कुठे बलात्कार वा कुठली अशीच अमानुष घटना घडते तेव्हा लगेच आपल्याकडले अतिशहाणे भारतीय असल्याची लाज वाटते; अशी भाषा बोलू लागतात. आणि मग आमच्यातले बहुतांश खुळे आपल्या चांगुलपणाचे प्रदर्शन मांडण्यासाठी त्यांच्याच सुरात सुर मिसळून भारतीय असल्याबद्दल अपराधी भावना व्यक्त करू लागतात. यांना त्या हीन कृत्याची लाज वाटते, की आपल्या भारतीय असण्याची लाज वाटते? सव्वाशे कोटी भारतीय गुन्हेगार असल्यासारखी ही भाषा मला नेहमी संतापजनक वाटते. कारण मी कुठलाही गुन्हा केलेला नसताना माझ्या मनात त्याविषयी अपराधी भावना जागवण्याची ती रणनिती आहे. जेव्हा तुमच्या मनात अशी आपल्याच अस्तित्वाविषयी अपराधी भावना प्रभावी होत जाते; तेव्हाच तुम्ही तुमच्या अस्तित्वाचा बचाव करायची शक्ती गमावून बसत असता. तुमच्यातल्या प्रतिकार शक्तीचे त्यातून खच्चीकरण होत असते व केले जात असते. आज इतकी वर्षे पाकिस्तानने किती म्हणून गुन्हेगारी कृत्ये केली आहेत. पण कुणी तिथे आपल्या पाकिस्तानी असल्याची लाज वाटते; अशी भाषा वापरली आहे काय? जिहादी हिंसाचाराने जगभर हजारो निरपराधांचे हकनाक बळी घेतले आहेत, म्हणून कुणी मुस्लिम असल्याची लाज वाटते असे म्हणतो काय? श्रीलंकेच्या खेळाडूंवर पाकिस्तानात भर रस्त्यावर गोळ्या झाडल्या गेल्या; म्हणून कुणा पाकिस्तानी क्रिकेटपटूने तरी आपल्या पाकिस्तानी वा मुस्लिम असण्याची लाज वाटते, अशी भाषा वापरली आहे काय? ते फ़क्त कृत्याचा निषेध करतात, पण तेवढ्याच आवेशात इस्लाम म्हणजे शांतता व इस्लाम धर्म हिंसेला मान्यता देत नाही, असे त्याच्याच पुढे अगत्याने सांगतात. मग आम्ही उठसुट भारतीय असल्याची किंवा हिंदू असल्याची लाज वाटते अशी भाषा कशाला वापरत असतो? त्यातून आपण स्वत:च्याच अस्तित्वाला गुन्हा ठरवत असतो. ज्याचा अभिमान बाळगायचा त्याचीच लाज वाटू लागली; तर त्याचा बचाव करायची हिंमत येणार कुठून? म्हणूनच मग पाकिस्तानी सैनिकांनी वा तिथल्या जिहादींनी नियंत्रण रेषेवर भारतीय सैनिकाचे मुंडके कापल्याची पाकिस्तान्यांना लाज वाटली नाही, की कुणा मुस्लिमाला हे जिहादींनी इस्लामच्या नावावर केले असूनही मुस्लिम असल्याची कुणा मुस्लिमाला लाज वाटली, असे त्यापैकी कोणी म्हणाला नाही. कारण कृती करणार्याचे पाप त्या संपुर्ण समाजाचे नसते. अशा कृतीचा राग यावा. पण त्यासाठी स्वत:च्या अस्तित्वाबद्दल अपराधी भावना असायचे कारण नाही. आणि जो कोणी मुद्दाम तुमच्यात अशी जाणीव निर्माण करत असतो; तोच तुमचे मानसिक खच्चीकरण करत असतो. तुमच्या असण्याचे, तुमच्या अस्तित्वाचे व पर्यायाने तुमच्या मनोधैर्याचे त्यातून खच्चीकरण होत असते. एकदा तुमचे असे खच्चीकरण झाले; मग तुमच्या हाती कुठलेही भेदक हत्यार असले; तरीही स्वत:चा बचावही करू शकत नसता. कारण प्रतिकार व लढण्याची इच्छाच तुम्ही गमावून बसलेले असता. म्हणूनच घटना कितीही भीषण वा अमानुष असली, म्हणून आपल्या भारतीय असण्याची लाज वाटायचे कारण नाही. असे काही करणारा भारतीय आहे, हिंदू आहे म्हणून त्याला आधीच ओळखून आपण आपल्यातून हाकलून लावला नाही, याची लाज वाटायला हरकत नाही. पण ज्या जाणिवा, श्रद्धा व ओळखीने तुम्ही भारतीय वा हिंदू असतात, त्याची लाज वाटायचे कारण नाही.
