आता दिल्लीतल्या त्या बलात्कारित मुलीच्या सोबत घटनास्थळी असलेल्या मित्राच्या मुलाखतीचे गुर्हाळ सुरू झाले आहे. महिना लोटल्यावर त्याची एका वाहिनीने मुलाखत घेतली असून त्याने पोलिसांच्या हलगर्जीपणवर बोट ठेवले आहे. त्यातून अनेक बारकावे तपासले जात आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या पहिल्या पोलिस व्हॅनने त्यांना तात्काळ इस्पितळात उपचारासाठी नेले नाही. दुसर्या पोलिस गाडीने का नेले? त्या विवस्त्रावस्थेतील मुलीला पोलिसांनी झाकण्यासाठी काहीच का केले नाही? त्यासाठी लागणारी चादर मिळवण्यत किती मिनिटे गमावली? जवळच्या खाजगी इस्पितळात न्यायचे सोडून दुरच्या सरकारी इस्पितळातच कशाला नेले? त्यात बहुमोल वेळ खर्ची घातला, यावर वाहिन्यांचे दळण चालू आहे. ते दळायलाच हवे, नाही तर चोविस तास दाखवायचे काय? असे प्रश्न भरल्या पोटी आणि रिकामपणी खुप लोकांना सुचतात आणि वाहिन्यांवर अशाच लोकांचा भरणा असतो. पण पोलिसांच्या ऐवजी यांच्यापैकी कोणी वाहिनीचा पत्रकार घटनास्थळी आधी पोहोचला असता, तर त्याने त्यापैकी कुठली गोष्ट केली असती? त्याने आपल्या अंगावरचा शर्ट काढून त्या मुलीला झाकले असते का? तिला गडबडीने उचलून जवळच्या इस्पितळात उपचारार्थ नेले असते का? तेवढेही सोडा, पत्रकार, कॅमेरावाला तिथे पोहोचला असता तर त्याने कुठलीच मदत केली नसती. तिच्या किंकाळ्या शेवटचे श्वास व धापा चित्रीत करण्यात हे पत्रकार गुंतले नसते का? त्यांनी ‘फ़क्त आमच्याच वाहिनीवर’ दुर्मिळ चित्रण दाखवण्यासाठी तिच्या मरणयातनांकडे साफ़ काणाडोळा करून त्याचेच चित्रण करण्यान किती तास व मिनिटे गमावली असती? कोणी म्हणेल मी अकारण पत्रकार व वाहिन्यांवर आरोप करतो आहे. संधी मिळाली म्हणून ठोकून घेतो आहे. पण तसे अजिबात नाही. आजवरचा अनुभवच मला असे सांगतो की, अत्यंत निर्लज्जपणे त्या पहिल्या पोहोचणार्या पत्रकार व कॅमेरावाल्याने आधी दहा मिनिटे तरी ‘दुर्मिळ’ चित्रण केले असते. अगदी अन्य कुणा वाहिनी पत्रकाराला कळू नये, म्हणून पोलिसांनाही वर्दी दिली नसती.
आज जे कोणी तिच्या मित्राची मुलाखत प्रसिद्ध झाल्यावर पोलिसांच्या बारीकसारीक हालचालीचा हिशोब मागत आहेत, त्यांना तरी तेवढी माणुसकी आहे काय? पोलिसांनी कर्तव्य म्हणून जे करावे व केले नाही, म्हणून त्यांना जाब विचारला जातो आहे. पण कुठल्याही पेशात असलेल्या माणसाची सर्वात प्रथम माणुस म्हणून काही कर्तव्ये असतात. त्यात दु;खी, यातनात फ़सलेला जखमी वा मरणासन्न; याला मदत करणे हे माणूसकीचे पहिले कर्तव्य असते. आणि त्यासाठी कायद्याने जबाबदारी टाकण्याची गरज नसते. माणुस म्हणुन जन्माला येताच ती जबाबदारी आपोआपच अंगावर येऊन पडत असते. त्यातून पोलिसांप्रमाणेच पत्रकारी पेशात असलेल्यांचीही सुटका नसते. पण त्याचसाठी पोलिसांना जाब विचारणारे स्वत: त्या माणूसकीला किती पारखे झालेत? आठवत नसेल तर त्यांना काही महिन्यांपुर्वीच गुवाहाटीमध्ये घडलेल्या घटनेचे स्मरण करून देणे भाग आहे. तिथे एका पबमधून बाहेर पडलेल्या षोडषवर्षिय मुलीवर एक टोळक्याने हल्ला चढवला होता. भर चौकात तिचे कपडे फ़ाडणे व तिच्या शरीराची विटंबना करण्याचा उद्योग अर्धापाऊण तास चालू होता. त्याचे अगदी पहिल्या क्षणापासूनचे चित्रण एक पत्रकार करीत होता. पण त्याने तो गुन्हा थोपवण्याचे प्रयत्न केले नाहीत, की पोलिसांना वर्दी देण्याचेही कष्ट घेतले नाहीत. उलट जवळच असलेल्या आपल्या वाहिनीच्या कार्यालयाला निरोप देऊन थेट प्रक्षेपणासाठी कुमक मागवली होती. सुदैवाने त्या कार्यालयात कोणाचे तरी डोके ठिकाणावर होते, त्याने पोलिसांना खबर दिली आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे त्या तरूणीची त्या यमयातनांपधून सुटका झाली होती. मात्र पोलिस तिथे येण्यापर्यंत त्या वाहिनीच्या पत्रकाराने छापपैकी त्या विटंबनेचे चित्रण चालविले होते.
याला पत्रकारिता म्हणतात काय? संवेदनाशून्य व बेजबाबदार वागण्याला पत्रकारिता म्हणतात काय? पोलिसांनी काय करायचे हा वेगळा विषय आहे. परंतू पत्रकार म्हणून सार्वजनिक सभ्यता पाळली जात नसेल; तर त्याचे चित्रीकरण करत रहायचे, पण त्यात हस्तक्षेप करायचा नाही वा पोलिसांना खबर सुद्धा द्यायची नाही, ही कुठली सभ्यता आहे? स्वेच्छेने कुणा मित्रासोबत जाणार्या व त्याच्याशी प्रणयराधन करणार्या मुलीचे त्या अवस्थेतील चित्रण करणे सुद्धा गुन्हा आहे. आणि इथे जबरदस्तीने मुलीचे लैंगिक शोषण चालू असताना तिचे निर्धास्तपण चित्रण करणारा पत्रकार म्हणुन मिरवतो, याची आपल्या देशातल्या पत्राकारितेला लाजलज्जा नसावी? या विषयावर कित्येक दिवस मग चर्चा चालू होती, त्यासाठी तिथल्या पोलिस आयुक्त वा मुख्यंमत्री तरूण गोगोई यांच्यासह अनेकांवर आरोपांची राळ उडवण्य़ात देशभरची माध्यमे रमलेली होती. पण कोणी म्हणून आपल्यातल्या एका दिवट्याने बेशरमपणे त्या अमानुष घटनेचे चित्रण करताना माणू्सकीला काळीमा फ़ासल्याचे दु:खही व्यक्त केले नव्हते. इथे निखिल वागळेचे मी कौतूक करीन. बहूधा देशभरातील तोच एक वाहिनी संपादक असेल, की त्याने असे चित्रण करणारा व हस्तक्षेप न करणार्या त्या गुवाहाटीच्या पत्रकाराबद्दल पहिल्याच दिवशीच्या चर्चेत निदान नाराजी व्यक्त केली होती. आपण तिथे असतो तर बातमी बाजूला ठेवून त्या मुलीला मदत केली असती; असे निखिल त्या चर्चेत म्हणाल्याचे मला पक्के आठवते. निखिलच्या मुर्खपणाबद्दल मी नेहमी त्याची हजामत करतो. पण त्या प्रसंगी त्याने व्यक्त केलेले मत पत्रकारितेच्या माणूसकीची साक्ष होती. पण तो अपवाद होता. बाकी देशभरातील पत्रकारितेचे मुखंड नालायक ठरले होते.
इथे एक प्रश्न असा उपस्थित होतो, की पत्रकार आज जे प्रश्न विचारत आहेत, त्याची उत्तरे त्यांच्याकडे तरी आहेत काय? स्वत:च्या माणुसकीचे पुरावे व दाखले जे देऊ शकत नाहीत, त्यांनी पोलिसांवर किती आरोप करावेत आणि पोलिसांना किती धारेवर धरावे? हा असा एकच प्रश्न नाही. दिल्लीच्या निदर्शनामध्ये सुभाष तोमर नावाच्या पोलिसाचा मृत्यू झाला, त्याही प्रसंगात त्याचे चित्रण करणार्यांनी त्याला आपल्या गाड्य़ांमधून उपचारार्थ हलवण्याचे कष्ट घेतले होते काय? त्याला धाप लागली होती, श्वासोच्छवास अडत होता, हे चित्रणात दिसते. तिथे एक मुलगा व मुलगी त्याला मदत करताना दिसतात. पण त्या जिवावरच्या प्रसंगात फ़क्त चित्रण करण्याचीच पत्रकारांची जबाबदारी असते काय? त्या मुलानेही नंतर पत्रकार नुसते चित्रण करून निघून गेल्याचे सांगितले. याचा अर्थ काय होतो? बातमीदारी करणार्याने माणुसकीच्या गप्पा माराव्यात आणि तशी जबाबदारी आली, मग पळ काढावा काय? पोलिसांचे तेच काम आहे. पण जिथे पोलिस वा सरकारी यंत्रणा नसते, तिथे परस्परांना मदत करणे. हेच प्रत्येक सभ्य नागरिकांचे कर्तव्य असते. पत्रकारांनी असे आपले कर्तव्य पार पाडल्याची किती उदाहरणे देता येतील? नसतील तर मग पत्रकार व माध्यमातील लोकांना सभ्य नागरिक तरी म्हणता येईल काय? आणि जे सभ्यसुद्धा नसतात, त्यांच्या हाती माध्यमे सुखरूप असतील का? असे पत्रकार सभ्य समाजाला मार्गदर्शक असू शकतात काय? जे स्वत:ला बुद्धीवादाचे प्रतिक वा प्रतिनिधी मानतात, त्यांचीच बुद्धी इतकी सडलेली वा बुरसटलेली असेल, तर त्यांच्यामुळे देशाच्या बुद्धीला किड लागली तर नवल कुठले?
एखाद्या मनोरंजनाच्या वाहिनीने रियालिटी शो म्हणून घडणार्या घटनांचे चित्रण करावे, तसे घडणार्या विपरित घटनांचे चित्रण करणे; हा गुन्हा नाही काय? जेव्हा डोंबीवलीत अशीच एका मुलीची छेड काढण्याची घटना घडली, तेव्हा त्या टोळक्याला हटकणार्या तरूणावर हल्ला झाला होता. तिथे पन्नास साठ लोक होते, पण कोणी हस्तक्षेप केला नाही. तर समाजाला मुर्दाड ठरवण्याची स्पर्धा वहिन्यांच्या चर्चेपासून वृत्तपत्रातल्या लेखनापर्यंत चालली होती. पण असले पांडित्य जगाला व नागरिकांना शिकवणार्यांचे भाईबंदच पाऊण तास चित्रण करतात, त्यांची निर्भत्सना करण्याचेही कर्तव्य बजावले जात नाही, त्याला बदमाशी, दांभिकता की बेशरमपणा म्हणायचे? जेव्हा तुम्हीच असे भंपकपणा करता तेव्हा तुमच्या शब्दांची धार बोथट होत असते. आज दिल्लीतल्या पिडीतेच्या मित्राच्या मुलाखतीचे हवाले देऊन पोलिसांना जाब विचारणार्यांना तेवढा तरी नैतिक अधिकार आहे काय? पोलिसांच्या आधी आम्ही घटनास्थळी पोहोचलो असतो, तर त्या मुलीला तातडीने इस्पितळात घेऊन गेलो असतो, अमुक केले असते, तमूक केले असते, असे कोणी पत्रकार वाहिनीवाला छाती ठोकून सांगू शकेल काय? नसेल तर ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी; अशीच स्थिती असणार ना? की रोजच्या बातम्या, त्यावरच्या गंभीर चर्चाही नुसता रियालिटी शो समजायचा? तेही मनोरंजनच झाले म्हणायचे काय? एकूणच समाज किती बेशरम व दांभिक होत चालला आहे, त्याचे हे द्योतक आहे. आपण काय बोलतो, लिहितो, त्याचे पत्रकार जाणकारांना भान नाही आणि आपल्या कर्तव्याची जाणिव पोलिस व शासन यंत्रणेला नाही. मग अराजकाची स्थिती आली तर नवल कुठले? मग शाहरुख खान सुपरस्टार हिरो झाल्यास नवल ते काय? ( क्रमश:)
भाग ( ४८ ) ६/१/१३
भाऊसाहेब,
उत्तर द्याहटवासुंदर लेख लिहिला आहे आणि घेण्यासारखे खूप काही लिहिले आहे.
>> इथे जबरदस्तीने मुलीचे लैंगिक शोषण चालू असताना तिचे निर्धास्तपण चित्रण करणारा पत्रकार >> म्हणुन मिरवतो, याची आपल्या देशातल्या पत्राकारितेला लाजलज्जा नसावी?
मी तुमचे लक्ष्य ओढवू इच्छितो, IBN च्या इंग्लिश बातमी वाहिनीच्या सागरिका घोस यांच्या ये वक्तव्याकडे. जेन्वा गोवाहती मढाली घटना घडली तेंवा बरीच चर्चा झाली. वरील आशयाचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला twitter वर. घोस यानी मग आपल्या हुशार डोक्याच्या असमंतातले बरेच तारे तोडले. त्यातील तिचे असेच एक विषण, "आम्ही पत्रकार आहोत आणि आणि आमचे काम आहे फक्त बातमी जनतेसमोर ठेवणे. बस. तिला वाचवणे आमचे काम नवे."
आता बोला. काय म्हणायचे ह्या प्रवूत्तीला!