शुक्रवार, २५ जानेवारी, २०१३

आधुनिक महाभारतातले भरकटलेले अर्जुन


   आपण सत्याकडे पारदर्शक नजरेने बघू शकतो का? म्हणजे जसे समोर आहे ते बघू शकतो का? बहुदा नाही बघत. आपण आपल्या मनात ज्या भूमिका. समजूती, पूर्वग्रह व धारणा असतात, त्याच चष्म्यातून समोरचे दिसणारे बघत असतो. मग सर्वांना दिसते तेच आपल्या डोळ्यांनाही दिसत असते. मग प्रत्येकजण बघतो त्याला समोर आहे ते वेगवेगळे का दिसत असते? कारण समोर आहे ते बघण्यापेक्षा आपल्याला हवे तेच बघायचा मोह आवरता येत नसतो. थोडक्यात आपला अर्जून होत असतो किंवा झालेला असतो.

   आपल्या तमाम शिष्यांना गुरू द्रोणाचार्यांनी समोरच्या झाडावर बसलेल्या पक्षाच्या डोळ्यावर नेम धरायला सांगितले आणि तसेच थांबवून प्रत्येकाला एकच प्रश्न विचारल्याची गोष्ट मोठ्या कौतुकाने सांगितली जाते. त्या प्रश्नाचे प्रत्येकाने दिलेले उत्तर वेगवेगळे असते. कोणाला समोर झाड दिसते, कोणाला पाने, फ़ुले, फ़ांद्या, पक्षी तर कोणाला पलिकडले डोंगर दिसत असतात. एकटा अर्जून म्हणतो, त्याला फ़क्त पक्षाचा डोळा दिसतो आहे. म्हणजे तो एकटाच असा असतो, की ज्याचे लक्ष्यावरच लक्ष असते. बाकीच्यांचे लक्ष भरकटलेले असते, असे त्या कथेचे तात्पर्य आहे. उपदेश म्हणून गोष्ट छान असते. जेव्हा नेम धरायचा असतो, तेव्हा हा उपदेश योग्यच आहे किंवा त्यातली शिकवण योग्यच आहे. पण उर्वरित वेळी आपण दिसणारे सगळे जग बघायचे असते व बघितलेच पाहिजे. त्याऐवजी आपण प्रत्येक गोष्टीत फ़क्त आपले लक्ष्यच बघत बसलो; तर जगण्याचा पुरता विचका होऊन जाईल ना? म्हणजे समजा, एका दिवशी द्रोणाचार्य मुलांना सहलीला घेऊन गेले असते आणि तिथे आल्हाददायक वातावरणात निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठीच जायचे असते ना? अशा वेळी तोच प्रश्न गुरूजींनी सर्वांना विचारला असता; तर त्यांनी तेच उत्तर अपेक्षित धरले असते का? तिथेही अर्जुनाने पक्षाचा डोळाच दिसतो, असे म्हटले असते व अन्य मुलांनी डोंगर, दर्‍या, नदी, पक्षांचा कलकलाट अशी उत्तरे दिली असती, तर गुरूजींनी कोणाची पाठ थोपटली असती?

   सहलीला आल्यावर आपण धनुर्धर नसतो, तर निसर्गाचे सौंदर्य लुटायला आलेले रसिक पर्यटक असतो. तिथे आपली नजर बदलली पाहिजे. आपले लक्ष्य बदलत असते. त्याचे भान नसले तर दिसेल त्या प्रत्येक पक्ष्यावर नेम धरून आपण अवघ्या निसर्गाची नासाडी करण्याचा धोका असतो. म्हणूनच डोळ्यांना सर्वकाही दिसत असते. ते बघण्याचा विवेक बाळगता आला पाहिजे. सर्ववेळी हवे तेवढेच बघायची सवय जडली; मग सगळे जग बघता येत नाही आणि आपली नजर संकुचित होऊन जाते. आपोआपच आपला दृष्टीकोनही संकुचित होऊन जातो. जगाला जे सहज दिसू शकते व उमगू शकते, तेच आपल्याला दिसत असूनही बघायची नजरच हरवून जाते. आजकाल स्वत:ला शहाणे, बुद्धीमान, जाणकार किंवा वैचारिक पातळीवर जगणारे समजणार्‍यांचा एक वर्ग आपल्या समाजात असाच तयार झाला आहे. त्यांचा अर्जुन होऊन गेला आहे. त्यांना समोरचे दिसत असलेले, आहे तसे बघताच येत नाही. आणि अशा अर्जुनांमध्ये एकवाक्यता नसते. कारण प्रत्येकाचा द्रोणाचार्य वेगवेगळा असतो. ज्याचा दोणाचार्य पक्षाच्या डोळ्याला लक्ष्य करायचा धडा देणारा असतो, असा अर्जुन प्रत्येक क्षणी व प्रत्येक जागी फ़क्त पक्षाचा डोळाच बघत असतो किंवा शोधत असतो. दुसर्‍याच्या द्रोणाचार्याने नेमबाजी करताना झाडाच्या आंब्यावर नेम धरायचा धडा दिलेला असेल, त्याला जागोजागी फ़क्त आंबाच दिसत असतो. कुणाचा गुरू पानावर, कुणाचा फ़ुलावर तर कुणाच्या गुरूने झाडाच्या बुंद्यावर नेम धरायचा धडा दिलेला असतो. मग हे अर्जुन उत्तम धनुर्धर होण्यासाठी समोर दिसणार्‍या झाडाचे भिन्नभिन्न वर्णन करत असतात. कारण त्यांना संपुर्ण झाड दिसत असले; तरी ते त्यात त्यांना हवे तेच लक्ष्य शोधत व बघत असतात.

   मग कसा विरोधाभास तयार होतो बघा. मुंबईत बॉम्बस्फ़ोट झाल्यावर शरद पवार लोकांची दिशाभूल करतात व अकरा स्फ़ोट होऊनही बारा स्फ़ोट झाल्याचे बेधडक खोटे बोलतात, तेव्हा ते जनहितासाठी म्हणून योग्यच असते. कारण मुस्लिमांविषयी हिंदूंच्या मनात शंका संशय येऊ नये; म्हणून घेतलेली काळजी असते. समाजाच्या विविध घटकात वैमनस्य होऊ नये, म्हणून पवारांनी सत्याची गळचेपी हेच जनहित असते. पण गुजरातच्या दंगलीबाबत सत्य समोर आले पाहिजेच. मग त्यातून मुस्लिमांच्या मनात हिंदूंविषयी संशय निर्माण होऊन’ विविध समाज घटकात वैमनस्य वाढले तरी बेहत्तर. ही झाली सेक्युलर बाजू. कारण अशा अर्जुनांचा द्रोणाचार्य सेक्युलर असतो आणि त्याने सेक्युलर नेमबाजीचे धडे गिरवून घेतलेले असतात. दुसरी बाजू स्वत:ला हिंदूत्ववादी म्हणवून घेणार्‍यांची आहे. त्यांना नेमके उलट दिसत असते. गुजरातच्या दंगली विसरल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. पण दिल्लीच्या शिखविरोधी दंगली विसरण्याची गोष्ट त्यांना पटत नसते. फ़क्त पंधरा मिनीटे पोलिस बाजूला करा म्हणणारा ओवायसी ज्या पक्षाचा आहे, त्याचे असे प्रक्षोभक बोलणे व्यक्तीगत असते आणि त्यासाठी त्याच्या पक्षाला देशद्रोही ठरवायची गरज नसते; म्हणणारे सेक्युलर अर्जुन मालेगावचा विषय आला मग एकदम बदलून जातात. तेव्हा मात्र मालेगावच्या स्फ़ोटातले संशयित आरोपी कित्येक वर्षापुर्वी कधीतरी संघात होते व आज त्यांचा संघाशी संबंध उरलेला नाही; तरी त्यांच्या व्यक्तीगत कारवाया संघाचेच कारस्था्न असल्याचा दावा करतात. यातला भेदभाव सामान्य माणसाला लगेच लक्षात येऊ शकतो व दिसतो. पण जे शहाणपणाने आवेशात बोलत असतात, त्यांना मात्र तो बघता येत नाही. कारण त्यांना तो बघायचाच नसतो. त्यांचे लक्ष्य संघ वा हिंदूत्ववादी असतात. आणि आता सेक्युलर मंडळींच असा अर्जून होऊन गेला आहे. आणि तेच प्रामुख्याने बुद्धीवादी म्हणून मिरवत असल्याने, तशीच एकूण आजच्या बुद्धीवादाची दुर्दशा आहे. जितक्या द्रोणाचार्यांच्या आश्रमातून हे अर्जून आलेले आहेत तितकी त्यांची भिन्न भिन्न लक्ष्ये आहेत. आणि सामान्य माणसाला साध्या डोळ्यांनी जे स्पष्ट दिसते, तेच या लोकांना चष्मे लावूनही वेगवेगळे का दिसते, त्याचे हेच कारण आहे. कारण ते नेम धरलेले धनुष्यबाण खाली ठेवून एकही क्षण सामान्य माणसाचे जीवन जगायचे विसरून गेलेले आहेत. कायम त्यांच्या धनुष्याची प्रत्यंचा ताणून आपापल्या लक्ष्यावर नेम धरून सज्ज आहेत. आपल्याला सहज दिसणारे जग त्यांना दिसायचे कसे आणि दाखवणार कोण? परिणामी एकमेकांसमोर धनुष्यबाण ताणून उभे असलेले अर्जून अशी आधुनिक महाभारताची कहाणी होऊन बसली आहे.

   त्यामुळेच मग झाले असे, की जयपूर येथे कॉग्रेस पक्षाच्या चिंतन शिबीरात नवे केंद्रिय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी बेभान होऊन भाजपावर हल्ला चढवला. पण आपल्याच देशाला व सरकारला अडचणीत आणले असताना सेक्युलर अर्जुनांना त्यातली हानी व अपाय दिसत असून बघायची हिंमतही झालेली नाही. उलट शिंदे यांनी सत्यच कसे सांगितले व तेच कसे वासतव आहे; ते सिद्ध करण्याची अहमहमिका कॉग्रेस नेत्यांपेक्षा वाहिन्यांवरच्या सेक्युलर पत्रकार व विद्वानांमध्ये सुरू झाली. समोर झाड आहे किंवा नाही, डोळा दिसायला त्यावर तो पक्षी तरी आहे की नाही; याची कोणाला पर्वा होती आणि असते? क्षणाचा विलंब न लावता बहुतांश सेक्युलर पत्रकार, विद्वान आपले बाण सोडून मोकळे झाले. त्यातल्या त्यात सावध म्हणायचे तर छापील माध्यमातले पत्रकार होते, म्हणूनच त्यांनी तात्पुरता सेक्युलॅरिझम बाजुला ठेवून; समोरचे सत्य बघायचा तरी प्रयत्न केला. त्यामुळे छापील माध्यमांनी सत्य आपल्या वाचकासमोर आणायची हिंमत दाखवली. ही खरेच शुभ घटना आहे. कारण काही लोक हळूहळू सेक्युलर नशेतून बाहेर पडत असल्याचे ते लक्षण आहे. काही द्विवसांपुर्वी संघचालक मोहन भागवत जे बोललेच नाहीत ते शब्द ऐकून त्यांच्यावर भराभरा शरसधान करण्याचा असाच मुर्खपणा झालेला होता. तेव्हा त्यापासून मधू किश्वर व किरण बेदी, यांच्यासारख्या नामवंत सेक्युलरांनी स्वत:ला अलिप्त करून घेण्याची सावधानता बाळगली. आता तशी सावधानता बाळगत सेक्युलर नशेतून बाहेर येणार्‍यांची संख्या वाढताना दिसते आहे. महाराष्ट्र टाईम्स वा लोकसत्ता अशा वृत्तपत्रांनी शिंदे यांच्या सेक्युलर मुर्खपणाची पाठराखण न करता; त्यांची चांगलीच हजेरी घेत, त्यातला वेडगळपणा ठळकपणे दाखवण्याचे धाडस केले आहे. जसजसे दिवस जातील; तसतसे आणखी प्रामाणिक बुद्धीवादी या दिग्विजय धुंदीतून बाहेर पडतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. कदाचित आता सामान्य माणसालाही आपला खुळा बुद्धीवाद फ़सवेनासा झाल्याची ती जाणिव असू शकते. शिंदे यांच्या जयपूरच्या विधानाने देशाचे किती नुकसान केले आहे, त्याचे वास्तव खरोखरच अंगावर काटा आणणारे आहे. पण या सेक्युलर अर्जुनांना दाखवायचे कोणी व कसे?  ( क्रमश:)
 भाग   ( ६७)    २६/१/१३
 (bhaupunya@gmail.com) (facebook.com/bhau.torsekar)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा