गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१३

श्रद्धा-अस्मितेच्या पायावर राष्ट्राची उभारणी होते.


   कुठल्याही समाज, राष्ट्र वा मानवी समुहाची एक ओळख असते आणि ती ओळखच त्या समाज समुहाला एकत्र बांधून ठेवत असते. जसा माणूस स्वत:चा बचाव करत असतो, तसाच नेहमी त्या ओळखीचाही प्राणपणाने बचाव करत असतो. कोणी त्याला अस्मिता, कोणी अभिमान वा कोणी अस्तित्वभान असे वेगवेगळे नाव देतात. पण तशी ओळख नसलेला माणूस विरळा असतो आणि असा बिनचेहरा व बिन-ओळखीचा माणूस स्वत:चा बचाव करू शकत नाही, की अन्य कोणाचा बचाव करू शकत नाही. मग अशी ओळख ही श्रद्धाच असते. ती कधी भाषेची, प्रांताची वा धर्माची असू शकते. कधी जातीपातीचीही असू शकते. पण ती नसेल तर तुम्हाला ओळखच नसते. साधी गोष्ट घ्या. परवा कोणी त्या ऑस्करच्या सोहळ्यात ‘नमस्ते’ असा शब्द वापरला आणि एकाहुन एक बड्या नामवंत भारतीयांनी त्याची अभिमानाने आपल्या मतप्रदर्शनात दखल घेतली. ज्यांच्या वागण्या जगण्यात सहसा भारतीयत्व दिसत नाही किंवा आपल्यावर भारतीयत्वाचा शिक्का बसू नये, याची जी माणसे अगत्याने काळजी घेत असतात, अशीच ही मंडळी आहेत. शोभा डे किंवा तत्सम जे आंग्लाळलेले समाजातील प्रतिष्ठीत आहेत, असेच लोक इथे भारतात काही कोणी अस्मितेचा विषय काढला; मग त्याची हेटाळणी करण्यात नेहमी बौद्धिक धन्यता मानतात. अशा लोकांनाच कुणा अमेरिकन परदेशी नामवंताने नुसते ‘नमस्ते’ म्हटल्याने आभाळ केवढे ठेंगणे झाले होते. कमाल आहे ना? ज्यांना नित्यजीवनात भारतीय असल्याची लाज वाटत असते, त्यांना त्या नमस्तेचे इतके कौतुक कशाला असावे? कारण त्यांनी कितीही स्वत:ला भारतीय मानले नसले तरी परदेशी जातात, तेव्हा त्यांची दखल भारतीय म्हणूनच घेतली जात असते. दखल म्हणजे यांना फ़डतुस वागणूक दिली जात असते. मग त्यांच्या मनाचा कोंडमारा होत असतो. तिथे यातला कोणी कधी ‘नमस्ते’ चुकून बोलणार नाही. अमेरिकेनांपेक्षा अमेरिकन असल्याचे दाखवायची स्पर्धा चालते. पण तरीही त्यांच्या कातडीच्या रंगामुळे यांना तिथे भारतीय म्हणूनच हलकी वागणूक मिळते. त्याची जी छुपी वेदना असते; ती अशावेळी अस्मिता होऊन बाहेर येते. शोभा डे किंवा तत्सम लोकांनी त्या ‘नमस्ते’ शब्द उच्चारणाचे इतके कौतुक केले; कारण अशा लोकांना जगासमोर आपल्या भारतीयत्वाची लाज वाटत असते. त्याचा उच्चार अभिमानाने वा ठामपणे करायचीही हिंमत त्यांच्यामध्ये नसते. पण जेव्हा भारतीयत्व शिरजोर होताना दिसते; तेव्हा हीच मंडळी आपले भारतीयत्व दाखवायला अगत्याने आघाडीवर येताना दिसतील.

   कुठे बलात्कार झाले वा दंगली झाल्या, मग लगेच भारतीय असल्याची लाज वाटते; म्हणताना हेच लोक पुढे सरसावलेले दिसतात. असेच असेल तर कोणी मोठ्या परदेशी समारंभात नमस्ते म्हटल्यावर अभिमान कशाला? जो शब्द परदेशी जाऊन तुम्हाला उच्चारण्याची लाज वाटते, तो परदेशी माणसाने उच्चारला तर अभिमान तरी कशाला वाटतो? शोभा डे ज्या वर्तुळत वावरतात; त्या वर्तुळातील सगळे उच्चभ्रू बघितले, तर गुजरातच्या दंगलीपासून कुठल्याही बाबतीत पदोपदी ही मंडळी आपल्याला भारतीय असल्याची लाज वाटते असे म्हणताना व लिहिताना दिसतील. मग ती लाज किंवा ती अपराधी भावना; अशा प्रसंगी कशाला अभिमानाची होते? अभिमान असो, की लज्जास्पद असो, तुमची जी ओळख असते ती सर्वांगिण असते. ती सोयीनुसार कमीअधिक होत नसते. आपण अमुक आहोत, ही ती ओळख वा श्रद्धा असते. आणि तिचा अभिमान असेल तरच तिच्या समर्थनासाठी तुम्ही पुढे येता किंवा झुंज देऊ शकत असता. त्यातूनच तुमचे कर्तृत्व उभारले जात असते. त्यात यश व अपयश दोन्हींचा समावेश असतो. त्यामुळेच जेव्हा आपण समाज किंवा राष्ट्र म्हणून जगत असतो, तेव्हा त्याच्या भल्याबुर्‍या गोष्टींसाठी लाज बाळगून चालत नाही. भल्या गोष्टींचा अभिमान बाळगावा, बुर्‍या गोष्टी टाळायचा प्रयास करावा. परंतू कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली जी ओळख किंवा श्रद्धा असते; तिची लाज वाटून चालत नाही. जेव्हा अशी लाज वाटू लागते, तेव्हा आपण दुसर्‍या श्रद्धा वा दुसर्‍या विचारांना आपल्यावर मात करण्याची संधी देत असतो. कारण आपण जे कोणी असतो, त्याचा अभिमान विसरत असतो. सेक्युलर किंवा उदारमतवाद अशा अस्मितांची सतत टवाळी करताना दिसेल. आणि म्हणूनच उदारमतवादाच्या आहारी गेलेल्या अनेक महाशक्ती असलेल्या देशांची आज पुरती दुर्दशा झालेली आपण बघत असतो. अमेरिका आज जगातली एकमेव महाशक्ती मानली जाते. पण तिला अफ़गाणी जिहादींशी दोन हात करता आलेले नाहीत. त्याचे प्रमुख कारण आजच्या अमेरिकनांना आपल्या ओळखीचीच लाज वाटू लागली आहे. आपला देश इतरांवर अन्याय करतो, लुटमार करतो अशी एक अपराधी भावना तिथल्या समाजात यशस्वीरित्या राबवण्यात उदारमतवादी व सेक्युलर मंदळी यशस्वी झालेली आहे. त्याचेच परिणाम अमेरिका भोगते आहे. दुसरीकडे अर्धशतकापुर्वी अर्ध्या जगावर अरज्य करणारे युरोपीयन विकसित व श्रीमंत देश बघा. त्यांचीही अशीच दुर्दशा झालेली दिसेल. कारण आपण जगावर राज्य केले या अभिमानापेक्षा त्या देशातील समाजामध्ये अपराधीपणाची भावना आज अधिक आहे. परिणामी समाज म्हणून त्यांची उपजत प्रतिकार शक्तीच खच्ची होऊन गेली आहे. त्यांचा राष्ट्राभिमानच उध्वस्त होऊन गेला आहे. त्यांच्या धर्मश्रद्धा निकामी होऊन गेल्या आहेत.

   युरोपियन देशांची आजची दयनीय अवस्था त्यांच्यातल्या अपराधी भावनेतून आलेली आहे. सेक्युलर व बहुविध समाज घडवण्याच्या नादात युरोपियन देशांनी मोठ्या प्रमाणात परदेशी लोकांना नागरिकत्व बहाल केले; त्यातून त्यांच्या आजच्या समस्या उफ़ाळून आलेल्या आहेत. आणि त्यापैकी कोणी परदेशातून आलेल्या उपर्‍यांबद्दल नुसती तक्रार केली, तरी स्वकीयांवरच पक्षपात व वंशद्वेषाचा आक्षेप घेतला जातो. जणू त्या देशातले ते पुर्वापार वारस आहेत, हा त्यांचा गुन्हा ठरवला गेलेला आहे. त्यातून त्यांच्यात जी अपराधी भावना जोपासली गेली, त्याचे परिणाम दिसत आहेत. परंपरेने हे देश ख्रिश्चन मानले जातात. कारण कित्येक शतकांपासून त्यांची धार्मिक श्रद्धा व ओळखच ख्रिश्चन अशी होती. पण मागल्या पन्नास वर्षात सेक्युलर विचारसरणीने त्या धार्मिक श्रद्धा उध्वस्त करून टाकल्या. त्यातून या विविध युरोपियन समाज समुहांची आपली ओळखच हरवून गेली आहे. परिणामी तिथे आलेले व नागरिकत्व मिळवलेले परदेशी लोक शिरजोर होत चालले आहेत. कारण अशा बहुतांश परक्या नागरिकांनी तिथे जाऊनही आपल्या जन्मभूमीची संस्कृती व धर्माची कास सोडलेली नाही. मुठभर असूनही असे परके नागरिक तिथे आपल्या संस्कृती व धर्माचे काटेकोर पालन करतात, त्यात स्थानिक कायद्यांना हस्तक्षेप करू देत नाहीत. नुसते आपल्या परक्या संस्कृतीचे जतनच हे नवखे नागरिक करत नाहीत, तर आपल्या धर्मश्रद्धा व संस्कृतीच्या आग्रहासाठी स्थानिक कायद्यांना व संस्कृतीलाही आव्हान देत असतात. पण त्यांना रोखण्याची हिंमत अनेक युरोपीयन समाजांमध्ये उरलेली नाही. कारण बहुसंख्य असूनही हे समाज आपली धार्मिक व सांस्कृतिक ओळखच गमावून बसले आहेत. थोडक्यात ब्रिगेडीयर मलिक म्हणतात, तशा या युरोपियन समाज समुहांच्या धर्मश्रद्धा मोडकळीस आल्याने त्यांना समाज म्हणून नेस्तनाबुत करणे अस्मितावादी व श्रद्धावान अशा मुठभरांच्या छोट्या समुहाना सहजशक्य होते आहे.

   मग प्रश्न असा येतो, की त्या लहानमोठ्या युरोपियन समाज समुहांचा श्रद्धा व ओळखीचा पाया मोडीत काढण्याचे काम ज्यांनी केले; त्यांनीच आक्रमकांचे काम सोपे करून टाकलेले नाही काय? सेक्युलर उदारमतवाद्यांनी व मानवाधिकाराच्या नावाखाली युरोपियन देशात ज्याप्रकारे तिथल्या ख्रिश्चन समाजाचा व श्रद्धेचा पायाच उखडण्यात आला; त्यातून आज त्या समाजांचे मनोधैर्यच पुरते खच्ची होऊन गेले आहे. भारताच्या तुलनेत युरोपियन देशातील मुस्लिमांची संख्या खुपच कमी वा नगण्य आहे. पण त्या मुस्लिमातील जिहादी घातपात्यांनी युरोपियन समाजामध्ये निर्माण केलेली दहशत भारतापेक्षा थरारक आहे. आज देखील शस्त्रास्त्रांच्या क्षमतेमध्ये बघितल्यास अमेरिकाच नव्हेतर ब्रिटन, फ़्रान्स, इटाली व जर्मनी हे बलाढ्य़ देश मानले जातात. पण इतकी शस्त्रास्त्रे  व तंत्रज्ञान सज्जता असूनही त्यांना तिथले मुठभर जिहादी हैराण करून सोडत आहेत. पण जोवर त्यांच्या राष्ट्रीय अस्मिता व धर्मश्रद्धा भक्कम होत्या, तोवर त्या देशांची जगावर हुकूमत चालत होती. दुसरीकडे चीनसारखा निधर्मी वा साम्यवादी देश बघता येईल. त्याची श्रद्धा धर्माची नसेल. पण राजकीय, राष्ट्रीय अस्मिता पक्की व कडवी आहे. त्या श्रद्धेला धक्का बसेल असे कुठले कृत्य चीन सहन करत नाही. तिआनमेन चौकातील हत्याकांडाची लाज वाटेल; त्याला चीनम्ध्ये स्थान नसते. बर्‍यावाईट गोष्टीसह तिथल्या समाजाच्या अस्मिता श्रद्धा भक्कम आहेत आणि तो देश महाशक्ती म्हणून पुढे आलेला आहे. त्याला कोणी भयभीत करू शकत नाही. श्रद्धेची व अस्मितेची ही किमया आहे.  ( क्रमश:)
 भाग   ( १०० )    १/३/१३

1 टिप्पणी:

  1. हे स्वतःला उदारममतवादी म्हणवतात. आणि आपल्याच संस्कृतीचा, विश्वासांचा आणि श्रद्धेचा उपहास करतात! त्यांना यात मोठेपणा वाटत असेल, पण खरे तर त्यांची स्थिती, ‘न घरका न घाटका’ अशी केविलवाणी असते, म्हणून ते मग काहीतरी सनसनाटी विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात राहू पाहतात! खरे तर शोभा डे ही आता spent force आहे असे मला वाटते.

    उत्तर द्याहटवा