बुधवार, २० फेब्रुवारी, २०१३

शरद पवारांनी अन्य कुणाची झोप उडवली का?    या आठवड्यात शरद पवार यांनी आपल्याच पक्षाच्या एका मंत्र्याने मुलामुलीच्या विवाहावर मोठी उधळपट्टी केल्यावर आपली झोप उडाल्याचे वक्तव्य केले आणि सगळीकडे खळबळ माजली आहे. अखेर त्या मंत्र्याने जाहिर माफ़ी मागितली आणि आपल्या त्या शाही विवाह सोहळ्याचा प्रायोजक कोण होता; त्याचे नावही जाहिर करून टाकले आहे. आता त्या ठेकेदार प्रायोजकाच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर खात्याच्या धाडी पडल्या आहेत. शिवाय शरद पवार यांच्या पक्षनिरपेक्ष वृत्तीची जगाला साक्षही मिळालेली आहे. पण यातून कृषिमंत्र्यांना काय साधायचे आहे? शरद पवार हा असा राजकीय नेता आहे, की काहीतरी साध्य करण्यासाठीच ते चाल खेळत असतात. आपल्याच मंत्र्याचा बळी ते उगाच देणार नाहीत. त्यामुळेच राजकारणाचे अभ्यासकही हैराण असतील, की या ज्येष्ठ नेत्याने असा आपल्याच एका निष्ठावान कार्यकर्त्याचा बळी कशाला दिला असेल? तसे बघायला गेल्यास पैशाची उधळपट्टी किंवा दुष्काळाच्या निमित्ताने साधेपणाने जगण्याची शिकवण देण्य़ाच्या खुप संधी अलिकडल्या कालखंडात पवार साहेबांना मिळालेल्या आहेत. पण त्याबद्दल त्यांनी सदोदित मौन पाळलेले आहे. 

      अगदी अलिकडल्या काळातीलच उदाहरण द्यायचे तर पुण्यातील एक वादग्रस्त उद्योजक अविनाश भोसले यांच्या मुलांच्याही शाही विवाह सोहळ्याला किती खर्च झाला होता? तिथे कित्येक पुढारी हजेरी लावून गेले, त्यात पवार नव्हते काय? त्या शाही विवाह सोहळ्यासाठी मुंबई बंगलोर राजरस्त्यावरही वाहतुकीचा काही तास खोळंबा झाल्याच्या बातम्या होत्या. त्यातलीच एक कहाणी वृत्तपत्रांनी अगत्याने दिली व वाहिन्यांनी दाखवली होती. सुप्रियाताई आपल्या (अजित) दादाला अगत्याने फ़ोटोसाठी आग्रह धरतात, त्याची ती बातमी होती. त्या शाही सोहळ्यात किती खर्च झाला होता? त्यातले व्याही राज्याचे एक ज्येष्ठमंत्री पतंगराव कदम होते. त्याबद्दल तर पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचे कोणाच्या ऐकीवात नाही. तत्पुर्वी सिंचन घोटाळा म्हणून जे प्रकरण उजेडात आले, त्यात ज्येष्ठ मंत्री सुनील तटकरे यांच्या मुलाच्या शंभरावर कंपन्या असल्याचे व त्यांनी अफ़ाट माया गोळा केल्याचे चर्चेतले प्रकरण होते, त्याबद्दल झोप उडाल्याचे पवार कधी म्हणाले नाहीत. त्याच सिंचन घोटाळ्याने बरेच राजकारण खेळले गेले, अजितदादांना तडकाफ़डकी राजिनामा द्यावा लागलेला होता. सिंचनाचा दुष्काळाशी थेट संबंध असूनही पवारांची झोप त्या घोटाळ्यातील आकड्यांनी उडवली नाही. इथे महाराष्ट्रात असले मग पवार साहेब गावोगावी फ़िरत असतात; असे अगत्याने सांगितले जाते. त्यांना खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेले भव्यदिव्य वाढदिवसांच्या फ़्लेक्स फ़लकांचे दर्शन कधी झालेच नाही काय? मग त्यातली साधनसंपत्तीची नासाडी त्यांची कधीच झोप विचलित का करू शकली नाही? फ़क्त एका भास्कर जाधवच्या शाही विवाह सोहळ्याने पवार इतके कशाला व्यथित झाले आहेत? इतके की विनाविलंब त्या विवाहाच्या खर्चाची आयकर विभागाकडून छाननी सुरू व्हावी? 

   इथे पवार दुष्काळच नव्हे तर अन्य प्रसंगीही असे श्रीमंतीचे प्रदर्शन मांडू नये, असा दावा करीत आहेत. पण दुस्रीकडे त्यांचेच पुतणे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा मात्र आपल्या मंत्र्यावर बालंट आणले गेल्याच्या भाषेत बोलत आहेत. दुष्काळ कोकणात नाही, ज्या जिल्ह्यात दुष्काळ नाही, तिथल्या लोकांनी सोहळा केल्यास काय बिघडले, अशा थाटाची भाषा अजितदादांनी वापरली आहे. म्हणजेच पवारांची झोप उडाल्याचे बिचार्‍या भास्कर जाधव यांनाच आश्चर्य वाटलेले नाही. खुद्द पवारांच्या पुतण्यालाही काकांचा आवेश लक्षात आलेला दिसत नाही. बाकी कोणाहीपेक्षा अजितदादा आपल्या काकांना खुप चांगले व जवळून ओळखतात; हे नाकारता येणार नाही. तेव्हा दादांनी चुलत्याच्या विधानाला छेद देण्याच्या भाषेत बोलणे चमत्कारिक नाही काय? आपल्या दिर्घकालीन राजकीय जीवनात पवार खरेच पैशाच्या अशा ओंगळवाण्या प्रदर्शनाने विचलित होत राहिले असतील; तर ते सर्वात जास्त त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना माहिती असेल ना? म्हणजेच त्यामागची तात्विक भूमिका अजितदादांना जास्त माहित असायला हवी. मग दादांनी पवार साहेबांच्या आक्षेपाचे जोरात समर्थन करण्याऐवजी त्याचेच खंडन करणारी भूमिका कशाला घ्यावी? कुठेतरी मोठी गडबड नक्कीच आहे. शिवाय नुसते आरोप होताच सरकारची यंत्रणाही कधी नव्हे तो आळस झटकून कामाला लागावी, हा चमत्कारच नाही काय? पवारांचे वागणे असेच नेहमी अनाकलनीय राहिले आहे. की त्यामागेही काही गंभीर राजकारण साहेबांनी खेळलेले आहे? हा सगळा प्रकार कुठून सुरू झाला तेही बघण्यासारखे आहे. कुठल्या समारंभात बोलताना किंवा पत्रकार परिषदेत मतप्रदर्शन करताना पवार साहेबांनी भास्कर जाधव यांना फ़ैलावर घेतलेले नाही. त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये गौप्यस्फ़ोट केल्याप्रमाणे या विषयाला सुरूवात झालेली आहे. शिवाय योगायोगाने घेतलेली मुलाखत वा वार्ताहराला दिलेली ती मुलाखत नाही. एकाच वाहिनीच्या थेट संपादकाला दिलेली मुलाखत आहे, तिथून ह्या विषयाला तोंड फ़ुटलेले आहे. म्हणूनच सगळा विषय अनाकलनीय होऊन जातो. 

   कुठेतरी काका पुतण्यातल्या बेबनावाचे हे राजकारण आहे काय, अशी म्हणूनच शंका येते. कारण इथे नुसत्या एका मंत्र्याच्या मुलांच्या शाही विवाहाचे प्रकरण नाही. त्यातला एक मोठा ठेकेदारही त्यात अडकवला गेला आहे. सहसा अशा विषयात अन्य पक्षांकडून आरोप होतात आणि स्वपक्षीय सहकारी समर्थनाला पुढे सरसावत असतात. अजितदादा किंवा सुनील तटकरे यांच्यावर आरोप झाले; तेव्हा राष्ट्रवादीचे तमाम प्रवक्ते व नेते समर्थनासाठी पुढे आलेले होते. पण आज भास्कर जाधव हा त्यांच्याच पक्षाचा मंत्री एकाकी पडलेला आहे आणि खुद्द पक्षाध्यक्षानेच त्याच्यावर आरोप केल्यासारखी नाराजी व्यक्त केली आहे. मग विनाविलंब त्या प्रकरणाची कायदेशीर चौकशी सुरू झालेली आहे. एकटे उपमुख्यमंत्री अजितदादा काही प्रमाणात भास्कर जाधव यांच्या समर्थनाला पुढे आले असून बहुतांश बाकीचे त्यांच्याच पक्षातले नेते कोणत्याच बाजूने बोलायला तयार नाहीत. हा गोंधळ म्हणायचा काय? कसला गोंधळ आहे? काका पुतण्यांच्या या अजब भांडणात कोणाच्या बाजून उभे रहावे; असा तो गोंधळ आहे काय? म्हणजेच फ़क्त भास्कर जाधव एकाकी पडलेले नाहीत, तर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातील बहूतांश मंडळीच एकाकी पडलेली आहेत. त्यांना काय योग्य म्हणावे आणि काय चुक म्हणावे; त्याचाच अंदाज येत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणूनच घडलेला सगळा प्रकार अधिकच गोंधळात पाडणारा आहे. पवारही सहजगत्या बोलून गेलेले नाहीत; तर मुद्दाम मुलाखत देऊन त्यांनी हा विषय उकरून काढलेला आहे. मग त्यामागे त्यांचा हेतू काय ते शोधण्याची गरज आहे. कारण पवारांची निती कायमच ‘कहीपे निगाहे कहीपे निशाना’ अशीच राहिलेली आहे. मग इथे भास्कर जाधव हाच त्याचा निशाना असेल, असे मानता येत नाही. त्यांची निगाहे व नजर जाधव यांच्या विवाह सोहळ्यावर आहे यात शंकाच नाही. पण त्यांनी नेम कुठे धरलाय, त्याला अधिक महत्व आहे. तो नेम तर जाधव वाटत नाही. ज्याप्रकारे अजितदादांनी काकांचे मतप्रदर्शन खोडून काढायचा प्रयत्न केला, त्यामुळे अजितदादा मात्र जखमी झाल्यासारखे वाटतात. मग प्रश्न असा पडतो, की पवार साहेबांचा निशाणा कोणावर आहे? 

   तसे पाहिल्यास सगळे प्रकरण इतक्या थराला जायला नको होते. कारण जाधव यांनी ज्या ठेकेदाराचे नाव झटपट सांगून टाकले, तो आता गोत्यात आलेला आहे. जाधव यांनी ते नाव झटपट कशाला सांगावे? दुसरी बाब अशी, की हा ठेकेदार खुप जुना कॉग्रेसशी संबंधित आहे आणि यशवंतराव चव्हाणांपासून खुद्द शरद पवार यांच्याही जवळचा मानला जातो. अशा जुन्या सहकार्‍याशी पवार साहेब असे शत्रुवत वागण्याची अजिबात शक्यता नाही. माणसे जोडण्यासाठीच पवारांची ख्याती आहे, ते इतक्या छोट्या प्रसंगातून आपल्या निष्ठावान कार्यकर्ता जाधव आणि आपल्या जुन्या परिचित मित्र ठेकेदाराला गोत्यात आणायची शक्यता अजिबात नाही. शिवाय पवार ज्या स्तरावर काम करतात, त्या पातळीवर हा ठेकेदार किंवा भास्कर जाधव; ही अगदीच क्षुल्लक माणसे आहेत. तेव्हा त्यांचा काटा काढण्यासाठी पवार इतके मोठे गाजणारे नाट्य घडवतील अशी शक्यता जवळपास नगण्य आहे. मग त्यांनी या विषयाला इतके महत्व देण्याचे कारण काय असावे? की हा ठेकेदार व जाधव एकूण मोठ्या राजकीय डावपेचातील मोहरे आहेत? तीच शक्यता अधिक मोठी वाटते. दिसायला पवारांनी या उधळपट्टीवर आघात केला आहे व पक्षातल्यांनाही बेछूट वागण्याला आपण क्षमा करीत नाही, असा छान देखावा निर्माण केला आहे. पण खरोखरच सगळा विषय त्या उधळपट्टीपुरता मर्यादित असेल असे अजिबात वाटत नाही. कारण पवार यांनी त्यांच्या आयुष्यात कधी इतक्या साध्यासरळ गोष्टी केलेल्या नाहीत. धुर्त चाल हा त्यांच हातखंडा राहिला आहे. मग या सगळ्या शाही विवाह नाट्यामागचे राजकारण काय असेल? झोप पवारांची उडाली आहे की त्यांनी दुसर्‍याच कुणाची झोप उडवली आहे?   ( क्रमश:)  
 भाग   ( ९२ )    २१/२/१३

1 टिप्पणी:

  1. प्रश्न कळले, उत्तराचे काय? प्रश्न विचारणे सोपे अाहे. ्हया पत्रातून अापण काही सांगू इच्छिता काय?

    उत्तर द्याहटवा