शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१३

दहशतवादाची व्याख्या तरी कोणाला ठाऊक आहे?




   तब्बल चार आठवड्यापुर्वीची गोष्ट आहे. ‘पुण्यनगरी’च्या याच स्तंभातून मी केंद्रिय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या जयपूरच्या विधानातील खोटेपणा स्पष्टपणे कथन केलेला होता. तेव्हा अन्य माध्यमे त्यावर सावधपणे बोलत होती. लौकरच सुशिलकुमार आपली चुक वा खोटेपणा मान्य करतील व त्याची कबुली देतील असेही मी तेव्हाच म्हटलेले होते. मात्र ती वेळ इतक्या लौकर येईल, अशी माझी अपेक्षा नव्हती. पण संसदेच्या अधिवेशनाची कोंडी व्हायची पाळी आल्यावर शिंदे यांनी आपले शब्द मागे घेतलेच. अधिक दिलगिरीही व्यक्त केली आहे. माझ्या दृष्टीने ती दिलगिरी वा शिंदे खोटे पडण्याला महत्व नाही. त्यापेक्षा अतिशय महत्वाची बाब आहे; ती दहशतवादाच्या बाबतीतल्या अडाणीपणाची. मुस्लिम वा हिंदू दहशतवाद अशी लेबले लावून जे घाणेरडे मतांचे राजकारण चालते, त्याने देशाची सुरक्षा व जनजीवन किती धोक्यात आणले आहे, याचा त्यावर पांडीत्य करणार्‍यांनाही थांगपत्ता नसावा ही बाब अधिक घातक आहे. ज्याला रोगराई वा वैद्यकशास्त्राचे काडीचे ज्ञान नाही, अशा लोकांच्या इस्पितळात एखाद्या रोग्याला भरती केल्यास त्याच्या जीवाशी कोणकोणते खेळ होतील, त्याची कल्पना करा. म्हणजे आज आपला देश व समाज दहशतवादाचा शिकार का झालेला आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. कारण दहशतवाद म्हणजे नेमके काय त्याचाच थांगपत्ता नसलेले लोक यातले जाणकार म्हणून मिरवत असतात व पोपटपंची करीत असतात. त्यामुळे गल्लीतल्या दंगलीपासून बॉम्बस्फ़ोट व घातपातापर्यंत कशालाही ते दहशतवादाच्या व्याख्येत आणुन बसवतात. त्यामुळे होते काय? साधा ताप आणि डेंग्यू वा स्वाईनफ़्लू; यातला फ़रकच लोकांना कळेनासा होता. जेवढे अशा विषयातील अज्ञान अधिक, तेवढी रोगाची साथ झपाट्याने फ़ैलावत असते. म्हणूनच दहशतवाद म्हणजे नेमके काय व त्यातल्या दहशत शब्दाचा नेमका अर्थ काय; हे जाणून घेणे अगत्याचे आहे. त्यातही पुन्हा जिहाद व दहशतवाद यात जमीन अस्मानाचा फ़रक आहे. त्या दोघांची तुलना होऊच शकत नाही.

   पहिली गोष्ट म्हणजे गुजरातची दंगल वा अन्य कुठलीही दंगल आणि घातपाती कारवाया; यांच्यात कसलेही साम्य नाही. दंगल ही जमावाकडून घडते वा तशी घडवून आणली जाऊ शकते. पण त्यात कितीही माणसे मारली गेली, म्हणून त्याला दहशतवाद म्हणता येणार नाही. कारण दंगल ही स्थानिक समाजघटक व त्यांचे जमाव यांच्यात होत असते आणि त्याला स्थानिक संदर्भ असतात. त्यामागे स्थानिक राजकीय शक्तीसुद्धा असू शकतात. पण त्यातून प्रस्थापित राजकीय सत्तेला आव्हान दिले जात नसते. उलट दहशतवाद हे प्रस्थापित सत्तेला दिलेले आव्हान असते. त्यामागे देशाबाहेरील सत्तेचा हात असतो. त्याकरिता बाह्य शक्ती कार्यरत असते. उदाहरणार्थ मुजाहिदीन, तोयबा वा अलकायदा अशा ज्या जिहादी संघटना आहेत; त्यांच्यामागे वेळोवेळी अमेरिका, पाकिस्तान व अन्य सत्ता उभ्या राहिलेल्या आहेत. तीन दशकांपुर्वी अफ़गाणिस्तानमध्ये जिहाद पुकारण्यात आला, त्यामागे अमेरिकेची प्रेरणा होती. आजच्या भारतातील व काश्मिरातील घातपातामागे पाकिस्तान सरकारची शक्ती उभी आहे. आपण कितीही नाकारणार असलो; तरी श्रीलंकेतील तामिळी वाघांच्या दहशतवादामागे भारत सरकारची शक्ती उभी होती. अगदी त्यांना आरंभीच्या काळात घातपाती लष्करी कारवायांचे प्रशिक्षण भारतीय सेनेकडून देण्यात आलेले होते, हे नाकारता येणार नाही. कारण त्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. पुढल्या काळात चीन वगैरेंनी तामिळी वाघांचा उपयोग आपल्या राजकारणासाठी करून घेतला. आज आसामातील उल्फ़ा वगैरे संघटनांच्या दहशतवादाला बंगला देशच्या माध्यमातून चीन मदत करीत असतो. त्याचप्रमाणे नक्षलवादी माओवादी दहशतवादाला चीनचे सहाय्य लाभत असते. तर तोयबा व अन्य जिहादी संघटनांना पाकिस्तान, सौदी अशा देशांची खुली वा छुपी मदत मिळत असते. थोडक्यात मुद्दा इतकाच, की दहशतवाद हा कुठल्या तरी देशाच्या सत्तेचा पाठींबा असल्याशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळेच हिंदू दहशतवाद असा जो आरोप केला जातो, त्यात काडीमात्र तथ्य नाही, कारण अशा कुठल्याही अतिरेकी हिंदू संघटनेला जगातल्या अन्य कुठल्याही देशाच्या सत्तेकडून मदत मिळू शकत नाही. मिळालेली नाही. ती मिळू शकली असती, तर मालेगाव किंवा तत्सम चिरकुट स्फ़ोटात ही मंडळी पकडली गेली नसती. त्यांना दंगलखोर म्हणता येईल. ते हौशी हिंदूत्ववादी आतिरेकी माथेफ़िरू नक्कीच आहेत वा असतील. पण त्यांची गणना कुठल्याही दहशतवाद्यांमध्ये होऊ शकत नाही.

   म्हणूनच ज्याला हिंदू वा भगवा दहशतवाद असे संबोधले जाते त्यांची संख्या व साधने बघितली, तरी त्यांच्या हौशीपणाची साक्ष मिळू शकते. उलट कुठल्याही जिहादी घातपाताच्या घटना बघा, त्यातल्या कारवाया लष्करी सफ़ाईने पार पाडण्यात आलेल्या दिसतील. कारण त्यामागे सत्ता व कुठले तरी सरकार उभे आहे. दहशतवादाचा मूळ हेतू कुणाला मारण्याचा वा जीव घेण्याचा अजिबात नसतो, तर मृत्यूच्या भयाने ठराविक लोकांना शरण यायला भाग पाडणे, हाच त्यामागचा खरा हेतू असतो. हिंदू दहशतवाद म्हणून ज्याचा गवगवा केला जातो, त्या मालेगाव, अजमेर वा मक्का मशीदीच्या घटना नुसत्या बारकाईने बघितल्या, तरी त्यातली दंगलखोर वृत्ती लपत नाही. सुडाला पेटलेल्या माथेफ़िरुंची कृती असा तो प्रकार आहे. पण कसाब, अफ़जल गुरू, मुंबई वा अन्यत्रचे अनेक जिहादी स्फ़ोट सुडाची परिणती नसून त्यामागे पद्धतशीर युद्धयोजना दिसून येते. त्यामागे पाकिस्तानचा हात दिसून येतो. म्हणूनच जिहाद किंवा दहशतवाद म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, ते समजून घेण्याची गरज आहे. कसाब किंवा अफ़जल हे सामान्य मोहरे होते, असाही दावा केला जातो, ते खरे सुद्धा आहे. पण दहशतवाद असाच खेळत असतो, त्यात कर्नल पुरोहित सारखा महत्वाचा माणूस कधी अडकू शकत नाही किंवा सापडू शकत नाही. म्हणूनच साध्वी किंवा पुरोहित अडकले; हाच त्यांच्या दहशतवादी नसल्याचा व सूडबुद्धीने बेभान झालेले असण्याचा पुरावा आहे. कारण त्यांना दहशत माजवायची होती असे दिसत नाही. त्यांना दहशत कशी निर्माण होते ते सुद्धा ठाऊक नसावे. त्यांनाच कशाला आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांना तरी दहशतवाद म्हणजे काय व ती दहशत कशी निर्माण होते; त्याचा थांगपत्ता आहे काय? आपल्या देशाचे बाजूला ठेवा. अकरा वर्षापुर्वी न्युयॉर्कचे जुळे मनोरे उध्वस्त झाल्यावर अफ़गाणिस्तानला धडा शिकवायला निघालेल्या अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी थेट युद्धाचा पवित्रा घेतला व त्याला दहशतवाद विरोधी युद्ध असेही नाव दिले. पण अकरा वर्षे उलटून गेल्यावरही त्यांना त्या दहशतवादाचा पराभव करता आलेला नाही. आता थकूनभागून अफ़गाणीस्तान मधून माघार घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. कारण इतकी वर्षे घालवल्यावर आणि इतके नुकसान सोसल्यावर त्यांना दहशतवादाचे खरे रूप लक्षात आलेले आहे. त्या दहशतवादाशी पारंपारिक युद्ध छेडून त्याला पराभूत करता येणार नाही, याच्या साक्षात्कारानेच अमेरिकेला माघार घ्यायची पाळी आणली आहे. मात्र दुसरीकडे दहशतवादाचे खरे रूप ओळखून त्याचा नि:पात करायला कंबर कसलेल्या श्रीलंकेने वर्षभरात तामिळी वाघांचा निर्णायक पराभव केलेला आहे. दोन देशांच्या या अनुभवातून आपण काही शिकणार आहोत काय; एवढाच प्रश्न आपल्यासमोर आहे.

   ज्या रोगावर उपाय करायचा असतो किंवा ज्या समस्येचे निवारण करायचे असते, ती निदान आधी नेमकी समजून घेतली पाहिजे. तरच तिच्यावरचे उपाय शोधता येतात व योजता येतात आणि मगच त्याचे योग्य परिणाम मिळण्याची अपेक्षा बाळगता येत असते. अत्याधुनिक सेना व साधनसामग्री हाताशी असूनही अमेरिकेला अफ़गाण युद्धात माघार का घ्यावी लागली आहे? त्याच्या तुलनेत अत्यल्प साधने व मोजकी सेना हाताशी असताना श्रीलंकेच्या सेनेला तामिळी वाघांचे निर्दालन का करता आले; याचा अभ्यास म्हणूनच आवश्यक आहे. तो केला तरच दहशतवाद, जिहाद, नक्षलवाद आणि हिदू दहशतवादाचा बागुलबुवा यातला फ़रक लक्षात येऊ शकेल. त्यानंतरच त्यावरचे उपाय शोधता व अंमलात आणता येतील. या विषयात अमेरिकेमध्ये खुप अभ्यास चालतो. पण त्या पुस्तकी अभ्यासाचा उपयोग नसतो. ज्या अफ़गाण युद्धात अमेरिका जिहाद मोडून काढायला सरसावली; तिला दहशतवाद म्हणजे नेमके काय ते ठाऊक नव्हते, तिथेच तिचा पराभव झाला. कारण नेहमीचे युद्ध व त्यामा्गची प्रेरणा आणि जिहाद व दहशतवाद यामागची प्रेरणा, यातला फ़रकच अमेरिकन युद्ध जाणकारांना नव्हता. दहशत कशी व कोणत्या बळावर माजवली जाते आणि कुठल्या कारणास्तव दहशत माजवता येत नाही, याचे विश्लेषण म्हणूनच खुप मोलाचे आहे. त्याचे नवे युद्धशास्त्र आहे, जे सय्यद कुतुब वा ब्रिगेडीयर एस, के. मलिक अशांनी मांडलेले आहे. आपल्या वाहिन्यांवर पोपटपंची करणार्‍या कितीजणांना हे ठाऊक आहे? त्यांना ही नावे तरी माहित असतील की नाही, याची शंका आहे. धर्माचा दहशतवादाशी संबंध नाही ह्या दाव्यापासूनच मुळात चुक सुरू होते, चुकीच्या वाटेने जाऊन ध्येयापर्यंत पोहोचणार कसे? पाकिस्तानचे निवृत्त सेनाधिकारी ब्रिगेडीयर मलिक त्याचे नेमके तपशील देतात. धर्माचा व दहशतवादाचा नेमका संबंध कसा असतो?

२ टिप्पण्या:

  1. "दहशतवादाला धर्म नसतो" हे वाक्य तथाकथित सेक्युलर रात्रंदिवस आपल्या कानी-कपाळी बोंबलत असतात, पण त्यांचा हा सिद्धांत म्हणजे धांदात फसवणूक आणि खोटारडेपणा आहे. दहशतवादाला धर्म नाही ठीक आहे पण धर्माला दहशतवाद आहे ना..धार्मिक दहशतवाद आहे ना..मग का असत्य सांगताहेत? आता असे काय सिद्ध व्हायचे राहिले आहे कि जो काही माणसे मारायचा धंदा हे ठराविक लोक करताहेत त्याचे कारण काय आहे?
    "कोणताच धर्म दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष शिकवत नाही." हे दुसरे एक असेच धांदात खोटे संशोधन ...
    उगीचच सगळे धर्म एकदम योग्य, बरोबर, मानवतेच्या कल्याणासाठी असतात हि गोष्ट अनुभवावरून तरी काही पटत नाही. जगात जेवढी हिंसा, रक्तपात, अत्याचार आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या जेवढ्या घटना इतिहासात नोंदलेल्या आहेत त्या सर्व धार्मिक, धर्माला मानणाऱ्या (धर्म-वेड्यांनी) लोकांनी केल्या आहेत. नास्तिकांनी केलेल्या नाहीत. जे स्वतःला परधर्म सहिष्णू म्हणवत बसले त्यानी कायम मारच खाल्ला आहे. भारतातले सर्व उपद्व्याप, रक्तपात, बॉम्बस्फोट, दंगली, ह्या सर्व बुद्धिभ्रष्ट, धर्मवेड्या, दुसऱ्या धर्माबद्दल प्रचंड घृणा-द्वेष आणि स्वतःच्या धर्माबद्दलचा फालतू अभिमान व गैरसमज बाळगणाऱ्या पागल लोकांनी घडवलेले आहेत.
    इस्लामिक दहशतवाद हे एक सत्य आहे. जे दहशदवादी आहेत तेच सांगताहेत कि हे आमचे धर्मयुद्ध (जिहाद) आहे, मग साले हे नीच सेक्युलर कशासाठी सत्य लपवत आहेत???

    उत्तर द्याहटवा
  2. धर्माचा दहशतवादाशी संबंध नाही ह्या दाव्यापासूनच मुळात चुक सुरू होते, चुकीच्या वाटेने जाऊन ध्येयापर्यंत पोहोचणार कसे? पाकिस्तानचे निवृत्त सेनाधिकारी ब्रिगेडीयर मलिक त्याचे नेमके तपशील देतात. धर्माचा व दहशतवादाचा नेमका संबंध कसा असतो?...
    या लेखकांचे विचार व सूचना सविस्तर वाचायला आवडतील
    ...अफ़गाण युद्धात अमेरिका जिहाद मोडून काढायला सरसावली; तिला दहशतवाद म्हणजे नेमके काय ते ठाऊक नव्हते, तिथेच तिचा पराभव झाला. कारण नेहमीचे युद्ध व त्यामा्गची प्रेरणा आणि जिहाद व दहशतवाद यामागची प्रेरणा, यातला फ़रकच अमेरिकन युद्ध जाणकारांना नव्हता. दहशत कशी व कोणत्या बळावर माजवली जाते आणि कुठल्या कारणास्तव दहशत माजवता येत नाही, याचे विश्लेषण म्हणूनच खुप मोलाचे आहे. त्याचे नवे युद्धशास्त्र आहे.
    कदाचित अमेरिकनानी ते समजून घ्यायचा तेंव्हा प्रयत्न केला नाही पण आता तरी त्यांनी यावर विचार करून 2014 साली अफगाणिस्तान मधून पलायन करायच्या आधी ते स्पष्ट करून पडताळा घ्यावा.

    उत्तर द्याहटवा