मुस्लिम मतांचा गठ्ठा किंवा मुस्लिम गठ्ठ्य़ानेच कुणाला तरी मतदान करतात, असे आपल्या देशातील एक राजकीय गृहीत आहे. कुठल्याही निवडणूकांचे विश्लेषण होते; तेव्हा हा मुद्दा सातत्याने चर्चिला जात असतो. सतत एकच बोलत वा सांगत राहिले; मग त्याचा लोकांवरच नव्हे तर शहाण्यांवरही परिणाम होतो. इथेही मुस्लिम मतांच्या गठ्ठ्याची दंतकथा तशीच आहे. ते प्रत्येक निवडणुकीत खरे असतेच असे अजिबात नाही. काही वेळा खरे असेलही. पण असे माध्यमातून व राजकीय विश्लेषणातून सतत सांगितले गेल्याचा एक परिणाम; जसा राजकीय क्षेत्रावर झाला आहे, तसाच तो मुस्लिम मानसिकतेवरही झालेला आहे. त्यातून काही प्रमाणात मुस्लिमांची मते एकगठ्ठा होत गेली आहेत. मात्र त्याचा परिणाम हिंदू मानसिकतेवरही होऊ लागणे स्वाभाविक होते. कारण सगळेच पक्ष मुस्लिम मतांचा गठ्ठा मिळण्यासाठी मुस्लिमांचे लांगुलचालन करतात, अशी एक समजूत वाढीस लागली. प्रामुख्याने गुजरातच्या दंगलीनंतर याचा देशव्यापी राजकीय वापर झाला. उदाहरणार्थ लालूप्रसाद यांनी बिहारच्या निवडणुकांमध्ये मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी गुजरातच्या दंगली व हिंसाचाराची छायाचित्रे मुद्दाम प्रचारात वापरली होती. अन्य ठिकांणी भाजपा विरोधासाठी त्याचीच पुनरावृत्ती होत गेली. पण अशा गृहीताची दुसरी बाजू अशी, की हिंदू मतांचा गठ्ठा तयारच होणार नाही. विविध जातीमध्ये विभागल्या गेलेल्या हिंदूंचा मतांचा गठ्ठा कधीच होणार नाही, याची जणू प्रत्येकाला खात्रीच होती. मोदींनी धक्का दिला आहे, तो त्याच गृहीताला. निदान सध्या तरी मोदी यांनी गुजरातमध्ये त्या गृहीताला धक्का देऊन दाखवले आहे. हे त्यांचे हिंदू मतांच्या गठ्ठ्याचे गृहीत अजून कोणाच्या डोक्यातही आलेले दिसत नाही. म्हणूनच हे मतांच्या गठ्ठ्याचे मोदी मांडू बघत असलेले समिकरण समजून घेण्याची गरज आहे. अगदी जे लोक मोदींना पराभूत करायला उत्सुक आहेत, त्यांनीही हे समिकरण समजून घेतले पाहिजे. गुजरातमध्ये तेच समजून न घेतल्याने मोदींना पराभूत करणे कोणाला शक्य झालेले नाही. अगदी मागल्या दोन निवडणुका त्यांचे जुने सहकारी मोदींना पराभूत करण्यासाठी सज्ज झाले; तरी ते शक्य झालेले नाही. आणि आज सगळे सेक्युलर व भाजपातले विरोधकही मोदींचे समिकरण समजून घ्यायला तयार नाहीत, तीच मोदींची जमेची बाजू होऊन गेली आहे. काय आहे ते समिकरण?
मुस्लिमांची देशातील लोकसंख्या सतरा अठरा टक्के आहे. त्यामुळेच मतदारामध्येही तेवढीच मुस्लिमांची टक्केवारी मानली जाते. ते सर्वच मुस्लिम एक गठ्ठा मतदान करीत नसतील. पण निदान बारा तेरा टक्के मुस्लिम काही वेळी एक गठ्ठा मतदान करतात हे नक्की. पण तो गठ्ठा ज्या पारड्यात पडतो, त्याला आयता विजय मिळतो, यात शंकाच नाही. मग तेवढाच किंवा त्यापेक्षा थोडा अधिक वजनदार मतांचा गठ्ठा दुसर्या बाजूला तयार केला; तर त्या बाजूचे पारडे झुकणार ना? मुस्लिमांच्या विरोधात मनस्थिती असलेला हिंदूंचा तसा गठ्ठा तयार केला; तरच मुस्लिम मतांच्या गठ्ठ्यावर सेक्युलर नसताना मात करता येऊ शकेल ना? गुजरातमध्ये मोदी यांनी ते दंगली नंतर यशस्वीरित्या करून दाखवले. मुस्लिमांची संख्या भारतात वीस टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि अन्य धर्मिय सोडले, तरी निदान सत्तर टक्के लोकसंख्या हिंदूंची आहे, हे कोणी नाकारू शकणार नाही. अशी मोठी लोकसंख्या विविध भाषिक, प्रादेशिक, जातीजमाती अशा लहान मोठ्या गटात विभागली गेलेली आहे, यातही शंका नाही. पण त्याच्याही पलिकडे जाऊन स्वत:ला हिंदू मानणारी व धर्माची अस्मिता मानणारी, काही लोकसंख्या नक्कीच आहे. आणि त्या अस्मितेला जागवले तर हिंदूंच्याही मतांचा गठ्ठा तयार होऊ शकतो. तोच गठ्ठा गुजरातमध्ये मोदी यांनी उभा केला आहे. तिथे त्याला त्यांनी गुजरातची अस्मिता असे नाव दिले असले, तरी ती वास्तवात हिंदू अस्मिताच आहे, ज्यामध्ये तमाम लहानमोठ्या हिंदू जातीजमातींचा समावेश होतो. त्या पुढे केशूभाई पटेल यांच्या पटेल जाती अस्मितेलाही त्यांनी पराभुत करून दाखवलेले आहे. तेव्हा त्यांनी प्रत्यक्षात हिंदू अस्मितेचा म्हणजेच मतांचा गठ्ठा होऊ शकतो, याची प्रचिती मागल्या दोन निवडणुकांमध्ये घडवून आणली आहे. दंगल होऊन गेल्यावर पहिल्या निवडणुकीची गोष्ट बाजूला ठेवा. मागल्या दोन म्हणजे २००७ व २०१२ अशा निवडणूका त्यांनी त्याच गठ्ठा मतांवर जिंकल्या आहेत. आणि त्या जिंकताना त्यांच्या विषयी देशाच्या विविध राज्यात जे त्यांचे चहाते तयार झाले, ते विकासाचे पुरस्कर्ते आहेत; असे मानणे म्हणजे स्वत:ची फ़सवणूक करून घेणे असेल. मोदी विकासही करतात, पण त्यांच्या राज्यात मुस्लिमांची दादागिरी चालत नाही, अशी एक समजूत जाणिवपुर्वक निर्माण करण्यात आली आहे. अर्थात गुजरातमध्ये मुस्लिम जीव मुठीत धरून जगतात, असे चित्र सेक्युलर माध्यमे व राजकीय पक्षांच्या आरोपातून तयार झाले आहे. ते अनेक राज्यातल्या अनेकांना आवडणारे आहे, त्याचे काय?
उदाहरणार्थ मध्यंतरी आसाममध्ये ज्या दंगली झाल्या किंवा मुंबईत त्याच दरम्यान रझा अकादमीच्या मोर्चामध्ये जी दंगल माजवण्यात आली; तेव्हा मोदीच त्याला पायबंद घालू शकतील, अशी भावना बळावत असते. आज अशा भागात तुम्ही गेलात तर मोदींचे अधिक चहाते तुम्हाला आढळून येतील. आपल्या राज्यात वा देशात मोदींसारखा सत्ताधारी वा मुख्यमंत्री असेल, तर मुंबईत रझा अकादमीने घातला तसा गोंधळ घालायची हिंमत मुस्लिमांना होणार नाही; असे सामान्य हिंदूला वाटले तर नवल नाही. मध्यंतरी कमल हासनच्या ‘विश्वरूपम’ चित्रपटावरून गदारोळ झाला. तसा गुजरातमध्ये झाला नाही, याकडे लोकांचे लक्ष असते. सामान्य माणूस असे बारकावे लक्षात घेत असतो व लक्षात ठेवत असतो. मोदी पंतप्रधान असल्याने असे प्रसंग टाळले जातील, याची आताच कोणी खात्री देऊ शकत नाही. पण तशी अपेक्षा करणार्यांसाठी एक नेता तर समोर आहे ना? त्यातूनच मोदींची लोकप्रिय प्रतिमा उभी राहिलेली आहे. त्यातूनच त्यांनी हिंदू मतांचा गठ्ठा निर्माण केलेला आहे. हा त्यांचा चहातावर्ग त्यांचा मतदार आहे. सीमेवर दोन जवानांची हत्या झाल्यावर देशाचा पंतप्रधान चार दिवस गप्प होता आणि पाकिस्तानातून गुजरातला उद्योग मेळाव्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाला तसेच माघारी पाठवण्याची हिंमत मोदींनी केली होती. अशा प्रसंगातून त्यांची प्रतिमा निर्माण झालेली आहे. त्यातून त्यांनी हिंदू मतांचा गठ्ठा निर्माण केलेला आहे, नुकत्याच झालेल्या दोन मतचाचण्यामध्ये त्याचे नेमके प्रतिबिंब पडलेले दिसते. भाजपाला मिळू शकणारी मते आणि मोदी पंतप्रधान होणार असतील, तर भाजपाची वाढणारी मते त्याचीच साक्ष आहे. एबीपी न्युज वाहिनीच्या चाचणीमध्ये मतदाराने सांगितले, की आताच मतदान झाले तर भाजपाला ३९ टक्के लोक मते द्यायला तयार आहेत. पण मोदीच जर भाजपाचा पंतप्रधान होणार असेल, तर आणखी दहा टक्के लोक भाजपाला मते द्यायला उत्सुक आहेत. इथे मोदींसाठी भाजपाची वाढणारी दहा टक्के मते म्हणजे नेमके काय आहे? त्यालाच मतांचा गठ्ठा म्हणतात.
ही दहा टक्के मते भाजपाची नाहीत, तर भाजपा कडव्या हिंदूत्वाची भूमिका घेणार असेल तर भाजपाला मत द्यायला तयार आहेत. मोदी यांनी नेमका तोच हेतू डोळ्यासमोर ठेवून गेल्या पाच वर्षात वाटचाल केलेली आहे. एकीकडे त्यांनी गुजरातमध्ये आर्थिक, औद्योगिक प्रगती व विकासाची वाटचाल करताना दुसरीकडे त्यांची कडवे हिंदूत्ववादी नेते अशी प्रतिमा सेक्युलर माध्यमे तयार करतील अशी काळजी घेतली आहे. त्यातूनच मुस्लिम विरोधी असलेल्या लोकसंख्येच्या अपेक्षा आपल्या बाबतीत वाढतील; अशी योजना मोदींनी यशस्वीरित्या राबवली आहे. त्यातूनच हा हिंदू मतांचा गठ्ठा निर्माण झालेला आहे. जो साधारणपणे मुस्लिम मतांच्या गठ्ठ्याची बरोबरी करणारा आहे. मुस्लिम मतांचा गठ्ठा आज देशाच्या विविध राज्यांमध्ये, विविध पक्षांच्या व नेत्यांच्या मागे जाणारा आहे. एकाच पक्षाची वा नेत्याची त्या मुस्लिम गठ्ठ्यावर मक्तेदारी नाही. पण हिंदू मतांचा गठ्ठा जो आकाराला येत आहे, त्यावर मात्र मोदींची एकट्याची मकेदारी असणार आहे किंबहूना आहेच. त्यावर भाजपाही आपला हक्क सांगू शकत नाही, इतका तो मतदार मोदींशी एकनिष्ठ बनत चालला आहे. जितक्या प्रमाणात मुस्लिमांचा शत्रू अशी मोदींची प्रतिमा निर्माण केली जाईल; तेवढा असा गठ्ठा वाढत जाणार आहे, त्यासाठी मोदी स्वत:च प्रयत्नशील असतात, हे आता लपून राहिलेले नाही. अर्थात कोणी अजून डोळे उघडून मोदींच्या या हिंदू व्होटबॅन्क समिकरणाचा विचारही करत नसतील, तर त्यांचे डावपेच कोणाला कसे कळणार? मोदी यांनी जो कालबाह्य डाव गुजरातमध्ये मागल्या दहा वर्षात उधळून लावला, तोच मुस्लिम मतांच्या गठ्ठ्याचा डाव देशाच्या राजकारणात उलटवण्यास आता मोदी सज्ज झालेले आहेत. पण त्यांच्या विरोधकांच्या डोक्यात त्याचा प्रकाशही पडलेला नाही. मग मोदींच्या यशापयशाचे अंदाज त्यांना कसे करता येतील? ( क्रमश:)
भाग ( ८७ ) १६/२/१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा