मंगळवार, १५ जानेवारी, २०१३

सेक्युलर खोटेपणा आणि दांभिकपणाचा पर्दाफ़ाश


  माझ्या लिखाणातून नेहमी सेक्युलर व बुद्धीमंत यांच्यावर कडवी टिका असते. त्याचे कारण मला दांभिकतेचा खुप राग येतो. आणि आपल्या देशात हल्ली सेक्युलर असणे म्हणजे अंगात पुरेपुर खोटेपणा व दांभिकता भिनलेली असावीच लागते. त्याचे अनुभव अधुनमधून येतच असतात. मागे मी एका लेखात ‘मशाल’ सिनेमातील दिलीपकुमारचे अमरीश पुरी या खलनायकाला उद्देशून बोललेले वाक्य सांगितले होते. सामान्य गुन्हेगार निर्बुद्ध असतो. म्हणूनच त्याचा समाजाला फ़ारसा धोका नसतो. पण बुद्धीमान माणसाने गुन्हेगारी पत्करली; तर मात्र समाजाचा र्‍हास झालाच म्हणून समजा. कारण तो आपली कुशाग्र बुद्धी विनाशक व विध्वंसक दिशेने कामाला लावत असतो. आपले सेक्युलर बुद्धीमंत बहुतांश त्याच मार्गाला लागलेले आहेत. ते बेधडक खोटेपणा करू शकतात आणि दांभिकता हा तर त्यांच्या स्थायीभाव बनून बसला आहे. कुठल्याही बुवा-भगताला लाजवील इतका बेशरमपणा या सेक्युलर शहाण्यांमध्ये आढळून येतो. त्याचा अनुभव मला अनेक वर्षापासूनचा आहे. म्हणूनच कधीकधी अशा भंपक भोंदूंचे बुरखे फ़ाडणे अगत्याचे होऊन जाते. कालपरवा कोकणात चिपळू्ण येथे जे मराठी साहित्य संमेलन झाले; त्या निमित्ताने त्याच सेक्युलर दांभिकतेचे मोठेच प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्याकडे मी दुर्लक्षच केले होते. पण अतिरेक झाला, मग हस्तक्षेप करावा लागतो. म्हणून त्या संबंधात मी फ़ेसबुकवर एक प्रतिक्रिया टाकलेली होती. पण शक्य असूनही ‘पुण्यनगरी’मध्ये लिहायचे टाळले होते. पण तिथेही काही भोंदू भेटलेच. त्यांना खोटेपणा करायची खुमखुमी आली. पण खोटेपणाचे एक वैशिष्ट्य असते. मुद्दे नसले, मग ते फ़ाटे फ़ोडले जातात आणि तरीही खोटे पडायची वेळ आली; मग आपण खालच्या पातळीवर उतरत नाही’ म्हणून पळ काढतात. आपले लंघडेपण लपवायला उच्च पातळीवर आल्याचे नाटक कसे रंगवले जाते, त्याचा उत्तम दाखला म्हणून या वादाकडे बघता येईल.

   चिपळूणच्या साहित्य संमेलनात दोन वाद उफ़ाळून आलेले होते. एक होता परशूरामाच्या उल्लेख व गौरवाचा. तो संभाजी ब्रिगेडने काढला होता. त्याबाबतीत उहापोह होऊन संयोजकांनी माघार घेतली व परशूरामाचे चित्र मागे घेण्यात आले. दुसरा बाद तसा फ़ारसा रंगला नाही. पण ज्यांना गरळ ओकायची होती; त्यांनी हे निमित्त साधून आपला पोटशूळ मोकळा करून घेतला. संमेलनाच्या व्यासपीठाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावरून झालेला हा वाद होता. त्याची फ़ारशी दखल कोणी घेतली नाही. पण स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणारे जे मूठभर लोक माध्यमात मोक्याच्या जागा अडवून बसले आहेत; त्यांनी शिळ्या कढीला ऊत आणायची संधी साधून घेतली. त्यात पुष्पा भावे व प्रज्ञा पवार या दोन महिला पुढे होत्या. साहित्यिकांचा अवमान करणार्‍या ठाकरे यांचे नाव संमेलनाच्या व्यासपीठाला देऊ नये; म्हणुन त्यांनी निषेधात्मक भूमिका जाहिर केली होती. यातल्या पुष्पा भावे यांना साहित्यिक वा त्यांचे व्यवहार; याच्याशी काहीचे कर्तव्य कधीच नसते व नव्हते. ठाकरेद्वेष हा त्यांचा आवडता छंद आहे. त्यासाठीच त्या तिथे घुसल्या होत्या. मुंबईच्या संमेलनात तेरा वर्षापुर्वी त्यांनी असाच तमाशा मांडला होता. त्यानंतरच्या संमेलनात कुठे ठाकरे हा उल्लेख नसल्याने भाव्यांचे नाव कुठे ऐकू आले नाही. आता अचानक इतक्या वर्षांनी त्या उपटल्या आणि विरोधाची भाषा बोलू लागल्या. त्यांच्या सोबत दिवंगत दया पवारांच्या कन्या प्रज्ञा पवार यांना बघून मला थोडे आश्चर्य वाटले. कारण त्यांच्या वैयक्तीक जीवनातील एक (शिवसेनेच्या सरकार संबंधातील) घटना मला ठाऊक होती आणि ती प्रसिद्ध दलित साहित्यिक नामदेव ढसाळ यांनी जाहिरपणे लिहिलेली होती. म्हणूनच पुष्पा भावेंसोबत प्रज्ञा पवार यांनी ठाकरे विरोधात शड्डू ठोकलेला बघून नवल वाटले. तरी मी त्याबद्दल लिहायचे टाळले होते. पण माझ्याच एका समाजवादी सेक्युलर मित्राला तो किस्सा सांगितल्यावर; त्याला भयंकर संताप आला. त्यानेच खुप आग्रह केला म्हणून मी तो किस्सा माझ्या फ़ेसबुक खात्यावर लिहिला. तो जसाच्या तसा वाचकांनीव वाचावा, म्हणजे त्यांना स्वत:चे मत बनवणे सोपे होईल. बाळासाहेब ठाकरे वा शिवसेना यांच्याबद्दल अनेक आक्षेप वा आरोप होऊ शकतात, पण मरणोत्तर त्यांच्या नावाला आक्षेप घेणारे किती संभ्य वा असंस्कृत आहेत; त्याचा निवाडा प्रत्येकाने स्वत:शीच करावा. त्यावरून झालेल्या वादाचे तपशील मी पुढे देईनच. तो फ़ेसबुकवरील माझा छोटेखानी लेख पुढीलप्रमाणे होता.

   पद्मश्री पुरस्कार मिळवलेले कवी व दलित पॅन्थरचे संस्थापक नेते नामदेव ढसाळ, दैनिक ‘सामना’मध्ये ‘समष्टीसाठी सर्वकाही’ असे साप्ताहिक सदर दिर्घकाळ लिहित होते. त्यात त्यांनी आपण शिवसेनेकडे कशामुळे आलो; त्याचा अनुभव लिहिलेला आठवतो. त्यांचेच समकालीन दलित लेखक व फ़ोर्ड फ़ाऊंडेशन पुरस्कार मिळवलेले व त्याच पुरस्कारामुळे ग्रंथाली या प्रकाशन संस्थेला (बलुतं) प्रतिष्ठा मिळवून देणारे दया पवार; एका सेमिनार निमित्त दिल्लीला असगर अली इंजिनीयर यांच्या सोबत गेलेले होते. तिथे समारंभातच त्यांना हृदय विकाराचा झटका आला. मग त्यांना इस्पितळात दाखल करून इंजिनीयर निघून गेले. पवारांचे त्यातच प्राणोत्क्रमण झाले होते आणि त्यांचे शव दिल्लीच्या अनोळखी शहरात बेवारस पडून होते. त्याचे करायचे काय याची तारांबळ त्यांच्या मुंबईतील कुटुंबात उडाली होती. काहीच साधेना तेव्हा त्यांच्या कन्येने आपल्याशी संपर्क साधला; असे नामदेव यांनी त्यात लिहिले होते. सतत सेक्युलर पुरोगामी चळवळीत वावरलेल्या ढसाळांनी मग दिल्लीत वास्तव्य करणार्‍या माजी अर्थमंत्री मधू दंडवते यांच्याशी संपर्क साधून पवारांचा मृतदेह मुंबईस आणण्यासंबंधी खटपट करायची विनंती केली. पण त्यांनी शक्य नसल्याचे सांगत झटकून टाकले. नामदेवनी अनेक ठिकाणी आपल्या पुरोगामी ओळखी काढून प्रयास केले. पण सगळे वाया गेले. अखेरचा प्रयत्न म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. त्याने फ़क्त इस्पितळ कुठले तेवढे विचारले आणि सरकारी यंत्रणा कामाला लावली. दिल्लीतल्या महाराष्ट्राच्या आयुक्ताला सूचना दिल्या आणि मुंबईतून राज्य सरकारच्या मालकीचे विमान एका मंत्र्यासह दिल्लीला पाठवून दिले. त्यातून दया पवारांचे शव मुंबईस पोहोचले

   योगायोग असा, की तेव्हा विमानतळावर ग्रंथालीचे म्होरके दिनकर गांगल व कुमार केतकर आदी मंडळी उपस्थित होती. पण ते पवारांचा मृतदेह स्विकारण्यासाठी आलेली नव्हती. तर शिकागो येथे लता मंगेशकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा जंगी कार्यक्रम योजला होता. त्यासाठी अमेरिकेला जायला ग्रंथालीकर विमानतळावर आलेले होते. नामदेवने त्यांना मृतदेहाचे दर्शन घेण्याची विनंती केली; तर फ़्लाईट चुकेल म्हणून त्यांनी नकार दिला. याच पवारांच्या ‘बलुतं’मुळे ‘ग्रंथालीचे प्रथम नाव झाले होते. पण त्या पुरोगामी संस्थेच्या म्होरक्यांना दया पवारचे अखेरचे दर्शन घेण्यापेक्षा अमेरिकेला जाणारी फ़्लाईट मोलाची वाटली. असो, मुद्दा इतकाच, की त्या मुख्यमंत्र्याचे नाव आहे मनोहरपंत जोशी आणि तो जातियवादी शिवसेना भाजपाच्या युती सरकारचा मुख्यमंत्री होता. दया पवारांचे शव मुंबईत घेऊन येण्यासाठी दिल्लीला रवाना झालेल्या मंत्र्याचे नाव होते रविंद्र माने, तोही शिवसेनेचा जातियवादीच होता. ज्यांना आयुष्यभर प्रतिगामी व जातीयवादी म्हणून हिणवले, विरोध केला, ते कसोटीच्या प्रसंगी धावून आले आणि ज्यांच्या नादाला लागून पुरोगामी दांभिकपणाची पालखी आयुष्यभर उचलली, त्यांनी दगा दिला; याबद्दलचा पश्चात्ताप नामदेवने त्या लेखामधून व्यक्त केलेला आठवतो. परवा चिपळूणच्या साहित्य संमेलनात शिवसेनाप्रमुखांचे नाव व्यासपीठाला देण्यात विरोध करणार्‍यांमध्ये दया पवारांची कन्या प्रज्ञा पवार आघाडीवर होती, हे बघितले आणि ती आठवण जागी झाली. 

   शिवसेनाप्रमुख वा त्यांच्या विचारांनी कुठली संस्कृती जपली, जोपासली; असे विचारले गेले आणि जात असते. त्याचे उत्तर इथे आलेले आहे. कारण पुरोगामित्वाचे चटके बसलेला व जातियवादी मायेची फ़ुंकर अंगावर घेतलेल्या नामदेव ढसाळनेच ती आठवण सांगितलेली आहे. मधू दंडवते माजी अर्थमंत्री असून त्यांनी हात झटकले तरी ते सुसंस्कृत असतात. पण ज्यांच्या शिव्याच खाल्ल्या तरी साहित्यिक म्हणून त्यांचा सन्मान करते, ती शिवसेना व तिचा प्रमुख मात्र असंस्कृत असतो. काय व्याख्या असते या संस्कृतीची? व्यक्तीगत द्वेषाला तत्वज्ञानाचा मुलामा फ़ासण्यला संस्कृती म्हणतात का?   ( क्रमश:)
भाग   ( ५७)    १६/१/१३

६ टिप्पण्या:

  1. हा कुमार केतकर नावाचा 'पत्रकार' हा कॉंग्रेस पक्षाचा एक अघोषित प्रवक्ताच आहे माझी स्पष्ट धारणा आहे. २००० साली एकदा नाशिकच्या पंचवटीतील पंडित पलुस्कर हॉल मध्ये आमच्या एका कॉंग्रेस नगरसेवकाने त्याचे व्याख्यान आयोजित केले होते, त्यावेळी कॉंग्रेस सरकारचे आर्थिक धोरण, ग्लोबलायझेशन, मनमोहनसिंग चे अर्थव्यवस्थेचे चमत्कार, सोनिया गांधींचे भारतीयत्व, गांधी घराण्याचे देशावरचे उपकार वगैरे विषयावर अत्यंत 'अभ्यासपूर्ण' असे निरुपण त्यांनी दिल्याचे मला शब्द न शब्द आठवते. त्यावेळी मला हाच प्रश्न पडला होता कि हा मनुष्य तर विद्वान दिसतोय मग ह्याने इतके धांदात खोटे, विकासाचे इतके कपोल-कल्पित भारुड का सांगावे ? गावोगाव फिरून पक्षांचे नेते जसा केविलवाणा प्रचार करत असतात तसा ह्या पत्रकाराने का करावा? त्याच्या त्या भाषणात व आजही दिल्या जाणाऱ्या बाईट मध्ये एक गोष्ट मात्र कॉमन आहे ती म्हणजे वाजपेयी सरकारचा द्वेष ! कोंग्रेसच्या अखंड राजवटीत वाजपेयींचा सत्ताकाळ हाच देशाच्या सर्व दुर्दशेला कारणीभूत आहे हेच ह्या कुमार गोबेल्स घोषवाक्य आहे. भाऊंनी सांगितलेली सेक्युलर बुद्धिवंत बाजारबसवी म्हणजे कोण तर हे गोबेल्सचे बाप-जादे...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. daha takkyatala ghar milawun zale. aata rajya sabhecha khasdar mhanoon congress che ticket milawanya sathi he sagale udyog chalu aahet. ekda thanyatlya rahtya ghari tyachywar halla zala hota tenvha hech lok gale phodun radle hote.

      हटवा
  2. You have hit the nail on the head Bhau.Still our Secularists will abuse Balasaheb and Shivsena for their pervert thought process.

    उत्तर द्याहटवा
  3. manohar joshi, ravindra maane yaana salam. he sena pramukhanche sanskar aahet. congresi bujgaavni phakt krutaghna pana karu shaktat. mala aaschray pradnya pawar yaanche waatate. haa kissa facebook var pan maandava.

    उत्तर द्याहटवा