शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१३

भाजपा उमेदवारी घोषणा का करीत नाही?


   सध्या तरी नरेंद्र मोदी गुजरातमध्येच आहेत आणि त्यांचा पक्ष किंवा त्यांनी स्वत:ला २०१४ च्या निवडणुकीत अधिकृतपणे झोकून दिलेले नाही. पण माध्यमांना मात्र त्याची खुपच घाई झालेली आहे. मोदी उमेदवार असल्याप्रमाणे मतचाचण्या घेतल्या जात आहेत व त्यावर चर्चाही चालू आहेत. तेवढ्यावरही भागत नाही. मोदी एनडीएचे उमेदवार झाले तर नितीशकुमार यांचा जेडीयू त्या आघाडीत रहाणार कसा; याची त्या पक्षापेक्षा माध्यमांना चिंता भेडसावते आहे. तितकेच नाही तर एनडीएमधून नितीशचा पक्ष बाहेर पडला, तर भाजपाला उर्वरित मित्रांसह बहूमताचा पल्ला कसा गाठता येईल; याचीही चिंता माध्यमांनाच अधिक भेडसावते आहे. जणू मोदी पंतप्रधान व्हावेत अशी सेक्युलर माध्यमांचीच सर्वाधिक इच्छा असावी; असेच आजचे तरी चित्र आहे. मात्र भाजपा किंवा त्यांचा को्णी मित्र पक्ष ती इच्छा, लगेच तथास्तू म्हणून पुर्ण करायला राजी नाहीत. त्यामुळे माध्यमातील सेक्युलर मंडळींच्या जीवाची खुपच घालमेल सुरू आहे. मोदी उमेदवार असतील तर आम्ही एनडीएमधून बाहेर पडू; अशी नितीशनी धमकी द्यावी, इतकी किमान इच्छासुद्धा त्यांचा पक्ष पुर्ण करायला राजी नाही. किती अत्याचार आहे ना? वाहिन्या आणि माध्यमे ज्या राजकारण्यांना इतकी अहोरात्र प्रसिद्धी देत असतात, त्यांनी माध्यमांची इतकी सामान्य इच्छा सुद्धा पुर्ण करू नये? नितीश त्यावर काही बोलत नाहीत आणि त्यांचे विश्वासू सहकारी तशी वेळ येऊ देत म्हणून प्रश्नच झटकून टाकतात. याला अत्याचार नाही तर काय म्हणायचे? बरे मोदींची लोकप्रियता सिद्ध करण्यासाठी वाहिन्यांनी पदरमोड करून चाचण्या घेतल्या. भाजपाला आणखी काय हवे? करायचे लगेच मोदींचे नाव जाहिर आणि जाऊ द्यायचे नितीश ना एनडीए सोडून. पण कोणी म्हणून ढिम्म हलायला तयार नाही. ना मोदी आपली उमेदवारी बोलत, ना भाजपा त्यांचे नाव घेत. मग वाहिन्यांनी चोविस तास बोंबलायचे काय? तोगडीया, सिंघल यांच्या बडबडीला कोणी किंमत देत नाहीत, नितीश वगैरे त्यांची दखलही घ्यायला तयार नाहीत. मोठी गोची झाली आहे वाहिन्यांवरचा उतावळ्या सेक्युलरांची.

   जे माध्यमातल्या विद्वान, हुशार, अभ्यासू पत्रकारांना इतके सोपे वाटते, तेच या बुद्दू राजकारण्यांना अवघड का वाटावे? त्याचे कारण हे अभ्यासू लोक किनार्‍यावर बसून बोलत असतात. पण राजकारण्यांना वहात्या धारेत उतरून पोहायचे असते. हात मारता आले नाहीत तर गटांगळ्या पत्रकार, अभ्यासक खात नसतो. राजकीय नेते व उमेदवारांना खाव्या लागत असतात. म्हणूनच किनार्‍यावर बसून पोहणे किती सोपे आहे; त्याची गणिते मांडणार्‍या पत्रकार अभ्यासकांपेक्षा राजकारणी सावधपणे पावले टाकत असतात. त्यांना घाई नसते आणि वाहिन्यांना बातम्या रंगवायच्या आहेत, म्हणून कोणी पक्ष चालवत नसतो. त्यांची काही धोरणे, योजना व भूमिका असतात. त्या बातमीसाठी नसतात, तर समाजाच्या वर्तमान व भविष्याशी संबंधित असतात. त्यामुळेच त्यांना असे विषय माध्यमे व पत्रकारांच्या शिळोप्याच्या गप्पा चालाव्यात; तशा हाताळता येत नसतात. मग देशाच्या पंतप्रधान पदाचा विषय इतका झटपट सोडवावा हे शक्य आहे काय? त्यातील शक्यता, गणिते, समिकरणे, जु्ळवाजुळवी, रागलोभ अशा अनेक बाजू विचारात घ्याव्या लागतात. मतचाचण्या घेऊन अंदाज बांधावेत, अशा खर्‍या निवडणूका सोप्या नसतात. त्यात अनेकांच्या आयुष्याचा जुगार पणास लागलेला असतो. लालू किंवा मुलायम यांचीच कहाणी घ्या. मागल्या काही वर्षात त्यांनी माध्यमांच्या तालावर नाचतांना स्वत:ची कशी दयनीय अवस्था करून घेतली आहे? काही वर्षे सतत वाहिन्यांवर दिसणारे लालू आता कशाला गायब आहेत? कारण सेक्युलर पोरखेळात ते आपली शक्ती गमावून कफ़ल्लक झाले आहेत.

   भाजपाला सत्तेपासून रोखण्याचा जो खेळ दहा वर्षापुर्वी सुरू झाला, त्यात माध्यमांच्या तमाशात लालू मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. त्यात आपल्या कॉग्रेस विरोधाचा चेहरा ते गमावून बसले आणि आता आपले पाठीराखे निवडून आणायची क्षमता गमावल्यावर त्यांना त्याच सेक्युलर समिकरणात कोणी विचारत सुद्धा नाही. मागल्या खेपेस त्यांनी कॉग्रेसला सोबत घेतले होते व स्वत: लालू युपीए सरकारमध्ये सहभागी झाले. परिणामी त्यांचा बिहारमध्ये असलेला कॉग्रेस विरोधाचा पाया ठिसूळ होऊन गेला आणि पुढल्याच निवडणुकीत त्यांचा फ़ज्जा उडाला. त्यांच्या कॉग्रेस विरोधी मतांवर नितीश कब्जा करत गेले आणि लालू व पासवान नेस्तनाबूत झाले. बिहारमध्ये सेक्युलर खेळ खेळताना आणि त्यातून भाजपाला संपवताना, तेच दोघे संपले. भाजपा शिल्लक आहे. पण दरम्यान कॉग्रेसच्या नादाला लागून या दोघांनी आपली पत गमावली. उलट मुलायम-मायावती यांची कहाणी बघा. त्यांनी कॉग्रेसला लोकसभेत पाठींबा देताना कधीच थेट निवडणुकीत युती मात्र केली नाही. आपला मतदार कॉग्रेस विरोधातला आहे व तो कॉगेस सोबत गेल्याने बिथरू शकतो, याचे दोघांनी भान ठेवले आहे, तर त्यांची ताकद कमीजास्त झाली तरी टिकून आहे. तेव्हा माध्यमांतील सेक्युलर अभ्यासकांची गणिते वेगळी असतात आणि खर्‍या निवडणुकीतली सेक्युलर गणिते वेगळी असतात. हे मुलायमला ठाऊक आहे; तसेच नितीशही ओळखून आहेत. मोदींच्या विरोधात बोलणे वेगळे आणि कॉग्रेसच्या वळचणीला जाऊन बसणे वेगळे. आज तर कॉग्रेस पक्ष इतका बदनाम झालेला आहे, की त्याच्याशी कसलीही संगत म्हणजे शापच अशी स्थिती आहे. ते नितीश व त्यांच्या पक्षाला कळते. म्हणूनच मोदी विरोधात बोलतानाही कॉग्रेसचा लाभ होणार नाही, याची काळजी त्यांना घ्यावीच लागते. अन्यथा त्यांनाही बिहारमध्ये आपला पाया गमवावा लागेल.

   बिहारचे मुख्यमंत्री नितीश असले तरी तिथे त्यांचे सरकार वा बहूमत स्वबळावर सत्तेपर्यंत पोहोचलेले नाही, भाजपाने पाठींबा काढून घ्यायचा म्हटला तर नितीशचे सरकार एका दिवसात अल्पमतात जाऊ शकेल. कारण तिथे एनडीएचे संयुक्त सरकार असून त्यात भाजपाही भागीदार आहे. नितीशचे ११० तर भाजपाचे ९० आमदार आहेत. भाजपाला सोडून नितिश सत्ता टिकवू शकतात. पण त्यासाठी त्यांना लालू व पासवान यांची मदत घ्यावी लागेल. ते खेळवतील तसे त्यांच्या तालावर नाचावे लागेल. त्यापेक्षा दहाबारा वर्षात भाजपने मैत्रीची बुज राखली आहे. तिला सेक्युलर या शब्दासाठी चुड लावायची काय; असा नितीश समोर गंभीर प्रश्न आहे. तसे केल्यास मग त्यांचाही लालू व्हायला वेळ लागणार नाही. कारण त्यातून बिहारमध्ये पुन्हा लालू, पासवान व कॉग्रेसचे पुनरुज्जीवन होऊ शकेल. भाजपाला नामोहरम करणे शक्य नाही, पण हे लोक शिरजोर झाले तर नितीशची सद्दी संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. म्हणूनच जो माध्यमातल्या अभ्यासकांसाठी कागदावरचा खेळ आहे, तो नितीश वा त्यांच्यासारख्या नेत्यांसाठी जीवनमरणाचा प्रश्न असतो. त्यांना एक बातमी रंगवावी, तसा हा विषय हाताळता येत नसतो. कारण त्यांना त्याच्या मतदाराच्या मानसिकतेचा कल लक्षात घ्यावा लागत असतो. सेक्युलर वा हिंदुत्व यांच्या माध्यमातल्या व्याख्या वेगळ्या व व्यवहारी राजकारणातल्या वास्तविक व्याख्या वेगवेगळ्य़ा असतात. मते त्यानुसारच मिळत असतात. म्हणून त्याच कलाने राजकीय नेते व पक्षांना निर्णय घ्यावे लागत असतात. लोकमत जेव्हा कॉग्रेसच्या विरोधात खवळलेले आहे, अशा वेळी ज्या लोकप्रिय नेत्याकडे लोकमत आकर्षित झालेले असते, त्याला झुगारून चालत नाही.  

   म्हणूनच नितीशकुमार यांचा मोदी यांच्या नावाला मनापासून विरोध असला, तरी तो व्यवहारी राजकारणात कितीसा परिणामकारक आहे, त्याचीही चाचपणी करावी लागत असते. मागल्या दहा वर्षात भाजपाकडे लोकांच्या मनाला गवसणी घालणारा कुणी नेता नव्हता. पण त्याच कालखंडात कॉग्रेस व युपीए मिळून जो बट्ट्य़ाबोळ करण्यात आलेला आहे, त्यामुळे मोदी यांची प्रतिमा उंचावलेली आहे, त्यांच्याविषयी जनमानसात अपेक्षा उंचावलेल्या आहेत. हे राजकारणात दिर्घकाळ वावरलेल्या नितीशना नेमके कळते. म्हणूनच त्यांच्याशिवाय सुद्धा मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा मोठा पल्ला गाठू शकते, याची नितिशना जाणिव आहे. म्हणून तर त्यांना एक एक पाऊल जपून टाकायची वेळ आलेली आहे. बिहारमध्ये वीस टक्क्याहून अधिक मुस्लिम लोकसंख्या आहे तिला मोदींचे नाव कितपत पचनी पडू शकेल याची चिंता नितीशना आहे. त्यावर त्यांचा सेक्युलॅरिझम अवलंबून आहे. म्हणूनचा येत्या चारपाच विधानसभा निवडणुकीत मोदी त्या त्या राज्यात काय करिष्मा दाखवतात; याची प्रतिक्षा भाजपासोबतच नितीश सुद्धा करणार आहेत. तोपर्यंत कोणीच मोदी यांना पंतप्रधान पदाचे थेट उमेदवार म्हणून घोषित करणार नाही की पाठींबा देणार नाही.    ( क्रमश:)
भाग   ( ८० )    ९/२/१३


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा