सोमवार, २१ जानेवारी, २०१३

दाभोळच्या नरेंद्रबापूंची दिव्य चमत्कार शक्ती


   दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर प्रतिक्रिया देताना अनेकांनी अकलेचे तारे तोडले. आसारामबापू आणि अनिरुद्धबापू यांनी तर कहरच केला. बलात्कारित तरुणीने सरस्वती मंत्राचा जप केला असता तर बलात्कार झालाच नसता, मी दिलेल्या एका विशिष्ट मंत्रामुळे बलात्कारी नपुंसक होतील, अशी या बुवाबापूंची विधानं म्हणजे निव्वळ भोंदूगिरीच नाही तर समाजाची दिशाभूल आहे. दिल्लीतील बलात्कार पीडित तरुणीच्या मृत्यूने सारा देश व्यथित झाला. संताप उसळला. पुन्हा असे घडू नये यासाठी अनेक उपाय सर्व समाजघटकांतून व स्तरांतून पुढे आले. मग कथित आध्यात्मिक गुरू तरी मागे कसे राहणार? आसारामबापू व अनिरुद्धबापू या दोघांनी सुचवलेले उपाय सर्वत्र गाजले. आसारामबापूंच्या मते घरी सरस्वती स्तोत्र म्हणून जर ती तरुणी बाहेर पडली असती, तर तिच्यावर बलात्कार होऊच शकला नसता. अत्याचार करणार्‍यांपैकी काही जणांना तुम्ही माझे भाऊ आहात, मला वाचवा, अशी मनधरणी तिने करावयास हवी होती. अनिरुद्धबापूंचे म्हणणे असे, की, जर स्त्रीने ‘अनिरुद्ध चालीसा’ रोज १०८ वेळा असे अकरा दिवस म्हटले तर बलात्काराचा प्रयत्न करणारी व्यक्ती आपोआप नपुंसक होईल व तसे सर्वाना कळेल. मुळात ‘अनिरुद्ध गुरुक्षेत्र’ मंत्राचा जप केला तर बलात्कार होऊच शकणार नाही. शिवाय त्यांच्या चंडिका गटाच्या व अहिल्या संघाच्या महिलांना ते असे टेक्निक शिकवणार आहेत की, बलात्कार करणार्‍याला त्या नपुंसक करतील. आसारामबापूंनी याही पुढे जाऊन एका हाताने टाळी वाजत नाही, असेही तारे तोडले. याबाबत टीका करणार्‍या माध्यमांना त्यांनी भुंकणा्र्‍या कुत्र्याची उपमा दिली.  ही बाबा मंडळी स्वत:मध्ये विलक्षण गुंतलेली असतात. त्यांची सर्व आखणी व्यक्तिमाहात्म्य वाढवणार्‍या तंत्राची असते. 

   हा सुरूवातीचा जो परिच्छेद आहे, तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व जनक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या साप्ताहिक लोकप्रभेच्या २५ जानेवारी २०१३ च्या अंकातल्या लेखाचाही आरंभ आहे. आज हा माझा लेख तुम्ही ‘पुण्यनगरी’मध्ये वाचत आहात त्या दिवशी तारिख आहे २२ जानेवारी २०१३. आहे की नाही चमत्कार? अजून जो अंक ‘लोकप्रभे’च्या तारखेनुसार प्रकाशीत व्हायला दोन दिवस बाकी आहेत, त्यातला दाभोळकरांचा लेख मी आधीच  वाचू शकतो, तुम्ही सुद्धा वाचू शकता. खरे तर त्याच्याही पुढल्या ‘लोकप्रभा’चा अंक आज उपलब्ध झालेला असेल. याला काय म्हणायचे सांगा? जो दिवसच अजून उजाडलेला नसतो, त्या दिवशी प्रकाशित होणारा अंक किंवा नियतकालिक काही दिवस अगोदर वाचणे; कुठल्या विज्ञानानुसार शक्य आहे? तुमच्या आयुष्यात उद्या किंवा चार तासांनी काय घडणार आहे; ते तुम्ही वा कोणी नक्की सांगू शकेल काय? पण दाभोळकर आणि त्यांचे सवंगडी हे भविष्य वर्तवू शकतात. नुसते वर्तवत नाहीत तर एक एक आठवडाभर आधी त्यांच्या मनातले व अंकातले वाचकांपर्यंत पोहोचू शकते. इतक्या पुढारलेल्या भविष्याची अनुभूती घडवणे केवळ आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानालाच शक्य आहे. जुनाट पंचांगाच्या आधारे पत्रिका बनवून, ग्रहदशा बघून भविष्याची भाकिते सांगणारे खुपच मागासलेले असणार ना? कारण असे ज्योतिषी वा भविष्यवेत्ते फ़क्त भाकितेच करतात. तुम्हाला थेट पाचसात दिवस पुढल्या दिवसात नेऊन, काय छापले जाणार आहे, त्याचा साक्षात्कार कधीच घडवू शकत नाहीत. मग मी दाभोळकरांना सर्वात श्रेष्ठ बापू वा बुवा म्हटले तर तो त्यांचा सन्मान आहे की अवमान आहे सांगा?

   असो. ही झाली दाभोळच्या नरेंद्र बापूंची कालचक्रात कुठूनही कुठेही जाऊन पोहोचण्याची अतर्क्य दिव्यशक्ती. त्यासाठी त्यांनी किती साधना केली असेल त्याचे गणितही आपल्यासारख्या सामान्यजनांना मांडता येणार नाही. तेव्हा त्या भानगडीत पडण्यापेक्षा त्या ‘लोक प्रभा’वित करणार्‍या आपल्या उपदेशात नरेंद्र बापू काय म्हणतात ते जरा समजून घेऊ. नरेंद्रबापू आरंभालाच म्हणतात, ‘दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर प्रतिक्रिया देताना अनेकांनी अकलेचे तारे तोडले.’ आता ज्यांनी कोणी तारे तोडले ते तारेच आहेत, हे ज्यांना नेमके कळले ते ग्रहातार्‍यांमध्ये वावरणारे असले पाहिजेत ना? कारण तुम्ही आम्ही सगळी सामान्य माणसे त्या बलात्कारानंतर संतप्त होऊन उठलो होतो. अगदी काहींनी पोलिसांवर दगडही मारले. पण कुठे तारे तुटून पडल्याचे आपल्या लक्षात आले नाही. तारे तुटून पडले वा कोणी तोडले असते; तर काही क्षण का होईना रस्त्यावर उतरलेले लाखो लोक निदर्शने विसरून त्या तार्‍यांचे दर्शन घ्यायला तिकडे वळले असते. पण लोक उपोषण, धरणी, सत्याग्रह, घोषणा वा हिंसाचार अशा विविध कार्यात मग्न होते. पण कोणाचेच तारे तोडले जाण्याकडे अजिबात लक्ष गेले नाही. म्हणजे हे लाखो लोक व अन्य त्यांची निदर्शने बघणारे लोक किंवा ते आपल्या कॅमेरामध्ये टिपून वाहिन्यावर प्रक्षेपित करणारे सर्वजण चक्क आंधळेच असले पाहिजेत. इतके तारे तोडले जात होते आणि कोणाचे म्हणून तिकडे लक्ष जाऊ नये हा आंधळेपणाचा पुरावाच नाही काय? तर असे कोणी कोणी तोडून फ़ेऊन दिलेले तारे नरेंद्र बापूंनी गोळा केले. कदाचित तुटणारे वा तोडलेले तारे दिसायला दिव्यदृष्टी लागत असावी; जी तुमच्या किंवा माझ्यापाशी नसावी. त्यामुळे तो नरेंद्र बापूंचा दोष मानता येणार नाही. उलट आपण त्यांचे आभार मानायला हवेत, की त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीचा सदूपयोग करून असे अनेकांनी चोरून तोडलेले तारे गोळा केले. नाही तर पर्यावरण किती बिघडले असते हो.

   कदाचित आपल्याला हे तोडलेले तारे दिसले नाहीत; याचे एक वेगळेच वैज्ञानिक कारण असू शकते. ते आताच तोडलेले नसतील; भविष्यात कधीतरी तोडले जाणारेही तारे असू शकतील. पण जसा आठ दिवस तारखेपुर्वीच ‘लोकप्रभा’ वाचायला आधीच उपलब्ध होतो, तसे भविष्यात तोडले जाणारे तारेही नरेंद्रबापूंना आधीच दिसू शकत असतील, तुटून खाली पडताना गोळाही करता येत असतील. दिव्यशक्ती आत्मसात केलेल्या विज्ञाननिष्ठांना काय अशक्य आहे? तेव्हा दिल्लीच्या सामुहिक बलात्कारानंतर अनेकांनी अकलेचे तारे तोडले; हे नरेंद्र बापूंचे विधान आपण निमूटपणे मान्य केले पाहिजे. अकलेचे तारे असतात काय व कसे; असले अंधश्रद्धेचे सवाल बापूंना विचारायची आपली लायकी नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मग असले भोळसट सवाल आपल्या मनात येणार सुद्धा नाहीत. आपली विज्ञानावर संपुर्ण निष्ठा असली पाहिजे आणि ते काम फ़ार अवघड नाही. आपण दाभो्ळच्या नरेंद्र बापूंवर नि:शंक विश्वास ठेवला, मग विज्ञानाविषयी आपल्या मनात असले कुठले विचलित करणारे प्रश्नच निर्माण होणार नाहीत. थोडक्यात अकलेला तारे असतात व तोडले जातात आणि नरेंद्र बापूंना ते दिसू शकतात, एवढे मान्य केले, की झालो आपण विज्ञाननिष्ठ. किती सोपे काम आहे ना? अन्य कुणा बापू बुवाप्रमाणे बिल्ले, टोप्या वगैरे खरेदीसाठी पदरमोड करण्याचे कारण नाही. डोळे मिटायचे व नरेंद्र बापूंचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा, की आठ दिवस नंतर येणारा ‘लोकप्रभा’ दिसू लागतो आणि तोडलेले तारे दिसू लागतात. आपल्या विज्ञाननिष्ठेला इतका बहर येतो, की अन्य कुठल्या बापू वा बुवाने कितीही कहर केला तरी आपले चित्त विचलित होण्याचे भय नाही.

   म्हणून असेल कदाचित दाभोळकरांना व त्यांच्या अनेक सहकारी मित्रांना कधीपासून त्यांचेच नामबंधू गुजरातचे मोदी नरेंद्र पंतप्रधान होणार याची भिती वाटू लागली आहे. अजून मोदींनी स्वत: तशी इच्छाही व्यक्त केलेली नाही. पण जे कोणी दाभोळच्या बापूंचे भक्त अनुयायी आहेत, ते मात्र हा दुसरा नरेंद्र शिरजोर होण्याच्या भयगंडाने व्यथित होत आहेत. त्याला रोखण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरले आहेत. त्यासाठी दिव्यदृष्टी लागते. खुद्द नरेंद्र मोदी वा त्यांच्या भाजपा पक्षालाही ते पंतप्रधान होऊ शकतील याची माहिती नाही. पण नरेंद्रबापूंचे तमाम अनुयायी चिंतेत आहेत. आणि खुद्द नरेंद्र बापू मात्र अनिरुद्ध वा आसाराम अशा इतर बापूंनी तोडलेले तारे गोळा करण्यात गर्क आहेत. आपला विज्ञानाचा मंत्र सोडून लोक अन्य बापूंच्या मंत्राच्या आहारी जाण्याच्या भयाने दाभोळचे बापू अस्वस्थ झालेले आहेत. की त्यांना त्यांच्या दिव्य दृष्टीने लोक बापू मंडळींच्या आहारी गेल्याचे आधीच दिसले असावे? तसे नसते तर त्यांनी (तारे गोळा करायचे कार्य अर्धवट सोडून) इतका मोठा लेख लेख लिहिण्यात कशाला वेळ दवडला असता? इतर जे बापू आहेत त्यांनी जे मंत्र तंत्र सांगितले ते निकामी व निरूपयोगी असल्याचे सांगण्यासाठी दाभोळकरांनी इतका वेळ खर्ची घातला; तर काय करावे, त्याचाही उपदेश जरा करायचे कष्ट घेतले असते तर बरे झाले असते. कारण त्या बापूंनी काय उपाय सांगितले वा सांगतात, त्यानुसार त्यांचे भक्तही कधी चालत नाहीत. पण दाभोळच्या नरेंद्र बापूंनी जे उपाय व पर्याय आजवर सांगितले आहेत, त्याचाच लोक अवलंब करतात आणि तरीही बलात्कार होतच आहेत. मग आपण आजवर जे तारे तोडले होते, ते गोळा करून त्याविषयी दाभोळकरांनी लोकांचे प्रबोधन करायला काय हरकत होती? बलात्कारापासून सुरक्षित रहाण्याचा दाभोळच्या या नरेंद्र बापूंचा उपाय व मंत्र कुठला आहे? तो वापरूनही महिला बलात्काराच्या शिकार का होतात, ते उद्या बघू.   ( क्रमश:)
 भाग   ( ६३)    २२/१/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा