मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१३

कर्तव्यामधला आपुलकीचा ओलावा जपायला हवा


   गेले साडेपाच महिने मी माझा मोबाईल फ़ोन जवळपास बंद ठेवला आहे. कारण वाचकांचे फ़ोन आले तर त्याच्याची बोलायला वा वादप्रतिवाद करायची मला खरेच सवड उरलेली नाही. कारण रोजचे वाचन, लिखाण करण्यातून सुटका नाही आणि त्यात घरी रुग्णाईत अवस्थेत पडलेली माझी आई. तिचे वय आता शहाण्णव इतके आहे. रुग्णशय्येवर पडलेली असून तिच्या सगळ्या गोष्टी जागच्या जागीच उरकाव्या लागतात. अगदी उठणे, बसणे सोडा; साधे कुशीवर वळणेही अशक्य अशी दुरावस्था आहे. बाकी तसा काही आजार नाही, तर वार्धक्याने शरीर निकामी झालेले आहे. पण मेंदू व हृदय ठणठणीत आहे. ऐकू कमी येते. तरीही जगण्याचा मोह सुटलेला नाही. म्हणजे तोंडाने म्हणते, की यातून कधी सुटका होईल तो सुदिन. पण तो निव्वळ देखावा आहे. कारण तिचे हे शब्द मी गेली बारा वर्षे ऐकतो आहे. तेव्हा निदान ती उठबस करत होती, आपला देहधर्म स्वत:च उरकू शकत होती. गेले वर्षभर सर्वकाही परावलंबी झाले आहे. पण जगण्याची आसक्ती किंचितही कमी झालेली नाही. असे मी का म्हणू शकतो? तर दिवसभर बिछान्यावर पडल्यापडल्याही तिच्या हालचाली सुरू होत असतात. आपण खाली पडतोय, तोल जातोय, असे भास होऊन ती उशा, तकिये हलवते आणि ते पडतात. मग ते पुन्हा जागच्याजागी ठेवायचा उद्योग  दुसर्‍यांसाठी काम होऊन बसते. पण इतकी परावलंबी स्थिती असतानाही तिचे वागणे मला चक्रावून सोडते. या चारपाच महिन्यात अनेक शब्दांचे अर्थ मला नव्याने कळले व तिच्यामुळे कळले; हे मान्यच करावे लागेल. जीव नकोसा होणे, देह ठेवणे, जगण्याची आसक्ती, जीव मुठीत धरणे वगैरे शब्द आजवर हजारो, लाखो वेळा मी उच्चारलेले असतील, लिहिले सुद्धा असतील. पण किती नकळत मी त्यांचा निरर्थक वापर करीत होतो, त्याची जाणिव आता होते. हे मोजके शब्द झाले. असे अजून किती शब्द असतील मी आजही वापरतो, पण त्याचा खरा अर्थ मलासुद्धा ठाऊक नसेल असेच आता वाटते. मीच कशाला आपण सगळेच तसे शब्दांचा असा सढळ वापर करत असतो. असो.

   पाचसहा महिने आई माझ्याकडे आलेली आहे. त्यामुळे तिची सरबराई करताना मला माझ्या एकूण दिनचर्येला वेसण घालावी लागली आहे. बाहेरचे येणेजाणे जवळपास बंद झाले आहे, महिना महिना कुठे घराबाहेर पडलेलो नाही. कारण घरात आईला एकटी ठेवून जाता येत नाही. बदली कामगार कोणी असला तरच मी बाहेर पडू शकतो. शिवाय तिला ठरल्या वेळी खाऊपिऊ घालणे, औषध वा अन्य गोष्टी करणे अपरिहार्य आहे. मग लिहिणे वाचणे, थोडाफ़ार टिव्ही, बातम्या बघणे; यातच दिवस मावळत असतो. मग कोणाशी गप्पा वा फ़ोनवर बोलणे कसे शक्य आहे? अनेक वाचक त्यामुळे नाराज असतील याची मला खात्री आहे. म्हणूनच हे लिहावे लागत आहे. पण त्याहीपेक्षा मानवी स्वभावाचा एक वेगळा पैलू माझ्या अनुभवास आला, तोही वाचकांसमोर मांडावा अशी खुप तीव्र इच्छा झाली. आई माझ्याकडे आल्यापासून दिनचर्या ठरून गेली आहे. साधारण आठला सकाळी उठल्यापासून माझे व्याप उरकले; मग मी तिला टुथब्रश, पेस्ट देऊन तोंड धुवायला मदत करतो, चहा पाजून काम संपवतो. बाकी साफ़सफ़ाई एक महिला येऊन उरकते. म्हणजे साधारण नऊच्या आधी तिचे तोंड धुणे होत असते. सोमवारी पत्नी घरी नसल्याने मला लौकर उठून पाणी भरण्याचे काम उरकावे लागले. माझी ती पळापळ चालू असताना आईचे डोळे उघडेच होते आणि ती वर्दळ बघत होती. पाणी भरून संपल्यावर माझ्या गोष्टी उरकायच्या होत्या. पण ते राहिले बाजूला पाणी भरणे चालू असतानाच तिने मला इशारा करून जवळ बोलावले आणि विचारले, ‘तोंड वगैरे धुवायचे आहे की नाही?’ मी तिच्याकडे बघतच राहिलो. कारण खुलासा करणे अशक्य होते. तिला ठार ऐकू येत नाही. वैतागलो आणि आपल्या कामाकडे वळलो. तिच्याकडे दुर्लक्ष केले. रोजच्यापेक्षा मीही लौकर उठलो असल्याने तिचेही व्यवहार लौ्करच उरकले. पण दिवसभर तिचा तो प्रश्न मनात पिंगा घालत होता. पाणी भरून ठेवण्यासाठी चाललेली माझी तारांबळ तिला दिसत होती. तरीही तिने असे का विचारावे; हे माझ्या तर्कात बसत नव्हते. की आपल्याला त्रास द्यायला, डिवचायला तिने असे बोलावे? अनेक प्रश्न मनात राहुन राहुन येत होते, पिच्छा पुरवत होते. हिच्यासाठी गेले काही महिने बाहेरचे जग विसरून बसलोय आणि ही असे का बोलते?

   स्वत:च्या गोष्टी स्वत:ला करता येत नाहीत, इतके परावलंबी जगणे झाल्यावर माणूस दुसर्‍यावर विसंबून जगत असतो. तेव्हा तो दुसर्‍यावरचा बोजा झालेला असतो. आणि ज्याने ती जबाबदारी घेतलेली असते, त्यालाही स्वत:चे जगणे असते, आपल्या गोष्टी उरकायच्या असतात. त्यात मग त्या दुसर्‍याने आपल्या आयुष्यात कशाला प्राधान्य दिले पाहिजे? त्याच्या स्वत:च्या गरजा, गोष्टी सगळ्या विसरून त्याला जबाबदार्‍या पार पाडणे शक्य असते का? आपोआपच मग जो अवलंबून आहे, त्याच्या गरजा हे दुय्यम प्राधान्य होऊन जाते. ते त्यानेही समजून घेण्याची गरज असते. कारण ज्याने ह्या सर्व गोष्टी उरकायच्या आहेत, त्याने उभे रहाणे व बोजा उचलण्याइतकी त्याच्यात शक्ती असणे; हे दोघांसाठी सारखेच प्राधान्य असते. आणि याचे भान जो परावलंबी आहे, त्यानेच जास्त ठेवायला नको काय? कारण जो मदत करतो आहे, तोही थकून गेला वा कंटाळून गेला, तर त्याचे कोणी काढायचे? म्हणजेच जो मदतनीस असतो, त्याला सेवक वा हक्काचा गडी न समजता, पुरवून वापरण्याची उर्जा समजले पाहिजे. तेवढे भान ठेवले तर मदत देणारा व घेणारा यांच्यातले व्यवहार सुरळीत होऊ शकतात. अन्यथा कटकटीचे होऊन जातात. स्वत:ची कामे उरकताना दुसर्‍याची जबाबदारी घेतलेला असतो, त्याच्या धावपळ व कष्टाचे भान मदत घेणार्‍याने ठेवले; तर सर्व व्यवस्थित पार पडू शकते. अन्यथा मग जो परावलंबी असतो, त्याची कामे बोजा वाटू लागतात. कारण जबाबदारी घेणार्‍याचा चांगुलपणाच त्याला प्रवृत्त करत असतो, तो चांगुलपणा जपण्याची जबाबदारी परावलंबी माणसाची असते. त्याचे भान सुटले मग कटकटी सुरू होतात. आणि असे कधी होते? जेव्हा त्या मदतीला सवलत न समजता हक्क वा अधिकार समजले जाते, तिथून सगळी गडबड होते.

   मी सकाळी लौकर ऊठून पाणी भरत होतो, म्हणजे दिवसभर लागणार्‍या पाण्याचा साठा सर्वांसाठी करत होतो, व्यक्तीगत काम करत नव्हतो. ते सर्वच घरासाठी प्राधान्य होते. त्यापेक्षा आईला जेव्हा तिचे तोंड धुणे, दात घासणे प्राधान्याचे वाटते, तेव्हा समतोल बिघडत असतो. मुलगा उठला आणि इतका वेळ आपल्याकडे त्याचे लक्ष नाही, यातून तिचा अहंकार दुखावला होता. तो अहंकार असावाच कशाला? आपल्याला आपले व्यवहार उरकता येत नाहीत, इतकी दयनीय अवस्था असताना अहंकार कसा असू शकतो? हा विषय माझ्या घरापुरता नाही किंवा माझ्या आईपुरता नाही, कुठल्याही घरात वा समाजाच्या विविध स्तरातले व्यवहार चालतात, तिथे आपण बघितले तर त्यात अशीच गफ़लत होताना दिसेल. जिथे सवलत ही अधिकार बनून गेली; तिथे कुरबुरी वा वादंग उठलेले दिसतील. व्यक्ती, कुटुंब, संस्था वा एकूण समाज व राष्ट्र यांच्यातल्या प्राधान्याच्या गोष्टी बाजूला पडून गेल्या आहेत. त्या दिवशी समजा मी पाणी भरायचे बाजूला ठेवून आधी आईचे उरकत बसलो असतो, तर माझ्या मातृप्रेमासाठी पालिका अधिक काळ पाणी सोडणार नव्हती. म्हणजेच एकू्ण घरासाठी लागणारा पुरेसा पाणीसाठा अगत्याचा व प्राधान्याचा विषय होता. तो आईला समजत नसेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करणे अपरिहार्य असते. पण मुद्दा तो नाहीच. पाचसहा महिन्यात मी सर्वकाही मनपुर्वक करीत होतो. मला त्यात फ़ारमोठे काही केल्यासारखे वाटले नाही. पण सोमवारच्या त्या घटनेनंतर मला प्रथमची आईची जबाबदारी हा बोजा असल्याची जाणिव झाली. असे का व्हावे?

   तिला दिसते कमी, तिला वेळेचे भान नाही, हे मान्य आहे. पण तिने नकळत माझ्यातल्या चांगूलपणाला दुखावले. त्यातल्या आपुलकीला इजा केली आणि आता कर्तव्य भावना शिल्लक उरली आहे. जे करण्यात आनंद होता, तो हरवला आहे. आईने मी करत असलेल्या सेवेला आपला हक्क समजून जी चुक केली, तिथे सगळी गडबड झाली ना? माझ्या करण्यात कुठला बदल झालेला नाही. इतके महिने केले तेच सर्व गेले दोन दिवस ठरल्याप्रमाणे उरकतो आहे. पण आता त्यातली आस्था कमी झाली हे माझे मला जाणवते. कर्तव्यातला आपुलकीचा ओलावा कमी झाला आहे. एकाच्या कर्तव्य भावनेत दुसर्‍याने सवलत बघितली तर आपुलकीचा ओलावा आनंद निर्माण करत असतो. उलट एकाच्या कर्तव्यात दुसर्‍याने आपला अधिकार, हक्क बघितला वा मागायचा अट्टाहास केला, तर दोघातले नाते नासू लागते. समाजाच्या आज विस्कटलेल्या विविध संबंधात वाढत असलेली दरी अशीच काहीशी असेल का?  ( क्रमश:)
भाग   ( ७७ )    ६/२/१३

२ टिप्पण्या:

  1. तुम्ही माना किंवा न माना देवाण घेवाण हिशोब असतोच . मग तो व्यक्ती व्यक्तीन मधील असो किंवा समाजातील घटकान्म्धील . तो या जन्मातील असलातर ठीकच आहे बुद्धिनी कार्य कारण भाव समजेल पण ८०० वर्षांपूर्वीचा हिशोब अर्धवट ठेवून तुम्ही मेल असलात तर तो आज पूर्ण करावाच लागतो . आज जरी त्यापासून पळ काढला तर पुढे कधीतरी तो फेडावाच लागणार आहे . त्याची तीव्रता नक्कीच कमी करता येवू शकते पण प्रयोगशीलता आवश्यक आहे . मी नास्तिक आहे किंवा कोणच्या तरी विचारसरणीचा आहे म्हणून स्वतहाच्या मनाची कवाडे बंद करून घेतली तर आहे हे भोगून संपवायचे तरी नक्कीच चुकवता येत नाही .http://www.spiritualresearchfoundation.org/articles/id/spiritualresearch/happiness/benefitsofspiritualpractice/destiny_karma_g

    उत्तर द्याहटवा
  2. http://www.spiritualresearchfoundation.org/search_results.php?cx=002691867923147727620%3A7gzybslf4pw&q=give+and+take+&sa=Go&cof=FORID%3A11

    उत्तर द्याहटवा