आज शाहरुख खान हिंदी सिनेमाचा सुपरस्टार मानला जातो. मग त्याच्यापेक्षा सलमान अधिक कमाई देतो, की आमिरखानचे चित्रपट अधिक गल्ला गोळा करतात, त्याच्यावर तिखटमीठ लावून वाहिन्यांसर वृत्तपत्रातून मोठ्या चर्चा रंगवल्या जातात. त्या शाहरुखला सुपरस्टार किंवा लोकप्रिय करणारे चित्रपट कोणाला आठवतात तरी काय? कुठल्या चित्रपट व कथेसाठी आपण भारतीयांनी या अभिनेत्याला डोक्यावर घेतला, त्याची आठ्वणही नसेल. येणार्या संकटाची चाहुल आधी लागते म्हणतात. पण त्याकडे लक्ष असले तर ना? आपण पेरतो तेच उगवते असे म्हणतात. शाहरुखची लोकप्रियता हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आता त्याला दोन दशकांचा काळ उलटत आला आहे. एक नवी पिढी समोर आली आहे. शाहरुखला डोक्यावर घेणारी तरूण पिढी आता त्याच्याच बरोबर प्रौढत्वाकडे झुकलेली असणार यात शंका नाही. कारण त्या्ची बॉलीवूडमधली कारकिर्द १९९१ च्या सुमारास सुरू झाली. जेव्हा देशात राममंदीर व बाबरी मशीद वाद रंगला होता, तेव्हाची गोष्ट. दुरदर्शनवर प्रायोजित मालिका गाजत होत्या. खाजगी वाहिन्या दार ठोठावत होत्या. त्याच काळात शा्हरुख नावाचा दिल्लीतला तरूण मुंबईत आपले नशीब अजमावायला आला होता. प्रस्थापित अनील कपूर, संजय दत्त, सन्नी देओल वगैरे लोकांच्या गर्दीत आपल्याला संधी शोधत होता. त्याच्यातली गुणवत्ता हेरून यश चोप्रासारख्या यशस्वी निर्मात्याने त्याला संधी दिली. त्यातूनच मग आणखी काही चित्रपट शाकरुखच्या वाट्याला आहे. १९९३-९४ या दोन वर्षात त्याचे लागोपाठ तीन चित्रपट पडद्यावर झळकले आणि कमालीची लोकप्रियता मिळवून गेले. त्यानंतर शाहरुखने मागे वळून बघितले नाही. बघताबघता शाहरूख हिंदी पडद्यावरचा सुपरस्टार होऊन गेला. कुठले होते ते चित्रपट ज्यांनी शाहरुखला अकस्मात लोकप्रियतेच्या कळसावर नेऊन बसवले? आठवत नाही ना?
पहिला होता यश चोप्राचा ‘डर’, दुसरा होता आणखी कोणाचा ‘बाजीगर’ आणि तिसरा होता ‘अंजाम’. लागोपाठच्या याच तीन चित्रपटांनी वेगळ्या कथानकामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि अभिनयाची गुणवत्ता असलेल्या शाहरुखने बॉलिवूडमध्ये चांगलेच पाय रोवले. काय कथानक होते त्या तिन्ही चित्रपटांचे? त्या प्रत्येक चित्रपटात शाहरुख अत्यंत एकांगी व विकृत असा कृरकर्मा रंगवलेला होता. त्याची मध्यवर्ती भूमिका होती आणि तो एकतर्फ़ी प्रेमातून निरागस मुलींचे बळी घेताना दाखवला होता. थोडक्यात खलवृत्तीचा हिरो असेच कथानक असायचे आणि त्यात त्याच्या विकृत पापकर्माचे मानसिक स्पष्टीकरण देऊन उदत्तीकरण करण्यात आलेले होते. मुद्दा त्यात तो शेवटी मारला जातो, किंवा त्याला शिक्षा होते वगैरे नाही. मुद्दा आहे तो अशा मानसिकतेचे पर्यवसान कुठे जाऊन पोहोचते, त्याचे ‘मनोरंजक’ चित्रण या चित्रपटातून करण्यात आलेले होते. हे बघणार्यांसाठी फ़क्त मनोरंजन होते का? केवळ कथानक होते का? अशा कथांचा व दृष्य़ कथेचा; बघणार्यावर कोणता मानसिक प्रभाव पडतो, याचा विचार तरी कोणी केला होता काय? सिनेमा बघायला लोक केवळ मनोरंजनासाठी जातात हे मान्य करायला हवे. पण तिथे केवळ मनोरंजन होते, असेही मानण्य़ात अर्थ नाही. त्या कथेचा व त्यातल्या दृष्य़ाचा सुप्त मनावर काही प्रभाव पडत असतो. मनोविकारांवर प्रभाव पडत असतो. थोडक्यात कथा सांगणारा नेहमी ऐकणार्या वा बघणार्याच्या तरल मनावर काही परिणाम साधायचा हेतू बाळगूनच कथा सांगत असतो, दाखवत असतो. एकप्रकारे जे प्रमुख पात्र त्यात असते, त्याचे उदात्तीकरण त्यातून होत असते. शाहरुखच्या त्या तीनही चित्रपटात मुलींवर अत्याचार करणार्या प्रवृत्तीचे उदात्तीकरण झालेले आहे. आणि आपल्याला ती कथा आवडली, त्यातल्या भूमिका आवडल्या, त्या रंगवणारा आवडला, म्हणजे नेमके काय झाले होते? आपल्याला एकतर्फ़ी प्रेमातून अत्याचार करणार्या व्यक्तीमत्वाचा राग यायला हवा, त्याऐवजी तोच लोकांना आवडू लागतो; तेव्हा मग मुलींवर अत्याचार करण्याचेच उदात्तीकरण होत असते
शाहरुखचे हे चित्रपट आले त्याच्या दीडदोन वर्षे आधी, इथे आपल्या महाराष्ट्रात काय घडले होते, तेही आज आपल्याला आठवणार नाही. १९९३ सालात शाहरुखचे चित्रपट पडद्यावर येऊ लागले, त्याच्या दोनच वर्षे आधी मुंबई नजिकच्या उल्हासनगर या शहरात दहावीच्या परिक्षा केंद्रात रिंकू पाटिल नावाची मुलगी पेपर लिहायला गेली होती. तीन गुंड तिथे घुसले आणि त्यांनी वर्गातल्या बाकीच्या परिक्षार्थींना बाहेर हाकलले आणि तिच्यावर त्याच वर्गात रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. अवघा महाराष्ट्रच नव्हे तर देश त्या बातमीने हादरला होता. हरीश पटेल असे त्या गुंडाचे नाव होते. तो भुरटा गुंड होता आणि रिंकूवर त्याचे एकतर्फ़ी प्रेम होते. ती आपल्याला दाद देत नाही म्हणून तो तिला धमक्या द्यायचा. मारून टाकायच्या, पळवून न्यायच्या धमक्या द्यायचा. तरी तिने दाद दिली नाही, म्हणून त्याने आपली धमकी खरी करून दाखवली. तिला परिक्षा केंद्रातच जिवंत जाळली. महिनाभर तरी ती बातमी मराठी वृत्तपत्रात गाजत होती. आणि प्रत्येक पालक व माणूस हळहळला होता. नागरिक प्रक्षुब्ध झाले होते. तेव्हाचे गृहराज्यमंत्री अरुण मेहता यांच्यासह विरोधी पक्षनेते असलेले मनोहर जोशी उल्हासनगरला गेले होते. रिंकूच्या पालक व स्थानिक नागरिकांचे सांत्वन करायला सरकारला तिथपर्यंत धाव घ्यावी लागली होती. कारण असला प्रकार कधी कोणी ऐकला नव्हता, की पाहिला नव्हता. त्याची थरारकता विसरता येत नव्हती. पण अवघ्या दोनच वर्षात ‘डर’ ‘बाजीगर’ असे चित्रपट आले आणि त्यात रिंकू पाटिल हत्याकांडाचे उदात्तीकरण कथानकातून करण्यात आलेले होते. मग रिंकूला विसरून आपण तिला मारणार्या हरीश पटेलच्या उदात्तीकरणाला टाळ्या वाजवल्या. हरीशची भूमिका करणार्या शाहरुखला आपण डोक्यावर घेतला. त्यानंतर गेल्या दोन दशकात किती मुलींना अशा एकतर्फ़ी प्रेमाचे बळी व्हावे लागले आहे? त्याची काही मोजदाद आहे काय? आपल्याला शाहरुख नव्हे रिंकूला जाळणारा हरीश पटेल आवडला होता ना?
खरेच चित्रपटाचा वा त्यातल्या कथानकाचा समाज मनावर इतका विपरीत परिणाम होत असतो काय? चित्रपटात दाखवले म्हणून तसा गुन्हा वा मुर्खपणा माणुस करू शकतो काय? अनेकदा याची चर्चा झालेली आहे. पण त्याच्या तपशीलात जाण्यापेक्षा काही छोटे मुद्दे बघता येतील. शाहरुख वा अन्य कुठल्या चित्रपटातला हिरो वा हिरोईन जशी वेशभूषा करतात, त्याची नक्कल सहजगत्या होते की नाही? विचित्र वाटणारे कपडे त्यांनी घातले वा चमत्कारिक वाटतील असे केस राखले, कापले असतील, तर तसेच करणारे कित्येक आढळतात ना? ते कसे घडते? अगदी अनवधानाने घडते ना? चित्रपटाचा प्रेक्षकाच्या मनावरचा प्रभाव तपासण्याचा आणखी एक मार्ग आहे. अमिताभ वा राजेश ख्नन्ना लोकप्रिय असताना त्यांच्याप्रमाणे कान केसाखाली झालण्याची स्टाईल सर्वत्र पसरली होती. आज तिचा मागमूस दिसतो काय? आज शाहरुख वा अन्य कुणाच्या स्टाईलने केस विस्कटलेले राखले जातात. जे तेवढ्या चित्रपटासाठी शाहरुख वा आमिरने वेशभूषा म्हणून केलेले असते, तेच कित्येक लोक प्रत्यक्ष जीवनात नित्याची बाब म्हणून करत असतात. तेव्हा चित्रपटातून दाखवले जाते ते मनोरंजन उरत नाही. आता तर त्यांनाच घेऊन माल खपवणार्या जाहिराती झळकत असतात. म्हणूनच असे चित्रपट, त्यांच्या कथा समाजमनावर कोणते प्रभाव पाडतात, त्याला महत्व आहे. शाहरुखचे तेच प्रारंभीचे तीन चित्रपट म्हणूनच नुसते मनोरंजक नव्हते, तर समाजातल्या आत्मकेंद्री मुखदुर्बळ तरूणांना त्यांच्या इच्छा दुसर्यावर लादण्याची प्रेरणा देणारे संदेश होते. मुलगी आपल्याला आवडली, मग ती आपली झाली, त्यात तिच्या मताला वा इच्छेला कवडीची किंमत नाही, अशी मानसिकता घडवण्याला त्या चित्रपटाच्या लोकप्रियतेने हातभार लावला. त्याचेच मग दुष्परिणाम पुढल्या दोन दशकात जागोजागी घडत गेले. एकतर्फ़ी प्रेमाची प्रकरणे मोठ्या शहरातून सांगली वा जळगाव अशा दुय्यम शहरे व गावापर्यंत जाऊन पोहोचली. वयात येणार्या तरूणाची मानसिकता अस्थिर व चंचल असते. अंगात नवी मस्ती संचारत असते. जग जिंकण्याचे मनसुबे उसळी मारून वर येत असतात. नेमक्या त्याचवेळी आसपासचे वास्तव त्याला रोखुन धरत असते. ते वास्तव झुगारण्याची अनिवार इच्छा उफ़ाळून येत असते. त्यांच्यासाठी काय करायचे त्याचा वस्तूपाठच शाहरुखच्या तिन्ही चित्रपटांनी घालून दिलेला होता. कॉलेज वा शाळेतील मुले-मुलीच नव्हे तर अगदी खेड्यातल्या मुलांमध्येही मग एकतर्फ़ी प्रेमाच्या रक्तरंजित कहाण्यांचे पेव फ़ुटले. त्याला आपण जबाबदार नव्हतो? आपण शाहरुखला डोक्यावर घेण्याचा अशा महिला विरोधी गुन्ह्याशी नेमका काय संबंध असतो? ( क्रमश:)
only on main SRK sir ki movies degta hau.
उत्तर द्याहटवाSRK is globalstar hero.
SRK sir ki movies world main All Time Blockbuster hoti hai.
srk king of the world
Srk king bing kahi nahi to tar 1 actor.
उत्तर द्याहटवा