प्रत्येक युद्ध वा खेळाचे काही नियम असतात, तसेच त्याचे स्वत:चे असे तर्कशास्त्र असते. तसेच शासन व्यवस्था वा प्रशासनाचे किंवा अगदी अराजकाचे सुद्धा आपले असे एक तर्कशास्त्र असते. त्याच्या आधारेच त्याचा गाभा समजून घेता येतो. एका विषयातले तर्कशास्त्र वापरून दुसर्या विषयातले तर्कशास्त्रच मुळात समजून घेता येत नसते. मग तो विषय समजणे खुपच दुरची गोष्ट झाली. म्हणजे असे, की क्रिकेटचा जो खेळ आहे, त्यामध्ये अनेक नियम व त्याचे तर्क आहेत. त्यात तुम्ही हॉकी वा बेसबॉल अशा खेळांचे तर्क वा नियम लावून काहीही करू शकत नसता. युद्ध, दहशतवाद किंवा अराजक व दंगल सुद्धा अत्यंत वेगवेगळे विषय आहेत. त्यांचे आपले आपले तर्कशास्त्र आहे. एकाचे तर्कशास्त्र दुसर्याला लावले तर विचका होऊन जात असतो. दिल्लीतल्या किंवा गुजरात, मुंबईच्या दंगलींना दहशतवाद ठरवणे म्हणूनच मुर्खपणा असतो. दुसरीकडे नक्षलवाद, माओवाद यांची तुलना जिहादशी करणेही अत्यंत मुर्खासारखा युक्तीवाद असतो. साधी गोष्ट घ्या नक्षलवाद आपल्या देशात जिहादी घातपात सुरू होण्याच्या खुप आधीपासून धुमाकुळ घालतो आहे. पण नक्षलवादी अथवा माओवाद्यांनी कधी आपल्या प्रभावक्षेत्राबाहेर जाऊन घातपात किंवा हिसाचार केलेला आढळणार नाही. ते लोकांमध्ये वा जनतेमध्ये घबराट माजवतात. पण तेवढ्यावर समाधान मानत नाहीत. तर जो काही आटोपशीर प्रदेश परिसर असेल; तिथे आपली हुकूमत प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयास असतो. पोलिस वा प्रशासन यांचे कायदे नाकारून हे लोक आपली सत्ता त्या मर्यादित प्रदेशात राबवायचा प्रयत्न करतात. प्रसंगी पोलिस वा शासनाच्या सेनेशी दोन हातही करतात. पण आपल्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर जाऊन अकारण कुठल्याही लोकसंख्येला भयभीत करायचा वा हकनाक हत्या करण्याचा प्रकार माओवाद्यांकडून होताना आपल्याला दिसणार नाही. बंगाल, ओरिसा, बिहार, छत्तीसगड वा झारखंडाच्या विविध भागात अनेक तालुके नक्षलप्रभावित मानले जातात. तिथे सत्ता व हुकूमत त्यांची असते. पोलिस वा सरकारशी सहकार्य करायलाही स्थानिक लोक घाबरतात. पण त्यातले कोणी माओवादी दिल्ली वा मुंबईत येऊन मोठी घातपाती घटना घडवत नाहीत. कारण त्यांचे प्रभावक्षेत्र म्हणजे आपण भारत सरकारच्या हुकूमती खालून मुक्त केलेला स्वतंत्र प्रदेश; अशी त्यांची कल्पना आहे. पण तसे कधी जिहादी घातपातामध्ये घडलेले दिसणार नाही. जिहादी मंडळी शक्य तेवढ्या लोकांना हकनाक मारून मोठ्या लोकसंख्येच्या मनात दहशत निर्माण करायला उत्सुक असतात. त्यात आपला संशय सुद्धा येऊ नये याची काळजी घेतात. त्या घटनेचे धागेदोरे सापडू नयेत याचीही काळजी घेतात. असा मोठा फ़रक दोन्ही बाजूंमध्ये दिसेल. जिहादचे टोक नेमके उलटे आहे.
जिथे आपल्याला लगेच सत्ता प्रस्थापित करायची नाही, तर लोकांच्या मनात प्रस्थापित सरकार व सत्ता यांच्या हुकूमतीबद्दल शंका निर्माण करून कायद्यावरील विश्वास उध्वस्त करण्यातून अराजकाची स्थिती निर्माण करायची; अशी जिहादी भूमिका दिसून येईल. अमूक प्रदेशात सत्ता प्रस्थापित करणे, तिथला कारभार चालवण्यासाठी प्रशासकिय व्यवस्था निर्माण करणे; असे काही जिहादी करताना दिसणार नाहीत. मग विषय काश्मिरचा असो, सिरिया वा मुंबईचा असो. शक्य तिथे अराजक निर्माण करण्याचाच उद्योग चालू असलेला दिसेल. उल्फ़ा किंवा तामिळी वाघांची कहाणी अजून वेगळी आहे. त्यांना आपापल्या प्रदेशात सार्वभौम वेगळे राज्य व राष्ट्र हवे अशी भुमिका दिसेल. म्हणूनच ज्या भूमीशी निगडीत त्यांच्या मागण्या आहेत व त्याच्या आड येणारी सत्ता आहे त्यांच्याशीच संघर्ष करताना असे दहशतवादी दिसतील. श्रीलंका व तामिळनाडू अशा मर्यादेत वाघांचा धुडगुस चालू राहिला. तर उल्फ़ा, बोडो यांच्या कारवाया इशान्य भारतापुरत्या मर्यादित आढळतील. पण जिहादी घातपाताचे प्रकार या सर्वापेक्षा एकदम वेगळे दिसतील. असे घातपात करणार्यांना काय साधायचे आहे; तेच आपल्याला लक्षात येत नाही. आता ताजी हैद्राबादची घटना घ्या. त्यात जे मारले गेले वा जखमी झाले, त्यांच्याशी स्फ़ोट घडवणार्यांचे काही भांडण नव्हते. मग त्यांनी साधले काय? आता जिहाद म्हटल्यावर त्याला धर्माचा रंग दिला जातो असाही आरोप होईल. पण जे मारले जातात, त्यातही काही प्रमाणात मुस्लिमही असतात. मग जो धर्मयुद्ध म्हणून अशी हिंसा करतो, तो मुस्लिमांनाही कशाला मारतो आहे; असाही प्रश्न पडतो ना? माओवादी सरकारी पोलिस व कर्मचार्यांना घातपातातून मारतात. तसे जिहादी हल्ल्यात दिसत नाही. जिहादी कुणाही निरपराधाला समोर सापडला म्हणून जीवे मारतो. पण मग त्यातून साधतो काय? कायद्या विरुद्ध वा सत्तेविरुद्ध त्याची लढाई असेल तर त्याच्या अशा जिहादी हल्ल्यात सहसा कोणी सरकारी नेता, अधिकारी मारला जात नसतो. मग अशा हिंसेतून नेमके काय साध्य करायचे असते, जिहादी दहशतवाद्याला?
म्हणजे समजा आपल्याला नक्षलवादी, माओवाद्यांशी बोलणी करायची असतील तर ते ठराविक आदिवासी, वनवासी जंगलपट्टा वेगळे राज्य वा राष्ट्र हवे अशी मागणी करतील. उल्फ़ा बोडो यांची तशीच मागणी आहे. तामिळी वाघांची तीच मागणी होती. पण काश्मिर वगळता जिहादींची अशी कुठलीच मागणी नाही. मग हैद्राबाद वा मुंबईत स्फ़ोट वा घातपात कशाला केले जातात? काश्मिर देऊन टाकले तर तिथे शांतता नांदणार आहे का? दिर्घकाळ पॅलेस्टाईनचा विषय असाच निकाली काढायचा प्रयत्न झाला. म्हणून तिथला जिहाद संपला आहे काय? एक सार्वभौम नाही तरी स्वयंशासित प्रदेश अशी इस्रायलने पॅलेस्टाईनला मान्यता दिली, तर तिथे दुसरा जिहादी गट उभा राहिला व त्याने त्या समझौत्याला झुगारून इस्रायलवरचे हल्ले चालूच ठेवले. तेवढेच नाही. अराफ़त या जुन्या घातपाती नेत्यालाही झुगारून लावले. हमास व फ़ताह अशा दोन गटातच तुंबळ हिंसाचार सुरू झाला. मग काश्मिरचा प्रश्न नुसत्या भूमीमुळे सुटणार आहे काय? असे अनेक मुद्दे लक्षात घेतले तर समजू शकेल, की मुळातच दहशतवाद ही सत्ता प्रस्थापनेसाठीची युद्ध संकल्पना असून जिहाद ही त्याच्याहीपेक्षा अगदी वेगळी अशी काहीतरी बाब आहे.
इथेच मग अमेरिका किंवा जगभरच्या तमाम सत्ताधीशांची जिहादी दहशतवादाच्या बाबतीत फ़सगत होते. ते अशा दहशतवादाची तुलना अन्य घातपाती हल्ले व कारवायांशी करतात आणि जिहादचा धर्माशी संबंध नाही असा ‘अभ्यासपुर्ण’ दृष्टीकोन बाळगतात. पहिली गोष्ट म्हणजे जिहाद हा पारंरारिक युद्धप्रकार नाही. आणि दुसरी गोष्ट विसाव्या शतकाच्या मध्यानंतर जो दहशतवाद उदयास आला, त्याचेही जिहादी घातपाती भूमिकेशी साम्य साधर्म्य नाही. अमेरिकेने लादेन व तालिबानांना धडा शिकवण्यासाठी दहशतवाद विरोधी युद्धाची घोषणा करून टाकली. पण त्यात त्यांनी जिहादी संकल्पनाच समजून घेतली नव्हती. त्यामुळेच युद्धाच्या पद्धतीने त्यांनी परिस्थिती हाताळताना सगळीकडून मार खाल्ला. त्यांनी प्रत्यक्ष युद्धात मार खाल्ला आहे तर अन्य देशांनी आपापल्या अधिकार क्षेत्रामाध्ये त्याच जिहादी दहशतवादाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समजून हाताळल्याने त्यांचाही त्याबाबतीत पराभवच झाला आहे. कारण जिहाद पारंपारिक युद्ध नाही तसाच पारंपारिक दहशतवाद देखिल नाही. दहशतवाद किंवा युद्ध हे संघटित पातळीवर होत असते. जिहादची कल्पनाच मुळात धर्मातून आलेली असून त्याची प्रेरणाही धर्मच आहे आणि त्याचा पाया अफ़गाणिस्तानात घातला गेला, तो म्हणूनच समजून घ्यावा लागेल. पाकचे तेव्हाचे लष्करशहा जनरल झिया उल हक यांनी अमेरिकेच्या मदतीने या जिहादची उभारणी केली. त्यासाठी जगभरच्या विविध देशातील मुस्लिम धर्मवेड्या तरुणांना त्यात सहभागी करून घेतले. त्याची मूळ संकल्पना त्यांच्याच उत्तेजनाने एका पाक सेनाधिकार्यांनी एका पुस्तकातून मांडलेली आहे. त्या पुस्तकाचे नाव The Quranic Concept of War म्हणजे ‘कुराणातील युद्ध संकल्पना’ असे आहे. त्यात जिहादी युद्धाची प्रेरणा व संकल्पना अत्यंत सुटसुटीत करून मांडलेली आहे. त्यावर झियांनी शिक्कामोर्तबही केले आणि मगच त्याचा जगभर प्रसार व प्रचार झाला आहे. आज आपण अवघ्या जगाला भेडसावणारा जो जिहाद बघतो व अनुभवतो आहोत, तो त्याच प्रेरणेवर चालतो. त्याचे तर्कशास्त्र समजून घेतले तरच त्यावरचे उपाय शोधता येतील. दहशतीचे किती व कसे प्रकार असतात व जिहाद मधून कुठली दहशत साध्य करायची असते ते या पुस्तकात सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते बारकावे आणि मुद्दे समजून घेतले तर लक्षात येऊ शकेल, की आपल्याकडे स्फ़ोटासारख्या घटना घडल्यावर जी पोपटपंची चालते तो निव्वळ मुर्खपणा असतो आणि त्यावरले जे उपाय सुचवले जात असतात; तो त्यापेक्षाही मोठा मुर्खपणा असतो. दहशत हत्यार वा हिंसेने माजवता येत नाही हे त्याचे सुत्र किती चमत्कारिक वाटते ना? ( क्रमश:)
भाग ( ९५ ) २४/२/१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा