रविवार, २० जानेवारी, २०१३

हेमंत जॉनी आणि नरेंद्रबापू यांचे लिव्हर ट्रबल


   हल्ली प्रत्येक मनोरंजन वाहिन्यांवर विनोदी नकलांच्या कार्यक्रमांचा सुकाळ झालेला आहे. त्या कमी म्हणून की काय वृत्तवाहिन्यावरचे कर्मचारी आपापले विदुषकी चाळे करीतच असतात. पण तेही कमी पडतात, म्हणून की काय अन्य वाहिन्यांवरल्या विनोदी नकलांच्या पुन्हा नकला करून दाखवल्या जातात. थोडक्यात टिव्ही ज्यांच्या घरात आहे त्याच्यासाठी विनोदाचे अजीर्णच होत असते. नेहमीच्या विनोदाचा कंटाळा आला; मग थोडे हलके वाटावे म्हणून लोक सौम्य विनोदाच्या आहारासाठी वृत्तवाहिन्यांकडे वळत असतात. माझे ‘पुण्यनगरी’तले वाचक व फ़ेसबुकवरचे अनेक मित्र त्याचे किस्से मला कळवत असतात. कधीकधी मी सुद्धा खुपच थकवा आला; मग वृत्तवाहिन्यांचा आहार घेत असतो. अशाच माझ्या एका फ़ेसबुक मित्राचे एक निरिक्षण मला इथे अगत्याने सांगावेसे वाटते. अंबेजोगाई अशा ग्रामीण भागतल्या या मित्राचे नाव आहे बालाजी सुतार. त्याने मध्यंतरी एक फ़ारच सुंदर व मार्मिक शेरा हाणला. आदल्या रात्री त्याने कायबीइन लोकमतवर ‘सवाल’ बघितला होता. त्यावर भाष्य करताना बालाजी म्हणतो, ‘या निखिल वागळेचे इतके बोलून बोलून हात कसे दुखत नाहीत?’ ही आजच्या सामान्य प्रेक्षक व वाचकाने; पत्रकार व वाहिन्यांच्या जाणकारांची ठरवलेली लायकी आहे. तर अशा या गर्दीत उत्तम विनोदही खुप महाग होऊन गेला आहे. क्वचित राजू श्रीवास्तव किंवा कोणी सुक्ष्म निरिक्षणाने चांगले विनोद करतो, अन्यथा या क्षेत्रातल्या कलावंताचे पत्रकार बुद्धीमंतांनी पुरते हालच करून टाकले आहेत. सगळे बौद्धीक जीवनच विनोदी आणि हास्यास्पद करून टाकले; मग बिचार्‍या नकलाकारांनी तरी व्यंग कुठून शोधून काढायचे? पण काही वर्षापुर्वी अस्सल विनोदाचा इतका दुष्काळ नव्हता. जॉनी लिव्हर, राव ब्रदर्स, जॉनी व्हिस्की असे चांगले नकलाकार सकस विनोदाने लोकांना पोट धरून हसायला भाग पाडत असायचे. त्यातल्या जॉनी लिव्हरचे अनेक किस्से व नकला अजून स्मरणात आहेत. रस्त्यावर गर्दी वर्दळीत धक्का लागला म्हणुन एक दाक्षिणात्य आपल्या तसल्या हिंदीत कोणाशी तरी भांडतो, हुज्जत करतो, अशी ती नक्कल आहे.

  धक्का मारताय, गिर जाता तो? पडलो असतो ना? धक्का मारतोस? मागून बस आली असती तर? तिच्याखाली चिरडून मेलो नसतो? घरी माझी छोटीछोटी मुले आहेत, बायको आहेत. त्यांनी काय झाले असते? साला धक्का मारतो. खड्ड्यात पडलो असतो मग? माझ्या बायकापोरांनी काय करायचे? हरामखोर धक्का मारतोय. माझे कपडे खराब झाले असते मग? माझ्या कुटुंबाला तू पोसणार कायरे? नालायक, धक्का मारतो? माझा हातपाय तुटला असता मग? तु माझा संसार चालवणार होता कायरे? घरी माझी छोटीछोटी मुले आहेत. त्यांचे काय झाले असते? धक्का मारतोस? पडलो आणि अंगावरून गाडी गेली असती तर त्या गाडीवाल्याला भुर्दंड. हॉस्पिटलचा खर्च काय तू करणार होता काय रे?

   असे त्याचे चराट चालूच असते. पण ज्याचा धक्का लागला, त्याला तो बोलूच देत नसतो. जे काही होईल त्याचे वर्णन व जाब मात्र विचारत असतो. आणि धक्का मारतोस, म्हणून आरोपही करत असतो. शेवटी लिव्हर दमतो बोलून बोलून. तेव्हा कुठे त्या समोरच्याला बोलायची संधी मिळते. तो एकाच वाक्यात विचारतो, लेकीन भाईसाब तुम्हाला माझा धक्का लागलाच कुठे? त्यावर उसळून लिव्हर म्हणतो................ धक्का लग जातो तो?

   आता बोला. म्हणजे पंधरा मिनिटे लिव्हर त्याच्यावर आरोपांच्या फ़ैरी झाडत असतो आणि काय काय झाले असते त्याचे धोके सांगून जाब विचारत असतो; पण मुळात धक्काच लागलेला नसतो. म्हणजे सगळी बडबड अकांडतांडव अकारण उगाच चालू असते. आणि ते लक्षात आणुन दिल्यावर तोच आरोपकर्ता बेशरमपणे म्हणतो, धक्का लग जाता तो? त्या नकलांच्या ऑडीओ टेप्स मिळायच्या तेव्हा. मी त्यातला युक्तीवाद अनेकदा ऐकायचो. हल्ली वाहिन्यावर ज्या चर्चा व परिसंवाद चालतात, तेव्हा मला अनेकदा त्या टेप नव्या नकलाकारांकडून ऐकतो आहे काय असे वाटते. कारण अशा चर्चांमध्ये झालेले काय आहे, तो विषय बाजूला ठेवून भलतेच काही झाले असते तर, असा विषय फ़िरत भरकटत जात असतो. मग ह्या तमाम चर्चा करणार्‍यांना व त्याचे संयोजन करणार्‍यांना; जॉनी लिव्हरची बाधा झाली आहे असेच मला वाटू लागते. ज्याला मी लिव्हर ट्रबल असे नाव दिले आहे. गेल्या आठवड्यात असे दोन याच आजाराची गंभीर बाधा झालेले दोन रुग्ण मला आढळले. त्यांची सगळी चर्चा व युक्तीवाद; काय होईल वा झाले असते यावर चालू होता. पण समोर काय झाले आहे, त्याबद्दल मात्र ते अगदी गप्प होते. त्यातल्या एकाचे नाव हेमंत जॉनी उर्फ़ देसाई व दुसरे दाभोळचे नरेंद्र बापू. दिल्लीतल्या बलात्कारामुळे देशभर जी चर्चा चालू आहे, त्यावर त्यांचे लेख मान्यवर वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. त्यात हे दोघेही आसाराम बापू, अनिरुद्ध बापू, संघाचे प्रमुख मोहन भागवत इत्यादींवर घसरले आहेत. कारण बलात्कारावर उपाय म्हणून किंवा असे प्रसंग टाळण्यसाठी त्यांनी जे काही उपाय सूचवले; त्यातला फ़ोलपणा दाखवण्यासाठी या दोघा महंतांनी आपल्या विद्वत्तेचे दिवे पाजळले आहेत. समजा तुम्हाला ही बापू वगैरे मंडळी भोंदू भंपक वाटत असतील तर त्यांच्या मागे जाण्या्ची सक्ती तर नाही ना? त्यांचे उपाय दुर्लक्षित करा. पण आता देशाला भेडसावणारा विषय मुर्ख उपाय सुचवणार्‍यांचा नसून बलात्काराचा अपाय करणार्‍यांच्या बंदोबस्ताचा आहे. मग त्याला सोडून अन्य कोणी सांगितलेले उपाय चुकीचे आहेत आणि त्यामुळे कोणी बलात्कारापासून बचाव करू शकणार नाही, असले युक्तीवाद करण्यत कुठला शहाणपणा आहे?

   त्यापेक्षा गंभीर मुद्दा आहे, तो परिस्थितीचा. जे उपाय योजून व जी दक्षता बाळगूनही बलात्कार राजरोस चालू आहेत, त्यातला फ़ोलपणा दाखवण्याची गरज आहे ना? की बापूंच्या उपायाचा वापर करून भविष्यात निर्माण होऊ शकणार्‍या काल्पनिक धोक्याबद्दल भुई धोपटायची? ज्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला; तिने कुणा बापू बुवाच्या स्तोत्र वा मंत्राचा जप केलेला नाही, किंवा त्यावर विसंबून ती घराबाहेर पडलेली नाही. तर सरकारपासून देशातले विचारवंत ज्या कायद्याच्या राज्याचा सर्वात सुरक्षित म्हणून हवाला देतात, त्याचाच मंत्रजप करीत ती मुलगी घराबाहेर पडली होती. तीच कशाला देशाच्या कानाकोपर्‍यातल्या महिला त्याच कायद्याच्या मंत्राचा जपजाप करूनच बलात्काराच्या, अपहरणाच्या संकटाचे निवारण होणार या श्रद्धेवर जगत व हिंडतफ़िरत असतात. तेव्हा त्या प्रत्येक महिलेची फ़सगत झाली असेल; तर ती या आधुनिक वैज्ञानिक घटनात्मक राज्य विषयक मंत्रतंत्राने केलेली आहे. तेव्हा देशातल्या महिला मुलींना बलात्काराच्या धोक्यातून सावध करायचे असेल; तर तिला आज असलेल्या पहिल्या सक्तीच्या अंधश्रद्धेतून बाहेर काढणे अत्यावश्यक नाही का? कारण ही कायद्याच्या राज्याची अंधश्रद्धा सक्तीची आहे. बापू वगैरे मंडळींचा सल्ला वा श्रद्धा सक्तीची नाही. त्यामुळे त्यापासूनचा धोका अगदीच किरकोळ आहे. आणि कोणी तो सल्ला गंभीरपणे घेत नाही. अगदी त्यांचे भक्तसुद्धा वास्तव जीवनात कायद्याच्या अंधश्रद्धेवरच सर्वस्वी अवलंबून असतात. दिल्लीतलाच नव्हेतर देशाच्या कुठल्याही भागात होणारा बलात्कार वा गुन्हा हा कायद्याच्या तंत्रमंत्राचा फ़ोलपणा आहे.

   पण हेमंत जॉनी किंवा दाभोळचे नरेंद्रबापू आपल्या लेखामध्ये त्या देशव्यापी सक्तीच्या अंधश्रद्धेबद्दल अवाक्षर लिहित नाहीत, की बोलत नाहीत. उलट ज्यावर विसंबून अजून कोणी बलात्काराची शिकार झालेले नाहीत, त्यामुळे काय काय हाहा:कार माजेल, त्यावर हे काहूर माजवतात. अगदी जॉनी लिव्हरच्या भाषेत. धक्का लग जाता तो? म्हणजे धक्का लागलेलाच नाही तरी ओरडा चालू आहे आणि जिथे धक्का लागून ती मुलगी मेली व अन्य मारल्या लुटल्या जात आहेत; त्याबद्दल अवाक्षर नाही? याला मानसिक आजार नाहीतर काय म्हणायचे? आता याला लिव्हर ट्रबल का म्हणायचे? तर तो पित्तविकार आहे म्हणून. ही दोन्ही विद्वान मंडळी अशी आहेत, की त्यांना हिंदू असा शब्द कुठून कानी आला किंवा वाचनात आला; मग त्यांचे पित्त खवळते व त्यांचा पित्तप्रकोप होतो. त्यातून त्यांना अशा ‘कडवट’ उलट्या वांत्या होऊ लागतात. म्हणून त्याला पित्ताशयाचा आजार म्हणजे लिव्हर ट्रबल असे नाव द्यावे लागले. त्यांचे पित्त त्यांनी कुठेही ओकावे याबद्दल माझी तक्रार नाही. ते कडवट घोट घशाशी आले; मग उलट्या कराव्याच लागतात. पण इथे पित्त खवळण्याचे कारणच काय? धक्का तर लागू देत? तर हे शहाणे तोपर्यंतही थांबायला तयार नाहीत. धक्का लागला तर, म्हणून हुज्जत करू लागतात. आपण सामान्य बुद्धीची माणसे अशा वागण्याला भ्रमिष्ट म्हणतो. वाहिन्यांवर त्यालाच ज्येष्ठ जाणकार विश्लेषक म्हणतात.   ( क्रमश:)
 भाग   ( ६२)    २१/१/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा