सोमवार, १४ जानेवारी, २०१३

आभासाच्या जगातले भ्रमिष्ट विचारवंत पत्रकार
  ‘पुण्यबगरी’चा वाचक एक सव्वा कोटीपेक्षा अधिक आहे. माझा लेख ‘पुण्यबगरी’च्या बहुतेक आवृत्तीमध्ये प्रकाशित होतो. म्हणून तो प्रत्येक वाचक माझा लेख वाचतोच, असे मी गृहीत धरत नाही. त्यातले अनेकजण मला सातत्याने फ़ोन करून वा अन्य मार्गाने त्यांच्या प्रतिक्रिया कळवत असतात. काही लोकांना खुपच आवडते, काही लोक आक्षेप घेतात, काही लोकांना खुपच विचारप्रवर्तक वाटते. काही लोकांना रागही येत असतो. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. त्यामुळे त्या सर्वांचे मी स्वागतच करतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की मी लिहितो म्हणून सगळे डोळे मिटून ते सत्यच आहे म्हणून स्विकारत नाहीत; याचे मला खरेच समाधान वाटते. कारण वृत्तपत्राने व माध्यमांनी लोकांना विचार करायला भाग पाडले पाहिजे, हेच पत्रकारितेचे खरे उद्दिष्ट आहे. पण असे असूनही मी कधीच ‘पुण्यनगरी’चा तमाम वाचक वाचतो आहे, अशी भाषा वापरत नाही. कारण तमाम वाचक माझा लेख वाचत असेल, हे गृहीत आहे, ते सत्य व वास्तव असू शकत नाही. पण अनेक संपादक, पत्रकार अशी भाषा वापरतात. मला त्यांची कींव येते. कारण दहा अकरा कोटी एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे आणि आपल्या वृत्तपत्राचा खप जास्तीत जास्त काही लाखात असतो. मग तमाम वाचक वा महाराष्ट्राच्या वतीने बोलण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? पण असे लिहिणारे किंवा बोलणारे असतात, त्यांचा आवेश बघितला, तर ते मनापासून तेच सत्य समजून बोलतात, असेच दिसते. मग जे वास्तव नाही, त्या भ्रमात माणूस बोलत असेल, तर त्याच्याकडून कुठल्या शहाणपणाची अपेक्षा बाळगता येईल? आपण कुठे आहोत वा आपले स्थान काय; त्याचाच पत्ता नसलेल्या व्यक्तीने तुम्हाला त्याच्याकडे येण्याचे आमंत्रण दिले, तर तुम्ही कुठे जाऊ शकता? कुठेच नाही ना? मग या अशी भाषा वापरणार्‍यांचा मुर्खपणा तुमच्या सहज लक्षात येईल.

   तुम्ही रोज किंवा अधूनमधून टिव्ही बघत असाल, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, की तिथे बोलणारे सहसा निर्विकार असतात. त्यांची भाषा कशी असते? अवघा महाराष्ट्र तुमच्याकडे बघतो आहे. देशाचे तुमच्यावर लक्ष आहे. देश तुम्हाला विचारतो आहे, असे हे टिव्हीवरचे लोक का बोलतात? त्यांना देश कुठे व कसा आहे, त्याचा तरी पत्ता आहे काय? खरा देश बघायला मिळाला, तर त्यांची काय घबराट होईल, याची नुसती कल्पना केलेली बरी. आपल्याला कुठेही दिसणारा एक अनुभव सांगतो. हल्ली मोबाईल फ़ोनचे खुळ खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेले आहे. मग जुने झालेले फ़ोन खेळण्यासारखे पोरांना दिले जातात आणि मुले कानाला लावून एकटीच बडबड करीत मोठ्यांची नक्कल करीत असतात. इथून तिथे फ़िरत काहीतरी बडबडतात. त्यातही मोठ्यांच्या शब्दांचीच नक्कल असते. फ़ोनवर पलिकडून आवाज येतो, तेव्हा आपण उत्तर द्यायचे असते; याची त्या कोवळ्या जीवांना जाणीव नसते. त्यामुळे एकतर्फ़ी बडबड चालू असते. माझ्या भाचीची दीड वर्षाची मुलगी होती, त्यांच्याकडे मी वास्तव्याला होतो, तेव्हा हा खेळ मी बघितला होता. मग मी तिथून माझ्या घरी परतलो आणि कधीतरी त्यांना फ़ोन करून बोलत असताना; त्या मुलीची बडबड ऐकू आली. म्हणून म्हटले जरा फ़ोन आर्याकडे द्या. तिनेही कौतुकाने फ़ोन घेतला. हॅलो वगैरे बडबड केली. मग मी तिच्या नावाने बोललो, ‘कोण आर्या बोलतेय का?’ पुढे धमाका ऐकू आला. तिने फ़ोन एकून दिला होता. काही सेकंदात पलिकडली गडबड कानी आली. तिचे आईबाप तिला आजोबा बोलतात म्हणून समजावत होते. पण ती पोरगी फ़ोन काही हातात घ्यायला तयार नव्हती. ती खर्‍या ऐकू येणार्‍या फ़ोनला भुताटकी सारखी घाबरली होती. तिचा फ़ोन पलिकडून ऐकू येणारा नव्हता. स्वत:शी बड्बड करायचा होता. दोन्हीकडे आवाजाची नेआण करणारा फ़ोन तिला माहितच नव्हता. म्हणूनच कानाला लावला, तर त्यातून आवाज येणार्‍या फ़ोनला घाबरून तिने हातातला मोबाईल फ़ेकून दिला होता. अखेर मी त्यांना स्पिकर चालू करायला सांगितले आणि आर्या माझ्याशी मस्तपैकी बोलली. कारण सगळेच एकत्रित माझ्याशी संवाद करत होते.

   आजच्या वाहिन्या, वृत्तपत्रे बघितली वा वाचली; मग मला तो प्रसंग आठवतो. आजच्या माध्यमात एकतर्फ़ी संवाद चालू असतो. आपण लिहायचे, बोलायचे आणि समोरचा काय म्हणतो, ते न ऐकताच गृहीत धरून बोलतच राहायचे; अशी एकूण स्थिती असते. समोरच्या निर्जीव कॅमेरासमोर बोलताना ऐकणारा कोणी असायची गरज नसते. मग निर्जीव मुक्या भिंतीशी बोलावे, तसे हे लोक बडबड करीत असतात. त्यांचा खर्‍या माणसांशी, खर्‍या जगाशी संबंधच उरलेला नाही. त्यामुळेच मग वास्तवात काय घडते आहे, त्याचीही फ़िकीर नसते. कुठे काही घडले असे कळले, मग हे लोक अंदाज करतात, तर्क लढवतात आणि त्यावर बडबड सुरू करतात. अगदी घटनेचे चित्रण दाखवले जात असते. त्यातही बघणार्‍याला जे दिसत असते, त्यापेक्षा सांगणारा काही भलतेच वर्णन करत असतो; असा अनुभव अनेकदा येतो. त्यामुळेच मग समोरचा काय करतो आहे, काय बोलतो आहे, याच्याशी माध्यमातल्या लोकांना काही कर्तव्यच उरलेले नाही. त्यांना होणारे आभास वा त्यांनी लढवलेले तर्क; म्हणजेच वास्तव अशा भ्रमात ही मंडळी अनेकदा जगताना दिसतात. सहाजिकच जे घडते आहे, ते का घडते आहे व त्याचा कार्यकारणभाव काय आहे; त्याचा त्यांना थांगपत्ता नसतो. त्यातून मग अनेक विनोदही निर्माण होतात. महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री विलासराव देशमुख यांचे गंभीर आजारामुळे आकस्मिक निधन झाले, त्या दिवसाचा प्रसंग मला आठवतो. विलासराव व गोपिनाथ मुंडे विरोधी पक्षातले असले; तरी तरूणपणा पासूनचे पक्के मित्र. त्यामुळे कायबीईन लोकमत वाहिनीवर गोपिनाथरावांच्या आठवणी चाळवण्याचा प्रयास निखिल वागळे करीत होते. त्यात त्यांनी एक प्रश्न इतका मुर्खासारखा विचारला, की मुंडेही गडबडून गेले. त्यांच्या जीवलग मित्राचे आकस्मिक निधन झाले आहे आणि त्या प्रसंगी आप्ण मुलाखत घेतो आहोत; याचे भान असायला नको का? निखिलने जणू विलासरावांच्या एकसष्टीनिमित्त मुलाखत घेत असल्याप्तमाणे मुंडे यांना विचारले, एकाच कॉलेजमध्ये होतात, तर एकाच मुलीवर लाईन मारत होतात का?’

   खास विनोद पुढेच आहे. ज्याला इतकेही प्रसंगावधान नाही, त्या मुर्खाला पुढल्या दोनतीन दिवसात मुंबई मराठी पत्रकार संघाकडून आचार्य अत्रे पुरस्कार देण्यात आल्याचे वृत्त मला वाचायला मिळाले, तेव्हा मी थक्क झालो. कारण अत्रे हे प्रसंगावधानासाठी कमालीचे प्रसिद्ध होते. एका अनाथाश्रमाच्या कार्यक्रमात त्यांना प्रमुख पाहूणे म्हणुन आमंत्रित केलेले होते. तिथे नेहमीप्रमाणे अत्र्यांनी जबरदस्त भाषण केले. मात्र त्या अप्रतिम भाषणाचा शेवट त्यांनी इतके प्रसंगावधान राखून केला, की उपस्थितांना त्यांचा मुद्दा समजायलाही काही मिनिटे लागली होती. भाषणाची अखेर करताना अत्रे म्हणाले. ‘शेवटी या संस्थेने जे महान व उत्तम कार्य चालविले आहे, ती संस्था लौकरात लौकर बंद पडायची वेळ यावी अशा शुभेच्छा मी देतो.’ एकदम समोरच्या श्रोतृवर्गात शांतता पसरली. कोणाला काय करावे तेच कळेना. संस्था बंद पडावी याला शुभेच्छा कसे म्हणता येईल? हा तर शाप झाला. आपल्या विधानाचे गांभिर्य अत्र्यांना ठाऊक होते. मग बुचकळ्यात पडलेल्या श्रोत्यांना भ्रमातून बहेर काढण्यासाठी त्यांनी खुलासा केला. संस्थेचे काम चांगलेच आहे. पण अशा संस्थेची भरभराट म्हणजे समाजात अनाथांची संख्या वाढणेच आहे ना? मग संस्थेची भरभराट असा आशिर्वाद देऊन मी समाजाल शाप देऊ का? संस्था समाजाच्या निरोगी नैतिक कल्याणासाठी असतात. ते साध्य झाले, मग त्या बंदच पडायला हव्यात. या संस्थेचे कार्य अनाथांना संभाळणे असले, तरी तिच्या भरभराटीसाठी समाजात अनाथांची पैदास व्हावी हा शाप असेल. म्हणुन ती शुभेच्छा होऊ शकत नाही, संस्थेला दुसरी खुप चांगली कामे करता येतील. म्हणून संस्थेचा अनाथाश्रम बंद पडायची वेळ यावी याच शुभेच्छा असतात. इतके प्रसंगावधान राखणार्‍या अत्र्यांच्या नावाचा पुरस्कार निखिलला मुर्खपणाने बडबड करण्याबद्दल पत्रकार संघानेच अवघ्या दोनतीन दिवसात द्यावा; यातच एकूण माध्यमांची बुद्धीमत्ता किती रसातळाला गेलेली आहे, त्याची प्रचिती येते. असे निखिल एकटाच बडबडतो मानायचे कारण नाही, एकूणच वाहिन्यांची बकवास व वृत्तपत्रातून खरडले जाणारे चराट वाचल्यास; त्याची सातत्याने प्रचिती येत असते. मग त्यांच्याकडुन समाजा्ला भेडसावणार्‍या समस्यांची उकल वा उहापोह कसा व्हायचा? जे स्वत:च भ्रामक जगातल्या भ्रमात वावरत असतात, त्यांच्याकडून वास्तव जगातल्या समस्यांची कारणमिमांसा होऊ शकत नाही, किंवा त्यांच्याच बुद्धीमत्तेवर विसंबलेल्या समाजाचा बौद्धिक व व्यावहारिक र्‍हास होत जाणे अपरिहार्यच नाही काय?    ( क्रमश:)
भाग   ( ५६)    १५/१/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा