रविवार, २४ फेब्रुवारी, २०१३

जिहादचे तर्कशास्त्र बारकाईने समजून घ्यावेच लागेल.


   दहशतवाद किंवा दहशत हा शब्द आपण गेली दोन दशके सातत्याने ऐकत आहोत. पण त्याचे स्वरूप व व्यापकता आपण कितीशी ऐकली वा समजून घेतली आहे? तीन दशकांपुर्वी सोवियत लालसेनेने अफ़गाणिस्तानात घुसून तिथली सत्ता काबीज केली. मग स्थानिक कम्युनिस्टांना आपल्या कठपुतळ्या बनवून सत्ता राबवली. तेव्हा शीतयुद्धाचा काळ चालू होता. अमेरिका व सोवियत युनीयन या जगातल्या मोठ्या बलशाली महासत्ता मानल्या जायच्या. त्यांच्या इशार्‍यावर जगातली लहानमोठी युद्धे खेळली जात असत. व्हिएतनाममध्ये स्थानिक सत्ताधीशांना कम्युनिस्ट चळवळीने सशस्त्र लढ्यातून शह दिल्यावर डळमळीत झालेल्या सत्तेने अमेरिकेची मदत घेतली. तर सोवियत युनीयन कम्युनिस्टांच्या पाठीशी उभे राहिले. त्याची परतफ़ेड अमेरिकेने अफ़गाणिस्तानात केली. तिथे सोवियत सेनेला शह देण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने अफ़गाण बंडखोर उभे केले. त्यांना शस्त्रास्त्र साठा पुरवला. त्या बंडखोरांना मुजाहिदीन म्हणून ओळखले जात होते. त्यात जगभरच्या मुस्लिमांना सहभागी व्हायचे आवाहन करण्यात आले होते, अफ़गाण सीमेच्या अलिकडे पाकिस्तानात अशा परदेशी लढवय्यांना प्रशिक्षण देण्याची शिबीरे वसवण्यात आलेली होती. त्यांची युद्धप्रेरणा काय होती? यातले सगळे लढवय्ये मुस्लिमच असले तरी त्यातले मुठभरच अफ़गाण होते. बाकीचे इस्लामी भूमी सोवियत म्हणजे काफ़ीरांच्या तावडीतून मुक्त करायला आलेले बिगर अफ़गाण मुस्लिम होते. थोडक्यात हे परदेशी लढवय्ये धर्मकार्य करायला आलेले होते. त्यांना युद्धशास्त्र शिकवतानाच जे धार्मिक कर्तव्य पढवून धर्मासाठी लढायची शिकवण दिली जात होती, तीच खरी आजच्या जिहादची प्रेरणा आहे. तिचे व्यापक स्वरूप ब्रिगेडीयर मलिक यांनी आपल्या पुस्तकातून मांडलेले आहे. जिहादी युद्ध हे दहशतीचे असून ती दहशत मानसिक नव्हे तर काळजाला जाऊन भिडणारी असायला हवी; असेही त्यात मलिक म्हणतात. शिवाय त्यातला धर्माचा संदर्भ नेमका आहे. धर्मश्रद्धा व दहशतवादाचा नेमका संबंध मलिक यांनी त्यातून समजावला आहे. ते म्हणतात,

   ‘दहशत माजवा, पण दहशतीखाली दबू नका. जिहादी युद्धाची व्याप्ती अखेरीस मानवी हृदय, मन, आत्मा व श्रद्धा यांच्यापुरती असते. जर शत्रूची श्रद्धा ढासळून टाकली, तरच त्याच्या काळजात धडकी भरवता येते. म्हणजेच त्याला दहशतीच्या प्रभावाखाली आणता येतो. म्हणूनच अंतिमत: शत्रूची धर्मश्रद्धा डळमळीत करण्यालाच सर्वाधिक महत्व असते. ज्यांच्या धार्मिक श्रद्धा पक्क्या व भक्कम असतात, त्यांच्यावर दहशतीचा कुठलाही परिणाम होत नाही. म्हणूनच दुबळी धर्मश्रद्धा दहशतीला आमंत्रण देत असते. त्यामुळेच जिहादच्या पुर्वतयारीसाठी मुस्लिमेतर शत्रूच्या धर्मश्रद्धा डळमळीत करण्याची अत्यावश्यक असते. पण त्याचवेळी मुस्लिमांच्या धर्मश्रद्धा कडव्या करण्याचीही गरज असते. मानसिक दुबळेपणा तात्पुरता असतो, पण धार्मिक श्रद्धेचा दुबळेपणा कायमस्वरूपी असतो. मानवी आत्म्याला फ़क्त दहशतच स्पर्श करू शकते.’

   ब्रिगेडीयर एस. के. मलिक यांच्या निरुपणाचा हा गोषवारा आहे. त्यावरच अफ़गाण मुजाहिदीन व तालिबान युद्धसज्ज झाले हे विसरता कामा नये आणि फ़क्त अफ़गाण भूमीतून सोवियत सेनेला पळवून लावण्यावरच जिहाद थांबला नाही. तो अव्याहत जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोहोचला आहे. म्हणूनच हे मलिक साहेब जे सांगतात; ती जिहाद व दहशतीची व्याख्या समजून घेण्याची गरज आहे. ज्यांना दहशतवाद समजल्या जाणार्‍या जिहादशी दोन हात करायचे आहेत, प्रतिकार करायचा आहे; त्यांना तरी त्याची प्रेरणा व सुत्र समजून घ्यावेच लागेल. जो दहशत हा शब्द इतक्या सहजतेने आपण नेहमी वापरत असतो, त्याची व्याप्ती व व्याख्या आपण कधी इतक्या मुळापासून समजून घेतली आहे काय? इथे जिहादसाठी लढताना व ज्यांना दहशत घालायची आहे, त्यांच्याही धार्मिक श्रद्धांना मलिक महत्व देतात. ते स्फ़ोटके, बंदूका, रणगाडे, रॉकेट अशा कुठल्याही साधनांचा उल्लेख सुद्धा करत नाहीत. ते शक्ती वा बळाचा उल्लेख करत नाहीत; तर धर्मश्रद्धेचे अशा युद्धातील वा प्रतिकारातील महत्व सांगत आहेत. आणि असे विश्लेषण करणारा मलिक हा कोणी धरमार्तंड नाही. तो कसलेला सेनापती व युद्धानुभवी सेनाधिकारी आहे. त्याच्याच या तत्वज्ञान व संकल्पनेच्या आधारे आरंभीचे मुजाहिदीन घडवण्यात आले; हे विसरता कामा नये. म्हणूनच अशा जाणकाराचे शब्द गंभीरपणे समजून घेण्याची गरज आहे. तो जिहादी दहशतवादाचे युद्धशास्त्र व त्यातील महत्वाच्या साधनांचे विवेचन करतो आहे, आणि त्यातले प्रमुख हत्यार म्हणून धर्मश्रद्धेचा उल्लेख करतो आहे. पण कुठेच शस्त्रास्त्रे व शस्त्रसामग्रीचे नाव घेत नाही. किती विचित्र गोष्ट आहे ना?

   आपल्या माध्यमातून, वॄत्तपत्रातून वा टिव्हीच्या वाहिन्यांवर जे शहाणे दहशतवादाबद्दल बोलत असतात, त्यांना मी पोपटपंची करणारे म्हणतो, तेव्हा मी असा कोण शहाणा लागून गेलो आहे, असा प्रश्न वाचकाच्या मनात येऊ शकतो आणि तो अजिबात चुकीचा नाही. तेव्हा आधी असे मी का म्हणावे; त्याचा खुलासा करणे अगत्याचे आहे. त्याचे कारण असे, की या सगळ्यांपेक्षा ब्रिगेडीयर मलिक यांच्या मताला अधिक महत्व आहे. कारण ज्या जिहादचा अनुभाव आपण नित्यनेमाने घेत असतो, त्याची रणनिती व व्याख्या मुळात याच मलिकनी तयार केलेली आहे. त्यामुळेच त्याबाबतीत त्यांचे मत बाकी सर्वांपेक्षा मोलाचे व निर्णायक आहे. अफ़गाण जिहादसाठी अमेरिकेने पैसा व शस्त्रे पुरवली तरी त्यासाठी मुजाहिदीन तयार करण्याचे व त्यांना शहिद होण्याचे खास प्रशिक्षण पाक सेनेने दिले व त्यांची पायाभूत मानसिक जडणघडण त्याच पाकिस्तानी प्रशिक्षकांनी केलेली आहे. आणि ते प्रशिक्षण ज्या पायावर उभे आहे तो मूळ सिद्धांत ब्रिगेडीयर मलिक यांनी मांडला आहे. त्यावरील त्यांच्या विवेचनपुर्ण पुस्तकाला झिया उल हक यांनी खास प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यामुळेच बाकीचे काय बोलतात, त्याला मलिक यांच्या मूळ सिद्धांताची जोड व संदर्भ नसेल; तर त्यांची सगळी बडबड निव्वळ पोपटपंचीच ठरते. आणि इथे मलिक यांचा सिद्धांत नेमका लक्षात घेतला, तर आपण नेत्यनेमाने ऐकत असलेले विवेचन किती दिशाहिन व फ़सवे आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. मलिक यांच्या सिद्धांतानुसार ज्यांना मुजाहिदीन बनवून शहिद व्हायला पुढे करण्यात आले, ते विविध देशातले, संस्कारातले व विविध भाषा बोलणारे भिन्न वंशातले मुस्लिम तरूण होते. पण ते सगळे एकदिलाने, एकजुटीने आत्मसमर्पण करायला सज्ज होऊ शकले. त्यामागची श्रद्धा व प्रेरणा अगत्याची होती. हेतू, उद्दीष्ट यासाठी सर्वस्व अर्पण करायची ती जबरदस्त इच्छाच त्यामागची चालना होती. तीच ज्यांना ठाऊक नाही, ते मग स्फ़ोटकांचे पदार्थ, त्याचा पुरवठा वा संघटनांची नावे शोधत बसतात आणि दहशतवादाचा बंदोबस्त बाजूला पडतो. ज्या जिहादला आपण सामोरे जात आहोत, त्यात शस्त्रास्त्रे वा स्फ़ोटके, हत्यारे इत्यादीला काडीचे महत्व नसून; त्यात श्रद्धेला सर्वाधिक प्राधान्य आहे. आणि ती श्रद्धा ही धर्मश्रद्धा आहे. नुसती ही धर्मश्रद्धेची लढाई नाही, तर आपली धर्मश्रद्धा कडवी करून शत्रूची धर्मश्रद्धा खिळखिळी करण्याची ही लढाई आहे. त्यातला परिणाम धर्मश्रद्धेच्या बळावर किंवा दुबळेपणावर साधला जातो, हा त्यातला मुळ सिद्धांत आहे आणि आपण रोजच्या चर्चेतून काय ऐकत असतो? दहशतवादाला धर्म नसतो. आता सांगा तुम्ही बोधप्रद चर्चा ऐकत असता कि दहशतवाद जिहाद यावर पोपटपंची ऐकत असता?

   एक गोष्ट उघड आहे. सोवियत असो, की अमेरिकन सेना असो, तिच्याशी आमनेसामने लढणे कुठल्याही मुजाहिदीन वा तामिळी वाघाला, दहशतवाद्याला शक्य नसते. कारण या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या फ़ौजेइतकी साधनसामुग्री जमवणे बंडखोरांना शक्यच नसते. त्यामुळेच खुलेआम खरेखुरे युद्ध या बंडखोरांना शक्य नसते. म्हणूनच ते गमिनी युद्ध खेळत असतात. पण त्यात पुन्हा माणुसकी, नातीगोती अशा मानवी मानसिक दुबळेपणाच्या समस्या येत असतात. तुमची माणसे, नातेवाईक, कुटुंबिय, मित्र अशा बाबतीत हळवे होणारा सैनिक दुबळा होतो. तोच दुबळा झाला, मग त्याच्या हाती असलेल्या शस्त्राचा उपयोग रहात नाही. तेव्हा त्याला त्यापेक्षाही काही मोठ्या आस्थेमध्ये गुंतवून, अशा सर्व समजुती व भावनांच्या पलिकडे घेऊन जाणे अगत्याचे असते. त्याला श्रद्धा म्हणतात, आपण काही महान पवित्र कार्यात आहोत आणि त्यात आप्तस्वकीयांचा बळी पडला वा द्यावा लागला, तरी ते सत्कार्यच आहे, अशीच त्या लढणार्‍याची धारणा असायला हवी, तरच तो बेफ़िकीर होऊन पुढे सरसावू शकतो. त्यालाच मलिक धर्मश्रद्धा म्हणतात. कडवी श्रद्धा माणसाला कितीही व कुठल्याही यातना व कष्ट सोसायची ताकद देत असते. तर त्यातला दुबळेपणा हातातल्या भेदक शस्त्रालाही बोथट निकामी करून टाकत असतो. म्हणूनच मलिक श्रद्धेला इतके महत्व का देतात ते समजून घ्यावे लागेल. आणि त्यासाठी आधी आपण नेहमी ऐकत असतो, ती पोपटपंची बाजूला ठेवावी लागेल. सततच्या जिहादी हल्ल्यांना समर्थपणे सामोरे जायचे असेल, तर आपल्या धर्मश्रद्धा दुबळ्या असणे; हाच दहशतवाद जिहाद समोरचा आपला दुबळेपणा कसा आहे, ते आधी समजून घ्यावेच लागेल. आणि ते समजून घ्यायचे, तर आजवरच्या खुळेपणाकडे साफ़ पाठ फ़िरवून मलिक सांगतात, समजावतात ते जिहादचे तर्कशास्त्र अत्यंत बारकाईने समजून घ्यावेच लागेल.   ( क्रमश:)
 भाग   ( ९६ )    २५/२/१३

२ टिप्पण्या:

  1. दारुल-ए-हब...दारुल-ए-इस्लाम..यावर यांचे सर्व आवलंबुन आहे त्या शरिया च्या कायदे कानुन च्या चश्यातुन ते जगाकडे पहात असतांत..तुमच्या देशाचे कायदे कानुन संकृतीला काडीमात्र किंमत कोणताही मुस्लीम देत नाही..

    उत्तर द्याहटवा