भास्कर जाधव या आपल्याच पक्षाच्या नवख्या व तरूण मंत्र्याला फ़ैलावर घेणार्या राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष शरद पवारांना सोनेरी शर्ट घालणारा दत्ता फ़ुगे नावाचा आपलाच एक निष्ठावंत ठाऊकच नाही काय? राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या या कार्यकर्त्याची जागतिक किर्ती कशामुळे झाली, तेही पवारांना ठाऊक नसेल काय? खुप जुनी गोष्ट नाही. दोनच महिन्यांपुर्वी आधी मराठीत व मग अन्य भाषा माध्यमातून दत्ता फ़ुगे हा पुण्यातला राष्ट्रवादी कार्यकर्ता जगभर फ़ेमस झाला. त्याचे कारण जगाचे डोळे दिपवणारा तो सोन्याचा माणूस झाला होता. तब्बल साडेतीन किलो वजनाचा सोन्याचा शर्ट त्याने बनवला आणि परिधान करून जगाचे डोळेच दिपवले होते. अशी कुठली वाहिनी वा वृत्तपत्र नसेल, की तिथे दत्ता फ़ुगे आपल्या सोन्याच्या शर्टासह झळकला नाही. मग त्या कालखंडात पवारांना गाढ झोप लागली होती काय? दोनचार दिवस सर्वत्र चर्चा चाललेल्या आपल्याच कार्यकर्त्याचा हा पराक्रम त्यांना कसा दिसला नाही? की मंत्री वा आमदारापुरताचा त्यांच्या झोपेचा नियम लागू आहे? दत्ता फ़ुगे हा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील एका नगरसेविकेचा पति आहे. पावणे दोन लाख रुपये खर्चून त्याने पुण्याच्या विख्यात ज्वेलर्सकडून हा सोन्याचा शर्ट बनवून घेतला व प्रसिद्धी मिळवली. ही बातमी गेल्या गेल्या डिसेंबर अखेर बहुतांश वृत्तपत्रतून झळकली होती. पण तेव्हा पवारांची नाराजी वगैरे कोणाच्या कानावर आली नव्हती. मग हे पैशाचे ओंगळवाणे प्रदर्शन नव्हते, फ़क्त लग्नाच्या जेवणावळीच उधळपट्टी असते; असे मानायचे काय? एका नगरसेविकेचा पति जर अशी सोन्याची वस्त्रे परिधान करीत असेल; तर आमदाराने काय करावे आणि मंत्र्याने त्याच्याही पुढे जायला नको का? मग या दोन महिन्यांच्या प्रदिर्घ काळात पवारसाहेब शांत का झोपत होते? की आता वेगळ्याच कारणाने झोपमोड झाली आणि त्यांनी भास्कर जाधवांचा बळी देण्याचा पवित्रा घेतलेला आहे? झोपमोडीचे कारण उधळपट्टी असावे, हे अजिबात पटणारे नाही. ते भलतेच काही असावे अशी म्हणूनच शंका येते. शिवाय त्यांच्या व अजितदादांच्या भूमिकांमधला विसंवादही त्याच संशयाला खतपाणी घालणारा आहे.
गेल्या काही महिन्यांपासून, की वर्षांपासून पवारांची झोप उडाली आहे असे वाटते. अजितदादा पवार यांनी आपला उपमुख्यमंत्री होण्याचा अट्टाहास पुर्ण केला, तेव्हापासून पवारांची झोप उडाली आहे काय? दिवसेदिवस पक्षावर अजितदादांनी आपली हुकूमत प्रस्थापित केल्याचा विपरित परिणाम थोरल्या पवारांच्या झोपेवर झाला आहे काय? कारण अशोक चव्हाणांना ‘आदर्श’ प्रकरणात जावे लागल्यावर ज्या पद्धतीने दादांनी भुजबळांना बाजूला करण्य़ाचा डाव खेळला होता, तो खरेच पवारांची झोप उडवणारा होता. त्यानंतरच देशात प्रथम एक नवा पायंडा पवारांनी निर्माण केला. आजवर तमाम राजकीय पक्षाच्या युवक शाखा होत्या. त्यातच युवतींचाही समावेश होत असे. शिवाय वेगळी महिला शाखाही असायची. पण कुठल्याही पक्षात युवती शाखा वेगळी असल्याचा इतिहास नाही. पवारांनी आपल्या कन्येसाठी युवती राष्ट्रवादी कॉग्रेस जन्माला घालून त्याच्या राज्यव्यापी शाखा काढायचा सपाटा लावला होता. ती प्रत्यक्षात युवती संघटना आहे; की अजितदादांना शह देणारी वेगळी पर्यायी संघटना आहे? गेल्या पाच वर्षात अजितदादांनी महाराष्ट्रात व पक्षात जी आपली हुकूमत निर्माण केली, तेच पवारांना आव्हान वाटू लागले आहे काय? अन्यथा त्यांच्यात आणि पुतण्यात विसंवाद सतत का वाढत चालला आहे? दादांनी राजिनामा दिला, तेव्हा पक्षाचे सर्व मंत्री व आमदारही दादांच्या बाजूने उभे राहिले होते. पण पवारांनी राजिनामा मंजूर करण्याचा पवित्रा घेऊन सर्व आमदार मंत्र्यांना गप्प बसवले होते. मग एकेदिवशी थेट दादा पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. मध्यंतरी काय घडले? पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनापासूनही दादांना दूर ठेवण्यात आलेले होते. त्यांचा चेहराही अधिवेशनात कुठे दिसू नये याची काळजी घेण्यात आली. इतकेच नव्हेतर तिथे सर्वत्र पवार व सुप्रिया यांचेच चेहरे झळकत होते. जणू दादा नावाचा पवारांचा कोणी वारसच नाही, असे त्या पक्ष अधिवेशनातले चित्र होते. तरीही दादा पुन्हा मुसंडी मारून मंत्रिमंडळात आले आणि अजून त्याचीच बोचणी झोप लागू देत नाही काय?
अशा अन्य संदर्भात भास्कर जाधवांच्या शाही विवाहाकडे बघण्याची गरज आहे. यात कोण दादांच्या गटातला आहे आणि कोणावर बालंट आणले गेले, याचाही विचार होण्याची गरज आहे. ज्या दादांकडे जलसंपदा खाते आहे, त्याच्याशी संबंधित ठेकेदाराला विवाह खर्चाबद्दल गोवण्यात आलेले आहे. मग ही सगळी झोपेची खेळी की गोळी अजितदादांसाठी आहे काय; असाच प्रश्न पडतो. दादांच्या निष्ठावंत व निकटवर्तियांना पक्षातली व सार्वजनिक जीवनातील त्यांची खरी जागा दाखवून देण्यासाठी पवार साहेबांचे हे ‘जागरण’ सुरू झाले आहे काय? खरी खेळी तीच दिसते आहे. भास्कर जाधव यांच्यावर पवारांचे घसरणे, हे प्रत्यक्षात अजितदादांच्या निष्ठावंतांना दिलेला संकेत असू शकतो. खुलेआम आपल्या शत्रूला किंवा प्रतिस्पर्ध्याला जागवून अंगावर घेण्याचे पवारांचे तंत्र कधीच नव्हते. नेहमी दुसर्यांना गाफ़ील पकडून त्यांच्यावर वार करणे, घाव घालणे अशीच पवारनिती राहिली आहे. आतासुद्धा बीडचे जिल्हाधिकारी यांच्या बदलीचे निमित्त होऊन अचानक वादळ लागोपाठ उठलेले आहे. त्यात कोण फ़सले आहेत बघा. कोणावर त्या बदलीचे खापर फ़ोडले जात आहे? बीडचे दादानिष्ठ आमदार व मंत्री यांनाच असा कर्तबगार जिल्हाधिकारी नको आहे; कारण तो राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराला निपटून काढणारा आहे, असा गवगवा सुरू झाला आहे. भास्कर जाधव प्रकरण सुरू असतानाच बीडच्या दादानिष्ठांवर आणखी एक बालंट आणले गेले आहे. याच बीड जिल्ह्यात दादांनी भाजपाचे वरिष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांच्या पुतण्याला फ़ोडून मोठी बाजी मारली होती. तिथे आता नेमक्या त्यांच्याच विश्वासू सवंगड्यांवर आरोप सुरू झाले आहेत. दादांच्या विरोधातल्या या राजकारणाचा आरंभ काकांच्या झोप उडण्यातून व्हावा, हा निव्वळ योगायोग मानायचा काय? जाधवांच्या लग्नाची नाराजी संपण्याआधीच चि्चवडच्या दादानिष्ठ अपक्ष आमदाराच्या जेवणावळीच्याही बातम्या झळकल्या होत्या. त्याच दरम्यान नव्या मुंबईतील उपमहापौराच्या विवाह सोहळ्याचाही लगेच गाजावाजा झाला. हे सगळेच नेमके दादानिष्ठ निवडून काढलेले असावेत, हा कितीसा योगायोग आहे? की दादांना त्यांची पक्षातील व महाराष्ट्रातील खरी जागा दाखवून देण्याचा प्रयत्न चालू आहे?
अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये आपल्या महत्वाकांक्षा कधी लपवल्या नाहीत. त्याचवेळी त्यांनी श्रीमंती वा भपकेबाज कार्यक्रमांबद्दल कधी लाज बाळगली नाही. पैसेवाले व प्रसंगी गुंडगिरी करू शकणार्यांचा गोतावळा भोवती असण्याची खंत बाळगली नाही. ती दादांची स्टाईल आहे. पण थोरल्या पवारांना ती मंजूर नसली, तरी आज स्वबळावर राजकारण करू लागलेल्या दादांना त्याची पर्वा नाही. आणि तेच बहुध पवारांच्या झोप उडण्याचे खरे कारण आहे. पण त्याला पायबंद कसा घालायचा व शह कुठे द्यायचा; त्याचा गोंधळ उडालेला आहे. थेट डाव खेळणे हा पवारांचा कधीच स्वभाव नव्हता. अगदी स्वत: तरूण असतानाही पवार नेहमी कुटील नितीचाच वापर करत आलेले आहेत. गोड बोलून केसाने गळा कापणे असे म्हणतात, ती पवारांची राजनिती राहिली आहे. ती अशी आपल्याच घरच्यांमध्ये वापरली जाईल अशी कोणी अपेक्षा बाळगत नाही. पण शेवटी राजकारणात आपला परका असे भेदभाव करून चालत नाही. जिथे डोईजड होते, तिथे तुकडा पाडावाच लागतो. तशी वेळ शरद पवार यांच्यावर आली आहे काय? की सुप्रियाला आपला वारस नेमण्यातल्या अडचणी दूर करण्याचे डावपेच सुरू झाले आहेत? तोंडाने जा किंवा बाजूला व्हा; म्हणायचे नाही, पण समोरच्यावर तशी पाळी आणायची, यालाच राजकारण म्हणत असतात. आणि ते साधण्यासाठी शरद पवार नेहमी आडवाटेने खेळी करत आलेले आहेत. पितृतुल्य यशवंतराव चव्हाण किंवा वसंतदादा पाटील अशा बड्यांना त्यांनी अशाच खेळीत गुंतवून नामोहरम केले होते, तर त्यांच्याच आशीर्वादाने व कृपेने राजकारणात जम बसवलेल्या पुतण्याला त्याच औषधाची चव चाखायची वेळ पवारांनी आणली तर आश्चर्य मानायचे कारण नाही. अर्थात त्यासाठी आपल्याला काही वर्षे तरी ह्या रहस्याचा उलगडा व्हायला वाट पहावी लागेल. आजच्या घडामोडींचे परिणाम दिसतील, तेव्हाच भास्कर जाधव किंवा अनेकांना पवार साहेबांची झोप कशामुळे उडाली होती, त्याचा पत्ता लागू शकेल. तोपर्यंत आपल्याला नुसते डोळे चोळत जागरण करण्याखेरीज गत्यंतर नाही. कारण पवारांचे सुशिलकुमार शिंदे यांच्यासारखे नाही, की झटपट खरे सांगुन माफ़ी मागुन मोकळे व्हावे. शिंदेसरकारांच्या माफ़ीनाम्याचे रहस्य उद्या बघू. ( क्रमश:)
भाग ( ९३ ) २२/२/१३
वा भाऊ फार सुंदर विश्लेषण ... काकांना पुतण्याने 'वाचवा' म्हणून इतिहासात हाक दिली होती...
उत्तर द्याहटवाइथे पुतण्याने काकांना 'मला वाचव' म्हणायची पाळी आणली जात आहे. किती ही झाले तरी शरदराव आता अस्ताचलाचे नायक आहेत. वय व शरीर स्वास्थ्य त्यांच्या विरोधात आधीच आहे . शिवाय घरोब्यातील लोकांची अरेरावी आता त्यांना 2014 पर्यंत ऐकून घ्यावी लागणार... तिकडे करुणानिधींवर 'करुणाजनक' प्रसंग पुत्रांनी हमरी तुमतीवर येऊन आणला आहे... त्यावर आपले भाष्य वाचायला आवडेल...
साहेब,
उत्तर द्याहटवासाडे तीन किलो सोन्याच्या शर्ट ची किंमत १ कोट पेक्षाही जास्ती होती