रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

शरदाच्या चांदण्याला झोप का ग येत नाही
  श्रद्धा, अंधश्रद्धा किंवा दहशतवाद हे शब्द हल्ली आपण खुपच ऐकत असतो. पण कधीतरी साकल्याने त्यांचा मानवी जीवनातील संबंध व प्रभाव आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? त्यांचा मानवी जीवन घडवण्या विघडवण्यातला घनिष्ट संबंध असतो. माणूस आपल्या शारिरीक यातना, वेदना किंवा इजा यापेक्षाही आपल्या श्रद्धांना अधिक जपत असतो. त्याच्या पलिकडे गेल्याखेरीज तुम्हाला विज्ञाननिष्ठ, विवेकनिष्ठ वगैरे होणे शक्य नसते. त्यामुळेच अगदी विज्ञाननिष्ठ व बुद्धीवादी देखील अनेकदा एखाद्या अंधश्रद्ध भक्तांसारखे वागताना दिसतात. कुण्या बुवा बापूच्या भक्ताने आपल्या परम पूजनीय दैवताचा विवेक सोडून बचाव करावा; तसे तर्कहीन युक्तिवाद असे बुद्धीवादी करताना दिसतील आणि तसे करताना ते अप्रामाणिक असतात, असे मी म्हणणार नाही. ते श्रद्धेच्या आहारी गेल्यानेच तसे अविवेकी होत असतात. शनिवारची गोष्ट आहे, सर्वच वृत्तपत्रात व वृत्तवाहिन्यांवर चिपळूणचे आमदार व राज्याचे एक मंत्री भास्कर जाधव यांच्या मुलाच्या शाही विवाह सोहळ्याच्या बातम्या गाजत होत्या. त्यापेक्षा त्याबद्दल त्यांचे पक्षाध्यक्ष व केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्या उधळपट्टीबद्दल व्यक्त केलेल्या नाराजीने तो विवाह सोहळा अधिक गाजला. आपण आपल्या एकूलत्या एक मुलीचा विवाह किती साधेपणाने साजरा केला होता, त्याची आठवण सांगुन पवारांनी आपल्याच पक्षाच्या एका मंत्र्याच्या उधळपट्टीवर जाहिर नाराजी व्यक्त केली. त्याचा गाजावाजा चालू होता. राज्यामध्ये दुष्काळ असताना आणि नसला तरी; असे पैशाचे ओंगळवाणे प्रदर्शन निषेधार्ह आहे, अशी पवारांची प्रतिक्रिया सामान्यत: कोणालाही भारावून टाकणारीच होती. पण ती कितपत प्रामाणिक आहे; याचा तपासच करू नये काय? आपल्या बुवा बापूंच्या थोरवीबद्दल तपास केलेला त्यांच्या भक्तांना आवडत नाही, तसेच हल्ली अनेक राजकीय, सामाजिक नेते, पुढार्‍यांच्या बाबतीत झालेले आहे. त्यामुळेच माझ्या फ़ेसबुकवरील मित्रयादीतील काही पवार भक्तांच्या श्रद्धा दुखावण्याचा प्रमाद माझ्याकडून घडला. झाले असे, की पवारांची प्रतिक्रिया कितीही भारावून सोडणारी असली तरी ती दिखावू होती, याबद्दल माझ्या तरी मनात शंका नव्हती. कारण परिणाम साधण्यासाठी पवार कधीकधी बेधडक खोटे बोलतात किंवा लोकांची दिशाभूल करीत असतात. हा माझा आरोप नाही. त्यांनीही तसे अनेकदा स्पष्टपणे सांगितलेले आहे. त्यामुळेच भास्कर जाधव यांनी योजलेल्या शाही विवाह सोहळ्याबद्दलची पवारांची प्रतिक्रिया, मला दिखावू वाटली. त्याचेही कारण आहे. पवारांना ते खरेच आवडले नसेल तर त्यांनी मुलभूत प्रश्नाला का हात घातला नाही?

   त्यांनी पैशाच्या उधळपट्टी व प्रदर्शनावर संताप व्यक्त केला आणि तो सोहळा टिव्हीवर बघून आपल्याला झोप लागली नाही, इतके टोकाचे विधान केले. मग प्रश्न असा पडतो, की इतका खर्च आपला एक आमदार मंत्री करतो, तो ओंगळवाणा असेल, तर तो पैसा त्याने उधळायला आणला कुठून; असा प्रश्न पवारांना का पडला नाही? जो कनिष्ठ मंत्री लग्नात इतका पैसा उधळू शकतो, त्याच्यापाशी आणखी किती पैसा असेल आणि त्याने तो कुठल्या मार्गाने मिळवला; असा प्रश्न पवारांच्या मनात का आला नाही? नुसत्या खर्च व उधळपट्टीने झोप उडाली असेल; तर इतका अगणित पैसा मिळवण्याच्या मार्गाच्या नुसत्या विचारानेच पवारांना निद्रानाशाचा विकार जडायला नको काय? पण तसे काही झालेले नाही. त्यांनी चुकूनही त्या मंत्र्याच्या उत्पन्नाचा मार्ग कुठला याबद्दल शंकाही उपस्थित केलेली नाही. तेवढेच नाही, गेले काही महिने राज्यात दुष्काळ आहे आणि त्याला कारणीभूत असलेल्या सिंचन घोटाळ्यात अब्जावधी, हजारो को्टी रुपयांचा अपहार झाल्याचे आरोप झालेले आहेत. पण त्यातून पवारांची झोप उडाल्याचे वा त्यांनी संबंधितांचे कान उपटल्याचे वृत्त कुठल्याही माध्यामातून लोकांपर्यंत आलेले नव्हते. म्हणूनच हजारो कोटीच्या अपहारातील आरोपींच्या (सुनील तटकर व अजितदादा) पाठीवर मायेचा हात फ़िरवणारा माणूस; दोनचार कोटी रुपये विवाह सोहळ्य़ात खर्च झाल्याने विचलित झाला; याचे नवल वाटणे स्वा्भाविक नाही काय? या दोन वागण्यात व प्रतिक्रियांमध्ये प्रचंड विरोधाभास आढळून येत नाही काय? ज्यांना जाणवत नसेल ते पवार भक्त असू शकतात. अन्यथा कुठल्याही चौकस माणसाला पवारांच्या या झोप उडण्याच्या विधानातला टोकाचा विरोधाभास दिसायलाच हवा. आणि मला दिसला तर नवल नाही. बहुतांश लोकांना तो दिसला. म्हणूनच पुढल्या दोन दिवसात पवारांच्याच राष्ट्रवादी पक्षातल्या एका उपमहापौराने मुलीचा लग्नावर केलेली उधळपट्टी व चिंचवडच्या कुणा आमदाराने वाढदिवसासाठी घातलेल्या जेवणावळीच्या साग्रसंगीत बातम्या माध्यमांनी अगत्याने पेश केल्या. अन्यथा त्यांना प्रसिद्धीच मिळालीच नसती. कारण असे चित्र आजच्या राजकारणात अजिबात नवे राहिलेले नाही. पण पवारांचा आव ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ असा होता, म्हणूनच तो संशयास्पद होता. त्यातल्या त्याच विरोधाभासाने मला एक विडंबन सुचले आणि मी ते मुद्दाम फ़ेसबुकवर टाकले होते. दिवसभरात शेकडो मित्रांनी त्याला दाद दिलीच. पण शंभराहून अधिक मित्रांनी त्याची कॉपी करून पुढे त्यांच्या मित्रांपर्यंत ते विडंबन पोहोचवले. ते अन्यायकारक व अतिशयोक्त असते, तर त्याला इतका उत्स्फ़ुर्त प्रतिसाद मिळाला नसता. पण त्यांच्या मनातही पवारांचे विधान शंकास्पद असल्यानेच माझे विडंबन त्यांना भावले असेल ना? ‘लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई’ या मुळ अंगाई गीताचे ते विडंबन असे होते,

चिपळूणाच्या माळावरी भास्कर झोपला ग बाई
शरदाच्या चांदण्याला झोप का ग येत नाही

पंचपक्वान्ने पोटात ढेकरांची गर्दीघाई
जाधवाच्या मांडवात स्ररकारी सरबराई
उघड पाकळ्य़ा ओठांच्या तुजलाही घे मलाई
शरदाच्या चांदण्याला झोप का ग येत नाही

नाही इथे गांधी कोणी फ़क्त टोपी डोईवरती
खिशामध्ये टाटाबिर्ला खादी आहे अंगापुरती
जगावेगळी ही क्षमता दुष्काळाची भरपाई
शरदाच्या चांदण्याला झोप का ग येत नाही

मित्रांनो; तुम्हीच ठरवा यात मी कुठे शरद पवार या राष्ट्रीय नेत्यावर अन्याय केला आहे काय? त्यांच्या मुळ विधानातून व शाही विवाह सोहळ्यावरच्या प्रतिक्रियेतून जो प्रतिसाद तुमच्या मनात उमटला असेल, त्याच्याशी या विडंबन काव्याची तुलना करून बघा. यातली गंमत समजून घ्यायची की राजकारण बघायचे? मी राजकारणात नाही, तर पत्रकार आहे आणि जगात वा राजकारणात जे घडत असते, त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे हाच माझा पेशा राहिलेला आहे. यात माझे कुठे चुकले आहे काय? पण मित्रयादीतल्या एका मित्राचे चित्त माझ्या या बोचर्‍या प्रतिक्रियेने विचलित झाले आणि त्याने माझ्यावर हिंदूत्व व मोदी समर्थनाचा आरोप केला. या विडंबनात मोदी वा हिंदूत्वाचा संबंध तरी येतो काय? शरद पवार, त्यांचा पक्ष, त्यांचे अनुयायी व त्यांचे राजकारण इतकाच यातला विषय मर्यादित आहे ना? मग त्या मित्राने विचलित का व्हावे? तर त्याची पवारांवर अनन्य भक्ती असली पाहिजे. त्या भक्तीमुळे पवारांचे दोष त्याला बघता येत नाहीत किंवा दाखवले तर त्यात त्याला अन्य कुणाचे गुणगान देखील सापडू शकते. असे का व्हावे माणसाचे? अर्थात हा कोणी सामान्य पवारभक्त किंवा त्यांचा पक्षानुयायी नाही. तरी तो इतका विचलित झाला. तर त्याचे कारण मला शोधावेसे वाटते. कारण मला माझे काय योग्य व रास्त आहे, त्यापेक्षा दुसर्‍याला आपण सांगितलेले कळत नसेल, तर त्याबद्दल कमालीची उत्सुकता असते. तो कसा विचार करतो? इतरांना कळलेले व सहज समजू शकलेले अशा हुशार व्यक्तीला का समजले नाही; ते शोधण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. शिवाय इथे तर त्याने कारण नसतांना माझ्यावर मोदी वा हिंदूत्वाचा आक्षेप का घ्यावा? असाही वेगळा प्रश्न आहेच. त्याचे कारण इतकेच, की सामान्य माणूस समोर दिसते ते निरागस नजरेने बघू शकतो. पण अभ्यासू, बुद्धीमान माणसांच्या भूमिका व मते ठरलेली असतात. त्यामुळे समोर दिसते, ते आहे ही माणसे तसेच बघू शकत नसतात, तर त्यात त्यांना हवे तेच शोधत असतात आणि नाही सापडले, तरी ते असल्याचाही शोध लावून उलट आरोप करीत असतात. या उपरोक्त विडंबन काव्यात म्हणूनच त्या मित्राला मोदीभजन व हिंदूत्व सापडू शकले. यालाच भक्ती वा अंधश्रद्धा म्हणतात. जी तुम्हाला वास्तव आणि सत्यापासून पारखी करीत असते. कशी ते उद्या बघू.   ( क्रमश:)
 भाग   ( ८९ )    १८/२/१३

1 टिप्पणी: