रविवार, ३ फेब्रुवारी, २०१३

फ़ुले आंबेडकरांवर हक्क सांगणारे कुठे गेले?


   अहमदनगरच्या नेवासे तालुक्यातील सोनई गावात तीन तरूणांचे मृतदेह सापडल्याच्या घटनेला महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. त्याचा तपास रखडला आहे आणि खुनाची कारणेही उलगडलेली नाहीत. त्याबाबत सरकारी व प्रशासकीय उदासिनता एकवेळ समजू शकते. पण सामाजिक, राजकीय उदासिनता खरी धक्कादायक आहे. कारण राज्यातले पोलिस वा प्रशासन कधी शाहू, फ़ुले, आंबेडकरांच्या नावाची जपमाळ ओढत नाहीत. असा उद्योग सातत्याने करणारे जे महान समाज सुधारक आपल्यात वावरत असतात, त्यांची उदासिनता धक्कादायक आहे. अवघ्या अडीच महिन्यापुर्वी मुंबईत एक मोठी घटना घडत होती. त्या दिवशी शिवसेनाप्रमुखांची अंत्ययात्रा निघालेली होती आणि मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्रातल्या सर्वच प्रमुख शहरातले महत्वाचे व्यवहार ठप्प झालेले होते. त्याबद्दल जाहिरपणे सोशल नेटवर्कद्वारे नाराजी व्यक्त करणार्‍या दोन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले; तर देशाच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोहोचेल असा आक्रोश सुरू झाला होता आणि ज्यांनी ती कारवाई केली, त्या पोलिसांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायला एकाहून एक समाज सुधारकांची शर्यत सुरू झाली होती. ज्यांना दोन मुलींच्या त्या आविष्कार स्वातंत्र्याच्या गळचेपीने इतके व्यथित व्हायची वेळ येते, ते किती संवेदनाशील असतील ना? मग त्यांनी तीन तरुणांच्या अमानूष हत्येने किती व्यथित व्हायला हवे? त्यासाठी किती आक्रोश व्हायला हवा होता? त्याहीनंतर दिल्लीत सामुहिक बलात्काराची घटना घडल्यावर किती आक्रोश सुरू झाला होता? दिल्लीतल्या त्या घटनेचे पडसाद इतक्या दूर मुंबईतही उमटले होते. पण त्यातलाही कुणी नेवाश्याच्या गावातील या सामुहिक हत्याकांडाने विचलित झालेला दिसला नाही. आता त्या घटनेला महिन्याचा कालावधी होऊन गेल्यावरही कुठली तरी सामान्य घटना असावी तसे ते प्रकरण धुळ खात पडून रहावे?

   पहिली बाब म्हणजे तिन्ही मृत दलित आहेत. त्यांची हत्या झालेली आहे आणि त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. तरीही त्यांना दलित न मानता साध्या नेहमीच्या कायद्याने तरी न्याय मिळायला हवा की नको? तेवढाही न्याय किंवा तेवढीही दखल त्यांची घेतली जात नाही, अशी आजची वस्तुस्थिती आहे. आणि अशी दखल घेतली जात नाही, त्याला शाहू, फ़ुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असे मात्र अगत्याने म्हटले जात असते. कसला हा विरोधाभास आहे? कसली ही थट्टा आहे? बाकीच्या पक्षांचे सोडून द्या, जे स्वत:ला दलितांचे पक्ष व संघटना म्हणवतात, त्यांचीही उदासिनता धक्कादायक नाही काय? अर्थात आजकाल त्या दलित संघटनांपुरते फ़ुले आंबेडकर मर्यादित राहिलेले नाहीत. अलिकडे त्यांच्यावर अनेक मराठा, बहुजन संघटना आपलाही हक्क गाजवू लागल्या आहेत. त्यांच्यापैकी कोणी सोनई हत्याकांड प्रकरणात आवाज उठवल्याचे ऐकीवात नाही. मग असा प्रश्न पडतो, की फ़ुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणजे तरी काय? की निवडणूका आल्यावर आम्हाला हे महात्मे आठवतात आणि निवडणूकांचे निकाल लागल्यावर महाराष्ट्राची मालकी बदलत असते? मरणारा व मारला गेलेला माणूस आहे, माणसे आहेत, एवढेही आपण आता विसरून गेलो आहोत काय? एका कुटुंबातली तीन निरपराध माणसे अशी कत्तलखान्यातल्या जनावराप्रमाणे मारली जातात, त्याचे कोणालाच काही वाटत नाही काय? याला उदासिनता म्हणायचे की बधीरता? जातीपाती बाजूला ठेवा, निदान माणुसकी म्हणून तरी आपण कुणा निरपराधाकडे बघणार आहोत की नाही? या कसल्या अस्मिता आपल्याला बधीर करून बसल्या आहेत?

   महिन्याभरापुर्वी भारत पाक सीमेवर नियंत्रण रेषेची टेहळणी करणार्‍या दोन भारतीय जवानांची पाकने हत्या केली; तर उभा देश विचलित झाला होता. त्याचा चोख हिशोब देण्यासाठी पाकिस्तानवर हल्ला चढवा आणि युद्ध पुकारा, असा पुकारा करीत लाखो लोक कंठरवाने ओरडू लागले होते. आपल्या देशप्रेमाची साक्ष देण्याची सार्वत्रिक स्पर्धाच सुरू झालेली होती. कशाला? खरेच आपण त्या आपल्या सैनिकांवर इतके प्रेम करतो का? त्यापैकी एकाचे मुंडके तोडून पाकिस्तानी घेऊन गेले, म्हणून आपले रक्त खवळले होते ना? ते सगळे कितपत खरे होते? कारण इथे मुंबईपासून दोन चारशे किलोमिटर्स अंतरावर असलेल्या सोनई गावात त्यापेक्षा वेगळा प्रकार घडला नव्हता. जेवढे ते दोन जवान भारतीय होते, तेवढेच सोनई गावातले हे मारले गेलेले तीन तरूण अस्सल भारतीय होते. त्यांच्याही देहाची हत्या केल्यावर भीषण विटंबना करण्यात आलेली आहे. नुसती विटंबनाच नाही. निदान सीमेवरील त्या जवानाचे मुंडके सोडून उर्वरित देह भारतीयांच्या हाती सुखरूप लागावा, अशी स्थिती होती. त्यापेक्षा अधिक मृतदेहाची विटंबना करू नये, इतकी मर्यादा त्या शत्रू सैनिकांनीही पाळली होती. पण सोनई गावातला प्रकार त्यापेक्षाही पाशवी व अमानुष आहे. इथे मृतदेहाची विल्हेवाट लावुन ते कुजून सडून नष्ट व्हावेत इतका पाशवी प्रकार घडलेला आहे. आणि कोणाच्या अंगावर शहाराही येऊ नये? इतक्या आपल्या संवेदना व भावना बधीर झाल्या आहेत काय? सोनईतले हे तीन तरूण आणि सीमेवरचे ते दोघे जवान यांच्यात असा कुठला फ़रक होता? ते देशाच्या शत्रूशी लढणारे होते आणि इतके सोनईतले तरूण समाजाच्या शत्रूशी लढणारे नव्हते का? त्यांचा बळी समाजिक भेदभाव नावाच्या शत्रूनेच घेतलेला नाही काय? मग आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसादामध्ये असा जमीन अस्मानाचा फ़रक कस पडतो?

   कुठल्याही विषयात व घटनेत तमाम लोकांना लाज वाटावी असे आवाहन करणारे मुखंड कुठे आहेत? कारण ही इतकी लज्जास्पद घटना मुंबईच्या नजीक आपल्या दारापाशी घडली असताना, तिचा सुगावा लोकांना लागू नये याची काळजी कोणी घेतली? पालघरच्या नगण्य दोन मुलींसाठी आक्रोश करणार्‍यांचे सोनई बाबतीतले मौन चकित करणारे नाही का? सीमेवरील जवानांच्या मुंडक्यासाठी चर्चा घडवून आणणार्‍यांची या बाबतीतली उदासिनता थक्क करणारी नाही का? की संवेदनशीलता व बधीरता ही प्रत्येकाच्या जातीनुसार ठरत असते? हे तिन्ही तरूण मेहतर समाजाचे आहेत, दलितच आहेत. पण दलितांच्या प्रमुख जातीमधले नाहीत; म्हणून इतकी उदासिनता होती, की मतदार यादीत त्यांची संख्या जातीनिहाय नगण्य आहे म्हणून ही बधीरता दाखवण्यात आली? मला भिती त्यांचे मुडदे पाडणार्‍यांची वाटत नाही; इतकी भिती या शांततेची व मौनव्रताची वाटते. कारण ही शांतता व उदासिनता आजच्या वास्तविक जातीय राजकारणाचा सर्वात हिडीस चेहरा आहे. तो फ़क्त उच्चभ्रूंचाच नाही; तर संख्याबळ अधिक असलेल्या दलित पिछड्यांचाही आहे. आंबेडकरांच्या नावाने मतांचा जोगवा मागणार्‍यांचाही चेहरा त्यातच समाविष्ट आहे. कारण ही उदासिनता व निष्क्रियता पिछड्यांमधल्या मनूवादाचाही चेहरा आहे. आपल्या रक्तात जातीयवाद व जातीभेद किती खोलवर रुजला आहे, त्याचे ते प्रमाण आहे. आणि त्यासाठी आपण आपल्यातल्या माणुसकीला कशी तिलांजली देउन बसलो आहोत, त्याचे ते लक्षण आहे. भय त्याचे वाटते. सामाजिक न्यायाच्या गप्पा मारताना एकू्णच समाज किती व्यवहारी निष्ठूर झालाय; त्याची अशी प्रचिती चिंताजनक आहे. ज्या अविष्कार स्वातंत्र्यासाठी गळा काढला जातो, तेच स्वातंत्र्य अन्यायाविरुद्ध आक्रोश करताना मरगळून निष्क्रिय होत असेल, तर त्याचा उपयोग तरी काय?

   सीमेवरील जवानांची हत्या व मृतदेहाची विटंबना आणि सोनईतील घटना जवळपास एकाच वेळच्या असून त्यात माध्यमांनी दाखवलेला भेदभाव म्हणून तर धक्कादायक व चिंताजनक आहे. मग प्रश्न पडतो, त्या जवानांविषयीची आत्मियता खरी होती, की या तीन मेहतर तरुणांच्या हत्येविषयीचे मौन खरे असावे? त्या सोनई गावाची ख्याती काय? कुठे आहे ते गाव? याच गावातून शनी शिंगणापूरात जाता येते. जिथे म्हणे कुठली चोरी होत नाही. आणि शेजारच्या गावात मात्र चोरटे खून होऊ शकतात? कुठल्या जमान्यात आणि कुठल्या मानसिकतेमध्ये आपण आज जगतो आहोत? सगळा प्रकारच मन विषण्ण करून सोडणारा आहे. कारण बदनाम पोलिसांपेक्षा सामाजिक न्यायाचा डंका पिटणार्‍यांची अलिप्तता भयकारी आहे. आणि म्हणे फ़ुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. कोण होते ते तिघे तरूण? (क्रमश:)
भाग   ( ७५ )    ४/२/१३

२ टिप्पण्या:

  1. खरच भाऊ अत्यंत दु:खद आणि शोचनीय असे हे दुर्दैव आहे. खरे म्हणजे ह्या बातम्या हव्या तशा पोहचल्या नाहीत हा माध्यमांचा बनेल पणा आहे. मी सुद्धा ह्याच्या गान्भिर्यापासून अनभिज्ञ होतो. आपल्या ह्या पोस्ट मूळे माझेही डोळे खाडकन उघडले आहेत. आपण उचललेला हा मुद्द्दा अत्यंत आवश्यक होता. फुले आणि आंबेडकर ह्या महान व्यक्तींचे नावे आपल्या राज्यात केव्हा आणि कुठे व कोणत्या लोकांकडून घेतली जातात हा आता संशोधनाचा विषय राहिला नाही. थोर पुरुषांच्या नावाची मक्तेदारी हि ते कुठल्या जातीचे होते त्यांच्याकडे आपोआपच आरक्षित झालेली आहे. आपल्या देशात जी कधीच जात नाही 'जात' आहे. ही गोष्ट जशी इंग्रजांनी ओळखली होती तशीच सध्याच्या राज्यकर्त्यानीही जोखली आहे. तोडा-फोडा आणि राज्य करा हे सत्तेचे सूत्र इंग्रजांनी शोधलेले नाही. आपल्याच महान लोकांनी व तथाकथित स्मुतीकारांनी जगाला दिलेला सत्तेचा तो कानमंत्र आहे. हा मंत्र किती यशस्वी आहे हे तपासायला आपल्या देशापेक्षा दुसरे उदाहरण नसावे.
    बाबासाहेबांचा संघर्ष हा फक्त आर्थिक, शैक्षणिक, रोजगार ह्यांच्या आरक्षणा पुरता मर्यादित नव्हता. सर्व मागास जातींच्या ऐक्यातून एक व्यापक वैचारिक- सामाजिक परिवर्तनाचा तो संघर्ष होता. स्वत: बाबासाहेबांनी कधी दलितांचे वर्गीकरण केले नव्हते. महार, मातंग, मेहतर, चांभार, अशा सर्वाना ते दलित म्हणूनच मानत होते.
    आहार-विहार-विचार-उच्चार ह्यांची शुद्धता आणि शिकून संघटीत होण्याचा एक मूलमंत्र त्यांनी दलितांना सांगितला होता. एक प्रकारे तो निर्वाणीचा इशारा वजा आदेश होता. दुर्दैवाने तो कुणी पाळला का ?
    आपण मागे एक शब्द वापरला होता " दलितामधले मनुवादी" तो अत्यंत समर्पक आणि मार्मिक आहे. दलितामध्ये आपापसात एक जातीयवाद आहे. त्यामध्ये जो लढाऊ आहे, हक्काबद्दल जागरूक आहे तो एक नंबर वरचा आहे. जो बिचारा विखुरलेला आहे, त्याच्या जातीवाला कुणी महान नेता होऊन गेला नाही म्हणून तो अनौरस दलित आहे; त्यांचे कुणी वाली नाही. तो दलिता मधला अतिदलीत आहे.
    महामानवाला अभिप्रेत असलेली ही समाजव्यवस्था नव्हती. दलित ऐक्याचा आणि समतेचा हा विपर्यास त्यांना खचितच दुख देणारा आहे.
    माध्यमे तर कुठल्या लायकीचे लोक चालवीत आहे ते सर्वाना ठाऊक आहे. त्यांनी कुठला थर गाठला आहे ह्यावर आपण रोज आसूड ओढतच असतात: पण आज मला त्यांना खूप शिव्या द्याव्याश्या वाटतात. पुतळ्याची विटंबना झाली म्हणून हाहाकार करणे आणि जिवंत हाडा-मासांच्या माणसांची कत्लेआम झाली तरी सर्वांनी सोयीस्कर मौन पाळणे ही घटना मन विषन्न करणारी आहे. छत्रपती पासून ते शेवटच्या सुधारका पर्यंत जो सामाजिक क्रांतीचा अखंड यज्ञ चालू होता त्याचे हे घोर अपयश आहे.

    उत्तर द्याहटवा