रविवार, १३ जानेवारी, २०१३

पाकला धडा शिकवायला कोणाचा विरोध आहे?


   कुठल्याही समाजातले किंवा देशातले बुद्धीवादी आणि सामान्य माणसे; यांच्यात मोठीच दरी असते. कारण बुद्धीवादी हा नेहमी अभ्यासकाच्या अभिनिवेशात असतो. त्यामुळे त्याला समोर जे वास्तव साध्या डोळ्यांना दिसू शकते, ते तो बघूच शकत नसतो. आणि त्यात नवल असे काहीच नसते. आपणही त्याच अनुभवातून अनेकदा जातच असतो. बघा आठवून; जेव्हा आपण घरातली एखादी वस्तू शोधत असतो, तेव्हा ती सापडतच नाही. अगदी समोर तर असते; पण सापडत नाही. कारण आपण शोधत असतो. ही शोधण्याची झिंग किंवा नशा डोक्यात व डोळ्यात चढलेली असते, की नेहमी सहज दिसू शकणारेही डोळ्यांना दिसत नाही. मग अन्य कोणीतरी आपले लक्ष तिकडे वेधतो आणि आपल्यालाच आश्चर्य वाटते, की आपण इतके विसरभोळे कसे झालो? पण तो विसरभोळेपणा नसतोच. शोधायच्या आवेशात आपले डोळे व बुद्धी भरकटलेली असते. पण दुसर्‍या कुणाची नजर तशी झिंग चढलेली नसते. म्हणूनच त्याला आपल्याच समोरची वस्तू सहज दिसते आणि आपल्याला मात्र तिथेच असुन दिसत नाही. नेमकी अशीच स्थिती समाजातल्या बुद्धीवादी वर्गाची असते. त्यांना आपल्या बुद्धीची व शहाणपणाची कायम झिंग चढलेली असते. मग त्यांना सहज दिसणार्‍या व समोर असणार्‍या किंवा साध्या डोळ्यांना दिसणार्‍या गोष्टी; समोर असून दिसत नाहीत. किंबहूना अन्य सामान्य माणसांना जे साध्या डोळ्यांनी दिसते आहे, तेच आपल्या बुद्धीवादी नजरेला दिसत असेल, तर आपली बुद्धीच काम करीनाशी झाली काय; अशी त्यांना शंका येते. म्हणूनच असे बुद्धीवादी नेहमी समोरच्या साध्या गोष्टीतही विशेष काही शोधू बघतात. ही सगळ्याच बुद्धीवाद्यांची शोकांतिका असते. पण त्यामुळेच त्यांची व उर्वरित समाजाची फ़ारकत होत असते. विचारात, वर्तनात व परिणामात फ़रक होतच असतो. त्यामुळेच मग या मुठभर बुद्धीवादी व बाकीचा सामान्य समाज यांच्यात दरी निर्माण होत असते.

   आता हेच बघा, तिकडे काश्मिरच्या सीमेवर दोघा भारतीय सैनिकांची हत्या पाकिस्तान्यांनी केली, त्यांचा शिरच्छेद करून विटंबना करण्यात आली. त्यामुळे अवघा भारतीय समाज कमालीचा अस्वस्थ झालेला आहे. पाकिस्तानवर हल्ला करा, इथपासून पाकिस्तानला धडा शिकवा; असे म्हणण्यापर्यंत विविध प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. पण त्या प्रक्षोभाचा मागमूस आपल्याला वाहिन्यांवर मस्तपैकी चर्चा करणार्‍या विद्वान व लेख लिहिणार्‍या अभ्यासू पत्रकारांमध्ये दिसत नाही. उलट असे काही अभ्यासक, युद्ध म्हणजे चणेफ़ुटाणे नाहीत; असे इशारे देत पाकिस्तानशी मैत्री करण्याचे उपाय सुचवताना दिसतील. भारतीयच असूनही, त्यांना आपल्याच जवानांची झालेली हत्या वा विटंबना यांना संताप का येत नसावा? जशी सामान्य माणसाची प्रक्षुब्ध प्रतिक्रिया आहे; तशी विद्वान लोकांची भावना का नसावी? त्याचे उत्तर साधेसरळ आहे. आपण शहाणे आहोत आणि म्हणूनच सामान्य माणसाप्रमाणे रागावणे वा सुडाची भाषा बोलणे; आपल्याला शोभत नाही, अशी या लोकांची समजूत असते. मग आपण सामान्य माणसांपेक्षा वेगळे असल्याचे भासवण्यासाठी ते युद्धाचा उपाय योग्य असला; तरी त्यात समस्या असल्याचा शोध लावतात. त्यातला एक शोध असा, की आता दोन देशात पारंपारिक पद्धतीचे युद्ध होऊ शकत नाही. दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे त्यांच्यात संघर्ष पेटलाच, तर अणुयुद्धाचा धोका संभवतो. गेले दहा बारा वर्षे हेच सांगून पाकिस्तानच्या कुरापतखोरीला चुचकारण्यात भारतीय बुद्धीमंत आपली बुद्धीमत्ता खर्ची घालत आहेत. जणू अण्वस्त्रांची सज्जता करून भारताने स्वत:ला पंगूच करून घेतले; असाच समज त्यांनी करून घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यात व युक्तीवादात तथ्य नाही असे कोणी म्हणू शकत नाही. पण तथ्य किती आणि सत्य किती, याचाही विचार आवश्यक असतो.

   थापा मारणारा माणूस एक काळजी घेतो, ती म्हणजे तो संपुर्ण असत्य कधीच बोलत नसतो. त्याच्या बोलण्य़ात सत्य व असत्य, यांची सफ़ाईदार सरमिसळ असते. म्हणजे त्यातला काही भाग खरा असतो, तसाच काही भाग बेधडक खोटा असतो. पण काहीअंशी सत्य असल्याने ऐकणार्‍याचा मानसिक गोंधळ उडत असतो. त्यालाच खरी थापेबाजी म्हणतात. खोटा माल आकर्षक खर्‍या वेस्टनात गुंडाळून विकणे म्हणजे थापेबाजी असते. भारताला पाकिस्तानशी युद्ध परवडणारे नाही; असे पटवण्यासाठी अणूयुद्धाच्या शक्यतेची भिती घालणे वास्तवाचे विकृतीकरण आहे. याचे कारण युद्ध दोन देशात होऊ शकते, पण अणुयुद्ध दोन देशातले असू शकत नाही. ते कोणात पेटले याला महत्व नाही. ते पेटलेच तर सर्वव्यापी होणार असते व त्यात अवघे जग ओढले जाण्याचा धोका असतो. म्हणूनच अणू संशोधन व अण्वस्त्रांचा विकास, याबद्दल बडे देश कायम सा्वध असतात. मग असे देश कुठल्याही दोन देशातला संघर्ष अणुयुद्धाच्या थराला जाऊ देतील काय? नसतील तर अणुयुद्धाचे भय भारत-पाक यांच्यापुरते कसे काय असू शकते? तो दोन देशातला विषयच नाही, तर त्याबद्दलच्या धोक्याला एकट्या भारताने भयभीत होण्याचे कारणच काय? अवघ्या जगाने भयभीत व्हायला हवे. म्हणजेच तशी पाळी येऊ नये; यासाठी एकट्या भारताने झीज सोसण्याचे कारण नाही. त्यात तमाम पुढारलेल्या व विकसित देशांना पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यात भारत पाक यांच्यापेक्षा युरोप, रशीया अमेरिका व चीन अशा बड्या व श्रीमंत देशांचे हितसंबंध अधिक गुंतलेले आहेत. म्हणूनच पाकिस्तानशी युद्ध झाल्यास अणुयुद्धाचा धोका असल्याचे वास्तव अल्प प्रमाणात खरे असले तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये तसा धोका संभवत नाही. त्यासाठी भयभीत होऊन भारताने पाकिस्तानच्या कुरापती सहन करण्याचे काही कारण नाही. पारंपारिक युद्धाचा पवित्रा घेऊन पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे. त्यात गडबडून जाण्याचे काही कारण नाही.

   हे व्यवहारी सामान्य लोकांना कळते. कारण अणुयुद्धाच्या भितीपोटी गेल्या सहा सात दशकांचे राजकारण खेळले जाते आहे. पण जपानवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला, त्यानंतर आजवर कितीही युद्धे झाली, तरी दुसरा तसा बॉम्ब कोणी वापरलेला नाही. कितीही हमारतुमरी झाली, तरी तसा प्रसंग येऊ दिलेला नाही. पण त्याच वेळी पारंपारिक पद्धतीचे सशस्त्र संघर्ष कायम पेटत राहिलेले आहेत. रशिया वा अमेरिकेने अफ़गाण व व्हिएतनाम अशा घणाघाती युद्धातही अण्वस्त्रांचा वापर केलेला नाही. मग पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करील, या भयगंडाने पछाडलेल्या मानसिकतेमध्ये भारताने जगण्याची काय गरज आहे? तशी शक्यता असेल तरी अमेरिका व रशियासह चीनला त्यात हस्तक्षेप करावाच लागणार आहे. त्यात चीन व अमेरिकन सेनेकडे पाकिस्तानी अण्वस्त्रे कुठे व कशी आहेत, त्याची परिपुर्ण माहिती आहे. तसा धोका उभा राहिला, तर आहेत तिथेच त्यांना निकामी करण्याची पावले, उचलण्याची सज्जत त्यांनी ठेवलेली आहे. मग भारताविरूद्ध पाक अण्वस्त्रे वापरील असे भय दाखवण्याचे कारणच काय? वापर कोणीही कोणाचाही विरोधात केला तरी त्याचे परिणाम सभोवतालच्या देशांना भोगावे लागणार असतील तर ते देश पाकिस्तानला तसा वापर निमूट राहून करू देतील काय? नसतील तर पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करील अशी भिती घालण्यात काय अर्थ आहे?

   पण युद्ध म्हटले, की अनेक असुविधा आल्या. अनंत अडचणी येऊन त्यांनी जगण्यात व्यत्यय निर्माण होतात. त्यामुळे आधीच कष्टाचे जीवन कंठणार्‍या सामान्य लोकांच्या जगण्यात फ़ारसा फ़रक पडत नसतो. पण सुखवस्तू जगणार्‍यांच्या अनेक सुविधा युद्ध काळात रद्दबातल होतात. त्यांच्या ऐषाराम व चैनीला वेसण घातली जात असते. त्यालाच हा सुखवस्तू वर्ग घाबरत असतो. म्हणूनच त्याला युद्ध नको असते. युद्धातला विध्वंस व हानीकडे लक्ष वेधून तो वर्ग सामान्य माणसाला भयभीत करत असतो. आजही म्हणूनच पाकिस्तानने कितीही आगळीक केली, तरी नेमका बुद्धीवादी वर्गच युद्धाचे धोके सांगून भारत सरकारला युद्ध टाळण्याचे सल्ले जाहिरपणे देत आहे. त्यांना देशाच्या हानीची फ़िकीर नसून आपल्या सुखवस्तू जीवनाच्या हानीची फ़िकीर लागली आहे. तोच प्रकार पाकिस्तानातील बुद्धीवादी वर्गातही दिसून येईल. अन्य वेळी पाकच्या जिहादी अतिरेकाचे समर्थन करणारा तिथला बुद्धीवादी व पत्रकार वर्ग युद्धाच्या मात्र विरोधात बोलताना दिसेल. याचे कारण एकच असते. सामान्य जनता व सुखवस्तू बुद्धीवादी यांच्यातली दरी. इतर वेळी सामान्य माणसाचे जीवन असह्य झाले आहे, कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, पाकिस्तानला मस्ती चढली आहे, अशी भाषा वापरणरा हाच वर्ग आंदोलनाचा भडका उडाला, सीमेवरील युद्धाचे ढग जमू लागले, मग भाषा बदलताना दिसेल. कारण त्यांना वास्तवाशी कर्तव्य नसते तर शब्दांचा खेळ करायचा असतो आणि सामान्यांचे जीवन हे त्यांना खेळाच्या पटावरील सोंगट्यांच्या चाली वाटत असतात.     ( क्रमश:)
भाग   ( ५५)    १४/१/१३

1 टिप्पणी: