शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१३

देवीची साथ अंधश्रद्धेने नव्हे विज्ञानाने संपली


   बालपणीची गोष्ट आठवते. आज देवीची साथ म्हटले तर नव्या पिढीला त्याचे गांभिर्य कळणार नाही. पण त्या काळात म्हणजे साठ वर्षापुर्वी देवी ही भयंकर सांसर्गिक रोगाची साथ असायची. तिची जनमानसावर इतकी दहशत होती, की कोणाला त्याची बाधा झाली असेल; तर ‘देवी आल्या’ असेही बोलायला लोक घाबरत असत. मला हे आठवते कारण आमच्या लालबागच्या चाळीत माझी एक बालमैत्रीण त्याचा बळी झाली होती आणि तिचा भाऊ त्यातून कसाबसा बचावलेला आठवतो. त्यावर उपचार औषधे तेव्हा झटपट उपलब्ध नव्हती. जन्मत:च बालकांना काही डोस टोचून वगैरे दिले जात. तरीही त्याचे निर्मूलन झालेले नव्हते. त्यामुळे कुठल्या वस्तीत त्याची बाधा कुणाला झाली; मग आसपासच्या लोकांची पाचावर धारण बसायची. एक मजला खालच्या घरात दोन मुलांना बाधा झाली, म्हटल्यावर तमाम पालक हवालदिल झाले होते. त्यांच्या अंगावरचे पुरळ व फ़ोड बघून आमचीही गाळण उडाली होती. दुसर्‍या मुलांसोबत आमच्यातही त्याची चर्चा व्हायची. कारण तात्कालीन समजूतीप्रमाणे तो देवीचा कोप होता आणि मग देवीला प्रसन्न करून घेण्य़ावरच त्यापासून सुटका शक्य होती. सहाजिकच अन्य उपचार होत असताना; त्या घरात रोजच्यारोज भजने व्हायची. मला त्याविषयी कमालीचे कुतूहल होते. म्हणून घरच्यांची नजर चुकवून मी त्या खोलीत डोकावण्याचा प्रयास करीत असे. पण तिथले पालकही मला हाकलून लावायचे. एका दुसर्‍या मुलाच्या घरात देवी हा शब्द उच्चारला म्हणून कानशीलात आवाजही निघाला होता. कारण काय असेल? तर नाव घेतले तरी देवी तिथेही येते. त्या वयात चिकित्सा फ़ारशी शक्य नव्हती. पण कुतूहल खुपच होते. नाव घेतल्यावर देवी येते कशी व बाधा होते कशी? भजनांनी रोगराई बरी होत असेल तर औषधे कशाला करीत आहेत, असे अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालत होते. पण विचारायचे कोणाला आणि शंकासमाधान करणार कोण? लालबागच्या त्या कामगार वस्तीत आगावू शंका घेणार्‍या पोरांना पाठीत रट्टा घालणे; हेच शंकासमाधान असायचे. सहाजिकच देवीचे रहस्य दिर्घकाळ मनात पिंगा घालत राहिले होते. काही दिवसांनी त्या दोन भावंडातील मुलगी दगावली आणि मुलगा बचावला. पण आजाराची मुदत पुर्ण होत असताना शेवटचे भजन दुपारी उरकून मंडळी निर्माल्य वगैरे घेऊन भजने म्हणतच समुद्रावर विसर्जनासाठी गेल्याचे माहित होते. मग अशा भजने गुणगुणत निघालेल्या टोळ्या दिसल्या तर मी त्यांच्या मागून जात काय बडबडतात, त्याचाही मागोवा घ्यायचा प्रयत्न केला होता. पण काहीच कळू शकत नव्हते. देवीची बाधा म्हणजे दहशत होती.

   पुढे शाळेत विज्ञान शास्त्र शिकताना रोगराई, आजार, त्यावरील उपचार व ते शोधून काढणारे शास्त्रज्ञ असे विषय आले आणि काही प्रमाणार शंकानिरसन होऊ शकले. तेव्हा लक्षात आले, की पूजापाठाने वा भजनाने देवीची बाधा संपली नाही, ती बाधा होऊच नये म्हणून बालवयातच लस टोचून घेतली; मग त्या रोगजंतूंशी प्रतिकार करणारी शक्ती शरीरात उपजत निर्माण होते, ती निर्माण करायला औषधी लस मदत करते. अशी लस शोधून काढण्यासाठी जगभरातल्या अनेक शास्त्रज्ञांनी आयुष्यातली कित्येक वर्षे खर्ची घातली आहेत. नुसती औषधे शोधून काढली नाहीत; तर त्या रोगाची बाधा होऊच नये असेही उपाय शोधून काढले आहेत. त्यामुळे देवीचे जगातून निर्मूलन व उच्चाटन होत गेले. आरंभी शाळांमधून शहरातून व अखेरीस खेड्यापाड्य़ातून अशी लस टोचण्याचे व्यापक कार्यक्रम योजले गेले. लस न टोचलेले मूल शिल्लक ठेवले गेले नाही आणि दोन पिढ्यातच देवीचे संपुर्ण देशातून उच्चाटन झाले. त्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने करण्यापर्यंत मी पत्रकार होऊन गेलो होतो. भारतातल्या्च बिहार राज्यात अखेरचा देवीच रोगी आढळला आणि त्यानंतर पृथ्वीतलावर देवी शिल्लक उरली नाही. लोक त्यातून कसे बाहेर पडले? सरकारी योजना व सक्तीचे लसीकरण त्याचे खरे कारण होते. मोफ़त व सक्ती यामुळे समाज रोगमुक्त झाला आणि त्यानंतर बाधाच होत नसेल तर लोकांना निरर्थक भजन पूजनातून अंधश्रद्धा जोपासण्याची गरजच राहिलेली नाही. आता कुणासाठी देवीचा रोग ही असाध्य बाधा राहिलेली नाही, कारण त्याचे निर्मूलन होऊन गेले आहे. आपोआपच त्याच्या भोवतीच अंधश्रद्धा संपुष्टात आली. त्याचे श्रेय लस शोधून काढणार्‍यांपासून ती स्वस्तात उपलब्ध करणारे, ते लसीकरण खेड्यापाड्यापर्यंत घेऊन जाणारे, अशा सर्वांना आहे. त्यांनी भजनपूजनातून रोगबाधा संपत नाही, अशी लोकांची हेटाळ्णी केली नाही, की अंधश्रद्धा निर्मूलनाचा आव आणला नाही. त्यांनी लोकांना रोगमुक्त करण्याचा उपाय अंमलात आणला आणि लोकांना अंधश्रद्धेच्या मार्गाने जाण्याची गरजच उरली नाही. समजा हे सगळे लोक लस शोधण्यापासून ती लोकांपर्यंत घेऊन जायच्याऐवजी भजनपूजनाच्या विरोधातच भाषणे देत बसले असते, तर जगाला देवीपासून मुक्ती मिळाली असती का? देवीच्या रोगाचे निर्मूलन झाले असते का? त्यातून विज्ञानाची महती निदान तेवढ्या बाबतीत लोकांना पटली असती का?

   तेव्हाही देशात आणि जगात वैद्यकशास्त्र वापरात होते, विविध औषधे व उपचार होते. पण ते परिणामकारक नव्हते. तोकडे पडत होते. म्हणूनच एका बाजूला लोक डॉक्टरकडे जायचे. पण त्याची खात्री नसल्याने अंगारेधुपारे व भजनपूजनाचा मार्गही सोडत नव्हते. मुळात विज्ञानाने रोगच संपवला वा रोगाचे म्हणजे समस्येचे निर्मूलन केले आणि त्या अंधश्रद्धेतून लोक आपोआपच मुक्त झाले. त्याचा अर्थ लोक विज्ञानिनिष्ठ झाले असा अजिबात नाही. त्यांच्या लेखी भोंदू भगत व डॉक्टर त्यात फ़रक नाही. या्च्या दुकानात जायचे, त्याऐवजी त्याच्या दुकानात जायचे इतकाच फ़रक पडला आहे. उलट आज विज्ञान वा वैद्यकशास्त्राच्या बाबतीत नवनव्या अंधश्रद्धा उदयास आलेल्या आहेत. खेड्यापड्य़ात किंवा गरीब कष्टकर्‍यांच्या वस्तीत गेलात; तर इंजेक्शन देणारा डॉक्टरच उत्तम मानला जातो. सलाईन लावणारा डॉक्टरच्या हाताला गूण असल्याच्या समजूतीला काय म्हणायचे? कारण नसताना साध्यासाध्या आजारासाठी पन्नास चाचण्या घ्यायला भाग पाडून सामान्य माणसाची लूट करणारे वैद्यकशास्त्रातले भामटे कमी नाहीत. त्याला काय विज्ञाननिष्ठा म्हणायचे आहे? व्यवहारातील अनेक विषयात समजूती व अंधश्रद्धा आहेत. त्या धर्माइतक्याच बळकट व त्रासदायक आहेत. आणि त्या किंवा तसल्या अंधश्रद्धा निर्माण करणार्‍यांना सोबत घेऊन कोणी ‘अंधश्रद्धा निर्मूलना’चा आव आणत असेल, तर माझ्या लेखी तो कुठल्याही बापूबुवापेक्षा कमी भोंदू नसतो. डॉक्टर श्रीराम लागू हा असा डॉक्टर आहे आणि जर दाभोळकर त्याला आपल्या संस्थेमध्ये मानाचे पान देणार असतील; तर मग त्यांना भोंदू का म्हणायचे नाही?

   आज जो थेट वेदनाशामके वा अन्य औषधांचा अकारण मारा प्रचार व जाहिरातीमधून लोकांवर होत असतो, ती काय विज्ञाननिष्ठा आहे? अमुकतमूक मलिये और कामपर चलीये; अशा जाहिराती, वैद्यकीय अंधश्रद्धा निर्माण करीत नाहीत काय? कुठल्या गोळ्या घ्या मग क्षणार्धात तुम्ही वेदनामुक्त होऊन ताजेतवाने होता, असे लोकांच्या डोक्यात भरवण्याचा उद्योग कुठल्या विज्ञाननिष्ठेचा पुरावा आहे? लागू अभिनेते म्हणून अशा जाहिरातीमध्ये सहभागी होत असतील तर ते जाणिवपूर्वक लोकांची दिशाभूल करीत असतात. एक डॉक्टर असूनही अशी जाहिरात अभिनय म्हणून करणे; कसे क्षम्य असू शकते? त्यावरच भारताच्या मेडीकल कौन्सिलने त्यांच्यावर आक्षेप घेतला होता आणि दाद देत नाहीत म्हणून त्यांची वैद्यक पदवी काढून घेतली. मग अशा माणसाला दाभोळकर त्यांच्या व्यासपीठावर वा कार्यक्रमात कसा सहभागी करून घेतात? त्याच्या भोंदूपणाला मान्यता कशी देतात? हे प्रश्न मी नव्हेतर दाभोळकरांच्या विज्ञाननिष्ठ कार्यावर फ़िदा असलेल्या, पण ज्यांची विवेकबुद्धी शाबुत असलेल्यांनीच मुळात उपस्थित करायला नकोत का? पण तसे झाल्याचे निदान माझ्यातरी अनुभवात नाही. उलट अनेक दाभोळकर चहात्यांनी लागू यांचा अभिनय हाच व्यवसाय असल्याला बचाव मांडला, हे धक्कादायक आहे. याला विज्ञाननिष्ठा वा विवेकबुद्धी कशी म्हणता येईल? दाभोळकर तर विवेकबुद्धी शाबूत ठेवून बुवाबापूंच्या कृती तपासण्याचे आग्रही आहेत, पण त्यांचे चहाते व भक्त मात्र आपल्या बापूंच्या विवेकाची तपासणीही सहन करू शकत नाहीत. एका अंधश्रद्धेतून सुटून दुसर्‍या अंधश्रद्धेत लोकांना ढकलण्याचाच हा प्रकार नाही का? देवाधर्माची अंधश्रद्धा असू नये, पण वैद्यक वा वैज्ञानिक अंधश्रद्धा असली पाहिजे; असा दावा आहे काय? असायला हरकत नाही. मग त्यांनी आपल्या संस्थेचे वा संघटनेचे नावही धार्मिक अंधश्रद्धा निर्मूलन असे ठेवावे. मग माझी काहीही हरकत नाही. दोन्ही बुवा बापू गुण्यागोविंदाने नांदू शकतील आणि त्यांच्यासहित समाजाचे गांजलेपणही सुखाने संसार मांडू शकेल. माझी विज्ञाननिष्ठा किंवा विवेकबुद्धी पुस्तके वाचून, भाषणे ऐकून आलेली नाही, तर अनुभवातून मी बुद्धीप्रामाण्यवादी झालो आहे. म्हणूनच शास्त्रज्ञ असो, की बुद्धीवादी असो, त्यालाही तपासून बघितल्याशिवाय मी कोणावर आंधळा विश्वास ठेवायला तयार नसतो. मग तो बुवा बापू असो की दाभोळकर असो.    ( क्रमश:)
भाग   ( ७३ )    २/२/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा