शनिवार, १२ जानेवारी, २०१३

असंतोषाला चूड लावणारा क्रांतीकारक नसतो


   एक गंमत कशी आहे बघा. गावातल्या शेतात जेव्हा कुठलेच पीक वगैरे नसते, तेव्हा तिथे कीड किटक असतातच असे नाही. आणि असले तरी त्याची कोणाला फ़िकीर नसते. पण जे शेत पीकाखाली असते, तिथे मात्र असे प्रश्न सतावत असतात. कुठली किड लागेल, कसला रोग पिकावर पडेल; अशा काळजीत शेतकरी असतो. ती फ़िकीर येणार्‍य़ा अपेक्षित पिकाची नासाडी होण्याची असते. त्याला विध्वंसाची क्षमता म्हणतात. आजवर जगाचा इतिहास बघितला; तर विध्वंसाच्या ताकदीवर साम्राज्ये उभी राहिलेली दिसतील. आधीचा जो कोणी राजा वा सम्राट असेल, त्याला आपल्या हुकूमत असलेल्या प्रदेशात जोवर अशा विध्वंसक प्रवृत्तीला वेसण घालणे शक्य झाले आहे; तोवरच त्याची सत्ता टिकून राहिलेली दिसेल. पण त्याला वेसण घालण्याची क्षमता म्हणजे प्रतिस्पर्धी म्हणून जो समोर येईल त्याचा विध्वंस करण्याची ताकद. उलट त्याची सत्ता विध्वंसक कारवायांनी उलथून पाडणार्‍यांनी सत्ता काबीज केली, की प्रथम ते विध्वंसाची भूमिका सोडून संरक्षणाची भूमिका घेतात, अर्थात ज्यांचे आक्रमण हे लूट करण्यापुरतेच असते, ते कधी संरक्षणाची भूमिका घेत नाहीत. लूट केली, की निघून जातात. पण ज्यांना आपली नवी सत्ता प्रस्थापित करायची असते; असे लोक जुन्या सत्ता प्रशासनाची डागडूजी करून नवे राज्य निर्माण करताना दिसतील. पण कधीच लाडीगोडीने सत्ता बदलत नाही. लोकशाहीने ती सुविधा निर्माण करून दिली. त्यात लोकांच्या मताने शांततापुर्ण सत्तांतर होते.; म्हणजे तसे मानले जाते. पण म्हणून सामान्य माणसाच्या आयुष्यात मोठे स्थित्यंतर होत नाही. सहाजिकच लोकशाहीतील सत्ताधीशांनी विश्वस्ताप्रमाणे वागावे; ही सुद्धा अपेक्षा आहे. पण दुर्दैवाने अलिकडल्या काळात लोकशाहीने सत्तांतर होते, तेव्हा सत्तेवर येऊन बसणार्‍यांना आपण युद्धातून सत्ता मिळवली असे वाटते आणि ते आपल्या विरोधकांना संपवण्याचे डावपेच खेळू लागतात. सहाजिकच लोकांच्या ज्या रागातून वा असंतोषातून सत्ता त्यांना मिळालेली असते; त्या रागाचे वा असंतोषाचे निवारण करण्याचा विचारही नव्या सत्ताधीशांच्या मनाला शिवत नाही. परिणामी अल्पावधीतच या नव्या  सत्ताधीशाबद्दल जनमानसात राग व असंतोष खदखदू लागतो. मग होते असे, की प्रशासन व्यवस्था कायम असते, तिचे निर्णय घेणारे बदलत रहातात. जो सत्तेवर होता, त्याला खाली खेचल्याचे फ़सवे समाधान लोकांना जरूर मिळते. पण ज्यासाठी बदलले, तो हेतू मात्र साध्य होत नाही. याची जाणिव होते, तेव्हा लोक कालच्या सत्ताधीशाकडे पुन्हा वळू लागतात. त्यातून मग लोकशाही हे एक दुष्टचक्र बनून जाते आणि हळुहळू त्यात सामान्य जनतेचा लोकशाहीबद्दल भ्रमनिरास होऊन जातो.

   या नव्या लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये एका बाजूला सुखवस्तू राजकारणी व दुसर्‍या बाजूला कसलेही उत्तरदायित्व नसलेली नोकरशाही, असे दोन गट मस्त मजेत असतात, कारण कुठल्याही बाजूने सत्तेचे पारडे झुकले तरी त्यांच्या ऐषारामात फ़रक पडणार नसतो. सत्ता वा राज्याच्या अस्थिरतेशी त्याच्या जीवनातील अस्थिरतेचा संबंध नसतो. त्यात नोकरशहा, राजकारणी नेते व बुद्धीवादी यांचा समावेश होतो. म्हणूनच अशी मंडळी नेहमी लोकशाहीतील स्थैर्याचे आग्रही असतात. सोंगट्यांचा डाव खेळावा; तसे हे लोक सत्ताधारी बदलण्याच्या डावपेचात सामान्य जनतेच्या भावनांशी खेळ करत असतात. जनतेला चिथावणे, तिच्या भावना प्रक्षुब्ध करणे व रागाचे रुपांतर असंतोष व वैफ़ल्यात करणे; असे त्यांचे उद्योग चालू असतात. सामान्य जनता ही अत्यंत सोशिक व संयमी असते. कितीही अन्याय व अत्याचार सोसण्याची क्षमता जनतेमध्ये असते. किंबहूना  बुद्धीजीवी वर्गाने आपल्या पोपटपंचीतून नागरिकांना सोशिक बनवलेले असते. त्यामुळेच कितीही अन्यायग्रस्त मोठी लोकसंख्या बंडाला प्रवृत्त होत नाही. घुसमटत असलेला समाजही सत्ता वा राजकीय व्यवस्था उलथून पाडायला सज्ज नसतो. त्याला त्यासाठी चिथावण्या द्यायला लागतात, चिडवावे व फ़ितवावे लागते. त्याच्या बधीर व संवेदनाहीन बनलेल्या मनाला खर्‍या जखमांच्या वेदना शब्दातून टोचून जाणवाव्या; असे काही करावे लागते. ते काम समाजातील बुद्धीमंत व भाषाप्रभू करत असतात. आपल्या शब्दांनी, प्रचाराच्या माध्यमातून हा विचारशील वर्ग सामान्याच्या सुकलेल्या जखमेवरची खपली काढून त्यावर मीठ चोळण्याचे काम करू लागतो, तेव्हाच जनतेत वैफ़ल्याची लाट धुमसू लागतो, ज्याचा पुढे क्रांतीकारी वणवा होऊ शकत असतो.

   इथे एक लक्षात घेतले पाहिजे, की लोकांच्या दुखण्याने कोणी विचारवंत, बुद्धीवादी दु:खी वगैरे होत नाही. त्याची स्वत:ची नाराजी वा सत्तेवरला, व्यवस्थेवर असलेला राग जसा धुमसू लागतो; तसा तो आपल्या वैफ़ल्याला सामाजिक परिमाण जोडू लागतो. तुम्ही वाहिन्यांची चर्चा मुलाखती ऐकत असाल तर त्यातली भाषा बारकाईने ऐका. संपादकीय अग्रलेख वाचत असाल, तर ती भाषा तपासून बघा. ‘अवघा महाराष्ट्र तुमच्याकडे अपेक्षेने बघतो आहे. देशाची जनता चिडलेली आहे. लोकांना हे जाणून घेण्याचा हक्क आहे. इथली जनता हे सहन करणार नाही. सुशिक्षित, सुसंस्कृत महाराष्ट्राला हे कधीच मंजूर होणार नाही.’ असली विधाने तुमच्या वाचनात व ऐकण्यात नित्यनेमाने येतील. यातला देश, महाराष्ट्र, जनता, म्हणजे नेमका कोण असतो? कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी वा भाजपा इत्यादी पक्षांना, त्यांच्या नेत्यांना निदान काही कोटी, लाखो लोकांनी मते दिलेली असतात. पण वाहिन्यांवर, वर्तमानपत्रातून बाष्कळ बडबड करणार्‍यांना ऐकणारे व वाचणारे किती असतात? महाराष्ट्र वा देशाने आपले मत वा दु:ख या शहाण्यांना कधी व कुठे कानात येऊन सांगितलेले असते? नसेल तर हे कशाच्या आधारावर असली भाषा बोलत असतात? तर ते तुमचे आमचे सामान्य माणचाचे मन बोलल्याचा आव आणून त्यांच्याच मनातले वा अपेक्षांचे बोल ऐकवत असतात. जनतेच्या नावावर खपवत असतात. पण इतक्या सफ़ाईदारपणे हे शब्द बोलले जात असतात, की वाचणारा व ऐकणार्‍याला उगाच तेच आपल्या मनातले आहे, असे आभास होऊ लागतात. निखिल वागळेच्या सवाल कार्यक्रमात बघितले, तर तो नेमका उलट्या टोकाचे बोलत असतो, असेच तिथल्या तिथे दिसते. कारण त्याच्या सवाल दरम्यान चाललेल्या चर्चेत बहूसंख्य लोक निखिलच्या दाव्याच्या नेमके उलट कौल देत असतात. भले असे कौल देणार्‍यांची संख्या नगण्य वा शेकड्यात असेल. पण त्यातही सिद्ध होते की करोडो वा लाखो भारतीय वा मराठी जनतेच्या वतीने बोलत असल्याचा तो आव निव्वळ सोंग असते.

   हे त्यांना कळत नाही असेही नाही. त्यांना त्यांचा खोटेपणा नेमका ठाऊक असतो. पण सतत असेच खोटे व आभासात्मक बोलत राहिले; मग सामुहिक मनावर त्याचा ठसा आपोआप उमटत असतो, असे मानसशास्त्र सांगते. हिटलरचा प्रचारमंत्री गोबेल्स म्हणायचा; सतत खोटे लोकांच्या कानीकपाळी ओरडत रहा. हळुहळू लोकांना तेच खरे वाटू लागते. त्यात तसूभर सत्य असायची गरज नाही. एकच पुरावा इथे पुरेसा ठरेल. मागल्या दहा वर्षात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गोत्यात; अशी बातमी किमान हजार वेळातरी प्रत्येक वाहिनीने दाखवून झाली असेल. पण अजून एकदाही मोदी व्यक्तीगतरित्या कायद्याच्या कुठल्या कचाट्यात सापडू शकलेले नाहीत. पण त्यांच्यावर दंगल माजवल्याचा एकही पुरावा नसतानाही, सर्वसाधारणपणे त्यांना गुन्हेगार मानले जातेच आहे की नाही? गुजरात वा अन्य देशभरच्या चाचण्या व मतदानात मोदींना अधिक लोक कौल देतात. पण माध्यमातले मुखंड मात्र त्यांच्या विरोधातल्या बातम्या थांबू देत नाहीत. कारण त्यांना मोदी गुन्हेगार वाटतो आणि म्हणूनच ते बोलत असतात, मोदींनी देशाची माफ़ी मागितली पाहिजे. मग त्यातला देश म्हणजे कोण असतो? तर हेच माध्यमातले मुठभर लोक, ज्यांचा सामान्य जनतेशी फ़ारसा संबंध नसतो. आपल्या मनातल्या गोष्टी किंवा वैफ़ल्य, राग वा असंतोष ते जनतेच्या नावावर खपवत असतात. त्यातून देशभरच्या मुस्लिमांना मोदींच्या विरोधी उभे करण्यात तर ही माध्यमे यशस्वी झाली आहेत की नाही? तर माध्यमांचे व बुद्धीमंतांचे काम लोकशाहीत असे चालते. समाजाला वा लोकसंख्येला डिवचण्याचे व चिथावण्याचे काम हा वर्ग करत असतो. त्याच्या मनातली मळमळ, क्षोभ जनतेच्या गळी उतरवण्याचे काम हा वर्ग कुशलतेने पार पाडत असतो. साध्या  शब्दात सांगायचे तर जळावू सरपणाला अग्नी देण्याचे कार्य समाजातला बुद्धीवादी वर्ग करत असतो, सरपण जसे ज्वलनशील असते, पण आपोआप पेट घेत नाही, तसे हे लोक समाजातील अस्वस्थतेचा कुशलतेने वापर करून लोकशाही वा आधुनिक सत्तेला आव्हान निर्माण करतात. अस्वस्थ लोकसंख्येतील विध्वंसक शक्ती पेटवण्याचे काम बुद्धीवादी करत असतो. मात्र त्याने कितीही क्रांतीचा आव आणला म्हणून तो क्रांतीकारक नसतो वा क्रांतीचा समर्थक सुद्धा नसतो. तो कमालीचा मतलबी, स्वार्थी व संधीसाधू असतो.       ( क्रमश:)
भाग   ( ५४)    १३/१/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा