दिल्लीतल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेला त्यानंतर उफ़ाळलेल्या संतापाच्या लाटेने इतकी प्रसिद्धी मिळाली की माध्यमांना त्या विषयातून बाहेर पडायची इच्छाच होत नव्हती. मग त्याबद्दल जो कोणी बोलेल, त्यालाच माध्यमाच्या बातम्यांमध्ये प्रसिद्धी मिळत असते. आणि ज्यांना प्रसिद्धी हवी असते, अशी माणसेही हुशार असतात. ती त्याच बाबतीत बोलून आपल्यावर प्रसिद्धीचा झोत ओढवून घेत असतात. जर कोणी त्याबद्दल बोलले नाही, तर पत्रकार त्याचा पिच्छा पुरवून त्याला बोलायला भाग पाडतात. मग त्याला त्याबद्दल काही माहिती असो किंवा नसो. उदाहरणार्थ राज ठाकरे यांनी बिहारी वा उत्तर भारतीयांच्या विरोधात आंदोलन छेडले असताना आमिरखान किंवा सचिन तेंडूलकर यांचे त्याबद्दलचे मत विचारणारा मुळात बेअक्कल असतो. कारण ही माणसे अशा विषयातली जाणकार नाहीत. कारण मुंबई कोणाची वा मुंबईत येणारी गर्दी, त्यांच्या वाट्याला येतच नसते. ते सामान्य नागरिकांपासून अलिप्त कोंडवाड्यातले जीवन जगत असतात. मुंबईची वाढती लोकसंख्या हा विषय ज्यांच्या अभ्यासाचा वा चिंतेचा असतो, त्यांचेच अशा विषयातील मत महत्वाचे असते. कारण आमिर वा सचिन जे मत व्यक्त करतील, ते ग्राह्य धरून धोरण राबवले गेले, तर त्यातुन निर्माण होणार्या समस्यांचे निराकरण करायची कुठली जबाबदारी त्यांच्यावर नसते. त्यामुळे कुठल्याही विषयावर मतप्रदर्शन करण्यात त्यांचे काही जात नाही, की जबाबदारी त्यांच्यावर येत नाही. परंतू माध्यमांना असा खुळेपणा करावाच लागत असतो. चोविस तास वाहिन्या चालवायच्या, तर काहीतरी दाखवायला हवे आणि खुसखुशीत असायला हवे. त्यामुळे वादग्रस्त ठरेल असे शोधावे लागते अन्यथा निर्माण करावे लागते.
तर अशा या वादाच्या काळात आसाराम बापू, अनिरुद्ध बापू, संघचालक मोहन भागवत, कुठल्या पक्षांचे लहानमोठे नेते इत्यादिंनी आपापले मतप्रदर्शन केले होते. मग त्यांची मते पुढे करून त्यांना मुर्ख किंवा आरोपी ठरवण्याची जंगी स्पर्धा सुरू झाली. इतके पोषक वातावरण तयार झाले; मग काही ‘नेहमीचेच यशस्वी’ कलाकार असतातच. तसे त्यात अंधश्रद्धा निर्मूलनवाले दाभोळकर नरेंद्र बापू घुसले तर नवल कुठले? अर्थात त्याबद्दल माझी तक्रार नाही. पण ज्या शब्द, वाक्ये वा मुद्दे यासाठी अशा बापू व बुवांना ओलिस ठेवण्याची स्पर्धा लागली होती; त्यांनी एका अत्यंत व्यक्तीकडे साफ़ दुर्लक्ष करावे हे धक्कादायक होते. त्या व्यक्तीचे नाव सिंधूताई सकपाळ असे आहे. त्यांनीही अंगप्रदर्शन व अपुरे कपडे बलात्काराचे कारण असल्याचे व महिलांनी अंगभर कपडे घालण्याचे आवाहन त्याच दरम्यान केले होते. किंबहूना बाकीचे बुवा, बापू तसे बोलण्याआधी सिंधूताईंनी आपले मतप्रदर्शन केले होते. पण त्यावरून कोणा पत्रकार वा माध्यमाने काहूर माजवले नाही. जणू ही सगळी मंडळी बापू, बुवा बोलण्याच्या प्रतिक्षेत होती. म्हणजे काय बोलला याला महत्व नव्हतेच. कोण बोलला याला महत्व होते. सिंधूताई सकपाळ समाजसेविका असल्याचे डंके ज्यांनी दिर्घकाळ पिटलेले आहेत, त्यांचे विधान आक्षेपार्ह असले तरी त्यातून सेक्युलर धर्मनिरपेक्षता सिद्ध होणार नव्हती ना? त्यामुळेच माध्यमे मुघ गिळून गप्प बसली. निव्व्ळ बातमी देऊन विषय संपला. पण तशाच पद्धतीचे विधान संघ वा बापू यांच्याकडून होताच आभाळाचा सर्व भार पेलणारा सेक्युलर खांबच उखडला गेला आणि आभाळ कोसळले.
भागवत यांनी इंडियात बलात्कार होतात व भारतात होत नाहीत असे म्हटले. म्हणजे काय तर पुढारलेल्या फ़ॅशनेबल तरूणी जे अंगप्रदर्शन करतात, त्यातून चिथावण्या दिल्याप्रमाणे कामुकतेला प्रोत्साहन दिले जाते; असेच त्यांना सुचवायचे होते. तसे ग्रामीण भागात होत नाही, तर शहरी भागात होते. शहरे म्हणजे इंडिया व भारत म्हणजे ग्रामीण अशी विभागणी त्यांनी केली. हे मलाही मान्य नाही. पण जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला; तोच सिंधूताई सकपाळ यांनीसुद्धा केलाच होता ना? मग सेक्युलर माध्यमांना तेव्हाच तो का उचलून धरता आला नाही? आणि तेव्हा उचलला नसेल तर भागवत यांच्यावर झोड उठवताना सिंधूताई देखिल असेच बोलल्या; याचे नवल का विचारले गेले नाही? याचा अर्थच सरळ आहे, की कोण काय म्हणाले यानुसार चुक वा गुन्हा ठरत असतो. काय बोलला वा काय केले ते दुय्यम आहे. सिंधूताई बोलल्या तर बिघडत नाही. संघाचा कोणी बोलला मग भयंकर मुर्खपणा होत असतो. याला न्याय म्हणत नाहीत की पत्रकारिता व विवेकबुद्धी म्हणत नाहीत. त्याला बदनामीची मोहीम म्हणतात. आणि त्यावर भाष्य़ करायला पुन्हा दाभोळचे नरेंद्र बापू आणायचे. आसाराम बापू किंवा अनिरुद्ध बापू यांनी कुठले स्तोत्र म्हणून वा राखी बांधून बलात्कार रोखता येतो असे खुळचट विधान केले. त्यात तथ्य नाही तर शुद्ध मुर्खपणा आहे, हे मान्यच करायला हवे. कारण बापू वा बुवांना काय वाटते; त्याच्याशी संबंध नसून ज्या मुलीला अशा घटनेचे परिणाम भोगावे लागतात, त्या मुलीच्या अनुभवाला प्राधान्य आहे. मग बापूच्या स्तोत्रात वा धर्माच्या ग्रंथात कोणते शब्द आहेत, त्याला काडीमात्र अर्थ नाही. अर्थ असतो, तो त्या शब्दांच्या परिणामाला. वास्तव जीवनातील त्याच्या परिणामाला महत्व असते, कारण ते परिणाम कोणाला तरी भोगावे लागत असतात, इजा करून जात असतात किंवा त्याच्या जीवाशी खेळणारे असतात. त्यामुळेच अशी स्तोत्रे म्हटल्याने कुणावर होणारा बलात्कार थांबला किंवा गंडादोरा बांधल्यामुळे बलात्कार रोखला गेल्याचे कोणाच्या अनुभवात नाही की ऐकीवात नाही. म्हणूनच ती स्तोत्रे व ग्रंथ अशा विषयात निकामी आहेत; यात शंकाच नाही, त्यावर विश्वास ठेवणेही मुर्खपणाच आहे. नुसता मुर्खपणा नव्हेतर अंधश्रद्धाच आहे याबद्दलही वाद होण्याचे कारण नाही.
पण अशा शब्द, स्तोत्रे व ग्रंथांवर ‘डोळे झाकून’ विश्वास ठेवायला सांगणारे बुवा, बापू जर भंपक असतील तर तशाच निरर्थक, निकामी शब्द व ग्रंथावर तसाच आंधळा विश्वास ठेवायला भाग पाडून; मुली महिलांना बलात्काराच्या कराल दाढेत ढकलणारे दुसर्या बाजूचे जे सेक्युलर धर्मनिरपेक्ष महंत बापू आहेत, त्या मुर्खांचे काय करायचे? दिल्लीत ज्या मुलीला अशा सामुहिक बलात्काराच्या भीषण अनुभवातून जावे लागले; तिने कोणा बापू बुवाचा गंडादोरा बांधला नव्हता, की कुणा महाराजाने सांगितलेल्या स्तोत्राचे पठण केले नव्हते. तर तिने मी सांगतो, त्या सेक्युलर बुवबाजीवर आंधळा विश्वास ठेवला होता. त्यातूनच तिला अशा नरकवासातून जायची पाळी आली, हे सत्य कोणी नाकारू शकणार आहे काय? अशा कोणत्या अंधश्रद्धेबद्दल मी बोलतो आहे? पहिली अंधश्रद्धा म्हणजे आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. आपल्या देशात पोलिस आहेत. गुन्हेगारीचा कायद्याने बंदोबस्त केला जातो, कायदा मोडणार्याला कायद्यानुसार शिक्षा होते. कायद्याचे राज्य असल्याने नागरिक सुरक्षित आहेत. अशा शेकडो अंधश्रद्धा आहेत, आणि त्याच अंधश्रद्धेने त्या मुलीचा बळी घेतला. दिल्लीमध्ये कायदा सुव्यवस्था भक्कम आहे, असा दावा सातत्याने करणारे सरकार आणि कायद्यानेच प्रत्येक गोष्ट व्हायला हवी असा आग्रह धरणारे सगळे पुस्तकातल्या शब्दांचेच महात्म्य सांगत असतात ना? कायद्याच्या पुस्तकातले व विधीमंडळाने संमत केलेले शब्द अत्यंत प्रभावी असल्याचा दावा कोणा आसाराम वा अनिरुद्ध बापुचा नाही ना? मग जेवढी त्यांची स्तोत्रे निकामी आहेत, निष्प्रभ आहेत, त्यापेक्षा हे संमत होऊन पुस्तकात छापलेले कायद्याचे शब्द निकामीच नाहीत का? कारण ती मुलगी किंवा तशा बलात्कार विनयभंगाच्या बळी होणार्या मुली महिला, त्याच कायद्याचा धावा अहोरात्र करीत असतात. त्यावेळी कधी व कुठला कायद्याचा शब्द, स्तोत्र, मंत्र त्यांच्या मदतीला धावून आला आहे?
कायदा नावाचे जे काही थोतांड या देशात आहे, त्याने आपला चमत्कार कधी दाखवला आहे? तसे असते तर त्याच थोतांडाच्या विरोधात लाखोंच्या संख्येने लोक दिल्ली वा अन्यत्र रस्त्यावर का उतरले असते? दिल्लीतला सामुहिक बलात्कार हा नुसताच गुंडगिरीचा बळी नाही. तो कायदा नावाच्या एका भीषण अंधश्रद्धेचा बळी आहे ना? आणि अशा त्या अंधश्रद्धेच्या जंजाळात सामान्य जनतेला गुंतवणारे कोण आहेत? कोणी आसाराम बापू, अनिरुद्ध बापू किंवा धर्ममार्तंड नाहीत. जर बापू सांगतो त्या स्तोत्राच्या फ़ोलपणावर आमचे पत्रकार माध्यमे व विद्वान हिरीरीने तुटून पडले, तर त्यापैकी कोणालाच कायद्याच्या भीषण अंधश्रद्धेकडे डोळसपणे का बघता आलेले नाही? दाभोळचे अंधश्रद्धा निर्मूलन नरेंद्रबापू त्याच पीठाचे शंकराचार्य आहेत ना? इतके शेकडो कायदे निकामी होऊन पडले असताना त्यांना आणखी एक कायदा पाहिजे आहे. त्यांना कायदेबापूच्या तावडीतून कोणी सोडवायचे? ( क्रमश:)
भाग ( ६१) २०/१/१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा