मंगळवार, २२ जानेवारी, २०१३

विज्ञान आणि बुवाबाजीत काही फ़रक आहे का?


   मुद्दा सरळ आहे. तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे कधी जाता? तुम्हाला जेव्हा एखादा आजार वा बाधा होते तेव्हा जाता. तिथे गेल्यावर डॉक्टर तुम्हाला काय आजार आहे, कुठे दुखापत झाली आहे वगैरे विचारपूस करतात. मग त्यानुसार आजाराचे निदान करतात व त्याला अनुसरून उपचार सुरू करतात. समजा त्याच्या ऐवजी डॉक्टरने तुम्हाला भविष्यात कुठला आजार होण्याबद्दल सांगायला सुरूवात केली किंवा त्या संभाव्य आजाराच्या उपचारार्थ कुठले औषध घेऊ नये, याचाच सल्ला द्यायला सुरूवात केली तर तुम्ही काय कराल? तापट डोक्याचे असाल तर तुम्ही अशा डॉक्टरला शिव्या द्याल किंवा थप्पड मारून तिथून निघाल. शांत, विवेकी असाल तर दवाखान्याची पाटी लावून कोणी तरी वेडगळ बसलाय म्हणून काढता पाय घ्याल. अन्य काही करणे तुम्हाला शक्य असते काय? इथे तुम्ही त्रस्त आहात आणि कोणी डॉक्टर अन्य डॉक्टरवर दुगाण्य़ा झाडत असेल वा त्याच्या औषधांची निंदानालस्ती करीत असेल, तर त्याला मुर्ख ठरवण्याखेरीज तुम्हाला पर्यायच उरत नाही. कारण असले सल्ले देण्याची ती वेळ नसते. दहा लोक दहा पद्धतीचे उपाय; आपण आजारी वा संकटात असलो मग सुचवत असतात. मात्र आपण डॉक्टर वा अन्य जाणकाराकडे एवढ्यासाठी जातो, की आपल्याला त्या आजारातून सुटका हवी असते. भाषण नको असते. शिवाय कल्पनेतल्या किंवा भविष्यात संभवणार्‍या आजारावर बोलायची तेव्हा सवड नसते. दिल्लीत जेव्हा सामुहिक बलात्कार एका धावत्या बसमध्ये झाला, तेव्हा लोकांचा आपल्या सुरक्षित असण्यावरचा विश्वासच उडाला होता. त्यामुळे लोक धरदार सोडून रस्त्यावर उतरले होते आणि सुरक्षेच्या हमीसठी ठिय्या देऊन बसले होते. तो बलात्कार का होऊ शकला होता?

   देशात कायद्याचे राज्य आहे. इथे कायदे बनवणारे सरकार व कायदेमंडळ आहे. त्याचा अंमल करणारे प्रशासन आहे. त्याचे ताबेदार पोलिस आहेत. त्यामुळे कोणी मनमानी करू शकत नाही; असे लोकांना खात्रीपुर्वक सांगण्यात आलेले आहे. नुसते सरकारच नव्हेतर माध्यमे, जाणकार, राजकीय पक्ष, विचारवंत आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर सुद्धा तेच अहोरात्र सांगत असतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी देशात कायदा आहे व कायदा कोणी हाती घेऊ नये, मनमानी करू नये. मग आपल्यासारखी सामान्य माणसे, अशा मान्यवरांच्या शब्दावर विसंबून घराबाहेर पडतात. निर्धास्तपणे आपापले व्यवहार करतात. फ़िरतात, खरेदीविक्री करतात, शाळा कॉलेज वा इस्पितळ, चित्रपटगृहात जातात. तेव्हा रस्त्यावर आपल्याला कसला धोका नाही अशी त्यांना खात्री असते. देवाचे नाव घेऊन वा ‘(आसा)रामभरोसे’ कोणी घराबाहेर पडत नाही. किंवा कुठल्या बुवा फ़कीराचा गंडादोरा ताईत बांधलाय म्हणून आपण सुरक्षितपणे कुठेही जाऊ शकतो, असा लोकांचा भ्रम नसतो. लोक प्रस्थापित कायद्यावर विसंबूनच घराबाहेर पडतात. तेव्हा दिल्लीतला सामुहिक वा अन्य कुठे रस्त्यावरून अपहरण करून होणारा बलात्कार झाला; म्हणजेच समस्या किंवा आजार कायद्याचे उपाय योजूनही झालेला आहे. आणि म्हणूनच दिल्लीचे लोक असे चवताळून रस्त्यावर आलेले होते. त्यांचा कायदा, त्याची अंमलबजावणी करणारे प्रशासन व पोलिसांवर असलेला विश्वासच उडाला होता. कायद्याचे राज्य ही शुद्ध फ़सवणूक आहे, अशा अनुभवाने विचलित झालेले लोकच रस्त्यावर उतरले होते.

   मग कायद्याच्या निरूपायाला काय करायचे अशी चिंता त्यांना भेडसावत होती. अत्यंत वैज्ञानिक व विवेकबुद्धीने वागल्यानंतर झालेल्या अपायाने लोक संतप्त झाले होते. असेच नेमके पुण्यात तीन वर्षापुर्वी घडले होते. रिदा शेख नावाच्या मुलीला तिच्या मातापित्यांनी पुण्यातल्या सर्वात खर्चीक व उत्तम वैद्यकीय उपचार देणार्‍या इस्पितळात दाखल केले होते. तिला कुठल्या फ़कीर बाबाकडे अंगाराधुपारा करायला नेलेले नव्हते. उत्तमातल्या उत्तम जाणकार डॉक्टरांच्या हाती तिला सोपवले होते. आणि तिथले डॉक्टरही तिच्यावर स्तोत्रमंत्र वा अंगाराधुपारा फ़िरवत नव्हते. इंजेक्शने, औषधांचे डोस, कृत्रीम श्वसन अशा तमाम सोयींचा वापर करून तिला बरे करण्याचा प्रयास डॉक्टर्सही करीत होते. पण जितके खर्चीक उपचार चालू होते व पुढली पुढली औषधे रिदाला दिली जात होती, त्यातून तिची प्रकृती सुधारण्यापेक्षा अधिकच बिघडत होती. बिचार्‍या रिदाच्या कुटुंबियांना त्यातले विज्ञान काही कळत नव्हते. आधुनिक वैद्यकशास्त्रही कळत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचे जीवन त्या डॉक्टर्सच्या हाती निर्धास्तपणे सोपवले होते. पण तरीही रिदाचा बळी गेलाच. अर्थात त्याला विज्ञान किंवा तिच्या आईवडीलांचा विज्ञानावरचा विश्वास जबाबदार नव्हता. तर डॉक्टर्सच्या अविवेकी आगावुपणाचा तो दुष्परिणाम होता. तिथे उपचार करणार्‍यांना विज्ञान माहिती होते, पण ते रोगशास्त्रातले सर्वज्ञानी नव्हते. त्यामुळेच त्यांचे जे अपुरे ज्ञान होते, त्यानुसार ते डॉक्टर्स तिच्यावर उपचार करत होते. पण आपले उपचार कुठे चुकतात, त्याचा आढावा घ्यायचा विवेक त्यांना उरला नव्हता. आपल्याला सर्वकाही कळले आहे, अशा विज्ञानाच्या अर्धवट अंधश्रद्धेने रिदाचा बळी घेतला होता. कारण तिला स्वाईनफ़्लू झाला होता आणि डॉक्टर्स तिच्यावर न्य़ुमोनियाचा उपचार करत होते. मग इथे समस्या काय झाली होती? एखाद्या बापू, बुवा, भगत, मांत्रिक जसा स्वत:च्या दिव्यशक्ती वा मंत्रशक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवतो किंवा त्याचे भक्त ठेवतात; तसाच इथेही प्रकार होता. आंधळा विश्वास रिदाचा बळी घेऊन गेला. कारण तिला कुठला आजार झाला आहे, त्याची पर्वा न करता आपल्या अनुभवाच्या जुन्या ज्ञानावर विसंबून डॉक्टर्स काम करीत राहिले. पण त्यात रिदाचा, तिच्या कुटुंबियांचा काय दोष होता? हानी त्यांची झाली ना?

   नेमकी तशीच दिल्लीच्या किंवा अन्य कुठल्या बलात्काराची कहाणी असते. त्यात बळी पडणारी मुलगी देशात, राज्यात व आपल्या गाव, शहरात कायद्याची हुकूमत आहे, यावर विसंबून जीवन कंठत असते, त्याच विश्वासावर ती घराबाहेर पडत असते आणि तोच विश्वास तिचा बळी घेत असतो. कारण असा प्रसंग वा संकट ओढवते; तेव्हा तो कायदा, त्याचा अंमलदार कुठेच दिसत नाही. त्या कायद्याचा परिणाम वा प्रभाव कुठे जाणवत नाही. मग ज्याला कायद्याचे राज्य म्हणतात, ती एक अंधश्रद्धाच नाही काय? बापू, बुवांच्या ताईतामध्ये कुठले अक्षर लिहून ठेवलेले मंतरलेला कागद, त्यांच्या स्तोत्र मंत्राचे शब्द त्याच कागदावर रहातात. पण त्या मुली महिलेला बलात्कारापासून वाचवू शकत नाहीत, हे सत्यच आहे. पण तेवढेच कायद्याच्या पुस्तकातले निर्जीव शब्द व अक्षरेही निरूपयोगीच नाहीत काय? आणि लोक ज्याच्यावर विश्वास ठेवतात व फ़सतात, त्यालाच अंधश्रद्धा म्हणतात ना? मग आपल्या देशात नित्यनेमाने होणारे बलात्कार, अपहरण, खुन दरोडे व त्यांची अफ़ाट संख्या; कशाचे लक्षण आहे? कायद्याच्या राज्याची की कायदा नावाच्या अंधश्रद्धेची? दिल्लीतल्या बलात्कारानंतर अन्य बापू, बुवांनी जे उपाय सुचवले आहेत, त्यात काडीचे तथ्य नाही हे सांगायची गरज नाही. कारण ते उपाय कुठले लोक करतही नाहीत. ते लोक बापूंची भजने ऐकतात. पण रस्त्यावर रात्री अपरात्री कुणी गुंड अंगावर आला तर कुठला ताईत वा मंत्र आपल्याला वाचवील असे मानत नाहीत. म्हणून तर लोक कायद्याकडे धाव घेतात. कुठे छेड काढली गेली, विनयभंग झाला, तर कोणी बाब बुवाकडे धाव घेत नाही, तर पोलिस ठाण्यात धावतात. तिथे त्यांची कोणी दाखल घेतो का? मग त्या पोलिस ठाण्यात व ताईतामध्ये किंवा कायदा वा मंत्रामध्ये नेमका किती फ़रक राहिला?

   बाबा, बुवा वा बापू यांच्यावर श्रद्धा ठेवणे किंवा त्यांच्या भक्तीला लागणे अयोग्य असेल. पण म्हणून कायद्याची भक्ती खरी असल्याचा पुरावा काय? आणि आज तरी समस्या देशाला व जनतेला भेडसावणारी समस्या आहे ती कायदा व सरकार नावाच्या अंधश्रद्धेने फ़सगत होण्याची. त्यातून उपाय होऊ शकला असता, तर लोकांना दैववादी व्हायची वेळ आली नसती. कारण आजघडीला तरी लोकांसाठी नित्यजीवन रामभरोसे होऊन गेले आहे. जगण्याचे प्रत्येक क्षेत्र असे आहे, की कुठेच कशावर विश्वास ठेवून निर्धास्तपणे जगता येत नाही. म्हणूनच लोक इतके दिवस रस्त्यावर उतरून तोच कायदा बदलण्याचा आग्रह धरून बसले होते. ज्या कायद्याने जीवन धोक्यात आणले आहे व फ़सवणूक चालविली आहे, त्याच अंधश्रद्धा बनलेल्या कायद्याच्या विरोधात लोक रस्त्यावर आले होते. मग खर्‍या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्याने काय करायला हवे होते? त्या आंदोलनात सहभागी व्हायचे, की भलत्याचे बुबा बापूंच्या बडबडीवर वैज्ञानिक मंत्रोपचरांचे सोपस्कार करीत बसायचे? अकलेचे तारे इतरांनी खुप तोडले. पण मग इतका मोठा लेख लिहून दाभोळचे नरेंद्र बापू त्यापेक्षा काय वेगळे करत होते? इतरांच्या हातून सुटलेले अकलेचे तारे तोडायचाच उद्योग त्यांनी सुद्धा केला नाही काय? भोंदू भगताने फ़सलेल्या ताईतावर चिडलेल्या भक्ताला नवा ताईत द्यावा, त्यापेक्षा दाभोळकरांचे प्रवचन वेगळे आहे काय?     ( क्रमश:)
 भाग   ( ६४)    २३/१/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा