सजीव सृष्टीमध्ये काही जीव स्वयंजीवी असतात, तर काही परोपजीवी असतात. म्हणजे स्वयंजीवी असतात, ते आपले अन्न शोधून, निर्माण करून व बनवून त्यावर उपजीविका करत असतात. तर काही जीव हे परोपजीवी म्हणजे दुसर्याने निर्माण केलेल्या अन्नरसावर झडप घालून गुजराण करीत असतात. जसे झाडावर वृक्षावर बांडगुळ असते किंवा आपल्या घरात अन्यत्र डास वा मच्छरांचा वावर असतो. ते जीव आपल्या रक्तावर पोसले जात असतात. म्हणजेच दुसर्याच्या जगण्यावर त्यांचे अस्तित्व अवलंबून असते. अगदी तसेच मानवी सामुहिक जीवनात ज्याला आपण सामाजिक व्यवहारी जीवन समजतो, त्यात काही माणसे परोपजीवी जगत असतात. त्यांचे जगणे अन्य कुणाच्या तरी जगण्यावर अवलंबून असते. दुसर्या कुणाच्या तरी साधनसंपत्ती निर्माण करण्यावर अवलंबून असते. अशी सर्जनशील वा स्वयंजिवी माणसे असतात म्हणून परोपजिवींची उपजिविका चालू शकते. त्यात मग भुरटे, भामटे, दरोडेखोर, चोर गुन्हेगार असतात, तसेच समाजाच्या दुखण्यावर जगणारेही असतात. पुन्हा तेवढ्यावर भागत नाही. काही जीव व लोक असे असतात, की त्यांचे जगणे परोपजिवींच्या अस्तित्वावर अवलंबून असते. हे समजून घ्यायचे तर शेतीमध्ये जसे एकात्मिक किटक नियंत्रण म्हणुन चालते, ते बघायल हवे. पिकावर येणार्या किड किटकांचे दुसर्या तशाच कि्डकिटकांकडून होणारे नियंत्रण. म्हणजे असे असते, की अमूक एक किड असेल तर तिच्यावरच पोसले जाणारे काही किटक वा किडे असतात. मग शेतकरी चलाखी अशी करतो, की त्याच्या मुळ पिकावर जी किड मोठ्या प्रमाणावर येऊन नासाडी करण्याचा धोका असतो; त्या किडीवर पोसले जाणारे किटक वा किडी यांचाही वावर आपल्या पिकात व्हावा, अशी मुद्दाम योजना करतो. मग होते काय हे दुसरे परोपजीवी असतात, ते पहिल्या परोपजीवींचा फ़डशा पाडत रहातात, त्यामुळे मुळ पिकाची नासाडी करणार्या किडीचे नियंत्रण आपोआप होते. आणि त्याला खाणारे किटक वा किड मुळ पिकावर पोसली जाणारी नसल्याने पिकाला त्यापासून धोका नसतो. साध्या भाषेत आपण त्याला काट्याने काटा काढणे म्हणतो, त्यातला प्रकार आहे. असो, सांगायचा मुद्दा इतकाच, की नुसतेच परोपजीवी जीव नसतात, तर त्यांनाही आपली उपजीविका बनवून जगणारेही जीव असतात आणि त्याचेच भाईबंद आपल्याला मानवी समाजात व सामुहिक जीवनातही दिसतील.
आता इथे एक गंमत लक्षात घेतली पाहिजे, की अशा ज्या दुसर्या जातीच्या किडी वा किटक सजीव असतात, त्यांचे अस्तित्व त्या पहिल्या परोपजीवी किडी किटकावर अवलंबून असते. त्या पहिल्याच किडीचा पुरता नायनाट झाला, मग या दुसर्या गटातील परोपजीवींचेही जगणे धोक्यात असते. हे बिचार्या किटक किडींना समजत नाही. पण अशा प्रवृत्तीची माणसे समाजात असतात, त्यांना मात्र आपल्या अस्तित्वाचा घोर कायम लागलेला असतो. त्यामुळे ते सतत आपले खाद्य म्हणजे भक्ष्य शोधत असतात. त्याचे पीक, पैदास व्हा्वी म्हणून कार्यरत असतात. आपल्याला नित्यजीवनात भेडसावणारे कित्येक व्यवहारी प्रश्न व समस्या आहेत. त्या साध्यासरळ मार्गाने व प्रयत्नाने सुटत नाहीत. त्यासाठी बर्याच अवैध उचापती कराव्या लागत असतात. कोणी त्याला भ्रष्टाचार लाच वगैरे म्हणतात. पण तो उपाय ज्या गरीबाला शक्य नसतो, त्याला त्यापेक्षा स्वस्तातला उपाय व मार्ग शोधावा लागत असतो. असा मार्ग म्हणजे आपल्यावर होणारा अन्याय सोसण्याचे मनोधैर्य व मनोबल निर्माण करणे होय. हे मनोबल अंगात असेल तर मग अन्यायाची चीड येत नाही किंवा अन्याय सोसण्याची क्षमता निर्माण होत असते. अडचणीवर अशी सुद्धा मात करता येत असते. मग ती सुविधा देणारे स्वस्तातले व्यापारी निर्माण होतात. व्यापारात अडकलेला पैसा, असाध्य आजार व त्यावरच्या उपचारासाठी गाठीशी पैसा नसणे, कोणी व्यवहारात फ़सवणूक करणे अशा अनेक समस्या प्रश्नांनी आजकालचा माणूस गांजलेला असतो. खरे तर समता, न्याय, कायदा यांचे राज्य असल्याने अशा स्वरूपाचे प्रश्नच निर्माण होता कामा नयेत. नियम व कायद्याने जनतेला जे अधिकार मिळालेले आहेत; त्याचे लाभ त्याला मिळाले तर तो नागरिक अगतिक, हतबल होणार नाही. मग त्याला तो अन्याय वा अडचण सोसायची गरज भासणार नाही. तीच भासली नाही तर त्याला त्यासाठीची सहनशक्ती वा मनोबल आत्मसात करायची गरज उरणार नाही. आपोआपच असे काही पुरवणार्याच्या दुकानात त्याला जावे लागणार नाही. याचा साधासरळ अर्थ इतकाच, की कायद्याचे प्रामाणीक राज्य असेल तर माणुस हतबल निराश होणार नाही व चमत्कार घडून यातून सुटावे; असा विचारही त्याच्या मनाला शिवणार नाही. मग तो त्या दिशेने जाण्याचा धोका तरी असेल काय? .
पण अशा रितीने समाज चमत्काराच्या आहारी जाण्याची परिस्थिती निर्माण होत असते. आता तशी परिस्थिती निर्माण होते; कारण समस्या सोडवण्यासाठी माणसाची बुद्धीच काम करीनाशी होते. म्हणजे असे, की कायद्यात समोरचा माणुस गुन्हा करतो आहे आणि आपण तर कायद्यानुसार वागतो आहोत. पण सत्ता त्याच्या हाती असल्याने तो कायद्यानेच आपल्यावर अन्याय करत असतो आणि सांगितले जात असते, की कायदा न्यायासाठी व अन्यायाचे निर्मूलन करण्यासाठी आहे. आपण ऐकत एक असतो आणि अनुभवास वाटेल ते भलतेच येत असते. मग त्या कायद्यापेक्षा लोक चमत्काराच्या मार्गाने तर्कबुद्धीच्या पलिकडे जाऊन मार्ग शोधू लागतात. असे करू शकणारे कोणी बुवा, भगत, महाराज वा बापू असतात. त्यांच्याकडे जाण्याखेरीज लोकांपुढे पर्यायच शिल्लक उरत नाही. मग शेतकरी जसा एक किडीचे नियंत्रण करण्यासाठी दुसर्या किटक किडीची मदत घ्यायला जातो, तसे गांजलेले लोक चमत्कार नावाच्या दुसर्या परोपजीवी किटक किडीकडे जातात. उपाय म्हणून जातात हे विसरता कामा नये. शेतकरी मुद्दाम किड किटक आपल्या पिकावर यायची व्यवस्था करीत नसतो. त्याच पीक निरोगी होणार याची खात्री असेल, तर असे उपाय तो करणार नाही. गांजलेला माणुसही अकारण कुठल्या चमत्काराची अपेक्षा अजिबात करणार नाही. त्याला काही अपवाद असतील. पण तो नियम नाही. त्याच्या नित्य जीवनात कायदे व नियमाने सर्व गोष्टी सुरळीत होऊ शकल्या, तर चमत्काराच्या मागे जायची त्याला गरजच उरणार नाही. पण आज तरी सार्वजनिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये केवळ चमत्कारच काही सिद्ध करू शकेल, अशी लोकांना आशा वाटते. अण्णा हजारे भ्रष्टाचार संपवू शकतील व एक लोकपाल कायदा त्यातून मुक्तता करील; ही सुद्धा तशीच चमत्कार घडण्याची अपेक्षा असते. त्यासाठीच लोक त्यांच्या मागे धावले.
असो. मुद्दा इतकाच, की आपल्या समाजात दोनतीन दशकांपुर्वी जेवढे चमत्कारी बाबा, बुवा, बापू नव्हते, त्याच्या अनेकपटीने आज अशा चमत्कारी बाबांची पैदास झाली आहे. त्याचे पहिले कारण म्हणजे जीवनातील अन्याय, अत्याचार, अडचणी यावर मात करण्याचे विवेकी मार्ग व उपाय सुचवणार्या व समजावू शकणार्या विवेकी समंजस बुद्धीमंताचा अभाव हे आहे. तीनचार दशकांपुर्वी आजच्यापेक्षा गरीबी व हलाखीमध्ये लोक जीवन कंठत होते, पण चमत्काराने वा आयते काही मिळेल वा मिळावे अशी आपेक्षा बाळगणारे खुपच कमी लोक होते. कारण चमत्काराने जीवनात बदल होत नाही, तर आपल्या कष्टातून, श्रमातून व मेहनतीमधून जीवन साकारत असते, अशी लोकांना विवेकी शिकवण देणारे सानेगुरूजी, आचार्य अत्रे इत्यादी बुद्धीमंत होते आणि लोकांची विवेक बुद्धी जागवण्यात पुढाकार घेत होते. लोकांना समजावण्यात आघाडीवर होते. लोकांना समजणार्या भाषेत बोलणारे, लिहिणारे होते. अलिकडे त्याचाच दुष्काळ पडला आणि साक्षरांची लोकसंख्या वाढली असताना सुशिक्षितांचे प्रमाण घटले आहे. मग साक्षर अशिक्षितांनी बुद्धीचा विवेकी वापर करावा अशी अपेक्षा कशी करता येईल? त्यांना कायद्याच्या राज्याने पोसलेले परोपजीवी इतके लुटत, लुबाडत असताना व कायदा त्यांचे नियंत्रण करण्यात अपेशी ठरत असताना; त्याच कायद्याच्या राज्याचे गुणगान करणारे बुद्धीमंत त्या गांजलेल्या लोकांसमोर असतील, तर त्यांना चमत्काराचीच अपेक्षा करावी लागणर ना? त्यामुळे मग आता तिसर्या स्तरावरचे परोपजीवी उदयास आलेले आहेत. म्हणजे होते असे, की भ्रष्टाचार, अन्याय अनागोंदीने गांजलेले लोक बुवा बापूंकडे चमत्कारासाठी जाऊन त्यांना पोसतात आणि मग त्याच बापू, भगतांना भक्ष्य बनवून उपजिविका करणारे अंधश्रद्धा निर्मुलनवाले तिसरे परोपजिवी तयार झाले आहेत. मग ते मूळात कायद्याच्या राज्यात सामुहिक बलत्कार धावत्या बसमध्ये झाला; याबद्दल बोलत नाहीत. तर त्यावरचा बापूने सांगितलेला उपाय कसा खोटा व भंपक आहे, त्यावर तोडसुख घेतात. आहे ना सामाजिक एकात्मिक कीडनियंत्रण? म्हणूनच बापू, बुवा, महाराज व अंधशद्धा निर्मूलन चळवळ यांचा परस्पर संबंध जरा तपशीलात समजून घेण्याची गरज आहे. ( क्रमश:)
भाग ( ६०) १९/१/१३
भाऊ,
उत्तर द्याहटवासोन्याच्या नावाने पितळ विकले जात आहे. सोने खरे आहे म्हणून पितळ खोटे म्हणतात. पितळ खोटे आहे म्हणून सोने खरे आहे असे उलटे म्हणत नाहीत. सोन्याच्या परीक्षेचे नियम आहेत. ते शिकले की फसगत होत नाही.
अध्यात्मातही तसेच आहे. भोंदू लोकांची बुवाबाजी का चालते? कारण लोकांना खरे साधू आणि भोंदू यांतला फरक कळत नाही म्हणून. खरा साधू ओळखायला शिकणे म्हणजे साधना करणे होय.
खरे ओळखायची लोकांना सवय लागली की खोटे आपोआप उघडे पडेल.
आपला नम्र,
-गामा पैलवान