मंगळवार, २९ जानेवारी, २०१३

खरे सिद्ध करायला, खोटे बोलायचे का?




     केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी गेल्या रविवारी जयपूर येथील कॉग्रेसच्या चिंतन शिबीरात केलेल्या एका आरोपाने मोठीच राजकीय खळबळ उडवून दिलेली आहे. आपल्या हाती आलेल्या अहवालानुसार संघ व भाजपा यांच्या शिबीरात भगवा दहशतवाद शिकवला जातो व हिंदू दहशतवादी घडवले जातात; अशा स्वरूपाचा तो आरोप आहे. मग त्यांनी हिंदू शब्द वापरला, की भगवा यावर वाद घालण्यात अर्थ नाही. त्यातला आशय स्पष्ट आहे. त्यांनी देशातला व संसदेतला प्रमुख विरोधी पक्ष भाजपा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या रा. स्व. संघावरच दहशतवाद फ़ैलावत असल्याचा आरोप केलेला आहे. आता त्या आरोपामुळे भाजपा वा संघवाले विचलित झाले, संतापले आणि त्यांनी त्यावर आक्षेप घेतला तर योग्यच आहे. पण त्यावर गदारोळ उठल्यावर शिंदे वा अन्य कॉग्रेसजनांनी केलेला खुलासा कमालीचा हास्यास्पद आहे. तो खुलासा म्हणजे गृहमंत्र्यांच्या विधानाचा विपर्यास झाल्याचा दावा केला जातो. विपर्यास भाजपाने केला म्हणायचा तर नेमका त्यांनी घेतला; तोच अर्थ पाकिस्तानात बसलेल्या लष्करे तोयबाच्या प्रमुखानेही काढला आहे. म्हणजेच गृहमंत्री बोलल्याचा जो आशय इथल्या माध्यमांनी व भाजपाने काढला; तोच त्या विधानाचा सर्वसाधारण अर्थ असू शकतो. त्यावरूनच प्रतिक्रिया उमटणार ना? सवाल असा आहे, की देशाच्या गृहमंत्र्याने कुठलेही विधान करतांना जपुन बोलायचे असते. कारण त्याच्या विधानाचा संदर्भ अनेक गोष्टींसाठी लावला जाणार असतो. पाकिस्तानचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आसिफ़ अली झरदारी यांनी एका जागी बोलताना असेच वादग्रस्त विधान केलेले होते व भारताने त्याचे भांडवल केले आहे, मग शिंदे वाटेल ते बोलून निसटू शकतील काय? ‘पाकिस्तानने काही काळ दहहतवादाचा वापर राष्ट्रीय धोरण म्हणून केला’, असे झरदारी बोलून गेले होते. तो वापर कश्मिर धोरणाच्याच बाबतीत झाला; असे भारताने कायम म्हटलेले आहे. म्हणजे तसे विधान करून झरदारी यांनी भारताला पाकविरुद्ध मुद्दाच पुरवला होता. शिंदे यांनी त्याची परतफ़ेड केली म्हणून त्यांचे जयपूरमधील विधान हा गंभीर मामला आहे.

   भारतातल्या दहशतवाद व जिहादी कारवायांमागे पाकिस्तानचा हात आहे; असे आरोप आपण गेली दोन दशके करीत आहोत. मग मुशर्रफ़ यांच्या कारकिर्दीत बलुचिस्तानमध्ये जो असंतोषाचा भड्का उडाला, त्याला भारताच्या कारवाया कारणीभूत आहेत; असा आरोप पाकिस्तान करू लागला. त्याला कुठला पुरावा नाही. पण आरोप होतच असतो. आपणही तसे आरोप पाकिस्तानवर करता असतो. मुंबईतील हल्ल्याचा सुत्रधार म्हणून आपण लष्करे तोयबाचा प्रमुख हफ़ीज़ सईद याच्याकडे बोट दाखवत असतो. त्या्च्या विरोधातले सज्जड पुरावे मिळाल्याने व जगाला ते दाखवले असल्याने; अमेरिका व राष्ट्रसंघानेही त्यावर बंदी घातली आहे. पण पाकिस्तानने कधीच सईदला त्यातला गुन्हेगार मानलेले नाही वा तसा आरोप स्विकारलेला नाही. उलट त्याने लष्करचे नाव बदलून जमात उद दावा असे केले. ती सेवाभावी संघटना आहे असाच पाकिस्तान प्रत्येकवेळी प्रतिदावा करीत आलेले आहे. मात्र आपल्याकडे हिंदूत्ववादी संघटनांवर जे आरोप सेक्युलर पक्ष व माध्यमांकडून होत असतात, त्याचा आधार पाकिस्तान नित्यनेमाने घेत असते आणि त्याच आधारावर भारतातच हिंदू दहशतवाद बोकाळला असल्याचा प्रतिआरोप केला जात असतो. शिंदे यांच्या जयपूरच्या विधानाने त्याच आरोपाला दुजोरा मिळालेला आहे. इथे शिंदे यांची चुक कुठे झाली, ती लक्षात घेतली पाहिजे. ते कॉग्रेस पक्षात आहेत व कॉग्रेसचे नेताही आहेत. पण त्याचवेळी ते भारत सरकारचे गृहमंत्री सुद्धा आहेत. मग ते बोलतील त्याकडे कॉग्रेस पक्षाच्या नेत्याचा आरोप म्हणून बघितले जाणार नाही. तर भारत सरकारचे मत वा निष्कर्ष म्हणूनही बघितले जाणार असते. शिंदे यांनी केलेला आरोप व दिग्विजय सिंग यांनी केलेला आरोप यात असा मूलभूत फ़रक असतो. म्हणूनच अशा महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने त्याचे कायम भान राहले पाहिजे. शिंदे यांना त्याचेच भान ठेवता आलेले नाही. पण पक्षिय अभिनिवेशामध्ये त्यांनी केलेल्या विधानामुळे भाजपाला किती नुकसान होईल; हा भागा अजिबात महत्वाचा नाही. शिंदे यांच्या त्याच विधानाने भारताचे किती नुकसान केले वा होणार; या गोष्टीला अत्यंत महत्व आहे.
 
   शिंदे यांनी ते भाषण केल्यावर इथे भाजपाने कल्लोळ केला, ह्याला महत्व नाही. त्यापेक्षा पाकिस्तानातून तात्काळ आलेली प्रतिक्रिया महत्वाची होती. लष्करे तोयबाचा मुखिया व २६/११ च्या मुंबई हल्यातला सुत्रधार, आरोपी हफ़ि़ज़ सईद याने भारतातच दहशतवाद पोसला जातो, याला भारताच्या गृहमंत्र्यांनीच दुजोरा दिल्याचे घोषित केले. तेवढ्यावर न थांबता त्यांने तात्काळ तीन भारतीय हिंदू दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याचे आवाहन अवघ्या जगाला करून टाकले. त्यांनी नावे वाचली तर शिंदे किती हास्यास्पद ठरलेत; त्याचा अंदाज येऊ शकतो. हफ़िज़ने बंदीची मागणी केली त्यात संघ व हिंदू परिषदेचे नाव असायला हरकत नाही. पण त्याने बंदी घालायची मागणी केलेल्या तिसर्‍या संघटनेचे नाव ‘शिंदे’ असे दिले होते. म्हणजे त्या माकडाला शिंदे हे व्यक्तीचे नाव किंवा आडनाव असते हेसुद्धा माहीत नाही. अशा माकडाच्या हाती आपण कोलित देतो आहोत, याचे भान गृहमंत्र्यांनी ठेवायचे असते. कारण गृहमंत्र्याचे विधान जाहिर असले; मग ते भारत सरकारचे धोरण वा मत मानले जात असते. जगभर पाकिस्तानी जिहादी धुमाकुळ घालत आहेत. मुंबई हल्ल्यातला हाती लागलेला एकमेव फ़िदायिन अजमल कसाब; यानेही हफ़िज़च आपल्या हल्ल्याचा सुत्रधार असल्याची कोर्टात कबुली दिलेली आहे. त्याचा फ़ोनवरचा आवाजही नोंदला गेलेला आहे. त्याच्या आवाजाचा नमूना द्यायचेही पाकिस्तानने नाकारले आहे. त्याच्यासह लष्कर विरोधातले पुरावेही पाकने नाकारले आहेत. फ़ार कशाला जगाकडे पुरावे असताना लष्कर नावाची संघटना पाकिस्तानात कार्यरत आहे; हे सुद्धा स्विकारण्यास नकार दिला आहे. आणि दुसरीकडे आमचे गृहमंत्रीच ज्या संघटनांबद्दल काही संदिग्ध पुरावे किरकोळ प्रकरणातले आहेत. त्याचा हिंदू दहशतवाद म्हणून जगभर डंका पिटणार असतील, तर पाकने त्याचा गैरवापर करू नये असे कोणी म्हणू शकेल का? आपण भाजपाला शह देण्याचे राजकारण करताना भारत सरकारच्या पायावर धोंडा मारतोय याचे तरी भान शिंदे यांनी ठेवायला नको का? त्याच्या परिणामांचा विचार नको करायला?

   हफ़िज़ने त्याच्याही पुढे जाऊन अनेक मागण्या केलेल्या आहेत. भारताचे गृहमंत्रीच इथे दहशतवादी संघटना आहेत व त्या घातपात हिंसेचे प्रशिक्षण देतात. तेव्हा या निवेदनाच्या आधारे भारताला दहशतवादी राष्ट्र घोषित करावे, अशीही मागणी हफ़िज़ने केली आहे. नशीब अजून पाकिस्तानने तशी मागणी केलेली नाही. पण उद्या नजिकच्या काळात पाकिस्तान तशी मागणी करणार नाही, याची कोणी हमी देउ शकते काय? कारण तशी मागणी करण्यासाठी पाकिस्तानला कुठले पुरावे देण्याची गरज नाही. कारण तसे पुरावे आहेत व तसा अहवालच आपल्या हाती आलेला आहे, असे भारताच्या गृहमंत्र्यानेच खुलेआम सांगून टाकलेले आहे. तेव्हा ती एकप्रकारे भारतात दहशतवादी प्रशिक्षण शिबीरे असल्याची भारत सरकारचीच कबुली ठरते. त्याचे पुरावे राष्ट्रसंघाने पाकिस्त्तानकडे मागायची गरज उरत नाही. ते पुरावे आहेत म्हणणार्‍या भारत सरकार व गृहमंत्री शिंदे यांनाच द्यावे लागणार आहेत. म्हणजेच त्यांनी जे काही नंतर वा आधी भाजपच्या तोंडावर खुलासे टाकले आहेत, ते पुरेसे नाहीत. त्यांना तशी वेळ आली तर जगासमोर त्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. आणि ते पुरावे भाजपा किंवा संघाच्या विरोधातले देऊन चालणार नाही. तर त्यांनाच निर्दोष ठरवणारे पुरावे द्यावे लागतील. कारण भाजपा किंवा संघ दहशतवादी संघटना असतील तर त्यावर भारत सरकारला बंदी घालावी लागेल. कारण तशी माग्णी पाकिस्तानने लावून धरली तर त्यासाठी समोर भाजपा किंवा संघाचा कोणी प्रवक्ता नसेल. समोर असेल राष्ट्रसंघ व अवघे जग. त्यामुळेचे जे कोणी पोपटासारखे भाजपा व संघाला दहशतवादी ठरवण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावून अकलेचे तारे तोडत आहेत, ते शिंदे यांचे समर्थन करीत नसून भारताला सापळ्यात अडकवत आहेत. मग ते माध्यमातले बावळट सेक्युलर असोत किंवा कॉग्रेसचे मुर्ख नेते असोत. कारण पाकिस्तानने त्याचा आधार घेतला तर जगासमोर नाचक्की भाजपाची होणार नाही ती नाचक्की भारत सरकारची होणार आहे. त्याचे उत्तर भारत सरकार म्हणजे प्रत्यक्षात कॉग्रेसलाच द्यावे लागणार आहे. कारण या आरोप व भाषणाचा आधार पाकिस्तानने घेतला तर भाजपा व संघ बाजूला पडून देशाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.   ( क्रमश:)
भाग   ( ६९ )    २९/१/१३

२ टिप्पण्या:

  1. एक्झॅटली याच गोष्टीसाठी मी त्याला शिव्या घातल्या भाऊ आणि आतादेखील समोर दिसला तर चपलेने सडकवून काढेन. या माणसाला कुठे काय बोलावं हे कळू नये? शेजारचा देश सगळं काही करून सवरून नामानिराळा होतो आणि आपण मात्र देशात आपल्या पक्षाचं सरकार स्थिर राहावं म्हणून देशाचीच इभ्रत वेशीला टांगावी ! अशा कर्मदरिद्री मंत्र्यांच्या हातात जर देश राहिला तर येत्या काही वर्षात या देशात इस्लामी राज्य अटळ आहे. भाजप व संघाने आपल्या परिने जितका विरोध करायचा तितका केला पण त्याचा काँग्रेसवर काही परिणाम होणार नाही कारण हा निगरगट्टपणा त्यांनी शेजारच्या देशाकडूनच उचलला आहे. मुळात भगवा दहशतवाद काय किंवा हिंदू दहशतवाद काय, हे दोन्ही शब्द केवळ हिंदूत्वावर घाला घालत नाहीत, तर ज्या हिंदूत्वामुळे हा देश 'भारत' किंवा 'हिंदूस्तान' म्हणून ओळखला जातो, त्या भारताच्या सुरक्षिततेवर घाला घालत आहेत, हेच मुळी सत्तालोलूप आत्मकेंद्रित शिंदेच्या लक्षात आलं नाही. जेव्हा लक्षात आलं तेव्हा तीर सुटला होता. सारवा सारवीसाठी काँग्रेसने फेकलेलं दलित कार्डसुद्धा कामी आलं नाही. म्हणूनच आता त्यांना अफजल गुरूला लवकरात लवकर फाशी देऊन सेक्युलरपणाचा "बॅलन्स" साधायचा आहे. तशी लवकरात लवकर त्याच्या फाशीची व्यवस्था ते करतीलही. पण कुणी सांगावं, जर कसाबच्या फाशीसारखीच अफजल गुरूच्या फाशीच्याबाबतीतही त्यांनी "गुप्तता" पाळली तर काँग्रेसच्या विरोधात जाणा-यांच्या संख्येत वाढच होईल. देशाची सुरक्षितता ज्यांच्या वक्तव्यामुळे पणाला लागू शकते अशा नेत्यांना पुन्हा निवडून द्यायचं की नाही याचं संपूर्ण स्वातंत्र्य जनतेला आहेच.

    उत्तर द्याहटवा