सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३

दिशाभूल करणारे आपल्याला वाचवतील काय?


   गेली दहा वर्षे गुजरातच्या दंगलीचे इतके स्तोम माजवण्यात आलेले आहे, की जणू देशात त्यापुर्वी कधी हिंदू-मुस्लिम दंगली झाल्याच नव्हत्या. पण वस्तुस्थिती तशी नाही. त्या कालखंडामध्ये देशात भाजपाप्रणित एनडीएचे वाजपेयी सरकार सत्तेवर होते, आणि त्याला कोंडीत पकडायला अन्य कुठला महत्वाचा मुद्दा सेक्युलर विरोधकांकडे नव्हता. म्हणूनच त्या दंगलीला हिंदू दहशतवादाचा चेहरा लावण्याचा तो पद्धतशीर प्रयत्न करण्यात आला होता. केवळ विरोधी पक्षच नव्हेत, तर स्वत:ला सेक्युलर मानणार्‍या माध्यमांनीही खोटेनाटे काहीही सांगत त्या दंगलीचे इतके स्तोम माजवले, की देशाबाहेरही त्याला नरसंहार ठरवण्याची स्पर्धाच सुरू झाली. मग त्याचेही अपप्रचारासाठी भांडवल करण्यात आले. अगदी वाजपेयी यांच्यासारखा नेताही आपली सेक्युलर प्रतिमा जपण्यासाठी मोदींना ‘राजधर्म’ शिकवण्यास पुढे सरसावला. पण त्याआधी गुजरातमध्ये किंवा अन्यत्र तेवढ्याच भीषण हिंदू मुस्लिम दंगली झालेल्या होत्या व त्यातही अल्पसंख्यांक असल्याने मुस्लिमांचेच अधिक नुकसान झालेले होते. पण ज्यांनी नुसती एकच बाजू ऐकण्यात धन्यता मानली व ज्यांना त्यातच रस होता; त्यांच्यासाठी तेच सत्य होऊन बसले. नुसते सत्य नव्हे, तर पवित्र सत्य होऊन बसले. अशी एक घट्ट श्रद्धा तयार झाली, मग त्यातून बाहेर पडणे अशक्य असते. भल्याभल्यांना त्यातून बाहेर पडता येत नाही. मग ज्यांना भाजपा वा मोदी यांचा तिटकाराच आहे, त्यांनी त्या समजूतीमधुन कसे बाहेर पडावे? सहाजिकच अशी जी माणसे असतात, त्यांची मानसिकता एक ठराविक पद्धतीने काम करत असते. ती समजूत, ती पक्की अंधश्रद्धाच त्यांची एक मोजपट्टी बनून जाते. जगातल्या सगळ्या गोष्टी वा अनुभव ही माणसे त्याच मोजपट्टीने मोजू बघतात. त्यांची मते वा विरोध त्यातूनच आकार घेत असतो. सहाजिकच मग मोदी द्वेषाने भारावलेल्या माणसाला मोदीविषयक चांगले सत्य आवडत नाही, उलट त्यासंबंधातले विरुद्ध पण खोटेही खुप प्यार असते. त्यामुळेच मी मोदी संबंधाने काही तथ्य व सत्य मांडतो आहे, ते त्यांना समजून घेणे अवघड झाले तर नवल नाही. त्यामुळेच मग मी शरद पवार याच्या राजकीय विरोधाभासावर विडंबन लिहिले तर त्यातही; त्यांना माझे मोदी भजन दिसू शकते.

   आता साधा विचार करा, की पवार यांची कोणी खोटी निंदानालस्ती केली वा बदनामी केली म्हणून त्याचा मोदी यांना कुठला फ़ायदा होऊ शकतो तरी का? मग पवारांच्या विडंबनात यांना मोदीभक्ती कशाला दिसावी? तर सवाल पवारांचा नाहीच. त्यांना मोदी विषयक सत्य पचवण्याचा त्रास होत असतो. तेवढ्य़ासाठी मग अशी मंडळी कारण नसताना पवारांच्या बचावाला धावून येतात आणि पवारांचे शाही विवाहाविरुद्धचे मत कसे लोकांना आवडणारे आहे असे सांगू लागतात. पण हे विसरून जातात, की काही लोकांना आपले साधेपण आवडावे, म्हणूनच पवारांनी असे मत व्यक्त केलेले असते, त्यांना साधेपाणाशी सोयरसुतक नसते. तसे असते तर पवारांनी आपल्या पक्षाच्या विविध समा्रंभ, सोहळे व सभांमध्ये होणार्‍या अवाढव्य खर्चीक उधळपट्टीवर कधीच नाराजी व्यक्त केली असती. ज्या एकूलत्या एक मुलीचा साधेपणाने विवाह साजरा केला, असे पवार अगत्याने सांगतात, तीच मुलगी सुप्रिया सुळे आज बारामतीच्या खासदार असून युवती कॉग्रेसचे भव्यदिव्य मेळावे नित्यनेमाने आयोजित करीत असतात. त्यावरचा भपकेबाज खर्चही डोळे दिपवणारा असतो. त्यात सहभागी होणार्‍या प्रत्येक तरूणीला भगवे फ़ेटे बांधण्याचा खर्च उधळपट्टी नाही, असा दावा कोणी करू शकेल काय? एका मेळाव्यात दोनतीन हजार मुलींना नवे कोरे फ़ेटे बांधायचा खर्च किती असतो? त्यासाठी गावोगावी उभारण्यात येणार्‍या प्रचार फ़लकांवर किती रुपये खर्च होतात? आणि असे जिल्हावार मेळावे आतापर्यंत डझनावारी झालेले आहेत. त्याला साधेपणा व बिनखर्चिक आयोजन असे पवार म्हणणार आहेत काय? की त्यातून कित्येक दुष्काळी गावांमध्ये कोरड्या विहीरीमध्ये नवे पाण्याचे झरे फ़ुटत असल्याने त्या मेळाव्याचा खर्च दुष्काळ निवारणाचा खर्च आहे असा पवारांचा दावा आहे? एका आमदाराच्या घरगुती समारंभावर इतक्या जाहिर तोफ़ा डागताना सारासार विचार शरद पवारांसारखा जाणता नेता करणार नसेल आणि केवळ लोकांना भारावून टाकायला अशी फ़ुसकी भाषा वापरणार असेल; तर लग्नाच्या भपक्यापेक्षा ती घातक नाही काय? आणि असे दिशाभूल करणारे आपण बोलतो, याची कबुली खुद्द पवार यांनीच दिलेली आहे. परिणाम साधण्यासाठी आपण धडधडीत खोटे बोलतो, असे पवारांनी एका वाहिनीच्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे. त्यामुळे इथे देखील त्यांना उधळपट्टीच्या विरोधापेक्षा आपल्या जाणतेपणाचा आभास निर्माण करायचा होता हे उघड आहे.

   १९९३ सालात शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चौथ्यांदा झालेले होते. तेव्हा मुंबईत पहिल्यांदाच भीषण बॉम्बस्फ़ोट मालिका घडली होती. तिचे पाकिस्तानशी व मुस्लिमांशी असलेले संबंध त्यांना ठाऊक होते व दिसलेले होते. पण सामान्य मुंबईकराची दिशाभूल करण्यासाठी पवारांनी चक्क धुळफ़ेक करणारी वक्तव्ये केली होती. मुस्लिम व पाकिस्तानविषयी लोकांना संशय येऊ नये हा परिणाम साधण्यासाठी आपण खोटे बोलल्याची कबुली स्वत: पवारांनी एनडीटीव्ही या वाहिनीच्या मुलाखतीमधून दिलेली आहे. इतक्या गंभीर बाबतीत खोटे व दिशाभूल करणारे बोलू शकणारा माणुस; कधी कसे विधान करतो, हे म्हणूनच जपुन बघावे लागते व समजून घ्यावे लागते. पण पवार स्वत: जरी स्वत:चा खोटेपणा कबुल करू लागले तरी, त्यांचे भक्त त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. हीच तर अंधश्रद्धेची किमया असते. आपल्या पूजनीय व्यक्ती वा बुवांवर त्या भक्तांची इतकी अढळ श्रद्धा असते, की त्याने स्वत:चा गुन्हा कबूल केला वा खोटे कबुल केले; तरी त्याचे भक्त त्याला खोटा मानायला तयार नसतात. याची उलट बाजू अशी, की ज्याच्यावर त्यांचा राग असतो किंवा ज्याचा अशी माणसे द्वेष करीत असतात; त्याने कितीही चांगले केले तरी, त्यात त्यांन दोष वा गुन्हाच दिसत असतो. तेव्हा अशा मोदी विरोधकांना मोदीने चांगले काही केले असेल, तरी दिसणार कसे? नावडतीचे मीठ अळणी अशी आपल्या मराठी भाषेत जुनीच म्हण आहे ना? तशीच यांची गत असते. त्यामुळे उद्या नरेंद्र मोदी देशाचा पंतप्रधान झाला तरी त्यांना ते कितपत मान्य होईल, देवजाणे. अशी ज्यांची अवस्था आहे त्यांच्यापर्यंत सत्य घेऊन जाता येत नाही आणि अनेकदा त्यांना इजा पोहोचली तरी ते सत्याचा स्विकार करीत नाहीत. आपल्या समजूतीमध्ये मशगुल असण्यातच हे स्वत:ला सुरक्षित मानत असतात.

   माझी त्यांच्याबद्दल अजिबात तक्रार नाही. त्यांनी खुशाल अशा समजूतीमध्ये गुण्यागोविंदाने नांदावे. पण अजाणतेपणी त्यांच्या मागे जाणार्‍यांचे मात्र त्यात हकनाक बळी जात असतात. त्यांची दया करावी की कींव करावी ते समजत नाही. सत्य ओरडून सांगावे लागते, ते अशा शहाण्यांसाठी नव्हे तर त्यांना शहाणे समजून त्यांच्यामागे अजाणतेपणी जात असलेल्या अनभिज्ञांसाठी. गेल्या दहावीस वर्षात आपल्या देशात जिहादी दहशतवादाने जे हकनाक बळी घेतलेले आहेत, ते अशाच अंधश्रद्धेचे बळी आहेत. त्यात जसे हिंदू व अन्य धर्मिय बळी गेले आहेत; तसेच अनेक मुस्लिमही बळी गेलेले आहेत. फ़रक असेल तर तो किंचित समजूतीचा आहे, मुस्लिम अशा घटनेत बळी पडतो, तेव्हा त्याला दु:ख, खेद वा यातना होण्यापेक्षा समाधान मिळत असते, कारण तो धर्मासाठी शहिद झाला अशी त्याची धारणा असते आणि अन्य बिचारे हकनाक मारले गेलो; म्हणून मृत्यूला सामोरे जात असतात. अफ़जल गुरू असो, की अजमल कसाब असो, त्यांची फ़ाशी जाण्यापुर्वीची मनस्थिती बघा. आपण धर्मासाठी काही पवित्र कार्य केले अशीच ती मानसिकता आहे. म्हणून तर गुन्हेगार ठरून फ़ाशी गेलेल्या त्यांचा अभिमान देशाच्या अनेक भागातील मुस्लिमांना वाटलेला आहे. अनेकांनी तो अभिमान रस्त्यावर येऊन, घराबाहेर पडून उघडपणे बोलून दाखवला आहे. त्यांचा आपल्याला राग येणे स्वाभाविक आहे. पण कधी आपण त्यांच्या त्या मनस्थितीत जाण्याचा प्रयत्न केला आहे काय? अफ़जल गुरू. अजमल कसाब असो किंवा आता खटल्यात अडकलेला अबू जुंदाल असो; त्यांची मनस्थिती अशी का आहे, याचा आपण विचार केला आहे काय? कधीतरी पकडले गेलो, घातपात करताना फ़सलो, तर मारले जाऊ; अशी भिती त्यांच्या मनाला स्पर्श का करत नसेल? तो एम आय एम या मुस्लिम पक्षाचा पुढारी अकबरुद्दीन ओवायसी अशी आक्रमक बोली का बोलू शकतो? शंभर कोटी हिंदूंना मारण्याची भाषा बोलताना त्याच्या मनाला आपणच मारले जाऊ; अशा भितीचा स्पर्श का होत नाही? उलट शंभर कोटी लोकसंख्या असूनही हिंदू का भयभीत असतात? ही दहशत काय भानगड असते? दहशतवाद धर्माचा असतो की दहशतीचे वेगळे काही तर्कशास्त्र आहे? आपल्या देशातले सेक्युलर शहाणे त्याचे योग्य व समजू शकणारे उत्तर कधी देऊ शकलेले नाहीत. कारण त्यापैकी कोणी मुळात आपल्या श्रद्धा व समजूतीच्या बाहेर पडून वास्तविक समस्येकडे पारदर्शक नजरेने बघायचा प्रयत्नच केलेला नाही. त्यामुळेच मग मोदी, हिंदू भगवा दहशतवाद असे फ़सव्या शब्दांचा भुलभुलैया निर्माण केला जातो. सत्य त्यांनाच बघता येत नसेल तर ते आपल्याला सत्य सांगणार काय आणि समजावणार तरी कसे? दहशत कशी असते आणि कशामुळे असते किंवा दहशतीवरचा सर्वात प्रभावी उपाय कोणता? कधी अशा प्रश्नांची उत्तरे आपण शोधली तरी आहेत काय? उलट त्याबाबतीत ज्यांचे भ्रम आहेत, त्यांच्यावरच विसंबून आपण घातपाताला बळी पडत राहिलो ना? आणि आपल्याला वाचवण्याचा प्रयास करणार्‍यांनीच आपल्याला दिशाभूल करून दहशतवादाच्या जबड्यात नेऊन सोडले आहे.   ( क्रमश:)
 भाग   ( ९० )    १९/२/१३

1 टिप्पणी:

  1. आपल्या देशात जिहादी दहशतवादाने जे हकनाक बळी घेतलेले आहेत, ते अशाच अंधश्रद्धेचे बळी आहेत. त्यात जसे हिंदू व अन्य धर्मिय बळी गेले आहेत; तसेच अनेक मुस्लिमही बळी गेलेले आहेत. फ़रक असेल तर तो किंचित समजूतीचा आहे, मुस्लिम अशा घटनेत बळी पडतो, तेव्हा त्याला दु:ख, खेद वा यातना होण्यापेक्षा समाधान मिळत असते, कारण तो धर्मासाठी शहिद झाला अशी त्याची धारणा असते आणि अन्य बिचारे हकनाक मारले गेलो; म्हणून मृत्यूला सामोरे जात असतात. अफ़जल गुरू असो, की अजमल कसाब असो, त्यांची फ़ाशी जाण्यापुर्वीची मनस्थिती बघा. आपण धर्मासाठी काही पवित्र कार्य केले अशीच ती मानसिकता आहे. म्हणून तर गुन्हेगार ठरून फ़ाशी गेलेल्या त्यांचा अभिमान देशाच्या अनेक भागातील मुस्लिमांना वाटलेला आहे. अनेकांनी तो अभिमान रस्त्यावर येऊन, घराबाहेर पडून उघडपणे बोलून दाखवला आहे. त्यांचा आपल्याला राग येणे स्वाभाविक आहे. पण कधी आपण त्यांच्या त्या मनस्थितीत जाण्याचा प्रयत्न केला आहे काय? अफ़जल गुरू. अजमल कसाब असो किंवा आता खटल्यात अडकलेला अबू जुंदाल असो; त्यांची मनस्थिती अशी का आहे, याचा आपण विचार केला आहे काय? कधीतरी पकडले गेलो, घातपात करताना फ़सलो, तर मारले जाऊ; अशी भिती त्यांच्या मनाला स्पर्श का करत नसेल?
    धर्मश्रद्धेने असे जिवावर उदार झालेले लोक असतील तर इतरांनी यावर उपाय काय योजावा असा विचार येतो...

    उत्तर द्याहटवा