जादू तेरी नजर, खुशबु तेरा बदन
तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण
जादू तेरी नजर, खुशबु तेरा बदन
तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण
तू है मेरी किरण
मेरे ख्वाबो की तस्वीर है तू
बेखबर मेरी तक़दीर है तू
तू किसी और की हो ना जाना
कुछ भी कर जाऊंगा मै दीवाना
तू हाँ कर या ना कर
तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण
तू है मेरी किरण
फासले और कम हो रहे हैं
दूर से पास हम हो रहे हैं
मांग लूँगा तुझे असमान से
छीन लूँगा तुझे इस जहाँ से
तू हाँ कर या ना कर
तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण
तू है मेरी किरण
दोन दशकांपुर्वी हे गाणे किती गाजले होते ना? त्याची चाल मस्त होती, गुणगुणली जात होती. प्रत्येकाच्या तोंडी हे गाणे जाऊन बसले होते. पण खरेच त्या गाण्यातून आपण कोणता संदेश समाजात फ़ैलावतो आहोत, याचा विचारही कोणाच्या मनाला शिवला नव्हता. अशा गाण्याच्या गुणगुणण्यातून सहजगत्या स्त्रिया, मुलींशी अमानुष व अतिरेकी वागण्याची शिकवण सुप्त मनात मुरवली, रुजवली जाते आहे, हा धोका कोणालाच दिसला नसेल? यश चोप्राच्या चित्रपटाचे यश आणि नव्या अभिनेत्याच्या स्वागतामध्ये तमाम टिकाकार, समालोचक रममाण होऊन गेले होते. स्वत:ला समाजचिंतक म्हणवणारेही अलिप्त होते. दोनच वर्षापुर्वी उल्हासनगरला ज्या रिंकू पाटिलची जाळून हत्या एकतर्फ़ी प्रेमातून झाली, त्याचे उदात्तीकरण त्यातून होते आहे, असा विचारही कोणाच्या मनाला शिवला नाही; तो समाज किती मुर्दाड झालेला असेल? त्या समाजाची बुद्धी म्हणजे त्यातले बुद्धीमंत किती रसातळाला गेलेले असतील; त्याची कल्पना येऊ शकते. आज ज्यांना रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत जे बोललेलेच नाहीत; त्यातही समाजिक धोका दिसतो, त्यांना वीस वर्षापुर्वी शाहरुखचे आगमन मुली महिलांच्या एकूण जगण्यावरचाच हल्ला आहे, त्याचे भान नव्हते. त्या चित्रपटातल्या गीतामधून महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणायचे व त्यांच्या हुकूमत गाजवण्याचे एकतर्फ़ी अधिकार समाजात रुजवले जातात; हे बुद्धीमंतांना कळलेच नसतील तर त्यांची बुद्धी कुठले शेण खायला गेली होती? मोहन भागवत यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांसमोरचे बंदिस्त भाषण माध्यमांनी मुद्दाम समोर आणून त्यातला नसलेल्या धोक्याबद्दल आवई अफ़वा पसरवायच्या आणि ज्या गाण्यातून मुली महिलांवर अधिकार गाजवण्याची प्रेरणा खुलेआम दिली जाते, त्याबद्दल झोपा काढायच्या असतात काय? सर्वत्र वाजणारे व गाजणारे ते गाणे बुद्धीमंतांना ऐकूच आले नव्हते, की त्यांच्या बुद्धीबरोबरच कानही बधीर होऊन गेलेले आहेत?
तू मला होकार दे नाहीतर नकार दे, तू माझीच आहेस; अशा अर्थाच्या त्या ओळी सक्ती व जबरदस्ती शिकवणार्या आहेत. तेवढेच नाही त्याच्याही पुढे जाऊन तो म्हणतो, ‘तू दुसर्या कुणाची होऊ नकोस, मी वेडा असून काहीही करून बसेन’. काहीही करून बसेन म्हणजे काय? तर तुझ्या आयुष्याचा नरक करून टाकीन. आणि त्या चित्रपटात शाहरुख तसे करताना दाखवला आहे. ते गाणे आणि त्याला सुसंगत अशीच चित्रकथा एकतर्फ़ी प्रेमात पडलेल्या प्रत्येक तरूणासाठी जणू वस्तुपाठच होता. जी मुलगी आपण मनापासून प्रेम करीत असून प्रतिसाद वा होकार देत नसेल; तर काय करायचे, त्याचे प्रात्यक्षिकच त्यात दिलेले होते. त्याचे गांभिर्य कोणी दाखवून द्यायचे असते? पत्रकारांनीच ना? पण तसे कधीच होत नाही. ज्या बुद्धीवादी व विचारवंत वर्गाने ही जबबदारी घेतलेली असते किंवा तो तसे भासवत असतो. तो नेहमी अशा खर्या धोक्यावरून तुमचे आमचे लक्ष उडवण्याचेच काम करत असतो. थोडक्यात जनतेला गाफ़ील ठेवून लांडगा आलारे आला; अशा अफ़वांकडे लोकांचे लक्ष वेधण्याचे पाप बुद्धीजिवी करतात. आणि हे नेहमीच चालते. आजही तेच चालू आहे. गेला आठ्वडाभर खाजगी बोलण्यातून हैद्राबाद येथील अकबरुद्दीन ओवायसी याच्या चिथावणीखोर भाषणाची चर्चा चालू आहे. पण त्याबद्दल अवाक्षर बोलायचे माध्यमातील मुखंडांनी टाळले. उलट त्याच्यावरून लोकांचे लक्ष उडवण्यासाठी वा तिकडे लोकांचे लक्ष जाऊच नये; म्हणून मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणाची तोडमोड करून वडाची साल पिंपळाला लावण्याचा उद्योग जोरात चालविला होता. भागवत यांनी पाश्चात्य देशात व संस्कृतीमध्ये विवाहाच्या पद्धतीचे जे विश्लेषण केले, ते उचलून भारतील समाजावरील विधान म्हणून दाखवण्याचा धडधडीत खोटारडेपणा वाहिन्यांसह तमाम माध्यमे करीत होती. भागवत जे बोललेच नाहीत, त्यावर प्रतिक्रिया घेतल्या जात होत्या आणि त्यांच्या निषेधाचा धुमाकुळ चालू होता. सुदैवाने काही समजूतदार मान्यवर व्यक्ती समाजात अजून आहेत, त्यांनी माध्यामंच्या या राजरोस भामटेगिरीचा मुखवटा फ़ाडला.
मधू किश्वर या महिला इंग्रजी व हिंदीत पत्रकारिता करतात. त्या पक्क्या सेक्युलर, पण स्वतंत्र वृत्तीच्या महिला आहेत. त्यांनी आजवर भाजपा व संघ यांच्यावर अत्यंत कठोर टिका केलेली आहे. पण भागवत यांच्या विधानावर त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्यांनी भागवतांचे संपुर्ण भाषण ऐकायची आधी मागणी केली. तेव्हा वाहिन्यांच्या संपादकांनी पळ काढला. दुसर्या विदुषी आहेत दिल्लीच्या माजी पोलिस आयुक्त किरण बेदी. त्यांनी शेवटी युट्युबवर जाऊन भागवतांचे संपुर्ण भाषण ऐकले; तेव्हा त्यांना वाहिन्यांसह माध्यमांची बदमाशी लक्षात आली. भागवत पाश्चात्य देशातील विवाह संबंधावर बोलले, तेच त्याचे भारतीय विवाहासंबंधी मत असल्याचे भासवून वाहिन्या व वृत्तपत्रे, लोकांची अक्षरश: दिशाभूल करत होत्या. पण या दोघींनी तो खोटेपणा तिथेच सोडून न देता, त्याचा मुखवटा सोशल माध्यमातून म्हणजे ट्विटर व इंटरनेटच्या माध्यमातून फ़ाडला. भागवत यांच्यावर टिका वा अन्याय बाजूला ठेवा. पण त्यापेक्षा मुद्दा खुप वेगळा आहे आणि तो घातक आहे. खर्या धोक्यापासून लोकांना गाफ़ील ठेवण्यासाठी अशी दिशाभूल चालू असेल; तर ते देशाला अत्यंत घातक आहे. याच काळात हैद्राबादचा मुस्लिम आमदार अकबरुद्दीन ओवायसी याने चिथावणीखोर भाषण केले होते. पंधरा मिनिटासाठी पोलिस बाजूला करा, पंचविस कोटी मुस्लिम शंभर कोटी हिंदूंची कत्तल करतील; असे त्याचे दंगलीला आमंत्रण देणारे विधान होते. पण त्यावर पोलिस कारवाईची मागणी (जशी भाजपाच्या वरूण गांधीबाबत करण्यात माध्यमांनी पुढाकार घेतला होता) तसे इथे घडले नाही. उलट ओवायसीला झाकण्यासाठी भागवत जे बोललेच नाहीत, त्यावर काहूर माजवण्यात आले. अन्यथा माध्यमांच्या मौनाचे दुसरे काय कारण असू शकते?
आपल्या मराठी भाषेत यालाच साप साप म्हणून भूई धोपटणे म्हणतात. ज्यात कुठला धोका संभवत नाही, त्यावर काहूर माजवायचे. आणि जिथे खरा धोका आहे, त्यावरून लोकांचे लक्ष उडवायचे. हल्ली माध्यमात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक त्यासाठीच करण्यात आली आहे. जे लोकशिक्षणाचे माध्यम होते, त्यालाच लोकांची दिशाभूल करण्याचे माध्यम बनवण्यात आले आहे. त्यासाठी चतुरम लबाड व धुर्त बुद्धीमंतांना कामाला जुंपण्यात आले आहे. त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा वापर करून आधी खोटी राई असल्याचा आभास निर्माण केला जातो आणि मग त्याच राईचा पर्वत केला जातो. याच खोटेपणात गुंतलेल्यांना मग खरे समोर दिसले तरी भिती वाटू लागते. रोगराईच्या जंतूंना किटकनाशकांचे भय वाटावे तशी आजकाल बुद्धीवादी वर्गाला सत्याची भिती वाटु लागली आहे. वीस वर्षापुर्वी माध्यमे इतकी फ़ैलावली नव्हती. त्यांचा पसाराही मोठा नव्हता. पण त्यांच्या बौद्धीक र्हासाची सुरूवात तेव्हापासूनच झाली होती. म्हणून तर एका लोकप्रिय चित्रपटातून व गीतामधून थेट महिलांच्या स्वातंत्र्यच नव्हेतर जगण्यावरही हिंसक आक्रमण करण्याच्या खुल्या आव्हानाचा धोका त्यांना दिसू शकला नाही. आणि दिसला असेल तर त्यांनी जाणीवपुर्वक समाजाला अंधारात ठेवण्यातच धन्यता मानली होती. त्या पापाचीच फ़ळे आज समाजाला भोगावी लागत आहेत. एका बाजूला राजरोस खोटेपणा प्रतिष्टीत झाला आणि दुसरीकडे महिलांच्या आयुष्यातली सुरक्षितता पुरती रसातळाला गेली आहे. आम्ही शाहरुखला डोक्यावर घेतले तर किरणचे जीवन निर्भया, दामिनीसारखा नरक होणारच ना? ( क्रमश:)
भाग ( ५० ) ८/१/१३
नेहेमी प्रमाणेच उत्कृष्ट लेख. या देशातील तथाकथित बुद्धिवंतांनी व प्रसार माध्यमांनी - निधर्मीवाद, उदार मतवाद व अहिंसा - यांच्या नावाखाली गेले काही वर्षे जो धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे देश व समाज दिशाहीन झाला आहे. त्यातच टी व्ही वरील मालिकांचा रतीब व रियालिटी शोज मुळे समाजाला बुद्धीमांद्य येउन सर्वांच्या जाणीवा बोथट झाल्या आहेत.
उत्तर द्याहटवाप्रसार माध्यमांचे व तथाकथित बुद्धीवंतांचे सत्य उघड करून, आपण उत्तम सामाजिक काम करीत आहात, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आपल्यासारखे काही इतर पत्रकार अशी देश सेवा करीत आहात.
फक्त हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.