अशी लाज वाटण्याची भाषा जाणिवपुर्वक व योजनापुर्वक आपल्या प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण करण्यासाठीच योजलेली असते. तिचे परिणाम आपण भोगत आहोत. काश्मिरच्या सीमारेषेवर दोघा सैनिकांची हत्या झाली व एकाचे मुंडके कापुन नेल्यावर आपल्या देशाचा पंतप्रधान वा सेक्युलर सरकार कुठलीही प्रक्षुब्ध प्रतिक्रियासुद्धा देऊ शकले नव्हते. कारण त्यांना आपल्या भारतीय असण्याचीच लाज वाटत असेल, तर त्यांनी आपल्या जवानाचे मुंडके कापून नेल्याने चिडावे कशाला व कसे? कोणालाही चीड येते वा प्रतिकार करावासा वाटतो, तो मुळात त्याच्या अभिमानाला धक्का बसला, इजा झाली तर. ज्याचा अभिमानच वाटत नसतो, त्याचा प्रतिकार करायची इच्छाच होणार कशी? म्हणूनच ते मुंडके कापून नेल्यावरही आमचे सरकार शांत बसून होते, संरक्षणमंत्री व परराष्ट्रमंत्री विचारमंथन करत बसले. पण त्याचवेळी तुमच्या माझ्यासारखे लाखो करोडो नागरिक प्रक्षुब्ध झाले होते, पाकिस्तानवर हल्ला करा; म्हणूनही मागणी करू लागले होते. पण पंतप्रधान शांतच होते ना? कारण आपल्याला आपण भारतीय असल्याची लाज वाटत नाही, तर अभिमान आहे. म्हणून आपण चिडून उठलो होतो. पण भारतीयत्वाचीच लाज वाटणारे पंतप्रधान वा सेक्युलर जे कोणी आहेत; त्यांना त्या जवानाचे मुंडके कापल्याचे सोयरसुतक नव्हते ना? म्हणूनच कारण कुठलेही असो; आपल्याला आपल्या भारतीयत्वाची, हिंदू असण्याची लाज वाटता कामा नये. ती वाटू लागली, की आपण संपलो म्हणून समजा. कारण त्याचीच लाज वाटू लागली तर आपली प्रतिकारशक्ती त्याच्याबरोबरच क्षीण व निकामी होऊन जात असते. तिथेच मग कसाब किंवा कोणीही बॉम्बस्फ़ोट घडवणारा अर्धी लढाई जिंकत असतो. आणि तेच तर पाकिस्तानी सेनाधिकारी ब्रिगेडीयर मलिक आपल्याला समजाऊन सांगत आहेत. ते काय म्हणतात, ते म्हणूनच काळजीपुर्वक समजून घेण्याची गरज आहे. जोवर तुमची श्रद्धा पक्की व भक्कम असते, तोपर्यंत हत्यारे वा हिंसा दहशत माजवू शकत नाहीत, अशीच मलिक यांनी ग्वाही दिलेली आहे ना?
कितीही प्रतिकुल परिस्थितीत तुमचा बचाव व्हायचा असेल; तर त्यातून सहीसलामत सुटण्याची इच्छा आवश्यक आहे. त्यासाठी साधने मग दिसू लागतात व उपलब्धही होतात. पण इच्छाच नसेल तर समोर व हाताशी साधने असूनही तुम्ही काहीच करू शकत नाही. ती साधने निकामी व निरूपयोगी असतात. म्हणून तर ज्याच्या हाती कुठलेही साधन व अधिकार नव्हता असा माणूस त्या जवानाचे मुंडके कापले गेल्यावर आपला भारतीयत्वाचा अभिमान दाखवू शकला, त्याचे नाव नरेंद्र मोदी. जेव्हा तीस लाखाची फ़ौज हाताशी असूनही मनमोहन सिंग आणि त्यांचे सरकार हात चोळत बसले आणि जवानाचे मुंडके तरी परत द्या; अशा गयावया पाकिस्तानकडे करत होते, तेव्हा मोदी यांनी त्यांच्या गुजरातच्या गुंतवणूक योजनेसाठी आलेल्या पाकिस्तानी शिष्टमंडळाला तसेच माघारी पाठवून दिले होते. ह्या माणसाने आमंत्रिताला परत पाठवण्याची ती हिंमत कुठून आणली? तर त्याला आपल्या गुजराती, हिंदू व भारतीय असण्याची अजिबात लाज वाटत नाही. गेली दहा वर्षे त्याच्यावर नरभक्षक, मौतका सौदागर असे शेकडो आरोप झाल्यावरही त्याने एकदाही माफ़ी मागितली नाही; हीच त्याची ताकद आहे. चुका वा गुन्हे गुजराती हिंदूंकडून झाले असतील, तर त्यांना शिक्षा द्यायला हरकत नाही. पण त्यासाठी गुजराती हिंदू असणे हा ज्याने गुन्हा मानला नाही, त्याच्याविषयी लाज बाळगली नाही, म्हणूनच मोदीमध्ये ही हिंमत दिसू शकली. ती देशाच्या सर्वशक्तीमान मानल्या जाणार्या सेक्युलर सरकारला दाखवता आलेली नाही. गुजरातच्या दंगली वा तो हिंसाचार याच्याविषयी अपराधी भावना कुरवाळत बसला असता, तर त्यालाही इतकी हिंमत दाखवता आलीच नसती.
म्हणूनच एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे. कुठलीही अमानुष घटना कृती कोणकडून घडली आणि तो आपल्यातला असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला राग जरूर यावा, त्या माणसाचा तिटकारा जरूर वाटावा. पण तो आपल्यातला आहे, म्हणून आपण स्वत:चाच तिटकारा करण्यासारखा मुर्खपणा नाही. कारण तसे करण्यातून आपणच स्वत:ला हतबल व असहाय करून टाकत असतो. त्या जवानाच्या मुंडके कापल्यानंतरची आपण व्यक्त केलेली हतबलता, अगतिकता ही सेक्युलर देणगी आहे. जिने आपल्याला स्वत:चीच निर्भत्सना करायची सवय लावली आहे. या सेक्युलर देणगीने आपल्यातली प्रतिकार शक्ती खच्ची करून टाकली आहे. आपल्याला स्वत:च्या अस्तित्वाचीच लाज वाटू लागते; तेव्हा आपण त्या अस्तित्वासाठी लढायला उभे राहू शकत नाही. त्याचा बचाव करू शकत नाही, की त्याला टिकवू शकत नाही. एवढा खंडप्राय देश भारत आज जगासमोर अगतिक आहे, कारण त्याला स्वत:ची ओळख नाही, कारण आजचा भारत आपल्या श्रद्धा व आपली ओळखच गमावून बसला आहे. सेक्युलर ग्लानीने त्याला स्वत:ची ओळखच उरलेली नाही. मग त्याने लढायचे कशाला आणि कशासाठी? ब्रिगेडीयर मलिक सांगतात, तशी आपल्या मनातली दहशत ही आपण गमावलेल्या श्रद्धेमुळे आलेली आहे. म्हणूनच त्यावरचा उपाय शस्त्रास्त्रे नसून आपल्या भारतीयत्वाच्या व हिंदू असण्याच्या श्रद्धाच आपले सुरक्षा कवच आहे, जी श्रद्धा आपल्याला बचाव वा लढायला प्रवृत्त करू शकते. दहशतवादाशी सामना करायचा असेल तर आपण सर्वप्रथम आपल्या श्रद्धा व आपली ओळख प्राणपणाने जपली पाहिजे. त्याची लाज वाटता कामा नये. कोणी काही गैरकृत्य केले तर त्याला दोषी मानावा. पण भारतीय म्हणून लाज वाटायचे कारण नाही. जो कोणी असा आपल्या मनात अपराधी भावना जोपासू पहात असेल तो त्या दहशतवाद्यांचाच हस्तक असतो, हे विसरता कामा नये. ( क्रमश:)
भाग ( ९९ ) २८/२/१३
'आज इतकी वर्षे पाकिस्तानने किती म्हणून गुन्हेगारी कृत्ये केली आहेत. पण कुणी तिथे आपल्या पाकिस्तानी असल्याची लाज वाटते; अशी भाषा वापरली आहे काय? जिहादी हिंसाचाराने जगभर हजारो निरपराधांचे हकनाक बळी घेतले आहेत, म्हणून कुणी मुस्लिम असल्याची लाज वाटते असे म्हणतो काय? '
उत्तर द्याहटवानक्कीच नाही असे का तर हिंदू धर्मश्रद्धेला धक्का बसलेला आहे. तसा तो पाकींना बसत नाही...