गुरुवार, ३१ जानेवारी, २०१३

कुणा व्यक्तीचे दैवतीकरण कसे सुरू होते?


  दैववाद व दैवतीकरण किती सहजगत्या सुरू होत असते आणि त्याचे अंधश्रद्धेत कसे अनवधानाने रुपांतर होते, ते आपल्या लक्षातही येत नाही. चिकित्सक वृत्ती वा विवेकबुद्धी निकामी वा निष्क्रीय करण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे माणसाच्या चांगूलपणाचे रुपांतर त्याच्या अपराधी भावनेत करणे. एखादा माणूस सदभावनेने कुणाशी चांगला वागत असतो, तेव्हा बोलता बोलता त्याच्यात ही अपराधी भावना निर्माण करता येत असते. आपण काही गोष्टी नित्यनेमाने सहज कुणाच्याही बोलण्यातून ऐकत असतो. ‘अमुकतमुक होते वा झाले; तर त्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. काय चालले आहे? शरमेची गोष्ट आहे. तुझ्यासारखा माणूस असा बोलतो? कमाल आहे तुमची, तुम्हीसुद्धा अशा बाजूने उभे?’ रोजच कुठे ना कुठे आपण हे शब्द ऐकत किंवा वाचत असतो. त्यांचा इतका सातत्याने आपल्यावर भडीमार होतो, की कसलाही विचार न करता, आपला कसलाही संबंध नसलेल्या गोष्टीबद्दल आपल्या मनात एकप्रकारची अपराधी भावना निर्माण होत असते. आपणही त्या घटनेला, गोष्टीला जबाबदार आहोत; असे त्या वाक्यातून आपल्या मनात ठसवले जात असते. प्रत्यक्षात आपला त्याच्याशी दूरान्वये संबंध नसतो. मग आपणही उठून आपण त्यातले वा तसले नाही; हे दाखवायला पुढे सरसावत असतो. आणि कधीतरी नकळत आपणही तीच भाषा बोलू लागतो. त्या वाक्यांचा अर्थ वा हेतूही आपल्याला ठाऊक नसतो. पण आपण असेच बोलत असतो.

   दिल्लीत सामुहिक बलात्कार झाला किंवा मेळघाटला बालकांचे कुपोषण होते. तेव्हा त्यावर तावातावाने बोलणारे व लिहिणारे अशीव वाक्ये आपल्या अंगावर फ़ेकत असतात. मग आपण भारतीय आहोत; म्हणूनच आपल्याला उगाच गुन्हेगार वाटू लागते. त्या अपराधापासून मुक्त होण्याची तीव्र इच्छा आपल्या मनाच्या चांगुलपणातून उत्पन्न होते. आणि त्यात आपण काहीच करू शकणार नसतो. दिल्लीतला बलात्कार किंवा मेळघाटच्या कुपोषणात मुंबई वा पुण्याचा नागरिक जबाबदार नसतोच. पण त्यात तो कुठलाही हस्तक्षेपही करू शकत नसतो. पण असले शब्द सतत कानावर पडले; मग आपण काहीतरी केले पाहिजे, तरच अशा पापातून आपल्याला मुक्ती मिळू शकेल, अशी धारणा तयार होते. पण ज्याला आपण जबाबदार नाही व ज्यात आपला कसला हात नाही; त्याचा पश्चाताप व प्रायश्चित्त आपण का करायचे, असा साधा प्रश्न आपल्या मनाला शिवत नाही. इतके आपण त्या आदळणार्‍या शब्द व वाक्यांच्या प्रभावाखाली आलेले असतो. थोडक्यात अशा शब्दांनी व त्यांच्या मार्‍याने आपली चिकित्सक बृत्ती व विवेकबुद्धी पुरती निष्क्रीय होऊन जात असते. आणि परिणामी प्रायश्चित्त म्हणून आपणही तशीच बडबड करू लागतो, त्यातून सुटकेसाठी धडपडू लागतो. आपण त्या पापाचे भागिदार नाहीच; पण कडवे विरोधक आहोत, असे भासवण्याची संधी शोधू लागतो. त्यासाठी मग आपल्याला अन्य पापी व अपराधी शोधून त्यांना त्यांच्या पापाची जाणिव करून देणे अगत्याचे वाटू लागते. हे पाप कुठल्याही दैववाद, दैवतीकरण, बुवाबाजी व महात्म्याचा उदय होण्यासाठी अगत्याचे असते. कारण पापच नसेल तर पुण्याला अर्थ उरत नाही आणि आपोआपच पुण्यात्म्यालाही अर्थ उरत नाही. म्हणून कुठल्याही देवधर्माची व श्रद्धेची जन्मभूमी मुळातच पापाने सुपीक असावी लागते आणि पाप नसेल, तर पापाचे सिंचन तिथे करावे लागते.

