रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

मतांची टक्केवारी आणि मिळणार्‍या जागांचे गणित


   गंमत कशी असते बघा. समोरचा माणूस काही तरी सांगायचा प्रयत्न करीत असतो. पण तो काय म्हणतो ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही; तर काहीही उपयोग नसतो. आपल्या डोक्यात काही असते वा आपले एखाद्या गोष्टीबाबत एक ठाम मत असते. आपण त्याच्या पलिकडे जाऊन ऐकायच्या मनस्थितीमध्ये नसलो, तर समोरच्याने कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग नसतो. ‘हेडलाईन्स टूडे’ वाहिनीचा संपादक राहुल कन्वलची तशीच बाब होती. कुंभमेळ्यात जमलेल्या साधूंच्या मेळ्यात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याची मागणी झाली; तेव्हा पत्रकारांशी बोलताना हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनी मोदी हे नेहरूंइतके लोकप्रिय असल्याचा दावा केला होता. पत्रकारांनी मग त्यांची खिल्ली उडवली. असे का व्हावे? त्यापैकी कोणीतरी सिंघल यांचा तो दावा त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न तरी केला काय? समजा अगदी सिंघल हा माणूस मुर्खासारखा बोलत असेल, तरी त्याच्या डोक्यात काय आहे, ते जाणून घ्यायचा प्रयत्न का होऊ नये? जर सिंघल हा माणूस मुर्खच असेल व मुर्खासारखा बडबडत असेल; तर त्याची बडबड माध्यमे मनावर तरी कशाला घेतात? त्याच्या मुर्खपणाकडे पाठ फ़िरवायची होती. का नाही फ़िरवायची? मुर्खपणाला दाद देणेही मुर्खपणाच नाही काय? पण ज्याअर्थी पत्रकार अशी दाद देतात, त्याअर्थी त्यांना सिंघल हा माणूस मुर्ख वाटत नसावा. मग तो काय म्हणतो, ते तरी समजून घेण्याचा संयम हवा की नाही? नेहरू व त्यांची लोकप्रियता हा आपल्याकडे दंतकथेसारखा विषय आहे. त्याबद्दल शंका घेतली वा प्रश्न विचारले; तरी विद्वानांना आवडत नाही. सहाजिकच सिंघल यांनी मोदी व नेहरू यांची तुलना केली, म्हणजेचे मर्यादा ओलांडली होती. तात्काळ त्यांना मुर्ख ठरवण्याची शर्यत सुरू झाली. पण हा माणूस नेमके काय म्हणतो आहे; ते समजून घेण्याची इच्छाही कोणाला झाली नाही, यातच पत्रकारांचा उथळपणा लक्षात येऊ शकतो. त्यातल्या त्यात या राहुल कन्वलने निदान त्याच विषयावर सिंघल यांची वेगळी मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानेही सिंघल काय म्हणतात, ते समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण तरीही मी त्याचे आभार मानेन. कारण राहुलच्या त्याच प्रयत्नामुळे सिंघल यांना नेमके काय म्हणायचे आहे, तिकडे माझे लक्ष जाऊ शकले.

   खरे सांगायचे, तर सिंघल यांनी मोदींची नेहरूंशी केलेली तुलना मलाही हास्यास्पद वाटली होती. कारण पहिली निवडणूक लढवण्यापुर्वीच नेहरू राष्ट्रीय नेता म्हणुन देशाला परिचित होते आणि त्यांनी कॉग्रेसचा अध्यक्ष वा नेता म्हणून आपली स्वातंत्र्य चळवळीवर छाप पाडलेली होती. त्यामुळेच एका राज्याचा विकसनशील मुख्यमंत्री अशी प्रतिमा असली म्हणून काय झाले? आधुनिक भारताचा भाग्यविधाता अशी ज्याची प्रतिमा गेल्या अर्धशतकात कायम जनतेच्या मनावर ठसवण्यात आली आहे; त्याच्याशी एका राज्याच्या मुख्यमंत्र्याची तुलना कशी होऊ शकते? मलाही म्हणूनच सिंघलचे विधान खटकले होते. पण सिंघल तेवढे एकच वाक्य बोलले नव्हते. त्याच्या पुढेमागे काहीतर संदर्भ असणार आणि तो सापडला, तरच त्यांच्या डोक्यातला विचार आपल्याला समजू शकेल, असे मला वाटत होते. त्याचे उत्तर ‘हेडलाईन्स टूडे’साठी कन्वलने घेतलेल्या मुलाखतीमध्ये सापडू शकले. त्यात बोलताना वाजपेयी यांच्याइतके मोदी लोकप्रिय आहेत का; अशा प्रश्नाचे उत्तर देताना सिंघल यांनी जो मुद्दा मांडला, तोही कोणाला न पटणारा होता. कारण वाजपेयी सुद्धा नेहरू व इंदिराजीच्या काळापासूनचे जनसंघाचे लोकप्रिय नेता होते. ज्या काळात कोणी मोदी यांचे नावही ऐकलेले नव्हते. पण या मु्लाखतीमध्ये सिंघल एक वाक्य असे बोलले, की त्यातून मला एक नवी दिशा सापडली. त्यांनी सांगितले, की वाजपेयी जनतेमध्ये लोकप्रिय नव्हते तर माध्यमे, राजकीय विचारवंत व अभ्यासकांमध्ये प्रिय होते. म्हणजेच त्यांच्या लोकप्रियतेचा डंका माध्यमांनी पिटलेला असला, तरी जनमानसात ती लोकप्रियता तेवढी नव्हती. याच एका वाक्याने मला चकीत केले आणि मी त्याचा शोध घेऊ लागलो. शेवटी मी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन जुन्या काही निवडणूक निकालाचे आकडे तपासले. तर मला धक्काच बसला. कारण सिंघल म्हणतात तेच सत्य होते. कारण वाजपेयींचा डंका माध्यमांनी पिटलेला असला, तरी खुद्द भाजपाच्या पाठीराख्या मतदारामध्ये मात्र वाजपेयी तेवढे लोकप्रिय नव्हते. उलट वाजपेयी यांच्या हाती माजपाचे नेतृत्व गेल्यामुळेच भाजपाच्या मतदारामध्ये घट होत गेली.

   म्हणूनच आपल्या डोक्यात जे असेल ते बाजूला ठेवून समोरच्या माणसाला समजून घेणे अगत्याचे असते. जर समजूनच घ्यायचे नसेल व आपल्या मनात आहे, त्यावरच विसंबून रहायचे असेल; तर दुसर्‍याशी संवाद तरी कशाला करायचा? दुसरी गोष्ट जेव्हा दुसर्‍याला समजून घ्यायचे असेल, तर त्याला आधीच मुर्ख ठरवून चालत नाही. तो कसा विचार करतो व तसाच विचार का करतो; यातही डोकावून बघण्याची गरज असते. इथे वाजपेयी हाच भाजपाचा लोकप्रिय चेहरा होता, हा भ्रम इतरांप्रमाणे माझाही होता, हे मी नाकारणार नाही. सिंघल काय म्हणाले, त्याचा निवडणुकीच्या निकालातील आकड्यांमध्ये शोध घेतला नसता, तर माझाही गैरसमज कायम राहिला असता. पण ज्याला सिंघलचा मुर्खपणा मानले जाते; तेच वास्तव असल्याचा शोध मला कशामुळे लागला, तर मी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला म्हणून. आणि हे आकडे थक्क करून सोडणारे आहेत. ती सगळी आकडेवारी अभ्यासली तर माध्यमे व त्यातले दिडशहाणे आपल्याला किती उल्लू बनवतात, त्याची साक्षच मिळत जाते. पराभवालाही विजय व अपयशालाशी यश ठरवण्यापर्यंत माध्यमांची कशी मजल जाते, त्याची साक्ष निवडणूक निकालाचे आकडे देतात. थोडक्यात प्रकार असा चालतो, की पाण्याचे गणित मांडताना लिटरमध्ये बोलण्याऐवजी फ़ुट इंचात बोलायचे आणि कापडाचे गणित सांगताना लिटर मध्ये बोलायचे, अशातला प्रकार आहे. मोदी बाजूला ठेवा आणि सोनियांची कहाणी घ्या. मागल्या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये सोनियांनी कॉग्रेसला सत्तेवर आणून बसवले, हे खरे असले; तरी त्यांनी कॉग्रेस पक्षाला पुर्वीचे वैभव प्राप्त करून दिल्याचा डंका गेल्या दहा वर्षात पिटला गेला, ही नुसती धुळफ़ेक होती. आणि ते आकड्यानेच सिद्ध होते. राजीव गांधींच्या पराभवातही त्यांना जितक्या जागा व मते मिळाली होती; त्यापेक्षा सोनियांनी कॉग्रेसला मिळवून दिलेली मते कमीच आहेत. अगदी नरसिंहराव व सीताराम केसरी यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसने मिळवलेल्या अपयशापेक्षा सोनिया गांधी थोडीही प्रगती करू शकलेल्या नाहीत, हे वास्तव माध्यमांनी दडपलेले सत्य आहे. अशी माध्यमे मोदी यांच्याविषयी सत्य सांगू शकतील काय?

   आणि म्हणूनच माध्यमे मोदींच्या लोकप्रियतेचे आकडे चाचण्या घेऊन स्वत:च दाखवत असतात, पण त्याचे निष्कर्ष मात्र चुकीचे काढून आपली दिशाभूल करत असतात. म्हणजे एबीपी माझा वाहिनीने भाजपाला आताच निवडणूका झाल्यास देशात ३९ टक्के मते मिळतील आणि मोदी भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तर ४९ टक्के मते भाजपाला मिळतील असा दावा केला आहे. जेव्हा आपण असे आकडे सांगतो, तेव्हा त्या आकड्यांचे जागांमध्ये कसे रुपांतर होते, त्याचा अभ्यास या लोकांनी कधी केला आहे काय? उदाहरणार्थ राजीव गांधींच्या कॉग्रेसचा १९८९ सालात दारूण पराभव झाला, तेव्हा व्ही पी सिंग यांचा नेतृत्वाखाली मतविभागणी टाळायचा मोठा प्रयास झाला होता. तरी राजीवनी ३८ टक्के मतांसह १९७ जागा जिंकल्या होत्या. आणि १९८४ सालात त्यांना ४९ टक्के मते मिळाली तर ४१५ जागा जिंकता आल्या होत्या. मग तेवढीच मते भाजपाला मिळत असतील तर त्या पक्षाला किती जागा मिळू शकतील? मोदी नसतील तर ३९ टक्के मते व दोनशेच्या जवळपास जागा आणि मोदी उमेदवार असतील तर ४९ टक्के मतांसह किमान ३०० जागा म्हणजे स्पष्ट बहूमत मिळू शकेल की नाही? वाहिन्यांची चाचणी शंभर टक्के बरोबर नसेल. पण जी काही आहे, त्यानुसार आकड्यांचा अर्थ कसा लागतो? तो आधीच्या निकालाशी ताडून बघता येतो ना? मग चाचणीनंतरच्या चर्चेत ३९ टक्के मते असताना दिडशेपेक्षा कमी जागा कशा सांगितल्या जातात? तर त्यांना मोदी वा भाजपा जिंकणार हे मान्य करायचे नसते. म्हणुन आकडे बरोबर सांगायचे पण निष्कर्ष मात्र चुकीचे काढायचे, असला प्रकार चालतो. त्याचे हेच कारण आहे, सिंघल काय सांगतात वा आकडे काय दाखवतात, ते बघायची इच्छा नाही, की तयारीच नाही. मग ज्यांना सत्य बघायचीच हिंमत नाही, ते सत्य आपल्याला सांगणार तरी कसे? त्यांना मोदींची हिंदू व्होटबॅन्क दिसणार तरी कशी? तिची तुलना मग हे शहाणे मुस्लिम व्होटबॅन्केशी करणार तरी कशी? थोडक्यात मुळ समिकरणच चुकीचे मांडले तर योग्य वा खरे उत्तर सापडणारच कसे?   ( क्रमश:)
 भाग   ( ८८ )    १७/२/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा