शनिवार, २ फेब्रुवारी, २०१३

अंधश्रद्धेने गांजलेले माणसाचे नित्यजीवन


   श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात अतिशय पुसट रेषा असते. तशीच विश्वास व श्रद्धा यांच्यातही पुसट रेषा असर्ते. त्या केव्हा अनवधानाने पार केल्या जातात, त्याचे आपल्याला भान असतेच असे नाही. भक्ती वा श्रद्धा या अशा गोष्टी आहेत, की त्या तुम्हाला गाफ़ील करत असतात. अंधश्रद्धा तुमच्यातली चिकित्सक वृत्तीच निकामी करून टाकत असतात. आणि त्यासाठी अन्य कुणाकडे बोट दाखवण्याची गरज नाही. अगदी मी सुद्धा त्या अनुभवातून अनेकदा जात असतो. मी स्वत:ला बुद्धीप्रामाण्यवादी म्हणत असलो, तरी असे अनेक गाफ़ील क्षण माझ्याही आयुष्यात अधूनमधून आलेले आहेत, हे नाकारता येणार नाही. तेव्हा मी उगाच कोणाची अंधश्रद्ध म्हणून हेटाळणी करायला धजावत नाही. अंधश्रद्ध त्याला म्हणतात, जो आपल्या गाफ़ीलपणाच्या मागे आपली बुद्धी पणाला लावून युक्तीवाद करू लागतो. वास्तव दिसत असूनही बघायचे नाकारतो. आणि असे अनेक बुद्धीमंतही करताना दिसतील. प्रत्येकाच्या समजूती व श्रद्धा भिन्न असतील. पण त्यांचा आंधळेपणा मात्र एकाच स्वभावाचे असतात. आणि तो स्वभाव आपल्याला सत्य गवसल्याचा वा समजल्याचा अहंकार असतो. तो अहंकार एकदा मानगुटीवर बसला; मग बुद्धी त्याची गुलाम होऊन जाते. त्यामुळेच शक्य तेवढे सावध रहाणे हा शहाणपणा असतो. मग तो बुवाबाजीच्या संदर्भातला असो की राजकीय, वैद्यकीय, विज्ञानाच्या बाबतीतला असो. तेच दाखवण्यासाठी मी दोन वाचकांच्या प्रतिक्रियांवर इथे भाष्य़ केले. त्यांची हेटाळणी करणे हा माझा अजिबात हेतू नाही. आपण किती गाफ़ीलपणे एखाद्या भूमिका, विचार वा व्यक्तीच्या आहारी जाऊ शकतो, तेच दाखवण्याचा उद्देश त्या्मागे होता. असे माझेही अनेकदा झालेले आहे. कधी ते घरातल्या, मैत्रीच्या बाबतीतले असेल; कधी गंभीर विषयाच्या बाबतीतले असेल. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे दिल्लीतल्या सामुहिक बलात्काराच्या बाबतीतले दाखवता येईल. त्यात सर्वात हिडीस व विकृत वर्तन करणार्‍या गुन्हेगाराचे वय अठरा वर्षे पुर्ण नाही; म्हणून त्याला अजाण ठरवून कायदा त्याचा गुन्हा पोटात घालायला तयार झाला आहे. याला विज्ञाननिष्ठा, बुद्धीप्रामाण्य़ म्हणायचे, की शब्दप्रामाण्याची अंधश्रद्धा म्हणायचे?

   ज्या मुलीवर तो सामुहिक बलात्कार झालेला आहे, तिच्या जीवाशीही खेळ झालेला आहे. त्या मुलीवर बलात्कार करण्यात जो मुलगा सहभागी झाला, त्याला बलात्कार हा गुन्हा आहे हे कळत नव्हते का? त्याला लैंगीक अत्याचार कळत नव्हते का? त्या मुलीच्या अब्रूचा विषय सुद्धा बाजूला ठेवा, तिला आपण प्राणघातक इजा करतोय, हे सुद्धा त्याला कळत होते ना? मग त्याला अजाण कसे ठरवता येईल? जो मुलगा आपल्या सैतानी वर्तनातून जे करून दाखवतो आणि केल्यावर अपराधी भावनेने पळ काढतो; त्याला अजाण कशाच्या आधारे मानायचे? तर तसे कायदा म्हणतो, अठरा वर्षे वय पुर्ण असेल तोच सज्ञान; अशी कायद्याची व्याख्या आहे. पण ती व्याख्या कशासाठी बनवलेली आहे? तर सरसकट काही निर्णय घ्यायचे असतात, म्हणून एक वय निश्चित केलेले आहे. त्याचा अर्थ असा होत नाही, की ते वय पुर्ण होते, त्या दिवशी माणसामध्ये कुठला एक अवयव आपोआप कार्यरत होतो आणि त्याला अक्कल येते. सर्वसाधारण त्या वयाच्या आसपास माणसाला समज येते, अशा गृहीतावर त्या वयाचा आकडा कायद्याने गृहीत धरलेला आहे. म्हणून एक दिवस किंवा एक तास अलिकडे पलिकडे करून कोणाचे जाणतेपण ठरवायचे नसते. शब्दांचा अर्थ असा लावणे; ही शब्दांची प्रतारणा असते. शब्दांचा हेतू काही संकेतापुरता मर्यादित असतो. त्या शब्दाचा, त्याच्या योजनेमागचा हेतू विसरून त्याचा अर्थ लावायला जाणे; म्हणजे त्या हेतूलाच हरताळ फ़ासणे असते. कायद्याचा सुद्धा काही हेतू असतो. लोकांना न्याय मिळतो व मिळावा; याचे हेतूने कायद्याची निर्मिती झालेली आहे. त्या हेतूला बाजूला ठेवून कायद्याच्या रचनेतल्या शब्दांचे महात्म्य वाढवले, मग कायद्याचा हेतू रसातळाला जात असतो. पण इथे बलात्कार प्रकरणात किंवा इतर अनेक प्रकरणात कायद्यातल्या शब्दांचे अर्थ शोधून न्यायालाच हरताळ फ़ासलेला दिसेल. त्याला कायद्यावरची अंधश्रद्धाच म्हणायला हवे ना?

   दोनतीन महिने अठरापेक्षा वय कमी आहे, म्हणून त्या गुन्हेगाराला अजाण ठरवण्याला न्याय म्हणून आपण निमूटपणे मान्य करायचे, याला विज्ञान कशाच्या आधारे म्हणायचे सांगा? ही विज्ञानाची कुठली कसोटी आहे? पण आपण ती कशासाठी मान्य करतो? तर कायदा तसे म्हणतो आणि ज्यांनी कायद्याचा तसा अर्थ लावला आहे, ते त्यातले जाणकार आहेत म्हणून? जे बुद्धीला व विज्ञानालाही पटणारे नाही, ते पटवून कशासाठी घ्यायचे? कशासाठी मान्य करायचे? ही या एकाच बाबतीतली गोष्ट नाही. आपला शेजारी पाकिस्तान नावाचा देश आहे. तिथे असा कायदेशीर पेचप्रसंग उभा राहिला आहे. तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष आसिफ़ अली झरदारी यांच्यावर भ्रष्टाचाराचा अर्धवट सोडून दिलेला व रद्दबातल करण्यात आलेला खटला, नव्याने चालू करावा असा हट्ट धरला आहे. आणि तसे करत नाही म्हणून तिथल्या पंतप्रधानाला दोषी ठरवून राजिनामा द्यायला भाग पाडले. त्यामुळे पाकिस्तानात नवा पंतप्रधान आणावा लागला. असे युसुफ़ रझा जिलानी यांनी का करावे? ते पंतप्रधान होते, पण ते सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जुमानू शकले नाहीत. हा त्यांचा गुन्हा कसा ठरला? तर न्यायालयाचा आदेश त्यांनी मानला नाही. पण तो मानायला देशाची घटनाच परवानगी देत नव्हती. कुठल्याही देशाचा कारभार तिथल्या राष्ट्राध्यक्षाच्या नावाने चालत असतो. त्यामुळे त्याच्यावर कुठला खटला भरता येत नाही. मग पंतप्रधानाने घटना धाब्यावर बसवून झरदारी यांच्या विरोधात खटला चालवावा कसा? पण तसा सर्वोच्च न्यायालयाचा तरी हट्ट कशाला?

   झरदारी यांनी अध्यक्ष झाल्यावर भ्रष्टाचार केलेला नाही. त्याच्या खुप आधी त्यांच्या पत्नी बेनझीर पंतप्रधान असताना झरदारी यांनी सरकारी कंत्राटे मिळवून देताना दहा टक्के लाच खाल्ल्याचा आरोप होता. त्यासाठी ते तुरुंगात होते व खटला चालू होता. राजकीय सौदेबाजी करताना मध्यंतरी सत्तेवर असलेले लष्करशहा परवेझ मुशर्रफ़; यांनी आठ हजार खटले अध्यक्षिय आदेश काढून रद्दबातल केले. त्यातच झरदारी यांच्यावरच्या खटल्याचा समावेश होता. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अध्यादेश मान्य केल्याने खटले रद्दबातल झाले. पण आपला जुना आदेश आता सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून त्या सर्व खटल्यांची नव्याने सुनावणी करायचे आदेश जारी केले आहेत. त्यात काहीच अडचण नाही. पण मध्यंतरी बदलत्या राजकारणामुळे झरदारी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष बनून गेले. त्यामुळे नेहमीचे कायदे त्यांना लागू होत नाहीत. देशाचे अध्यक्ष म्हणून त्यांना घटनेने संरक्षण दिलेले आहे. म्हणजेच सर्वसामान्य कायद्यानुसार ते भ्रष्ट व गुन्हेगार आहेत. पण त्यांच्याच नावाने चाललेल्या कायद्याच्या राज्यात तोच कायदा त्यांना हात लावू शकत नाही. मग तो कायदा सर्वांना सारखाच लागू होतो, असा दावा करण्यात अर्थ उरला काय? गुन्हे करून कोणी अध्यक्ष पदावर आरुढ झाला; मग त्याला गुन्हे माफ़, असाच त्याचा अर्थ होत नाही काय? मग कायद्याने न्याय होतो, याला अंधश्रद्धा नाही तर काय म्हणायचे? आणि इथे किती विचित्र भानगड आहे बघा. गुन्हा अध्यक्ष झरदारी यांचा आहे. पण त्यांच्यावर खटला भरू शकत नसल्याने पंतप्रधानाचा हकनाक बळी कायद्यानेच घेतलेला आहे. ज्या कायद्याने न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे, त्यानेच एकावर अकारण अन्याय मात्र केला आहे. पण त्याबद्दल अवाक्षर बोलण्याची कोणाची पाकिस्तानात हिंमत नाही. कारण तो कायद्याचा वा न्यायालयाचा अवमान ठरू शकतो. थोडक्यात कायद्याने अन्याय, अत्याचार केला तरी त्याला न्यायच मानायचा अशी सक्ती आहे.

   कायद्यावरचा विश्वास व श्रद्धा यांची कशी कधी अंधश्रद्धा होऊन गेली ना? किती नकळत आपण अन्यायाला न्याय मानायची सवय अंगवळणी पाडून घेतली आहे बघा. नित्यनेमाने आपल्या आयुष्यात आपण असे अनेक अन्याय सहजगत्या पचवत असतो. कायद्यानुसार म्हटले, की आपली बोलती बंद होऊन जाते. आपली विवेकबुद्धी व चिकित्सक वृत्ती काम करीनाशी होऊन जाते. विश्वास व श्रद्धा यांची किती सहजगत्या अंधश्रद्धा होऊन जाते, त्याचे असे शेकडो नमूने सादर करता येतील. पण तो व्यवस्थेचा भाग असल्याने त्याला कोणी अंधश्रद्धा म्हणत नाही वा समजत नाही. पण त्याचे व्यवहारी परिणाम बघा. अंधश्रद्धा नाही तर त्यात दुसरे काय आहे? कुठलेही शब्दप्रामाण्य वा ग्रंथप्रामाण्य जेव्हा बुद्धीला पटत नसते, ती अंधश्रद्धा असते. कारण ग्रंथ व शब्द हे मानवी जीवन सुसह्य बनवण्यासाठी असतात. त्यातच त्या शब्दांनी बनलेले नियम बाधा आणत असतील तर ती अंधश्रद्धाच असते.    ( क्रमश:)
भाग   ( ७४ )    ३/२/१३

1 टिप्पणी:

  1. 'कुठलेही शब्दप्रामाण्य वा ग्रंथप्रामाण्य जेव्हा बुद्धीला पटत नसते, ती अंधश्रद्धा असते. कारण ग्रंथ व शब्द हे मानवी जीवन सुसह्य बनवण्यासाठी असतात. त्यातच त्या शब्दांनी बनलेले नियम बाधा आणत असतील तर ती अंधश्रद्धाच असते.'
    भाऊ,
    आपले सहज सुंदर विचार व सोदाहरण शब्दात गुंफायची हातोटी फार सुंदर आपले विचार व बातम्यांचे विश्लेषण वाचायला आवडते.

    प्रत्युत्तर द्याहटवा