सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१३

प्रत्येक जातच एक समाज बनून गेलीय


   नेवासे तालुक्यातील सोनई येथे मेहतर समाजातील तीन युवकांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ या समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. राज्य सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

   मला अस्वस्थ करणारे हेच शब्द आहेत. तसे चटकन न खटकणारे शब्द आहेत. कारण ही नेहमीचीच वर्तमानपत्री भाषा आहे. त्या शब्द व भाषेवरून आपली नजर सतत फ़िरतांना मन किती बधीर होऊन गेले आहे बघा. त्यातली भळभळणारी जखमही आपल्या मनाला यातना द्यायची थांबली आहे. किती वेळ हे शब्द मी वाचले आणि माझे मलाच आश्चर्य वाटले, की लिहिणार्‍यापासून वाचणार्‍यांपर्यंत सर्वांचीच मने अगदी संवेदनाशून्य होऊन गेलीत. आता शब्दांना काही अर्थबोधच उरलेला नाही. ‘या समाजाच्या वतीने ..... मोर्चा नेण्यात आला.’ या शब्दांचा अर्थ कसा आणि काय लावायचा? या समाजाच्या वतीने म्हणजे कुठल्या समाजाच्या वतीने? मेहतर समाज म्हणजे कोण, त्या जातीचे लोक म्हणजे ‘समाज’ असतो? तर मग त्या जातीबाहेरचे जे कोणी आहेत ते समाज नाहीत काय? त्या उर्वरितांचा समाजाशी संबंधच नाही काय? एक जात म्हणजे एक समाज असतो का? असेच असेल तर मग या विविध समाज व जातिपातींचा परस्परांशी नेमका काय संबंध किंवा नाते आहे? मी जन्माने मेहतर नाही, म्हणून माझा त्या मृतांशी कुठलाच सामाजिक संबंध नाही काय? त्यांच्याशी माझे काही देणेघेणेच नाही काय? ते मेले वा त्यांना कोणी अकारण ठार मारले, तर मला त्याच्याशी काहीच देणेघेणे नसते का? असेल तर मग ‘या समाजाच्या वतीने’च मोर्चा का काढला जातो. तो समाज वगळून उरलेल्यांनी मोर्चा का काढू नये? की अशा बाबी आपापल्या जाती समाजाशीच निगडीत आहेत? ही कुठल्या मानवी संबंधांची पद्धत आहे? जिथे खुन, हत्या, न्याय अन्यायालाही जात असते?

   मेहतर समाज म्हणजे त्या जातीचे जे कोणी मुठभर लोक जात म्हणुन संघटित आहेत, त्यांचीच अशा खुन प्रकरणात न्याय मागायची जबाबदारी असते काय? बाकी जे मेहतर जातीत जन्माला आलेले नाहीत, अशा कुणाला अशा हत्याकांडाशी काहीच कर्तव्य नसावे काय? गावात बिबट्या वा कुठले श्वापद घुसलेले असते, तेव्हा त्याच्या विरोधात सगळा गाव एकवटतो, तो मानवी जमाव ‘समाज’ नसतो काय? मग त्याला कुठला समाज म्हणून नाव द्यायचे? बिबट्याने, लांडग्याने गावातल्या कुणाच्या मुलावर, म्हातारीवर हल्ला चढवला तर धावून येताना, रान उठवतांना, जातपात असते का? तेव्हा भिन्नभिन्न समाज असे वागतात काय? मग इथे काय वेगळे घडले आहे? कोणी तरी अमानुष पाशवी कृत्य केलेले आहे आणि रक्ताला चटावलेले जनावर मोकाट असताना एकट्य़ा मेहतर जातीतल्याच लोकांनी त्याच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावर यावे, मोर्चा काढावा, हा काय प्रकार आहे? त्या रक्तपिपासू जनावराचे भय एकट्या मेहतर समाजाला का वाटावे आणि उर्वरित समाज वा जातींना निश्चिंत का वाटावे? चक्रावून सोडणारी गोष्ट नाही काय? उपरोक्त बातमीच्या भाषेतला तो थंडपणा मला भयभीत करणारा वाटला. त्यात हत्या, मृतदेहाचे तुकडे करणे, त्यातली अमानुष कृती याबद्दलची शब्दांपासून माणसांमधली बधीरता चिंताजनक आहे. त्या शब्दातला व बातमीतला सूर कसा आहे? ‘त्यांच्यातल्यांची हत्या झाली व त्यांनी न्यायाची मागणी करायला मोर्चा काढला’, ही भाषा त्यांना म्हणजे मेहतर जातीतल्यांना अन्य लोकसंख्येपासून वेगळा मोजणारी आहे. म्हणजे बातमी लिहिणार्‍याला व वाचणार्‍यांना सुद्धा आपण माणसाच्या हत्येने व्यथित होत नाही, याचीही खंत उरलेली नाही याचीच साक्ष नाही काय?

   सीमेवरच्या दोन जवानांची हत्या व त्यांचे मुंडके कापले, त्यांचा समाज कुठला होता? त्यांची जात कुठली होती? तो सुखविंदर त्याच्या समाजाने सरकारकडे दाद मागायला मोर्चा काढल्याची बातमी निदान माझ्या तरी वाचनात नाही. याचा अर्थ त्या दोन्ही जवानांसाठी संपुर्ण भारतातील सर्व जातीजमातीचे नागरिक म्हणजे, त्यांचा समाज होता व आहे ना? मग सोनईच्या या तीन तरूणांसाठी मेहतर जातीतलेच लोक त्यांचा समाज कसा होऊ शकतो? काही क्षणांसाठी विसरून जा, की ह्या तीन तरुणांची हत्या सोनई गावात झाली. समजू की त्यांची हत्या नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानी सैनिकांनी केली असती आणि त्यांच्या मृतदेहाचे असेच तुकडे पाडलेले, फ़ेकून दिलेले आढळले असते; तर आपण कसे वागलो असतो? मग त्यांच्या हौतात्म्याच्या विटंबनेची दखल त्यांच्या समाज वा जातीने घ्यावी, अशी अपेक्षा करत आपण शांत बसलो असतो का? तसे घडले असते तर सुधाकर सिंग वा हेमराजच्या हत्ये इतक्याच प्रक्षोभाने आपली प्रतिक्रिया उमटली असती ना? तेव्हा आपल्याला जात आठवत नाही, मग आज सोनईतल्या हत्येचा न्यायनिवाडा होण्यासाठी मेहतरांनीच पुढाकार कशाला घ्यायचा? त्यात बाकीचे भारतीय, बाकीचे मराठी महाराष्ट्रीयन का नसावेत? समाज हा शब्द आपण किती संकुचित करून टाकला आहे ना? एका जातीचे, त्या जातीमध्ये जन्मलेले असतील, त्या लोकसंख्येला समाज म्हणतो आपण. आणि मग एका समाजाला दुसर्‍या समाजाच्या सुखदु:खाशी कसले कर्तव्यच उरलेले नाही. बाकी आपण भारतीय असतो ते क्रिकेटचे सामने खेळले जाणार असतील तेव्हा. उरलेल्या काळात आपण आपापल्या समाजातले असतो.

   पकिस्तानने सीमेवर हल्ला करून किंवा आपल्या जवानांची हत्या करून आपल्यातले भारतीयत्व जागवावे लागते. तर आपण आपापल्या ‘समाजाच्या’ कवच किंवा भिंती पार करून एकत्र येऊ शकतो. सोनईच्या हत्याकांडाची तीच भयावहता आहे. त्यातली अमानुषताही त्या सामाजिक जातीय भिंतींना खिडार पाडू शकली नाही, ती बाब त्या हत्याकांडापेक्षा चिंताजनक आहे. अशा हत्या, खुन कुठे ना कुठे होतच असतात. मरणारा अन्य कुठल्या जातीचा असेल. पण मुद्दा मृत कुठल्या जातीचा वा समाजाचा होता असा नाही, तर त्या हत्याकांडातल्या भीषणतेनेही आमच्यातल्या जातीय मानसिकतेला धक्का बसू नये ही वास्तविकता चिंतेची बाब आहे. खैरलांजी किंवा अन्यत्र असा प्रकार कुठल्या जातीबाबतीत होतो, त्यानुसार आवाज उठवला जातो, त्यातही पुन्हा मतदार यादीतल्या संख्याबळानुसार आवाजात चढउतार होत असतात. पण या सगळ्या गडबडीत आपल्यातला माणूस कुठल्या कुठे हरवून गेला आहे. संवेदनशीलता ही जाती समाजानुसार कार्यान्वीत होते, इतकी कृत्रीम होऊन गेली आहे. न्याय कुठल्या जातीपेक्षा दुबळ्यावर होत असतो आणि मुजोरीचा अविष्कार असतो. म्हणुनच अन्यायाचे परिमार्जन माणूस म्हणून करायला पुढे सरसावले पाहिजे, याचा आपल्याला विसरच पडून गेला आहे. मग ते सत्य मान्य करण्यापेक्षा आपण त्याला समाजाचे मुखवटे चढवत असतो. न्याय आणि अन्यायालाही आपण जातीपाती चिकटवल्या आहेत. सवलती अधिकार मिळवण्यापुरती लढाई मर्यादित होऊन गेली आहे, की सत्तेतला वाटा मुठभरांना मिळण्याचा संकुचित अजेंडा त्याला कारणीभूत आहे?

   परत एक गोष्ट विसरता कामा नये. इथे ता हत्याकांडातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यायची मागणी घेऊन अनेकजण पुढे येतील. पण सवाल त्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यापुरताच आहे काय? सवाल कायद्याच्या कठोर अंमलाचा आहे, की या जातीपातीच्या अस्मिता संपवून समाजात परस्परांविषयी आत्मियता निर्माण करण्याचा आहे? एकमेकांविषयी असलेली हिणकस भावना, तिटकारा किंव द्वेष-हेवा, यातून बाहेर पडण्याची प्रक्रिया त्या एका गुन्हेगाराला कठोर शिक्षा मिळाल्याने सुरू होणार नाही, की गतिमान होणार नाही. त्या अस्मिता व जातीच्या भिंती पाडण्याला प्राधान्य देण्याचा विचारच झालेला नाही. मग असे गुन्हे घडतच रहातात. त्यातून मग दुसर्‍या ‘समाजाच्या’ अस्मिता दुखर्‍या होतात. ही सामाजिक तेढ वाढतच जाते. त्यापासून मुक्त होण्याची प्रक्रिया महत्वाची आहे. म्हणूनच नुसती या किंवा खैरलांजी प्रकरणातील न्यायाची प्रक्रिया मोलाची नसते, तर त्या न्यायप्रक्रियेमध्ये समाजाचे सर्व घटक व स्तर तेवढ्याच आस्थेने सहभागी होण्याला महत्व असायला हवे. दिल्लीतल्या सामुहिक बलात्कारानंतर जसे तमाम वर्गातले लोक रस्त्यावर उतरले वा तिथे सीमेवर जवानाचे मुंडके कापल्याने प्रत्येक भारतीय अस्वस्थ प्रक्षुब्ध झाला; तशीच प्रतिक्रिया सोनई वा खैरलांजी नंतर उमटली पाहिजे. त्यासाठी याप्रकारची घटना घडली मग नुसत्या कायदेशीर न्यायाच्या मागणीपेक्षा, त्या मागणीमागे लोकसंख्येतले सर्वच घटक उभे करण्याची चळवळ उभी राहिली पाहिजे, तरच खरे सामाजिक अभिसरण सुरू होऊ शकेल. अन्यथा आपण नुसती शाहू, फ़ुले आंबेडकरांच्या नावाची जपमाळ ओढत राहू, पण सामाजिक समता व न्यायाच्या दिशेने एकही पाऊल पडणारे नाही. सोनईच्या घटनेनंतरची उदासिनता, त्याचाच पुरावा आहे, म्हणूनच तो मनाला यातना देणारा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा