मंगळवार, १ जानेवारी, २०१३

पुण्याची रिदा शेख कशाचा बळी झाली आठवते?   ‘लोकशाही व्यवस्थेत कोणत्याही लोकसमुहाच्या, जाती समुहाच्या अपेक्षा पुर्‍या होत नाहीत. त्या पु्र्‍या  व्हाव्यात म्हणून अनेक राजकीय पक्षांचा जन्म होतो. भारतासारख्या अठरापगड जातीधर्म असलेल्या देशात वाढता मध्यमवर्ग आणि त्यातील नवमध्यमवर्ग हा नेहमीच टीकेचा विषय राहिलेला आहे. त्याचे कारण या वर्गामध्ये वाढत असलेला आत्मकेंद्रीपणा, स्वार्थ. या वर्गाला राजकीय प्रक्रियेशी देणेघेणे नसते. त्यांना आपल्यापेक्षा खालच्या स्तरातील समाजाच्या उन्नतीविषयी कोणतीही संवेदनशीलता नसते किंवा या वर्गाच्या प्रगतीसाठी तो रस्त्यावर येऊन व्यवस्थेशी लढा देत नाही. आर्थिक सुबत्तेमुळे हा वर्ग दिवसेंदिवस माजोरी होत चालला आहे. त्याला झटपट निर्णय हवे आहेत. त्याला लोकशाहीपेक्षा हुकुमशाहीचे अप्रुप अधिक वाटते. त्यामुळे त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांविषयी, लोकशाहीविषयी, धर्मनिरपेक्षतेविषयी घृणा आहे. या वर्गाला कायद्याचे राज्य कागदावर मान्य आहे पण रस्त्यावर येऊन हिंसाचार करून सत्तेला आव्हान देण्यात यांना शूरत्व वाटते. या वर्गाने हा देश स्वतंत्र झाल्यापासून दुसर्‍या क्रांतीचे स्वप्न पाहिले. कारण सत्तेच्या वाटेकर्‍यात त्यांना स्थान नव्हते. या वर्गाला आलेली सुबत्ता हिंदुत्त्व वा राममंदिराच्या उदघोषाने नव्हे तर देशाने स्वीकारलेल्या उदारीकरण नावाच्या आर्थिक धोरणांमुळे आली आहे. देशात कम्प्युटर, मोबाइल आणण्याच्या क्रांतीकारी निर्णयामुळे आली आहे. तरीही या वर्गाचे क्रांतीचे दिवास्वप्न आजही पुरे झालेले नाही. दोन वर्षे देशात केजरीवाल आणि अण्णा यांनी अराजकतेचा व्हायरस जन्माला घातला. या व्हायरसमुळे निर्माण होत असलेली अस्थिरता आता आपण अनुभवत आहोत. देशाची प्रकृती आता दिवसेंदिवस लेचिपेची होत आहे. देशाला चार दिवस शांततेत गेले की ताप येतो. हा ताप केव्हा थांबेल हे सांगता येणार नाही पण या तापाच्या माध्यमातून इतर जातीयवादी व्हायरस समाजात पद्धतशीर घुसत चालले आहेत हे महत्त्वाचे आहे. दिल्लीतील गँगरेपची घटना निश्चितच निंदनीय होती. पण त्यासाठी राष्ट्रपतीभवनावर जाऊन हिंसात्मक पद्धतीने आंदोलने करण्यात काहीच अर्थ नव्हता.’  

‘भरकटलेले दुसरे आंदोलन!’ अशा शिर्षकाचा अग्रलेख सुजय शास्त्री नावाच्या पत्रकाराने ‘दिव्य मराठी’ या दैनिकात लिहिला आहे. त्यातला हा उतारा आहे. हे कमीअधिक प्रमाणात आजच्या माध्यमांचे निदान आहे. यातून समजू शकते, की लोकांना संताप येतो किंवा न्यायामुळे लोक चिडतात; या साध्या मानवी विकाराचा अशा पत्रकार विद्वानांना पुरता विसर पडला आहे. त्यांच्या लेखी किडामुंगी आणि शेळ्याबकर्‍या यांच्यापेक्षा लोकशाहीतील जनतेला अधिक कुठल्या भावना असता कामा नयेत. म्हणजे असे, की ठिक आहे बलात्कार झाला, सामुहिक बलात्कार झाला किंवा एखाद्या मुली, महिलेचा मुडदा पाडला गेला असेल. तर त्याबद्दल किती गोंधळ घालायचा? सरकारने घडल्या प्रकाराची दखल घेतली ना? मग आता घरोघर जाऊन लोकांनी नित्यकर्माला लागावे. तात्काळ न्याय वगैरे कुठली भाषा झाली? अशी आपण कोणाकडून अपेक्षा करू शकतो? शेळ्याबकर्‍या असतात, त्यांचे पालन करणारा मेंढपाळ किंवा पशुपालक; लांडगा आला वा त्याने हल्ला केला, एखादी शेळी पळवून नेली, मग ओरडा करतो. त्यात तो गमावलेल्या शेळीपेक्षा उरलेल्या बकर्‍यांचे संरक्षण करत असतो. त्यावर त्या कळपातल्या शेळ्याबकर्‍या कधी तक्रार करत नाहीत. मालकाने हाकलले, की गुपचुप पुढल्या कुरणात चरायला लागतात. आधी त्या शिकार झालेल्या शेळीला न्याय द्या किंवा सोडवून आणा आणि त्या लांडग्याचा बंदोबस्त करा; असा हट्ट करीत नाहीत. निमुटपणे आपले चरण्याचे व पैदाशीचे काम सुरू करतात. तशीच भारताच्या नागरिकांकडून या पत्रकारांची अपेक्षा आहे काय? नसेल तर त्यांना लोक कुठल्या प्रक्षोभाने रस्त्यावर उतरले व ठिय्या देऊन बसले आहेत, ते उमजत का नाही? त्यांना त्यात तमाशा कशाला दिसतो? त्या आग्रहात चुक काय वाटते? आपण लोकशाहीत रहातो व तिथे प्रत्येक नागरिकाला सुरक्षेची हमी देणारा कायदा आहे आणि जे नागरिक आहेत ते किडामुंगी नसून त्यांनाही रागलोभ, आग्रह, इच्छा आहेत याचे भान पत्रकार संपादक मंडळींना उरलेले नाही काय? अन्यथा त्यांना यात अराजक कुठले दिसते आहे? कसल्या व्हायरसबद्दल हा मुर्ख संपादक बोलतो व लिहितो आहे?

   लोक न्याय मागतात व अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवतात, त्यात यांना रोगराई दिसते, ही किती विकृतबुद्धी आहे ना? एखाद्या मोठ्या स्पेश्यालिस्ट डॉक्टरच्या अभिनिवेशामध्ये या मुर्खाने केलेले निदान व मिमांसा पाहिल्यावर मला पुण्यात हकनाक जीवाला मुकलेल्या रिदा शेखची आठवण झाली. ही मुलगी आता किती लोकांना आठवेल त्याची शंकाच आहे. पण मला आठवते, कारण ती साडेतीन वर्षापुर्वी भारतातला पहिला स्वाईन फ़्लूचा बळी म्हणून ती इतिहासात नोंदली गेली आहे. मात्र वास्तव भलतेच आहे. तिचा बळी जरी स्वाईन फ़्लूने घेतला असला, तरी प्रत्यक्षात तिला स्वाईन फ़्लूच्या कराल दाढेत ढकाल्ण्याचे पाप अत्यंत हुशार व उच्चशिक्षित डॉक्टर्सनीच केले होते. ती या जाणकार डॉक्टर्सच्या अज्ञानाचा बळी होती. कारण तिला स्वाईनफ़्लू झालेला होता. पण ज्यांच्याकडून तिच्यावर उपचार चालू होते, त्या शहाण्यांना स्वाईनफ़्लू नावाचा आजार ठाऊकच नव्हता. तिला झालेले दुखणे या डॉक्टर्सना न्युमोनियासारखे वाटल्याने वा दिसणारी लक्षणे न्युमोनियासमान असल्याने बिनदिक्कत हे डॉक्टर्स तिच्यावर न्युमोनियाचे उपचार करीत राहिले. त्यांच्या उपचारांना प्रतिसाद मिळत नसतानाही किंवा त्याचे अपायच दिसत असतांनाही; त्यांनी आपला हट्ट चालूच ठेवला होता. परिणामी रि्दा शेखला मात्र आपले प्राण गमवाले लागले होते. दिल्लीत चालू आलेले आंदोलन, त्यासाठी जमलेली गर्दी किंवा त्यावरचे फ़सलेले सर्व सरकारी उपाय बघितले; तेव्हा मला रिदाची आठवण आली. कारण तिच्यावरील चुकीच्या उपचाराप्रमाणेच इथेही चालू आहे. समोरच्या विषयाचे किंवा दुखण्याचे योग्य निदानच झाले नाही तर औषधे व उपचार चुकीचे होतात. असे चुकीचे उपाय अधिक घातक व अपायकारक असतात. दिल्लीतील सामुहिक बलात्कारानंतर लोक रस्त्यावर उतरले व इतके हट्टी का झालेत, त्याचे योग्य निदान व मिमांसाच झालेली नाही. नेहमीच्या समस्यांचेच निकष लावून त्याचे निदान व उपाय चालू आहेत. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी म्हणजे अपवादात्मक आहे. आणि म्हणूनच अशा नव्या स्वाईनफ़्लूची लक्षणे शोधावी व मगच त्यावर उपाय शोधून ते अंमलात आणावे लागतील.

   उपरोक्त अग्रलेखातील भाषेत हा इसम त्या आंदोलनाला व्हायरस म्हणतो आहे, पण तो व्हायरस नेहमीसारखा नाही, हे त्याला उमगलेले नाही. नवा व्हायरस येतो, तेव्हा त्याच्यावर जुन्या व्हायरसवरील औषधांची मात्रा चालत नाही, ही सुद्धा अक्कल नसलेल्याने व्हायरस हा शब्द वापरावा काय? व्हायरस म्हणजे काय त्याचाच पत्ता नाही, आणि चालले वैज्ञानिक भाषेत पांडीत्य सांगायला. मग स्वाईन फ़्लूला न्युमोनिया ठरवून चुकीचे निदान होण्याला पर्याय उरतो का? आज दिल्लीतल्या बलात्कारानंतर उफ़ाळलेल्या लोकक्षोभाला व्हायरस म्हणून हिणवणे सोपे आहे. कारण माध्यमे तुमच्या हाती आहेत. पण असा व्हायरस इजिप्त किंवा सिरियाप्रमाणे धुमाकुळ घालू लागतो, तेव्हा नाकी दम येत असतो. कारण त्यावरची कुठली लस किंवा डोस हाताशी नसतात. एक रिदा शेखचा बळी चालू शकतो. पण जेव्हा त्याचा साथीचा आजार होतो, तेव्हा बुडाखालचे सिंहासन डगमगू लागत असते, नेमकी तीच परिस्थिती येऊ घातली आहे. या व्हायरसची निर्मिती कुठे झाली? लोक असे कायदा, प्रशासन, पोलिस, सरकार व राजकारण्यांसह माध्यमांच्या बुद्धीमंतावर अविश्वास का दाखवू लागले आहेत, त्याचे आधी निदान आवश्यक आहे. जुन्या मोजपट्ट्य़ा किंवा निकष लावून या निदर्शने, प्रक्षोभाचे मोजमाप होऊ शकणार नाही किंवा त्यावरचे उपाय यशस्वी होऊ शकणार नाहीत. स्वाईन फ़्लूचा फ़ैलाव वाढू लागला, तेव्हा एकीकडे त्यावरचे उपाय, उपचार हाती घेण्यात आले, तसेच दुसरीकडे त्याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून उघड्या पाण्याच्या टाक्या, डबकी, तलाव, नाले निर्जंतुक करण्याच्याही मोहिमा हाती घेण्यात आल्या होत्या ना? केवळ एका बलात्कारापुरता हा विषय नाही, हे त्यामागचे सत्य आहे. यात कुठल्या राजकीय नफ़्यातोट्याचा किंवा सेक्युलर-जातीय राजकारणाचा संबंध नाही. लोकांत आपल्या घरात, शाळेत, बसमध्ये, कचेरीत वा रस्त्यावर महिला मुली सुरक्षित नाहीत असा भयगंड तयार झाला आहे, ही समस्या आहे. त्यावर आश्वासन उपयोगाचे नाही, तर दिसणारे परिणाम हा उपाय असू शकतो. त्याचे भान त्या रिदाच्या डॉक्टरप्रमाणे सत्ताधार्‍यांना उरलेले नाही की त्यांचीच भाटगिरी करण्यात धन्यता मानणार्‍या अशा शास्त्रीबुवांना उरलेले नाही. त्यामुळेच परिस्थिती दिवसेदिवस हातबाहेर चालली आहे. हा व्हायरस त्याच सत्ताधीशांनी आणलेला आहे. ( क्रमश:)
भाग   ( ४४ )    २/१/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा