत बदलू शकते असा त्याचा दावा होता. तो खोडून काढताना मेघनाद म्हणाले, त्यामुळे इथेच बसलेले किती विरोधक मोदींना माफ़ करतील विचारा. प्रत्येकजण म्हणाला माफ़ करणार नाही. मग मेघनाद उत्तरले; हेच तर मोदीच्या आडमुठेपणाचे कारण आहे. यांच्यासाठी माफ़ी मागायची, त्याचा कुठलाही लाभ नाही. पण यांच्यापलिकडे असा मोठा मोदी चहातावर्ग आहे, ज्याला मोदीच्या आक्रमक हिंदूत्वाचे कौतुक आहे आणि मोदींनी माफ़ी मागू नये, असा त्यांचा आग्रह आहे. मोदींनी माफ़ी मागितली तर तोच पाठीराखा नाराज होईल. म्हणजे माफ़ी मागून काय होणार? विरोधक आहेत, त्यांचे मतपरिवर्तन होणार नाहीच. पण चहाते आहेत ते मात्र नाराज होतील. मग मोदीने माफ़ी कशाला मागायची? स्वत:चा राजकीय तोटा त्याने कशाला करून घ्यायचा? मोदी हा निवडणूकीच्या म्हणजेच मतांच्या राजकारणात आहे आणि त्याला मतांची फ़िकीर केली पाहिजे. त्यामुळेच त्याला मत देतील, त्यांच्या भावना जपायला हव्यात. असा जो देशभर वर्ग तयार झाला आहे, त्याला आक्रमक, निष्ठूर, कठोर मोदी आवडत असेल, तर तो दंगलीबद्दल माफ़ी कशाला मागणार? आपली हक्काची मते कशाला गमावणार? मोदीचा जो देशव्यापी हिंदूत्ववादी मतदारसंघ तयार झाला आहे, त्याला हवा तसाच आक्रमक मोदी राहिला तर ती मते मिळणार आहेत. पण त्याने आपला चेहरा सौम्य, उदारमतवादी बनवल्याने ही मते गमवावी लागतील. पण सेक्युलर मते मात्र त्याच्याकडे वळणार नाहीत. अगदी माफ़ी मागितली म्हणून त्याला मुस्लिमांची भरघोस मतेही मिळण्याची शक्यता नाही. आणि म्हणूनच कुठल्याही स्थितीत माफ़ी मागणार नाही, असा हट्ट मोदी धरून बसला आहे. मेघनाद देसाई यांचे हे विश्लेषण नेमके व नेटके आहे. मुठभर सेक्युलर जे कधीच मोदीला माफ़ करणार नाहीत, त्यांच्या खुशीसाठी मोदींनी आपल्या हुकूमी मतदाराला तिलांजली द्यायची काय?

   मोदी हा माणुस किती धुर्त व सावध आहे त्याचा पत्ता यातून लागतो. त्याच्यासाठी सेक्युलर माध्यमांनी मोठ्या खुबीने अनेक वर्षे सापळा लावला आहे. पण तो त्यात अडकायला तयारच नाही. जेव्हा गुजरातची दंगल झाली, त्यानंतर सेक्युलर मंडळींना खुश करण्यासाठी पंतप्रधान अटलविहारी वजपेयी यांनी मोदी यांना ‘राजधर्म’ शिकवला होता, त्यामुळे भाजपाची प्रतिमा सेक्युलर वा सर्वसमावेशक होऊ शकली का? मोदी व गुजरातसाठी देशभर भाजपाच्या विरोधातला प्रचार चालुच राहिला ना? म्हणजे कितीही सेक्युलर चेहरा मुखवटा लावला, तरी भाजपावरचा हिंदूत्वाचा शिक्का पुसला जाणार नसेल तर ते नाटक करायचे तरी कशाला? त्यातून सेक्युलर वा मुस्लिम तुमच्या वाट्याला येत नाहीत. पण जे हिंदुत्वासाठी तुमच्या मागे आलेले आहेत, ते मात्र नाराज होऊन बाजूला पडतात. म्हणजेच सर्वसमावेशक चेहरा असा जो सापळा माध्यमे वापरतात, त्यात अडकणे हा शुद्ध मुर्खपणाच नाही काय? वाजपेयी यांच्यासह अडवाणी सुद्धा त्यात अनेकदा अडकलेले आहेत. पण मोदी मोठा चतुर व धुर्त माणूस आहे, तो असे सगळे प्रयत्न उधळून लावून आपल्या भूमिकेवर ठाम उभा आहे. त्याने स्वत:ला सेक्युलर सिद्ध करण्यास ठामपणे प्रत्येकवेळी साफ़ नकार दिला आहे. त्यातून आपल्या विरोधकांना व सेक्युलरांना स्वत:वर हिंदूत्वाचे सतत आरोप करण्याचीही भरपूर संधी दिलेली आहे. त्यातून आपली कडवा हिंदूत्ववादी अशी प्रतिमा तयार करून घेतली आहे. अगदी परवा अफ़जल गुरूला फ़ाशी दिल्यावर सेक्युलर माध्यमांची भाषाही बोलकी होती. एका फ़ाशीतून कॉग्रेसने ‘मोदी इफ़ेक्ट’ पुसून टाकला. पुसून टाकला तो मोदी इफ़ेक्ट म्हणजे तरी नेमके काय ते सांगाल की नाही? मोदी इफ़ेक्ट त्या फ़ाशीने पुसला गेला असेल तर तत्पुर्वी तो कसला इफ़ेक्ट होता, ते कोणी सांगायचे? ज्याला धर्मांध वा भगवा दहशतवादी असा लोकांसमोर दहा वर्षे सेक्युलर पक्ष व माध्यमांनी पेश केला, त्याचा कशावर, कुणावर, कसला इफ़ेक्ट होता, तो पुसण्यासाठी त्या बिचार्‍या अफ़जल गुरूला फ़ासावर का जावे लागले?( क्रमश:)
 भाग   ( ८३ )    १२/२/१३

३ टिप्पण्या:

  1. भाजपा कितीही हिंदूत्ववादी असला तरी कायद्याचे साखळदंड पायात असल्याने; धर्माच्या नावावर हिंदू मताचा जोगवा तो मागू शकत नाही आणि मोदीसुद्धा तसे करू शकत नाहीत. पण जो अपप्रचार झाला, त्यातुन जी कडव्या हिंदू नेत्याची प्रतिमा निर्माण झाली, तिने कडव्या हिंदूत्ववादी लोकांना नेता घरबसल्या मिळवून दिला. मोदी यांना मतांचा जोगवा मागताना, आता हिंदू हा शब्दही बोलायची गरज उरलेली नाही. त्यांचे काम सेक्युलर पक्ष व माध्यमांनी सोपे करून टाकले आहे. 

    उत्तर द्याहटवा