   अर्थात हे फ़क्त दैवावादाच्याच बाबतीत होत नाही. अगदी नास्तिकता दाखवायलाही असेच पाप-पुण्य़ाचे नाटक खेळावे लागत असते. तुम्ही इतके सुशिक्षित आणि तुम्ही असल्या भानगडीत पडता? हे वाक्य आपण कितीदा ऐकतो? जणू तुमच्या कुठल्याही वर्तनाला किंवा जगण्याला कुणाची तरी मान्यता असायला हवी आणि ती मान्यता घ्यायची, तर त्यांचे जे निकष, नियम असतील त्यानुसार बनलेल्या चौकटीत तुम्ही बसायला हवे. तुम्ही त्या चौकटीला आव्हान देता कामा नये किंवा नाकारता कामा नये, असाही आग्रह असतो. त्यामुळेच आपण कुठे चुकलो किंवा काय पाप केले असे विचारणेही पाप असते. डोळे झाकून आस्तिकता किंवा नास्तिकतेचे नियम स्विकारायचे असतात. आपल्या बुद्धीला पटण्याचा वगैरे काही संबंध नसतो. देवधर्मावर श्रद्धा असण्याला जसा हा नियम आहे; तसाच तो नसण्यालाही लागू होतो. कारण तुम्ही श्रद्धावान नाही हे सिद्ध करण्यासाठी जे दुसर्‍या बाजुचे नियम असतात, त्याचे पालन करावे लागत असते. असे नियम बनवणारे हे कोण व आपल्यावर असे नियम लादणारे ते कोण, असा प्रश्न विचारला तरी ते लोक विचलित होतात. तुम्ही कुणा बुवाबापूच्या भक्ताला त्याच्या मठाधीशाबद्दल शंका विचारा, तो जसा अस्वस्थ होतो, तसाच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतला कार्यकर्ताही त्यांच्या खरेखोटेपणाची छाननी सुरू झाली, मग अस्वस्थ होताना दिसेल. मग त्याची पहिली प्रतिक्रिया असते, ‘तुम्ही सुद्धा’? आपली सफ़ाई वा कारणमिमांसा ते देऊ शकत नसतात. कारण तशी मिमांसा त्यांनीही केलेली नसते. त्यांनी जे थोर सत्य म्हणून स्विकारले आहे, त्याचा फ़ोलपणा सिद्ध झाल्यास आपण मुर्ख ठरू या भयापोटी ते लोक आपल्या समजूतीचे समर्थन करायला सरसावत असतात. म्हणूनच एका बाजूला देवधर्म, बुवाबापू यांचे अंधश्रद्ध तर दुसर्‍या बाजूला नास्तिकता वा विज्ञाननिष्ठेचे अंधश्रद्ध आपल्याला आढळून येतात. दोघेही सारखेच कडवे असतात. दोघांनाही चिकित्सा व विवेकाचे भय सतावते.

   ज्या दोन वाचकांच्या प्रतिक्रिया मी काल दिल्या होत्या; त्यांनी माझे मुद्दे खोडून काढले असते; तर मला नक्कीच आवडले असते. पण तसे न करता त्यांनी मी ‘पत्रकार असून सुद्धा’ अशी भाषा वापरली आहे. आणि त्यांच्याच विधानातला विरोधाभासही बघण्यासारखा आहे. एकाच वाक्यात ते काय म्हणतात बघा, ‘इतके लोकांना गृहीत धरणे तुमच्यासारख्या पत्रकारांना शोभते का?’ इथे मी लोकांना म्हणजे वाचकाला गृहीत धरतो असा त्यांचा आक्षेप आहे. पण त्यांनी मात्र पत्रकार म्हणून मला गृहीत धरायला माझी कुठलीच हरकत असता कामा नये, असाही आग्रह त्यातच आहे. म्हणजे पत्रकाराने काय लिहावे, काय लिहू नये, त्याचा अधिकार त्याला स्वत:ला नाही. तो अधिकार यांनी ठरवायचा का? आणि त्यांच्या अशा अधिकाराची सनद त्यांना कोणी दिली? दाभोळकरांच्या भक्तीला लागले; मग त्यांना पत्रकाराने काय लिहावे; मगच त्याला शोभते, ते ठरवण्याचा अधिकार मिळत असतो का? की पत्रकाराने दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे निमूटपणे गोडवे गायचे, असे कोणी ठरवले आहे? असे बुवाबापूंच्या बाबतीत असते. त्यांची महानता निमूटपणे स्विकारल्यासच त्यांच्या संप्रदायात प्रवेश असतो. त्यांच्या महानतेबद्दल किंवा खरेखोटेपणाबद्दल शंका घेण्यास बुवाबाजीत वाव नसतो. पण मग दाभोळकर भक्तांची तरी वेगळी अपेक्षा कुठे दिसते आहे? अन्य कोणी पत्रकार किंवा संपादक असे प्रश्न विचारत नाहीत, हे मला माहित आहे. कारण मी जेव्हा यापुर्वी अनेकदा दाभोळकर वा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळी विषयी प्रश्न उपस्थित केले; तेव्हा अनेक पत्रकारांनी मला हटकले होते. कशाला इतकी हिंमत करतोस असेही विचारले होते. पण इतर कोणी अशा शंका विचारत नाहीत, म्हणुनच दाभोळकर म्हणतील ती विज्ञाननिष्ठा; असेच त्यांच्या भक्तांचे गृहीत होऊन बसले आहे आणि एका पत्रकाराने शंका विचारताच ते विचलित झाले असावेत.

   पण त्यांच्या प्रतिक्रिया बघा. ‘शोभते का?’ असे शब्द वापरून ते असे दाखवू बघत आहेत, की मी अंधश्रद्ध आहे किंवा त्याचा समर्थक आहे. म्हणूनच ते म्हणतात, ‘तुम्हाला श्रद्धा किंवा काय ठेवायची आहे ती ठेवा ना.’ हे कशाला सांगायला हवे? तर त्यातून तुम्ही अंधश्रद्धा जोपासणारे असाल तर असा, पण त्यासाठी आमच्या बापूंचा बळी कशाला देता? आमच्या श्रद्धेचा कशाला बळी देता; अशी तक्रार आहे. नेमकी हीच गोष्ट कुठल्याही महाराज वाबा बापूच्या भक्तांमध्ये आढळून येईल. तुमची श्रद्धा तुमच्यासाठी. आमची आमच्यासाठी. एकमेकांच्या अध्यातमध्यात नको. पण त्यातून आमच्या श्रद्धेची तपासणी थांबवा. तशी हमी द्या. कशी गंमत आहे बघा. अन्य बापूबुवाची शक्ती वा कुवत काही असेल; तर ती दाभोळकर तपासणार. मात्र त्यांची कुणी तपासणी करता कामा नये. बालमोहन हे वाचक तर अन्य दाभोळकर भक्तांना गप्प कसे, असे आवाहन करीत आहेत. 'अंनिस'चे कार्य ज्यांना ठाऊक आहे ते लोक गप्प बसून हे कसे काय सहन करतात?’ असे म्हणताना ह्या भाषेतून त्यांना काय सुचवायचे आहे? ज्यांना कार्य ठाऊक आहे त्यांनी माझा आवाज बंद करावा असे म्हणायचे आहे काय? मग बापू मंडळीचे भक्त तरी काय वेगळी भाषा बोलतात? पण मुद्दा तो नाही. दैववाद व कुठल्या गोष्टीचे दैवतीकरण कसे सहजगत्या सुरू होते, तो मुद्दा आहे. ते असे सच्चे अनुयायी जोडण्यातून होत असते. मग विषय आशय मागे पडतो आणि व्यक्ती दैवत बनून जाते. आणि मजेची गोष्ट म्हणजे त्या दैवतीकरणाचा पर्दाफ़ाश करायला निघालेलेच नवे दैवत उभे करत असतात. विज्ञाननिष्ठा व चिकित्सक वृत्ती बाजूला पडून कधी नरेंद्राचे तर कधी दाभोळकरांचे स्तोम माजवले जाते. समाजालाही उद्धारक हवाच असतोच. आणि बुवा उद्धारकाला आंधळे भक्त हवे असतात.    ( क्रमश:)
भाग   ( ७२ )    १/२/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा