नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याची तयारी गेली पाच वर्षे करीत आहेत आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाला सुरुंग लावण्यात त्यांचे विरोधक मागली दहा वर्षे गुंतले आहेत. इथे लढाई किती विषम आहे ते आधी लक्षात घ्यावे लागेल. शत्रू वा प्रतिस्पर्ध्याशी लढताना नुसती हत्यारे व साधने पुरेशी नसतात तर त्याच्या रणनितीवर मात केल्यासच लढाई जिंकता येत असते. मोदी विरुद्ध बाकीचे सगळे, म्हणजे अगदी त्यांच्याच भाजपामधले त्यांचे विरोधकही, एका बाबतीत मागे पडले, ते म्हणजे त्यांनी कधी मोदी यांची रणनिती समजूनही घेण्याचा प्रयत्न केला नाही. परिणाम असा झाला आहे, की मोदींना स्वत:ला ते काय करीत आहेत व कुठल्या दिशेने चालले आहेत ते नेमके ठाऊक आहे, पण त्यांचे तमाम विरोधक मात्र अंधारात चाचपडल्यासारखे लढत आहेत व फ़सत आहेत. मला बिशनसिंग बेदीची एक गोष्ट आठवते.
बहूधा १९९९ सालची गोष्ट असावी. तेव्हा विश्वचषक क्रिकेटस्पर्धा चालू होती आणि भारताचा कर्णधार अझरूद्दीन होता. तेव्हा नव्यानेच सुरू झालेल्या एनडीटीव्ही प्रणित स्टारन्युज वाहिनीवर टर्निंग पॉइंट असा एक कार्यक्रम व्हायचा. रोज रात्री होऊन गेलेल्या त्या दिवशीच्या सामन्याचे विश्लेषण करायला माजी कर्णधार बिशनसिंग बेदी हजेरी लावायचा. बेदी उपरोधिक व खोडसाळ बोलण्याविषयी प्रसिद्धच आहे. एकेदिवशी पावसामुळे सामना होऊ शकला नव्हता, तेव्हा चर्चेला दुसर्या दिवशीच्या सामन्याचा विषय घेण्यात आला होता. तो सामना भारत पाकिस्तान यांच्यात व्हायचा होता. तर भारताचा कर्णधार अझरुद्दीन याने कोणती रणनिती वापरावी म्हणजे पाकिस्तानला हरवता येईल; असा प्रश्न त्या कार्यक्रमाच्या संयोजकाने विचारला. तेव्हा बेदीने दिलेले उत्तर अवाक करणारे होते. संयोजकही बडबडला. बेदी म्हणाला उद्याच्या सामन्यात उतरण्यापुर्वी अझरने स्वत:ला संघातून वगळावे, संघाचा कर्णधार स्वत:ला वगळून कसा सामना खेळला जाऊ शकतो? त्यावर बेदीने दिलेले उत्तर मार्मिक, पण नेमके आहे. बेदी उत्तरला, पाक संघाची सगळी रणनिती अझर कर्णधार आहे, यावर बेतलेली आहे. कारण अझर समोर कुठलाही संघ वा खेळाडू असला, तरी तो कुठलाच बदल करत नाही. त्यामुळे त्याच्या बुद्दूपणावर पाकची रणनितीची भिस्त आहे. तोच कर्णधार नसेल, तर नव्या कर्णधाराच्या नव्या रणनितीचा पत्ताच नसल्याने पाक संघ गोंधळून जाईल. म्हणजे रणनितीतच पाकिस्तानचा अर्धा पराभव होऊन जाईल. उरलेले काम खेळाडू सहज पार पाडतील. ऐकायला विचित्र वाटणारी गोष्ट असली, तरी त्यातली खोच लक्षात घेण्यासारखी आहे. तुमची रणनिती व डावपेच ठाऊक असले, तर तुमचा प्रतिस्पर्धी त्यावर मात करण्यासाठी आपले डावपेच आखत असतो. जर तुमचे डावपेच ठाऊकच नसतील तर त्याला तुमच्यावर मात करण्याची रणनिती आधीपासून आखता येत नाही. त्याला तुमच्या प्रत्येक चालीचा ती खेळली गेल्यावरच विचार कारवा लागतो व त्यावर मात करायची रणनिती आखत जावे लागते. म्हणूनच युद्ध व लढाईत रणनिती आकस्मिक व धक्कादायक असणे अगत्याचे असते. मोदींच्या बाबतीत नेमकी तीच चुक त्यांच्या तमाम विरोधकांनी केलेली आहे. मोदींची कोंडी करण्याचे सर्व मार्ग व मुद्दे विरोधकांकडे ठरलेले आहेत व त्यावर मोदी कुठे व कशी मात करू शकतील; त्याचा त्यांच्या विरोधकाने किंचितही विचार केलेला नाही. ही मोदी विरोधकांना त्यांची जमेची बाजू वाटते. पण प्रत्यक्षात तीच आता मोदी यांच्यासाठी जमेची बाजू होऊन गेली आहे.
मुस्लिमांची नाराजी, सेक्युलर मित्रांचा आक्षेप, गुजरातच्या दंगली, हुकूमशाही वृत्ती, कडवे हिंदूत्व, एकाधिकारशाही असे मोदी यांच्या विरोधातले ठरलेले आक्षेप आहेत. ह्या गोष्टींमुळे त्यांना गुजरातमध्ये यश मिळत असले, तरी संपुर्ण देशात १८ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे आणि तिचा रोष पत्करून मोदी यांना देशाच्या पंतप्रधान पदावर दावा करता येणार नाही. जगभर गुजरातच्या दंगलीने मोदी बदनाम झालेले आहेत. अनेक बड्या पाश्चात्य देशांनी त्यांना व्हिसाही नाकारलेला आहे. सहाजिकच गुजरात बाहेर मोदी यांना कोणी स्विकारणार नाही; हे गृहित धरून त्यांच्या विरोधकांनी सगळे डाव आजवर खेळले आहेत. अर्थात हे डावपेच सुरू झाले, तेव्हा ते भाजपाची कोंडी करण्यासाठी सुरू झाले होते. तेव्हा मुळात गुजरातमध्येही भाजपाला संपवण्यासाठी मुस्लिमांचे दंगलीत मोठेच नुकसान झाल्याचा डंका सतत पिटला गेला. त्यातून देशाच्या कानाकोपर्यातले मुस्लिम, मोदी व मोठ्या प्रमाणात भाजपाच्या विरोधात जाण्याची रणनिती यशस्वी झाली, हे कोणी नाकारू शकत नाही. पण या व्यापक रणनितीचा अन्य दुष्परिणाम होऊ शकतो, याचा कोणीही मोदी विरोधकाने गंभीरपणे विचारच केला नाही. त्याचे एकच कारण म्हणजे देशातले १८ टक्के मुस्लिम एक गठ्ठा मतदान करतात, हे सेक्युलर गृहीत. पण अठरा टक्के मुस्लिम गठ्ठा मतदान करतात, म्हणून सगळे पक्ष त्यांच्याच गठ्ठ्य़ाचा विचार करत असतील; तर तेवढाच मतांचा दुसरा गठ्ठा निर्माण झाला मग काय होईल; याचा विचारही कोणाच्या मनाला कधी शिवला नाही. मोदी यांनी नेमका तोच विचार पर्याय म्हणून केला आणि पुढले डावपेच आखत गेल्या दहा वर्षात पद्धतशीर वाटचाल केली आहे. पहिली गोष्ट म्हणजे दंगलीतून जेवढी कटूता हिंदू व मुस्लिम यांच्यात निर्माण झालेली नव्हती; तेवढी नंतरच्या अपप्रचाराने निर्माण केली. त्याचे आरंभिक परिणाम गुजरातमध्ये दिसले. म्हणजे लगेच घेतल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी यांच्या हिंदूहृदय सम्राट असण्यावर शिक्कमोर्तब होऊन गेले. बाकीचे सेक्युलर लोक हिरीरीने तो शिक्का पक्का करीत असताना, मोदी यांनी तो पुसून टाकायचा कधीच प्रयत्न केला नाही. उलट त्यांनी आपल्यावरच्या हिंदूत्वाच्या शिक्क्याला गुजराती अस्मितेची जोड देऊन मोदी म्हणजेच गुजरात अशी एक नवी अस्मिता जन्माला घातली. तिचे पालनपोषण आपल्या सेक्युलर विरोधकांकडून पद्धतशीरपणे करून घेतले.
गेल्या दहा वर्षात मोदी यांचे तमाम विरोधक ज्याला बदनामी समजून मोदी विरोधातला आक्रमक प्रचार करीत होते; तो मोदींना हवाच होता. म्हणूनच की काय, त्यांनी वेळोवेळी आपल्या विरोधकांना हाती कोलित द्यावे, तसे काही मुद्दे जाणिवपुर्वक पुरवले सुद्धा. कोणी उत्तरप्रदेशात, कोणी बिहारमध्ये तर कोणी मुंबई वा अन्यत्र गुजरातच्या दंगलीचा मुद्दा वापरून मते मिळवण्याची धडपड केली. पण असे करताना नुकसान भाजपाचे होत असले, तरी प्रत्यक्षात मोदींची प्रतिमा कडव्या हिंदू नेत्याची बनवली जात होती. ती मोदी यांना हवीच होती. कारण मुस्लिमांच्या आक्रमक वृत्ती व जिहादी कारवायांनी अस्वस्थ असलेला भारतीय किंवा हिंदू कडव्या हिंदूत्वाच्या शोधात आहे, याची जाण मोदींना होती. ते स्थान दिर्घकाळ शिवसेनाप्रमुख बाळासहेब ठाकरे यांनी व्यापलेले होते. पण अलिकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे ठाकरे थंडावले असताना, ती पोकळी भरून काढायला मोदी यांचे छुपे प्रयत्न चालू होते. त्याला देशभरातल्या सेक्युलर माध्यमे, पक्ष व विचारवंतांनी मोलाचा हातभार लावला. मतांसाठी व सत्तेसाठी भाजपानेच हिंदूत्वाचा आग्रह सोडला असला, तरी तशी अपेक्षा बाळगणारा मोठा मतदारवर्ग होता, त्याला ठाकरे यांच्यासारखा कोणी हवाच होता. मोदींनी त्या दिशेने धुर्तपणे वाटचाल सुरू केली होती. त्यात दोन अडचणी होत्या. एकीकडे पक्षातले त्यांचे प्रतिस्पर्धी व दुसरीकडे मुस्लिम मतांच्या गठ्ठ्याचे राजकारण. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी आपल्या विरोधकांचा धुर्तपणे वापर करून घेतला. स्वत: हिंदूत्व न बोलता त्यांनी गुजरातच्या विकास कामांवर भर दिला, पण दंगलीबद्दल माफ़ीची भाषा करायला साफ़ नकार दिला. त्यामुळे सेक्युलर मंडळी देशभर निषेध करीत मोदींचे नाव सर्वत्र घेऊन जातील; हे त्यांना पक्के ठाऊक होते. दुसरीकडे विकासात मुसंडी मारून आपल्या प्रशासकीय कर्तृत्वाची छाप पाडण्यावर आपली शक्ती केंद्रीत केली. म्हणजे कामातून विकासपुरूष हे त्यांनी सिद्ध करायचे आणि त्यांच्या हिंदूत्वाचा डंका विरोधकांनी पिटावा; अशी कामाची वाटणी मोदींनी केली. सेक्युलर लोकांनी आपले काम मोठ्या मेहनतीने पार पाडले. परिणामी भाजपाच्या हिंदूत्वाविषयी साशंक असलेला देशाच्या कानाकोपर्यातला कडवा हिंदू आपोआपच मोदींकडे आकर्षित होत गेला. म्हणजे प्रत्यक्षात सेक्युलर लोकांनी त्याला मोदींच्या गोठ्यात आणायची अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडली. स्वत:च्या नकळत सेक्युलर लोकांनी मोदींना बहूमोलाची मदत केली. याचे कारण सरळ सोपे आहे. ज्याला सेक्युलर मोदींच्या बदनामीची रणनिती समजत होते, तीच मोदींनी आपल्या हिंदूत्वाची रणनिती बनवली. परिणाम बघा. ज्याला भाजपाच्या राष्ट्रीय समितीत जागा द्यायला पक्ष तयार नव्हता व ज्याला गुजरातमध्ये रोखू बघत होता, तो भाजपाचा राष्ट्रीय नेता होऊन गेला आहे आणि त्याचे श्रेय सेक्युलरांनाच द्यावे लागेल. हा कोणाच्या रणनितीचा विजय व कोणाच्या रणनितीचा पराभव आहे? ( क्रमश:)
भाग ( ८२ ) ११/२/१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा