लोक इतके अस्वस्थ का आहेत? जगात किंवा आपल्या देशात काही प्रथमच बलात्कार झालेला नाही. अगदी स्पष्ट बोलायचे तर जेव्हापासून माणसाला आपल्या शरीराच्या नग्नतेची लाज वाटू लागली, तेव्हापासून बलात्कार सुरू झाला असे म्हणता येईल. असो, तो खुप वेगळा विषय आहे. आजच्या बलात्काराबद्दल आपण बोलू. आजचा बलात्कार नवा नाही, हा मुद्दा आहे. इस्लामी आक्रमण झाले तेव्हा म्हणे महिला युद्धातल्या पराभवानंतर जोहार किंवा अन्य मार्गाने आत्महत्या करायच्या. कारण जिंकणारे येऊन आपल्यावर बलात्कार करणार हे गृहीत होते. तेव्हा बलात्कार ही किती जुनी बाब आहे ते लक्षात येऊ शकेल. अगदी त्यानंतरही ब्रिटिशांची सत्ता आल्यावर लिखीत कायदे व आधुनिक न्यायालये, पोलिस प्रशासन सुरू झाले; त्यानंतरही बलात्कार थांबलेले नाहीत. तसे कुठलेच कायदे गुन्हे थांबवू शकालेले नाहीत. तरीही नवनवे कायदे मागितले जात असतात व केलेही जात असतात. त्यासाठी प्रचंड प्रमाणात वैचारिक उहापोह चालू असतो. उर्वरित जग व जनता मुर्ख आहे, अशाच समजुतीमध्ये प्रत्येक काळातील शहाणे बुद्धीमंत नवनव्या सूचना देत असतात, शिफ़ारशी व सल्ले देत असतात. पण गुन्ह्यांना आळा बसलेला नाही. गेल्या शतकामध्ये इतके अफ़ाट संशोधन होऊन आणि वैद्यकीय वैज्ञानिक सोयीसुविधा वाढल्याने रोगराई संपलेली नाही. तीच अवस्था आपल्याला कायदे व गुन्ह्यांच्या बाबतीत दिसेल. मग एका सामुहिक बलात्काराने समाज इतका बेफ़ाम व उतावळा कशाला झाला आहे? त्याचा कायदा व न्यायावरचा विश्वास उडाला असे कोणाला वाटत असेल तर तो शहाणा मुर्खाच्या नंदनवनात वावरतो, असेच मानावे लागेल. लोकांचा आज सुखरूप जगण्यावरचा विश्वास उडाला आहे. त्यालाच अराजक म्हणतात. आपला कुणी वाली उरलेला नाही; अशी अगतिकतेची ती धारणा आहे. त्याचे प्रमुख कारण सत्ता, राजकारण, नेत्यांचा भ्रष्टाचार किंवा सरकारी अनागोंदी हे नसून बौद्धिक दिवाळखोरीने लोकांचा सुस्थिरतेवरला विश्वास उडाला आहे.
जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात वा समाजात काही मूठभर शहाणे असतात, आणि बाकीचा पोटभरू समाज म्हणजे तिथली लोकसंख्या त्याच्या बौद्धीक क्षमतेवर विसंबून असते. असे जे मुठभर शहाणे आहेत, ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील आणि अडचणी संकटावर मात करता येईल; या विश्वासावर मोठी लोकसंख्या म्हणजे माणसांचे कळप शांततापुर्ण जीवन जगत असतात. पण जेव्हा अशा शहाण्यांच्या प्रत्येक उपाय व उत्तरातील फ़ोलपणा समोर येऊ लागतो; तेव्हाच त्या लोकसंख्येचा धीर सुटत असतो. खरे तर त्या लोकसंख्येचा प्रस्थापितावरचा विश्वास डळमळीत करण्यात हेच शहाणे पुढाकार घेत असतात. प्रस्थापित व्यवस्था, मग ती राजकीय असो किंवा सामाजिक असो, तिच्याशी सुसुत्र राहून मोठी लोकसंख्या गुण्यागोविंदाने नांदत असते. त्यामध्ये सगळे मनासारखे होतच असते असे अजिबात नाही. इकडेतिकडे होतच असते. त्यातल्या काहीसाठी पक्षपात होत असतो, तर काहीजणांवर अन्याय अत्याचार होतच असतो. तरीही कोणी ती व्यवस्था उलथून पाडायला पुढे सरसावत नाही. लोकसंख्येतील बहूतांश लोकांना ती व्यवस्था उपकारक नसली; तरी अपायकारक नाही, याचेच समाधान असते. त्यामुळेच समाधानी व सुखी नसतानाही एवढी मोठी लोकसंख्या गुण्यागोविंदाने नांदत असते. पण त्यातले काही मुठभर असे असतात, की त्यांच्या कल्पनेतील परिपुर्ण उपकारक व्यवस्था त्यांच्या अनुभवास येत नसल्याने प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात ते आवाज उठवू लागतात. त्या व्यवस्थेतले दोष दाखवून किंवा त्रुटी दाखवून लोकांना भडकवायचे व चिथावण्याचे काम ही मंडळी करीत असतात. त्यासाठी कधीकधी अतिशयोक्ती सुद्धा होत असते. पण हे असे मुठभर असंतुष्ट बुद्धीमान असल्याने सोशिक समाजाला भडकवण्याचे शब्द सामर्थ्य त्यांच्यापाशी असते. त्यातूनच सामाजिक असंतोषाचा भडका उडत असतो. कोणाला हे ऐकून चमत्कारिक वाटेल. आपण उदाहरण घेऊन तपासू या.
गेल्या दहा वर्षात देशातली महागाई व दरवाढ कितीपटीने झाली आहे ना? तरीही लोक जमेल तसे त्या महागाईशी जुळवून वागत जगत आहेत. माध्यमातून मात्र त्यावर अहोरात्र कल्लोळ माजवला जात असतो. लोकांच्या घरगुती बजेटचे दिवाळे वाजले, गरीबाचे कंबरडे मोडले, अशा बातम्या आपण मागल्या दहा वर्षात कितीदा वाचल्या आहेत? पेट्रोल वा इंधनाचीच गोष्ट घ्या. दुप्पट वा तिप्पट किमती वाढल्या. म्हणून कुठे दंगली उसळलेल्या नाहीत. पण बातम्या अशा येतात, की देश अख्खा धुमसतो आहे असेच कोणाला वाटेल. पण प्रत्यक्षात दोनतीन दिवस गेल्यावर सर्वत्र महागाईचा विषय संपलेला असतो. ज्या वृत्तपत्रातून आपण महागाईच्या बातम्या वाचतो, त्यांच्या महागाईचे काय? दहा वर्षात देशातील वृत्तपत्रे व माध्यमे ही एकच बाब शी आहे, की तिच्या किंमती वाढलेल्या नाहीत. त्या कशाला वाढत नाहीत? इंधनाच्या किंमती वाढल्या मग भाजी, वाहतूक, प्रवास अशा सर्वांच्या किंमतीत वाढ होते, तर वर्तमानपत्राच्या किंमतीत वाढ का होत नाही? याचा अर्थच तोट्यात वृत्तपत्रे चालविली जात असणार ना? तेवढ्यावर विषय संपत नाही. नव्याने सुरू होणारी वृत्तपत्रे दोनतीन वर्षे अर्ध्या वा पाव किंमतीत मिळण्याची हमी दिली जाते. हा काय प्रकार आहे? आपल्याला रोजच्या रोज महागाईची भिती घालणार्या त्याच वृत्तपत्रांना महागाई का जाणवत नाही? त्यात बसलेल्या शहाण्यांना त्यांनी काढलेले उत्पादन बाजारात महाग का होत नाही, याचा खुलासा देण्याची गरज का वाटत नाही? तर मुद्दा असा, की आपण काय वाचावे यासाठी कोणी तरी करोडो रुपये बुडवून वर्तमानपत्रे किंवा वाहिन्या चालवत असतो. त्यामध्ये असे करोडो रुपये बुडवून त्याला काय मिळणार असते? अशा तोट्यात त्याचा काय फ़ायदा असतो?
त्यातून मग त्याला जनमानसावर प्रभूत्व गाजवता येत असते. आपण लोकांना भडकावू शकतो आणि प्रस्थापित व्यवस्थेला हादरे देऊ शकतो; अशी चटकन नजरेत न भरणारी ताकद त्या गुंतवणूकीतून कमावता येत असते. त्यासाठी अब्जावधी रुपये गुंतवून माध्यमांवर कब्जा केला जात असतो. मग अशा माध्यमात बसलेल्या शहाण्यांना मोठे पगार, गाड्या व अन्य चैनीच्या बाबी पुरवून माध्यमातले गुंतवणूकदार लोकमतावर हुकूमत निर्माण करत असतात आणि त्यात त्यांना मुठभर शहाणे सहाय्य करत असतात. तो प्रभाव निर्माण करण्यासाठी अत्यंत कुशल व कुशाग्र बुद्धीने लोकांना आधी त्यांच्यावर अन्याय होतो आहे, अशी बोचणी निर्माण करावी लागते. ती झाली मग त्याच जखमेवर मीठ चोळून त्याला भडकवणे सोपे असते. जेव्हा असा संतप्त जमाव निर्माण होतो, तेव्हा प्रस्थापित सत्ता व राजकारण भयभीत होते. मग ती सत्ता त्या जनमताला आटोक्यात आणायचे उपाय शोधू लागते. तो उपाय म्हणून मग तीच माध्यमे पुढे येतात. आम्ही लोकांना भडकावले आम्हीच त्यांना खच्ची करू शकतो, अशी मग सौदेबाजी होत असते. सहाजिकच जी माध्यमे सर्वसामान्य लोकांना अन्याय झाला म्हणून चिथावण्या देतात, तीच मग लोक रस्त्यावर उतरले तर, त्याच जमावावर अराजक वा दंगलखोर असाही आरोप करण्यात पुढे दिसतील. अण्णा हजारे असोत, की रामदेव असोत, केजरिवाल असोत की परवाच्या दिल्लीतील बलात्कारानंतर उमटलेली प्रतिक्रिया असो. त्यात माध्यमे व पत्रकारांची भूमिका तपासून बघण्यासारखी आहे.
आरंभी तो सामुहिक बलात्कार म्हणजे दिल्लीत कोणाचे जगणे सुखरूप राहिले नाही, असा ओरडा करणारी माध्यमेच होती. लाखो लोकांचा धीर सुटावा अशा बातम्या कोणी दिल्या होत्या? त्या वाचून वा ऐकून लोकांनी सत्तेला व पोलिसांना धन्यवाद द्यावेत, अशी कुठल्या संपादकाची अपेक्षा होती काय? नसेल तर मग इतक्या भडक बातम्या देण्याची व लोकांना चिथावण्या देण्याची गरज काय होती? पण ती दिली गेली आणि लोक रस्त्यावर उतरले, तेव्हा भयभीत सरकारने त्याच माध्यमांचा धावा केला आणि तीच माध्यमे आता निदर्शने पु्रे झाली; अशी भाषा बोलू लागली. कारण शहाण्य़ांना सत्तेला भयभीत करायचे असते. पण सत्ता उलथून मात्र पाडायची नसते. कारण त्याच सत्तेमध्ये व प्रस्थापित व्यवस्थेमध्ये शहाण्य़ांचे हितसंबंध, स्वार्थ गुंतलेले असतात. त्या गरीबाचे जिणे असह्य झालेले असले, तरी शहाण्यांचे जीवन सुखवस्तू व सुखरूप असते. व्यवस्थाच उलथून पाडली गेली तर सत्ताधार्यांसोबत प्रस्थापित शहाण्यांचे प्रभूत्वही धोक्यात येणार असते. म्हणूनच चिथावणी देऊन जनतेला रस्त्यावर यायला भाग पाडणारेच मग मतलब साधला की त्याच जमावाला अराजक म्हणून त्याची निर्भत्सना करू लागतात. कारण बुद्धीजिवी बहुतांशी आश्रीत मनोवृत्तीचा असतो, क्रांतीकारी नसतो, तो शब्दवीर असतो, क्रांतीवीर नसतो. जेव्हा क्रांती दिसू लागते तेव्हा शब्दवीर सर्वात अधिक भयभीत होतो. बुद्धीवाद्यांना पुस्तकातली क्रांती हवी असते. जनजीवनात आमुलाग्र बदल घडवून आणणारी क्रांती बुद्धीवादी वर्गाला कधीच नको असते. गेल्या काही वर्षात बुद्धीवाद्यांचा तो मुखवटा आंदोलनांनी फ़ाडला आहे. ( क्रमश:)
भाग ( ५३) १२/१/१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा