मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१३

कॉग्रेस मोदी इफ़ेक्टला का घाबरली आहे?
   शनिवारी अफ़जल गुरूला फ़ाशी दिल्यावर सोमवारी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी थाटात पत्रकार परिषद घेतली होती. आपण फ़ार मोठी बाजी मारली असे त्यांना दाखवायचे ठरलेले असावे. जयपूर येथील भाषणात भगवा दहशतवाद बोलून जी गडबड झाली होती, तिची सावरासावर करण्यासाठी बिचार्‍या अफ़जल गुरूचा बळी घेतला गेला. त्याचे श्रेय घेण्यासाठीच ही पत्रकार परिषद होती. पण दुर्दैव कसे बघा, ज्या्ला झुरळ म्हणून झटकून टाकायचा प्रयत्न होतोय, ते अधिकच अंगाला येऊन चिकटावे; तशी कॉग्रेसची अवस्था झालेली आहे. कारण गुरूच्या फ़ाशीचे कौतुक सांगायला घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या तोंडावरच यासिन मलिकचे प्रकरण येऊन आपटले. काश्मिरातील फ़ुटीरवादी गटाचा एक नेता यासिन मलिक याला पाकिस्तानात जाण्याची खास मुभा गृहखात्यानेच सवलत म्हणून दिली आणि तिकडे जाऊन त्याने कोणाची भेट घेतली? तर मुंबई हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार हफ़ीज़ सईद याची. ज्या सईदने भगव्या दहशतवादाचा आरोप केल्याबद्दल शिंदे यांचे आभिनंदन केले होते, त्यालाच हा यासिन भेटल्याचे प्रकरण शिंदे यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळीच उघडकीस आले आणि त्याचे उत्तर टाळून त्यांना पत्रकारांचा ससेमिरा टाळायची वेळ आली. आपण गृहमंत्री म्हणून कठोर निर्णय घेऊ शकतो; असेच सांगायला पत्रकारांपुढे आलेल्या शिंदे यांना यासीनच्या विषयावर मौन पाळायची पाळी आली. मात्र त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी जयपूरच्या भगवा दहशतवाद आरोपाचा गुरूच्या फ़ाशीशी संबंध नसल्याचा दावाही केला. पण अशी तडकाफ़डकी फ़ाशी का दिली; याचा खुलासा मात्र कोणाकडेच नाही. आणि वाहिन्यांपासून सगळी सेक्युलर माध्यमे तर अफ़जलच्या फ़ाशीने मोदी इफ़ेक्ट संपवला असे दावे केले आहेत. ते खरे असतील तर मोदी इफ़ेक्ट ही कॉग्रेससाठी चिंतेची बाब झाली आहे याची निदान माध्यमे तरी कबुली देत आहेत, हे मान्यच करायला हवे ना?

   इफ़ेक्ट याचा अर्थ मोदींचा प्रभाव ना? तो कोणावर कसला प्रभाव आहे? दिल्लीतल्या एका कॉलेजमधल्या भाषणाने मोदींचा प्रभाव निर्मा्ण होऊ शकत नाही आणि मतचाचण्याचा कौल घेण्यात आला, तो त्या भाषणाच्या दोन आठवडे आधी घेण्यात आलेला आहे. तेव्हा मोदी इफ़ेक्टच असेल तर तो गुजरातच्या निवडणुक निकालाचा किंवा त्याच्याही आधीपासूनचा असला पाहिजे. असेल तर मग तो कसा आला? कुठून, कशामुळे निर्माण झाला याचेही उत्तर माध्यमांनी द्यायला नको का? जो माणूस गुजरातमध्ये मुस्लिमांच्या विरोधात दंगली घडवून आणतो; असा आरोप गेली दहा वर्षे चालू आहे व त्यामुळेच भाजपाला भारतभर मुस्लिमांची मते मिळणार नाही; असेही सांगितले जात आहे. ज्याने गेल्या तीन निवडणुका जिंकताना गुजरातमध्ये मुस्लिम मतांची फ़िकीर केलेली नाही वा मुस्लिम उमेदवार पक्षातर्फ़े उभा करण्याचीही गरज समजलेली नाही; त्याचा देशाच्या लोकमतावर कसला इफ़ेक्ट म्हणजे प्रभाव असतो? ते लोकमत म्हणजे कोण लोक? असे अनेक प्रश्न आहेत. जो इफ़ेक्ट अफ़जलच्या फ़ाशीमुळे संपुष्टात आला, असा माध्यमांचा दावा आहे तो इफ़ेक्ट मुस्लिम लोकमतावरचा नक्कीच नाही. मोदी यांना मुस्लिमांचा शत्रू म्हणून गेली दहा वर्षे रंगवण्यात आलेले आहे, तेव्हा त्यांचा मुस्लिम मतांवर प्रभाव नसेल तर तो मुस्लिमांबद्दल शंका ज्यांच्या मनात आहेत,; त्यांच्यावरचा प्रभावच असणार ना? आणि तो कमी करायचा तर मुस्लिमांबद्दल ज्यांच्या मनात शंका आहेत, त्यांना खुश करण्याचाच प्रयास असणार ना? मग गृहमंत्री वा युपीए-कॉग्रेस सरकारने मुस्लिमांबद्दल शंका असणार्‍या मतदाराला खुश करण्यासाठी अफ़जल गुरूला फ़ाशी दिले काय? मोदींचा प्रभाव त्याच वर्गावर होता आणि तोच कमी करण्यासाठी कॉग्रेसने गुरूला फ़ाशी दिले; याचा अर्थच कॉग्रेस मुस्लिम विरोधी कडव्या हिंदूंना चुचकारण्याचा उद्योग करते आहे काय? तसे कुठली वाहिनी वा संपादक पत्रकार खुलेआम का सांगत नाही? मोदी इफ़ेक्ट संपवणे याचा अर्थच, कडव्या हिंदूंना चुचकारण्यासाठी कॉग्रेसने अफ़जल गुरू याला फ़ासावर लटकवले असे स्पष्ट का सांगितले जात नाही? त्यात कॉग्रेस हिंदूत्ववादी वा धर्माच्या आधारे मते मिळवू बघते; असा आरोप होईल ना? म्हणून ही पळवाट. मोदींच्या प्रभावाखालच्या कडव्या हिंदूंना आपणही मुस्लिमांच्या भावनांची पर्वा करीत नाही; असे दाखवण्यासाठीच अफ़जलला तडकाफ़डकी फ़ाशी देण्यात आली, हे निखळ सत्य आहे आणि ते स्पष्ट शब्दात सांगायचे नाही; म्हणून मोदी इफ़ेक्ट वगैरे अशी दिशाभूल करणरी भाषा वापरली जात आहे.

   अफ़जलच्या फ़ाशीमुळे मोदी इफ़ेक्ट संपल्याची ही भाषा, मोदी यांच्यासाठी हिंदू व्होटबॅन्क तयार होत असल्याची कबूली नाही काय? ती कशी व कोणती ते आपण नंतर बघू. पण मोदी इफ़ेक्टची. म्हणजे आज कॉग्रेसला भिती वाटू लागली आहे ती भाजपाची वा मोदी भाजपाचे उमेदवार होतील याची नसून; हिंदू व्होटबॅन्क तयार होत असल्याची भिती आहे. व्होटबॅन्क म्हणजे साध्या भाषेत हिंदू मतांचा गठ्ठा होय. सर्वसाधारणपणे मुस्लिम कुठल्या तरी बाजूला एक गठ्ठा मतदान करतात व त्यानुसार निवडणूक निकालाचे पारडे झुकते, असे आपल्याकडे मानले जाते. हे राजकीय पक्षांनी व सेक्युलर माध्यमांनी इतके मनावर घेतलेले आहे, की त्याचे भुतच राजकीय नेत्यांच्या मानगुटीवर बसलेले आहे. म्हणूनच एनडीएमध्ये असूनही नितीशकुमार मोदी यांना कडवा विरोध करीत असतात. बिहारमध्ये वीस टक्क्याहून अधिक मुस्लिम लोकसंख्या आहे आणि त्याच पाठींब्यावर आपण सत्तेवर बसलो आहोत, अशी त्यांची समजूत आहे. तीच कथा बंगालमध्ये ममता किंवा कॉग्रेस व डाव्यांची आहे. करण तिथे सत्तावीस टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे असे मानले जाते. जिथे म्हणून मुस्लिम लोकसंख्या मोठी आहे; तिथे त्यांच्या कलाने राजकीय पक्ष हलतात व डोलतात, हे आपल्याकडल्या राजकारणाचे सर्वमान्य विश्लेषण आहे. त्यामुळेच मोदी म्हणजे एकगठ्ठा मुस्लिमांचा विरोध असे गृहीत आहे. ते फ़ारसे चुकीचे म्हणता येणार नाही. पण असे समिकरण मांडतात, त्यांना एका गोष्टीचा साफ़ विसर पडतो, की मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांचे वजन जोपर्यंत दुसर्‍या बाजूला हिंदू मतांचा गठ्ठा नाही, तोपर्यंतच राहू शकते. गुजरातमध्ये मुस्लिमांची एकूण लोकसंख्या तुलनेने कमीच आहे. साधारणपणे दहा टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. तिच्या अन्यायाचे डंके पिटताना हिंदू समाज इतका दुखावला गेला, की मोदी यांनी त्याच्या्च जखमेवर फ़ुंकर घालण्यात आपले राजकीय समिकरण उभे केले. त्यामुळेच मोदी यांनी इतकी बदनामी व कोर्ट खटले झेलत तीन वेळा विधानसभा जिंकून दाखवली आहे.

   गेल्या तीन निवडणूकात कॉग्रेसही गुजरातमध्ये हिंदूत्वाकदे झुकत चालल्याचे दिसून येते. २००२ च्या निवडणूकीत दंगलीचे भांडवल करणार्‍या कॉग्रेसने १७ मुस्लिम उमेदवार उभे केले होते. पाच वर्षांनी ती संख्या ११ पर्यंत खाली आली आणि यावर्षी तर ती आठपर्यंत खाली आलेली आहे. तेवढेच नाही. कॉग्रेसने यावर्षी गुजरातच्या निवडणूकीत कोणी मोठा मुस्लिम नेताही गुजरातमध्ये प्रचाराला येऊ दिला नाही. उलट मोदी यांची बाब आहे, त्यांनी आपल्यावरचा मुस्लिम विरोधी हा शिक्का पुसण्याचे प्रयत्न अजिबात केला नाही. उलट एकही उमेदवार मुस्लिम उभा केला नाही. तरीही त्यांनी बहुमतापेक्षा अधिक जागा जिंकून दाखवल्या. अगदी तोगडीया व केशूभाई असे जुने सहकारी विरोधात असतानाही त्यांनी यशस्वीरित्या बहूमत मिळवून दाखवले आहे. त्यासाठी त्यांनी गुजराती अस्मिता असा शब्द वापरला असला तरी, त्यामागचा खरा चेहरा हिंदूत्वाचाच आहे. त्यांनी कुठेही प्रचारात हिंदूत्वाचा उल्लेख केला नाही. पण त्याची गरजच नव्हती. त्यांचे विरोधक व माध्यमे अखंड त्यांच्या हिंदुत्वाचा झेंडा फ़डकावत ठेवत असल्यावर मोदींना आपल्या हिंदू मतदाराला तसे उघडपणे सांगायची गरजच काय? पण कृतीतून बघितले तर त्यांनी आपण मुस्लिमांच्या गठ्ठा मतांवर हिंदू गठ्ठा मतांनी मात करू शकतो, असा सिद्धांतच गुजरात राज्यात यशास्वी करून दाखवला आहे. हे गठ्ठा मतांचे गणित केवळ मुस्लिमच वापरू शकतात असे नाही; तर हिंदूंचा धुर्त नेताही यशस्वीरित्या वापरु शकतो; हेच मोदींनी मागल्या तीन निवडणूकीत दाखवून दिले आहे. आणि त्याचाच अखिल भारतीय प्रयोग करायची सज्ज्ता हा माणू्स  गेली तीनचार वर्षे करत होता. आज मतचाचण्यांपधून जे आकडे समोर येतात, त्याची पद्धतशीर तयारी मोदी यांनी आधीपासून केली आहे. मोदी इफ़ेक्ट असे म्हटले जाते ते दुसरेतिसरे काही नसून हिंदू मतांच्या गठ्ठ्याचेच राजकारण आहे. हे कॉग्रेस सारख्या अनुभवी पक्षाला व नेत्यांना कळू शकते. भाजपानेते किंवा पत्रकारांना त्याचा थांग लागलेला नसला तरी निवडणूका जिंकण्यासाठी वेगवेगळे डावपेच खेळण्यात हयात गेलेल्या कॉग्रेस नेत्यांना येऊ घातलेला धोका कळतो आहे. कारण मोदी म्हणजे भाजपा नव्हे तर आपल्या मुस्लिम व्होटबॅन्केला धक्का देऊ शकणारी हिंदू व्होटबॅन्क; हे आता कॉग्रेसच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच मोदी यांच्या जादूभोवती जमू लागलेला तोच हिंदू मतांचा गठ्ठा विचलित करायचे राजकारण अफ़जल गुरूच्या फ़ाशीतून खेळले गेले. त्यातून मोदी इफ़ेक्ट पुसण्याचा प्रयास झाला. तो कितीसा पुसला गेला हे नजीकच्या काळात दिसेल. कारण फ़ाशीच्या तिसर्‍या दिवशीच यासिन मलिकच्या सईद भेटीने फ़ाशीवर पाणी ओतले आहे. ते बाजूला ठेवून आपण आधी हिंदू मतांचा गठ्ठा म्हणजे काय ते समजून घेऊ. ( क्रमश:)
 भाग   ( ८४ )    १३/२/१३

1 टिप्पणी:

  1. Congress Hindu matey viskalit ahet mhanun rajya karu shakat hoti.Tee matey ekatra hot ahet mhanun Congressne Afjal Guru la fashi dile. Anyatha tyala jailmadhye basavun varshoganati Biryani ani mutton khau ghatle asate.

    प्रत्युत्तर द्याहटवा