हिंदू मतांचा गठ्ठा हे कुणालाही सहज न पटणारे गणित आहे. आपल्या देशातले तमाम सेक्युलर पक्ष व राजकारणी; मुस्लिमांच्या चुकांवरही पांघरूण घालायला नेहमी सज्ज असतात. स्वत: हिंदू असले तरी ते मुस्लिम अतिरेकाची अतिशयोक्त बाजू घेतात. त्यातून आपण मुस्लिमांचे हितचिंतक आहोत, असे भासवण्याची अखंड धडपड चालू असते. कारण आपल्या मुस्लिम धार्जिणेपणातून मुस्लिमांची एक गठ्ठा मते आपल्या पारड्यात पडावित, अशी त्यामागची अपेक्षा असते. तसे हिंदूंच्या बाबतीत सहसा घडत नाही. कारण मुख्य वैचारिक राजकारण हिंदू समाजाच्या बाबतीत विचलित झाले असून ते जाती पोटजाती निहाय विस्कटले आहे. जाती पोटजातीचे विविध नेते व त्यांचे प्रादेशिक लहानमोठे पक्ष उदयास आलेले आहेत. त्यांनी आपापला जम बसवला असून त्यांचे मतांचे गठ्ठेही तयार झालेले आहेत. त्यामुळेच हिंदू म्हणून धर्माच्या नावाने मते मागणे शक्य नाही, की तशी अपेक्षाही बाळगता येत नाही. या जाती पोटजातीच्या लहानलहान मतांच्या गठ्ठ्य़ांचे बालेकिल्ले प्रादेशिक आहेत. मुस्लिमांसारखे अखील भारतीय नाहीत. अयोध्येतील राम मंदीर व शहाबानू प्रकरण यामुळे काही काळ हिंदू मतांचे थोडेफ़ार धृवीकरण भाजपा करू शकला होता. पण तो भार पेलणे वाजपेयी किंवा अडवणी यांना जमले नाही. सेक्युलर माध्यमे व मित्र पक्ष यांच्या अपेक्षांचा बोजा पेलता पेलता त्या दोन्ही नेत्यांचे हिंदूत्व दबून गेले. त्यातच पुन्हा तयार होणारा हिंदू मतांचा गठ्ठा विस्कटून गेला. १९९६ सालात संसदेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेल्या भाजपाला सत्तेची स्वप्ने पडू लागली व त्याने तयार होणार्या हिंदू मतांच्या गठ्ठ्याला लाथ मारून बहूमताच्या आघाडी समिकरण बनवताना हिंदू एकजुटीच्या भूमिकेला तिलांजली दिली. तिथून तो हिंदू म्हणून गठ्ठा मते देणारा मतदार विचलित व उदासिन होऊन गेला. १९८९ पासून १९९८ पर्यंत भाजपाची ताकद सतत वाढत होती आणि तेव्हा भाजपा हिंदूत्वाची पाठराखण करत होता. चार निवडणुका वाढत गेलेल्या भाजपाने १९९८ सालात एनडीए बनवताना मंदिर आदि हिंदूत्वाचे मुद्दे बाजूला टाकले व त्याची वाढ खुंटलेली दिसेल. १९९९ सालात आधी होत्या तेवढ्याच जागा जिंकल्या आणि २००४ मध्ये त्यातही घसरण झाली. २००९ मध्ये आणखी घसरण होऊन भाजपा १९९१ च्या इतक्या कमी जागांपर्यंत खाली आला. याचे रहस्य कोणी कधी समजून घेण्य़ाचा प्रयत्न केला आहे काय?
कालपरवा हेडलाईन्स टूडे या वाहिनीवर राहुल कन्वल याने हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांची मुलाखत घेतली. त्यात मोदींच्या लोकप्रियतेची चर्चा केली. मोदी यांचा चेहरा वाजपेयी यांच्याइतका उदारमतवादी नाही; वगैरे नेहमीची पोपटपंची कन्वल याने केली. पण वाजपेयी व मोदी यांच्या लोकप्रियतेमधला नेमका फ़रक सिंघल यांनी सांगितला, तो काही त्याला समजून घेता आला नाही. ही आजच्या माध्यमांची शोकांतिका आहे. ज्याची मुलाखत घेतात, त्याचे मत समजून घेण्याची वा जनतेला तो माणूस दाखवण्याची इच्छाच ही माध्यमे गमावून बसली आहेत. चित्रपट कथाकार वा नाटककार जसा आपल्या पात्रांना आपल्या मनाप्रमाणे खेळवत व प्रेक्षकांसमोर मांडत असतो; तसे हे आजचे पत्रकार जिवंत माणसे व नेत्यांना पात्राप्रमाणे पेश करू बघतात. त्यामुळे खरीखुरी माणसे वा नेते लोकांसमोर आणलेच जात नाहीत. त्याचे खरे कारण असे पत्रकार समोरच्या व्यक्तीला, त्याच्या व्यक्तीमत्व किंवा मताला समजूनही घेण्य़ाचा संयम दाखवत नाहीत. तिथे सगळी गडबड होते. इथे राहुल कन्वल सुद्धा सिंघल यांची मुलाखत घेण्यापेक्षा आपल्या मनातली वाक्ये व मुद्दे सिंघल यांच्याकडून वदवून घेण्यासाठी धडपडत होता. सहाजिकच सिंघल यांनी कुठला मोठा मुद्दा सांगितला त्या्कडे त्याचे लक्षच नव्हते. मोदी व वाजपेयी यांच्या जनमानसातील लोकप्रियता व प्रतिमेचे तेच नेमके विश्लेषण आहे. ‘वाजपेयी हे पत्रकार व राजकीय पक्ष- विचारवंतांमध्ये लोकप्रिय होते, जनतेमध्ये त्यांची लोकप्रियता तेवढी नव्हती. मोदी यांचे उलट आहे. त्यांची लोकप्रियता माध्यमे व राजकीय पक्ष विचारवंतामध्ये कमी आणि सामान्य जनतेमध्ये अधिक आहे.’ हा अत्यंत सुक्ष्म असा राजकीय बारकावा आहे आणि त्याची साक्ष निवडणुकीचे आकडेही देतात.
दीनदयाळ उपाध्याय यांचे निधन झाल्यापासून वाजपेयीच भाजपाचे सर्वात वरिष्ठ नेता होते यात वाद नाही. पण जनता पक्षातून १९८० साली वेगळे झाल्यापासून भाजपाने नवा अवतार घेतला; तेव्हाही वाजपेयीच भाजपाचा चेहरा होते. पण १९८४ मध्ये त्यांचाही लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आणि अन्य पक्षांबरोबर भाजपाचीही राजीव लाटेत धुळधाण उडाल्यावर नव्याने पक्ष उभारणीचे शिवधनुष्य अडवाणींनी पेलले. १९८७ नंतर हिंदूत्वाचा झेंडा भाजपाच्या खांद्यावर घेतला. त्यानंतर पुढल्या दहा वर्षात अडवाणी हाच भाजपाचा चेहरा होता. पण १९९६ साली जैन डायरीचा मामला गाजला. त्यात अडवाणी यांचे नाव आले आणि त्यांनी त्यातून मुक्त होईपर्यंत निवडणुक लढवणार नाही अशी भूमिका घेतल्यावर पुन्हा वाजपेयींचे नाव पुढे आले. अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने नुसता पक्ष सावरला नाही; तर संसदेतील सर्वात मोठा पक्ष होण्यापर्यंत मजल मारली. २ खासदारावरून ९०, १४०, १६० आणि १८६ अशी मजल मारली होती. पण वाजपेयी यांना पंतप्रधान केल्यावर अन्य पक्षांना सोबत घेताना ज्या तडजोडीची भूमिका घेतली गेली; तिथून भाजपाचा विस्तार थंडावत गेला. सहा वर्षे वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा राहिला आणि सत्तेसाठी अगतिक अशी त्याची प्रतिमा बनत गेली. त्यातच त्याची घसरण पुन्हा दिडशे खासदारांच्या खाली गेली. वाजपेयी असे अन्य पक्षात व सेक्युलर माध्यमात लोकप्रिय होते, पण जनतेत व मतदारांमध्ये अप्रिय होते. आकडेच त्याची साक्ष देतात. किंबहूना तोच सेक्युलर माध्यमे व विचारवंतांनी भाजपासाठी लावलेला सापळा होता, त्यात वाजपेयी आपली उजळ प्रतिमा बनवण्यासाठी फ़सत गेले व त्यांनी भाजपाच्या राजकीय शक्तीचे खच्चीकरण केलेले दिसेल. वाजपेयी यांना सेक्युलर म्हणायचे, सर्वसमावेशक म्हणायचे आणि भाजपावर मात्र हिंदूत्वाच्या दुगाण्या झाडायच्या, असा तो सापळा होता. त्यात वाजपेयी रमले आणि त्यांना थांबवणारा कोणी पक्षात नसल्याने त्याच्यासोबत भाजपाची लोकप्रियता रसातळाला गेली. हिंदूत्वाचा आक्रमक पवित्रा घेऊन उभा राहिलेला किंवा अडवाणींनी उभा केलेला भाजपा, सेक्युलर करता करता वाजपेयींनीच पुरता जमिनदोस्त करून टाकला. वाजपेयींचे माध्यमे आजही कौतुक करतात, त्यांना सर्वसमावेशक नेता म्हणतात, मग हीच भाषा तेव्हाच्या भाजपा बाबतीत का नव्हती? पुढल्या काळात त्यांची जागा घेऊ बघणारे अडवाणीही सेक्युलर माध्यमांच्या प्रेमात पडले. पण त्यामुळे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा अधिकच खाली घसरला.
एनडीएमधल्या अन्य पक्ष व सेक्युलर माध्यमांना खुश करताना अडवाणीही सेक्युलर होत गेले. पण ज्या हिंदूत्ववादी मतदाराने त्यांना इतक्या उर्जितावस्थेला आणले होते, त्याचाच त्यांना विसर पडला होता. गुजरातच्या दंगलीनंतर वाजपेयी तिकडे गेले असताना; त्यांनी आपल्या सेक्युलर प्रतिमेला जपताना मोदी यांना ‘राजधर्मका पालन करना चाहिये’ असा सल्ला दिला, ते भाजपा विरोधकांच्या हातात दिलेले कोलित नव्हते काय? सोनिया किंवा अन्य कुठल्या पक्षाचा वरिष्ठ नेता अशा प्रकारे स्वपक्षिय नेत्याला अडचणीत आणणारी विधाने कधी करतो काय? पण वाजपेयी यांनी नेमके तेच केले; तर माध्यमे त्यांचे कौतुक करत होती. ज्यांनी पक्षाच्या मतांमध्ये व जागांमध्ये कुठली भर घातली नाही, ते वाजपेयी लोकप्रिय म्हणजे नेमके काय? त्याची मोजपट्टी कुठली? ही शुद्ध धुळफ़ेक नाही काय? वाजपेयी यांनी लोकसभेत दोन खासदारांचा पाठींबा मिळावा म्हणून आसामच्या गण परिषदेशी मैत्री करताना तिथल्या स्वपक्षिय संघटनेचा बोजवारा उडवला, तसाच आंध्रमध्ये वाढणार्या पक्षाला चंद्राबाबूंच्या दावणीला बांधून कोंडी केली होती. मुद्दा इतकाच, की आपली प्रतिमा आणि पंतप्रधानपद जपण्यासाठी वाजपेयी यांनी पक्षाचा सतत बळीच दिला. त्याला सर्वसमावेश म्हणता येत नाही. उलट मोदी यांनी टिकेचे आसूड आपल्या पाठीवर घेताना पक्षाला आज देशव्यापी लोकप्रियतेच्या उंचीवर नेलेले आहे. आणि अशोक सिंघल नेमके तोच बारकावा दाखवत आहेत. पण राहुल कन्वल याला वा तत्सम पत्रकारांना तो बघायचाच नसेल तर दिसेल कसे? वाजपेयी यांना पक्षाच्या विस्तार व वाढीपेक्षा आपल्या पंतप्रधान पदाच्या शाश्वतीमध्ये रस होता व त्यासाठी त्यांनी पक्षाला स्वबळावर उभे रहाता येईल असा अजिबात विचार केला नाही. मोदी यांची कहाणी नेमकी उलटी आहे. आज तरी मोदींचे गणित स्वबळावरच भाजपाला संसदेत बहूमत मिळावे असे प्रयत्न दिसत आहेत. आणि म्हणूनच अन्य पक्षात, विचारवंतांमध्ये वा सेक्युलर माध्यमांत आपले व्यक्तीगत कौतुक व्हावे; याची त्यांनी अजिबात फ़िकीर केलेली नाही. मुसंडी मारून त्यांनी स्वत:ला व भाजपाला थेट लोकांनी सरकार बनवण्याची संधी द्यावी. असे प्रयास चालविलेले आहेत. त्यासाठी पंधरा वर्षापुर्वी सोडून दिलेल्या हिंदूत्वाची कास त्यांनी धुर्तपणे धरलेली आहे आणि त्या कार्यात त्यांच्या विरोधकांचे बळ मोदी मोठ्या खुबीने वापरून घेत आहेत. त्यातूनच त्यांनी आपल्यासाठी देशव्यापी हिंदू मतांचा गठ्ठा निर्माण करण्याची मोहिम यशस्वीरित्या राबवली आहे. म्हणूनच मुस्लिम आपला अधिकाधिक द्वेष करतील व आपल्याला मुस्लिमांचा शत्रू असे चित्र रंगवले जावे, असा मोदी जाणिवपुर्वक प्रयास करतात असेच कधीकधी वाटते. ( क्रमश:)
भाग ( ८६ ) १५/२/१३
chan ekdam
उत्तर द्याहटवामोदी चाणाक्ष चतुर व राजकारण निपुण आहेत तसेच पुर्वसुरींच्या चुकांपासून योग्य तो बोध घेण्याची त्यांची तयारी आहे.
उत्तर द्याहटवाअचुक विश्लेषण! वाजपेयींच्या राजकारणाला दुसरी बाजु आहे हे प्रथमच समजले!
उत्तर द्याहटवा