गुरुवार, १७ जानेवारी, २०१३

माध्यमांच्या नैतिकतेचा फ़ाटत चाललेला बुरखा


   अण्णा हजारे असोत की शिवसेना असो, अन्य कुठली चळवळ असो, त्यांच्या काही ठराविक भूमिका असतात. तुम्हाला त्या मान्य करण्याची सक्ती नसते. ज्यांना मान्य असतील ते त्यांच्यासोबत जातील व ज्यांना पटणारे नसेल त्यांना त्याकडे पाठ फ़िरवण्याची मोकळीक असते. अगदी त्याच्या विरोधात आपले मत मांडण्याची व त्या मताशी सहमत असणार्‍यांना संघटित करण्याचाही अधिकार घटनेने दिलेला आहे. त्यालाच विचार स्वातंत्र्य म्हणतात. त्यालाच आविष्कार, संघटना वगैरे नागरी स्वातंत्र्ये म्हणतात. पण विरोध व मतभेद म्हणजे दुसर्‍याचा विचार वा भूमिका नष्ट करण्यासाठी त्याची गळचेपी करायचा अधिकार मात्र कोणी कोणाला दिलेला नाही. आता गळचेपी कशाला म्हणायचे ते प्रत्येकाने आपापल्या व्याख्या करून चालणार नाही, त्याची सर्वमान्य अशी व्याख्या असली पाहिजे. म्हणजे असे, की वृत्तपत्रात वा माध्यमात एखाद्या अशा संघटना व राजकीय व्यक्तीच्या विरोधात तुम्ही आरोप केले, तर त्याची बाजू मांडण्याची तेवढीच संधी त्यालाही मिळाली पाहिजे आणि मूळ आरोप तुम्ही केलेला आहे, त्यामुळे ती संधी तुम्हीच दिली पाहिजे. म्हणजे असे, की मी इथे ‘पुण्यनगरी’मध्ये ज्यांच्याविषयी लिहितो वा आरोप करतो, तेव्हा एखाद्या वाचक समुहासमोर माझे लिखाण जात असते. मग माझा लेख वाचून त्यांचे मत बनत असते. पण त्याचा अर्थ असा असतो, की माझे लिखाण ज्याला मनापासुन आवडते, असे वाचक मग माझे आरोप व आक्षेप मान्य करून बसतात व त्यानुसार ती संघटना व व्यक्तीकडे बघू लागतात. मग माझ्या लिहिण्यात असत्य वा खोटेपणा असेल, तर व्यवहारात मी त्या वाचकाचे त्या संघटना किंवा व्यक्तीची प्रतिमा त्या वाचकाच्या मनात मलीन करीत असतो. असा कोणताही अधिकार मला कायद्याने वा घटनेने दिलेला नाही. म्हणून मला व प्रत्येक भारतीयाला जो अविष्कार स्वातंत्र्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे, तो सत्य कथनासाठी व सत्य सिद्धतेसाठी वापरला जाईल असेच त्यात गृहीत आहे. पण तसे होत नसेल तर मग तो त्या अधिकार व कायद्याचा गैरवापर असतो.

   असे समजा, की वारंवार मी कायबीइन लोकमत, निखिल वागळे, कुमार केतकर, राजदीप सरदेसाई अशा अनेक पत्रकार वा अन्य नेते, पक्ष यांचा उल्लेख करतो, त्यांच्यावर आरोप करतो, आक्षेप घेतो, तेव्हा त्याची दुसरी बाजू कोणी समोर आणली; तर मी लपवून वा दडपून ठेवता कामा नये. माझा जो वाचक आहे, त्याच्यासमोर ती बाजू सुद्धा सादर केली पाहिजे. ती बाजू वा दावे मी मान्य करण्याचे कारण नाही. पण वाचकांपासून लपवायचा मला अधिकार नाही. अर्थात त्या खुलासा वा प्रतिसादामध्येही मला खोटेपणा व चुक दिसली, तर त्याचा समाचार मी जरूर घेऊ शकतो. पण सहसा असे झालेले नाही. मग जे आरोप मी करतो, त्याला उत्तर दिले जात नाही; याचा अर्थ ते आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांना ते मान्यच आहेत असाही होतो. म्हणजे त्यामुळे माझ्या व ‘पुण्यनगरी’च्या वाचकांची मी दिशाभूल केली असा आक्षेप माझ्यावर घेता येणार नाही. आणि माध्यमांनी तेच करायला हवे. ज्यांच्यावर आरोप करता, त्या व्यक्ती वा संघटनेला खुलासा तेवढाच स्पष्ट व ठळकपणे दिला गेला पाहिजे. दोनतीन महिन्यांपुर्वी मी मुस्लिम समाजाच्या वर्तनासंबंधी पन्नासहू्न अधिक लेख लिहिले होते, त्याचा प्रतिवाद नौशाद उस्मान व अन्य एकदोघांनी केला होता. मी शक्य तेवढे त्यांचे मत शब्दश: माझ्याच सदरातून प्रकाशित केले होते. मग त्यांवर प्रतिवादही केला होता. पण त्यांचे मत दडपले वा लपवून ठेवले नाही. पण दुर्दैव असे आहे, की आजकाल बहुतांश वृत्तपत्रे बेछुट आरोप करतात व मतप्रदर्शन वा अविष्कार स्वातंत्र्याचा जो अधिकार मिळाला आहे, त्याचा गैरवापर करून लोकांच्या प्रतिष्ठेशी खेळत असतात. जेव्हा असा खेळ होतो, तेव्हा त्यातल्या व्यक्तीला होणारी इजा कशी भरून काढायची? म्हणजे एका बातमीत प्रतिष्ठीत व्यक्तीवर बलात्कार वा विनयभंगाचा आरोप छापला जातो. त्यासाठी त्याच्या विरोधात नोंदल्या गेलेल्या तक्रारीचा आधार घेतलेला असतो. पण तो नुसताच आरोप असतो, सिद्ध झालेला गुन्हा नसतो. पुढे त्याबद्दल तपास होऊन गुन्हा फ़ेटाळला गेला व आरोपी कोर्टात निर्दोष सुटला, तर त्याची कुठेच बातमी येत नाही. म्हणजे नुसत्या आरोपाच्या तक्रारीचा आधार घेऊन प्रसिद्ध झालेल्या त्या बातमीने उडवलेले शिंतोडे; त्या व्यक्तीच्या आयुष्यावर कायमचे चिकटून बसतात. कधीच धुतले जात नाहीत. हा त्या व्यक्तीच्या जिवाशीच खेळ होत नाही काय? मोठी व प्रतिष्ठीत माणसे खुप खपून, राबून आपली प्रतिष्ठा संपादन करीत असतात. पंधरा वीस वर्षात मिळवलेली अब्रू मग अशी एक बातमीमुळे क्षणात धुळीस मिळवली जाते. त्याची भारपाई कोणी कशी करायची?

   पुर्वी अमेरिकेतील हाणामारीचे काऊबॉय वेस्टर्न चित्रपट नियमित यायचे. त्यात एखादा मुजोर पोलिस वा लष्करी अधिकारी दाखवलेला असायचा. तो केवळ बंदूकीच्या नेमबाजीसाठी स्थानिक आदिवासींना पळायला लावून ठार मारायचा, जखमी करायचा, असे दाखवलेले असायचे. त्याच्यासाठी नेमबाजीचा खेळ असे. पण जाणार्‍याचा हकनाक जीवच जात असे. आज माध्यमातून त्यापेक्षा काही वेगळे चालले आहे काय? अनेक व्यासपिठावर ज्या एकतर्फ़ी बदनामीच्या मोहिमा चालवल्या जातात, त्याचा दुसरा अर्थ लावता येईल काय? जाणीवपुर्वक खोटे बोलायचे व लिहायचे आणि जाब विचारला; मग राज्यघटनेने अविष्कार स्वातंत्र्य दिलेले आहे, असा दावा करायचा. ही म्हणूनच फ़सवणूक आहे. पोलिसाच्या हाती पिस्तूल वा बंदुक कायद्यानेच सोपवलेली असते. पण म्हणून त्याने कोणावरही अकारण बंदूक रोखणे वा त्याला जखमी करणे वा त्याचा जीव घेण्याची परवानगी कायदा देत नसतो. अशा हत्या वा गोळीबाराला कायदा मान्यता देत नाही. त्याला अतिरेक म्हणून निलंबन केले जाते व चौकशी करून योग्य ती शिक्षा ठोठावली जाते. मग त्याच कायद्याच्या नैतिकतेमधून अन्य कोणी पत्रकार आहे म्हणून सुटू शकतो काय? असे म्हणायचा अवकाश, की लगेच ‘ज्याची तक्रार आहे, त्याने कोर्टात जाऊन दाद मागावी’ असाही साळसूद दावा केला जातो. ऐकायला तो खुप बरा व प्रामाणिक वाटतो. पण त्यातली हिडीस फ़सवणूक लक्षात येत नाही. ही भाषा नितीमत्तेच्या गप्पा मारणार्‍या पत्रकाराची आहे, की संघटीत गुन्हेगारी करणार्‍या माफ़ियाची आहे? कारण गुन्हेगार तरी तुम्हाला पोलिसात व कोर्टात जायची बंदी कुठे घालतात? गेलात तर पोलिस व कायदा काही करू शकत नाही, याची पिडीताला खात्री असते. म्हणून तोच बिचारा निमूटपणे गुन्हेगाराला शरण जात असतो. मग यातल्या एकाला गुंड म्हणायचे आणि दुसर्‍या नितीमान कसा म्हणायचे? दोघांचे वर्तन व परिणाम सारखेच असतील, तर दोघे एकाच माळेचे मणी नाहीत काय?

   मुद्दा इतकाच, की बातमी देणार्‍याने वा काही मजकूर छापणार्‍याने दुसरी बाजूही आपल्या वाचकांसमोर मांडलीच पाहिजे. त्याने नाही तर अन्य पत्रकार किंवा वृत्तपत्राने त्या व्यक्तीची बाजू समोर आणायला हातभार लावला पाहिजे. एखाद्या पोलिसावर खोट्या चकमकीचा वा अन्य कुठला आरोप असेल तर पोलिस खाते त्याच्या समर्थनाला उभे रहात नाही. उलट त्याच खात्यातले दुसरे कर्मचारी वा अधिकारी आरोपी असलेल्या पोलिसाला अटक करून तपास घेतात व पुरावे शोधून खटले भारतात. आपल्याकडे माध्यमांच्या गुन्हेगारीवर असा नैतिक वचक कोणाचा आहे काय? उलट जो खोटेपणा करतो, त्याचा खोटेपणा उघडकीस आणुनही तो दाद देत नाही आणि कोर्टात जाण्याचे प्रतिआव्हान देतो, त्याचा अर्थ इतकाच, की त्याचा खोटारडेपणा सिद्ध करण्यासाठी पिडिताने आपले काम व धंदे सोडून कोर्टकचेर्‍या करीत बसायचे. म्हणजे भुर्दंड पिडितालाच. हा सुसंस्कृतपणा नाहीच तर निव्वळ बदमाशी आहे. तुम्हाला जर समोरच्या व्यक्तीचे दोष दाखवायचे आहेत, तर त्याचा खुलासाही तितकाच ठळक छापा आणि पुन्हा त्याचे वाभाडे काढा. खोटाच असेल तर त्याच्याकडे बचाव नसतो, म्हणूनच त्याने दिलेल्या खुलाशातही अनेक चुका व दोष सापडतीलच. पण आपण आधी लिहिणारे वा छापणारे खोटे असू, तर त्याच्या खुलाशात आपण उघडे पडायचा धोका असतो. आणि म्हणूनच बहुतांश वृत्तपत्रे व पत्रकार खुलासे वा दुसरी बाजू प्रसिद्ध करायचे टाळतात. कारण त्यांना स्वत:चा खोटेपणा लपवायचा असतो. मग हे अविष्कार स्वातंत्र्य गुन्हेगारीसाठी वापरणे होत नाही काय? त्यामुळेच पत्रकारांवरचे हल्ले दिवसेदिवस वाढले आहेत व वाढतच जाणार आहेत. पत्रकार व माध्यमांनी वेळीच शहाणे होऊन मार्ग शोधणे म्हणूनच आवश्यक आहे. कारण त्यांच्या नैतिकतेचा बुरखा फ़ाटत चालला आहे.    ( क्रमश:)
भाग   ( ५९)    १८/१/१३

1 टिप्पणी:

  1. //मी शक्य तेवढे त्यांचे मत शब्दश: माझ्याच सदरातून प्रकाशित केले होते.//
    म्हणजेच अशक्य वाटणारे तेवढे गाळले हे तुम्ही मान्य करता तर!

    उत्तर द्याहटवा