दोन वर्षापुर्वी विश्वचषक भारताने जिंकला, तेव्हा प्रत्येक भारतीयाची छाती फ़ुगलेली होती. जणू आपले क्रिकेटपटू म्हणजे तो जगज्जेता सिकंदर असल्यासारखे आपण बोलत होतो. पण त्यानंतर जी भारतीय क्रिकेटची घसरगुंडी सुरू झाली; तेव्हा आपली तोंडे बघण्यालायक झालेली होती. कारण एकाहून एक महा दिग्गज खेळाडू भारतीय संघात होते, त्यांच्या नावावर मोठमोठे विक्रम क्रिकेटच्या इतिहासात नोंदलेले आहेत. पण जेव्हा इंग्लिश संघासमोर त्यांच्या देशात किंवा इथे मायदेशी खेळायची वेळ आली; तेव्हा आमचे एकाहुन एक महान फ़लंदाज ढेपाळत गेले आणि कुठलाच गोलंदाज भेदक गोलंदाजी करू शकत नव्हता. त्यावेळी आपल्या म्हणजे भारतीय क्रिकेट्वेड्यांच्या मनात कसले विचार घोळत होते? याच्या जागी तो अमुकतमूक असता तर? किंवा पाचसहा फ़लंदाज अवघ्या शेसव्वाशे धावात गारद झाल्यावर आम्ही कोणाकोणाच्या तोंडाकडे धावा जमवण्यासाठी बघत होतो? हरभजन किंवा रविंद्र जडेजा यांनी दोनतीनशे धावा खेळून काढाव्यात, अशीच भाषा बोलली जात नव्हती काय? चांगले नावाजलेले फ़लंदाज गारद होऊन जातात, तेव्हाच लोक अशा अन्य वेळी फ़लंदाज म्हणून उपयुक्त न मानलेल्या खेळाडूंकडून अपेक्षा करू लागतात. त्या अपेक्षांना कुठला तार्किक आधार नसतो, तर ती चमत्काराचीच अपेक्षा असते. म्हणूनच ती कितीही तर्कशुन्य असली तरी एका विचित्र तर्काच्या आधारे केलेली अपेक्षा असते. असा कुठला तो तर्क असतो? अमूक सामन्यात कधी हरभजनने ऐंशी वा जडेजाने शंभर वगैरे केलेल्या धावा आपल्याला आठवत असतात. आणि आजही त्याने तशीच धुवांधार फ़लंदाजी करावी; अशी ती खुळी अपेक्षा असते. त्यासाठी आपण जुगार खेळल्यासारखे बोलत असतो. तर्काने ती अपेक्षा खोडून काढता येऊ शकते. पण असेच चमत्कार पुर्वी कधी घडलेले असतात, त्याचे काय? निराश माणूसच मग चमत्काराकडे वळत असतो. किती लोकांना तीन दशकांपुर्वीचा भारताने जिंकलेला पहिलापहिला विश्वचषक आठवतो? तेव्हा तर एकदिवसीय क्रिकेटची जाणच भारतीयांना नव्हती. अन्य कुणा स्पर्धक संघाच्या गुणसंख्येत भर टाकायला जाणारा संघ एवढीच भारतीय संघाची १९८३ सालातली ओळख होती.
तेव्हा प्रथमच तरूण व अननूभवी कपील देवला कर्णधार करून स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेले होते. त्यात आधीच्या दोन स्पर्धांप्रमाणेच क्लाईव्ह लॉईडचा वेस्ट इंडीज संघच जिंकणार हे सर्वांचे गृहित होते. पण तिथे पहिल्याच फ़ेरीत पहिल्याच सामन्यात चमत्कार घडला. दोनदा जगज्जेता असलेल्या लॉईडच्या वेस्ट इंडीजला नवख्या कपील देवच्या संघाने; पहिल्याच सामन्यात पराभूत करून सर्वांना थक्क करून सोडले. तो अर्थात योगायोगच होता. लॉईडचा संघ गाफ़ील होता, तिथेच त्यांचा पराभव झाला होता. मात्र परतीच्या सामन्यात त्यांनी भारताला पाणी पाजून हिशोब चुकता केला. पण गंमत वेगळीच होती. त्या प्राथमिक साखळी स्पर्धेत दुबळ्य़ा पुर्व आफ़्रिकेशी झालेल्या सामन्यात भारताची अक्षरश: धुळधाण उडाली होती. अवघ्या १९ धावात भारताचे पाच खंदे फ़लंदाज तंबूत परतले होते. अशा स्थितीत कपील देव बॅट घेऊन मैदानावर उतरला. तेव्हा बाद होऊन माघारी येणारा संदीप पाटिल त्याची माफ़ी मागत होता. पण त्याच्या पाठीवर थाप मारीत कपील म्हणाला, ‘डोन्ट वरी, देख अब मै क्या करता हू.’ संदीप मनातल्या मनात हसत तंबूत आला. कारण हा तापट माथ्याचा जाट उलटीसुलटी बॅट फ़िरवून लगेच विकेट फ़ेकणार याची संदीपला खात्री होती. पण जसजसा सामना पुढे सरकत गेला, तसतशी सर्वांनाच तोंडात बोट घालायची पाळी आली. कारण समोर जे काही घडत होते, तो निव्वळ चमत्कार होता. तेव्हा कपीलने आपल्या बॅटचा असा दांडपट्टा फ़िरवायला सुरूवात केली, की त्याच पूर्व अफ़्रिकेच्या गोलंदाजांसह क्षेत्ररक्षकांना धावायला व चेंडू अडवायला मैदान अपुरे पडू लागले. त्या दिवशी पहिल्या भारतीयाने मर्यादित षटकांच्या स्पर्धेतले शतक ठोकले होते आणि तो फ़लंदाज म्हणजे कपील देव तिथेच थांबायला तयार नव्हता. त्याने शेवटपर्यंत किल्ला लढवला आणि विश्वचषक स्पर्धेतील एका डावात सर्वाधिक धावांचा वैयक्तीक उच्चांक साजरा केला. तो सामना त्या स्पर्धेतला निर्णायक होता. कारण त्याच विजयाने भारताला प्रथमच बाद फ़ेरीत जाण्याची संधी मिळवून दिली होती. आणि नंतर बाद फ़ेरीतही बाजी मारून भारताने वेस्ट इंडीजसह लॉईडचे हॅटट्रीक करायचे मनसुबे धुळीला मिळवले होते. तो खरेच चमत्कार होता. पण तो झाला होता.
चमत्कार असेच असतात आणि आयुष्यात अशा घटना घडत असतात, त्यांची अनेकदा तर्कसंगती लागत नसते. जेव्हा ते घडत असतात, तेव्हा भल्याभल्यांची मती गुंग होऊन जात असते. ती खेळी कपील खेळला नसता तर मुळात बाद फ़ेरीतच पोहोचणेच शक्य नव्हते. आणि १९ धावांवर पाच खंदे फ़लंदाज बाद झाल्यावर सर्वांच्या अपेक्षा कपीलवर खिळल्या असल्या तरी तो विक्रमी खेळी करील, यावर कोणी विश्वास ठेवायला तयार होता का? पण तेव्हा तो चमत्कार घडला. नुसता घडला नाही तर नावाजलेले फ़लंदाज तंबूत बसून तशी तर्कबाह्य अपेक्षाही करत होते. भारतीय क्रिकेटशौकीन तशी अपेक्षा बाळगून होते. जेव्हा कुठल्याही अपेक्षा करायला जागा उरत नाही, तेव्हाच माणूस चमत्काराची अपेक्षा करत असतो. मग ती कधी हरभजनकडून अधिक धावांची असते तर कधी एखादी मोक्याची विकेट सचिन वा गांगूलीने काढावी अशी असते. वास्तव नित्यजीवनातही तसेच अनेकदा होत असते. एकाहून एक मोठे अनुभवी राजकीय नेते तोकडे पडले; तेव्हा इंदिराजींनी देशाचे नेतृत्व समर्थपणे करून दाखवले होते. अराजकातून देशाला बाहेर काढून दाखवले होते. तशी लोकांनी अपेक्षा का करावी? आज मोदींकडून लोक इतक्या अपेक्षा का करीत आहेत, त्याचे उत्तर तशा अतर्क्य तर्कशास्त्रात शोधावे लागेल. आजवरच्या अनुभवी राजकीय नेते व विचारवंतांनी केलेल्या विवेचन, मार्गदर्शन व निर्णयातून देशाचे प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंत होत व वाढत गेलेली आहे. पण त्याच कालखंडामध्ये सगळीकडून नालायक ठरवण्यात आलेल्या एका मुख्यमंत्र्याने अपेक्षेपलिकडे यशस्वी कारभार करून दाखवला आहे. त्यातून या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. वाजपेयींपासून अडवाणींपर्यंत किंवा सोनियांपासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत बहुतेकांनी केलेली धडपड व प्रयास अपयशी ठरल्यावर लोक पर्याय शोधू लागले आहेत. त्यातून या अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत. बाकीच्या नामवंतांचे अपयश त्या अपेक्षेची जननी आहे. काही केले तर मोदीच करू शकेल, असा तो खुळा आशावाद म्हणता येईल. पण जेव्हा शहाणा आशावाद भ्रमनिरास करतो; तेव्हा सामान्य माणसाला खुळ्या आशावादाच्या अपेक्षांवर जगायची पाळी येत असते. आणि हा बदल केवळ इथल्या जनमानसापुरता मर्यादित नाही. परदेशी राजकीय नेते व सरकारांची मोदी विषयक भूमिकाही झपाट्याने बदलताना दिसते आहे. ते कुणाला आवडो किंवा न आवडो.
या अपेक्षेला एक वेगळी झालर सुद्धा आहे. ती आहे देशातल्या दहशतवादाची. जिहादी दहशतवाद ही कमालीची डोकेदुखी होऊन बसली आहे. एकीकडे जिहाद व दुसरीकडे माओवादी नक्षलवाद यांच्या कैचीत देशाचा कायदा नामोहरम झालेला असतानाच तिसरीकडे गुन्हेगारी बोकाळली आहे अधिक भ्रष्टाचार लोकांचे जीवन नकोसे करून सोडतो आहे. अशा चहुकडून गांजलेल्या सामान्य भारतीयाला गुजरातच्या खर्याखोट्या प्रगतीच्या गोष्टी ऐकायला मिळतात, तेव्हाच त्याच्या मनात खुळ्या अपेक्षा जाग्या होत असतात. त्या नुसत्या दंगलीची रसभरीत वर्णने करून संपवता येणार नाहीत. तर ज्या समस्यांनी जनतेला आज गांजलेले आहे. त्यापासून मुक्तता करण्याचा दुसरा उपलब्ध पर्याय दाखवावा लागेल. ती संधी दोनदा सत्ता हाती आलेल्या कॉग्रेसने गमावली आहे. मातीमोल करून टाकलेली आहे. दुसरीकडे मोदींनी एका राज्यात का होईना यशस्वी काम करून दाखवले आहे. त्याचेच प्रतिबिंब मग मतचाचण्यांमध्ये पडत असते. ते सत्य नाकारून युक्तीवाद होऊ शकतो, पण मोदींना रोखण्यासाठी तो उपयुक्त नाही. कारण त्या सेक्युलर म्हणून चाललेल्या खेळाचे दुष्परिणाम दहा वर्षे लोक भोगत आहेत आणि त्या्पासूनच तर लोकांना मुक्ती हवी आहे. तर तोच नको असलेला पर्याय लोकांसमोर ठेवून मोदींना कसे रोखता येईल? मोदीविषयीचे आकर्षण नेमके कशामुळे आहे, त्याचा तरी त्यांच्या विरोधकांनी विचार केला आहे काय? शोध घेतला आहे काय? हरभजन वा अन्य गोलंदाजांकडून धावांची अपेक्षा का केली जाते, ते त्या वेळच्या सामन्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते. मोदींविषयीच्या लोकांच्या अपेक्षा आजच्या राजकीय परिस्थितीने आणल्या आहेत. त्यापेक्षा उजवा व उत्तम पर्याय असेल तर लोक मोदींकडे ढुंकूनही बघणार नाहीत. पण पर्याय आहेच कुठे? फ़लंदाज उरलेतच कुठे? ( क्रमश:)
भाग ( ९१ ) २०/२/१३
sangh Zimbabwe hota..pan te titkese mahatwache nahi..aaple mhanne aapan nehmipramanech changlya tarhene maandale aahe..
उत्तर द्याहटवा