मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३

सेक्युलॅरिझमने जिहादला खतपाणी घातले का?
   गेली दहा पंधरा वर्षे तरी आपण एक पोपटपंची नित्यनेमाने ऐकत आलेलो आहोत; ती म्हणजे दहशतवादाला धर्म नसतो. पण इथे तर त्याच जिहादी दहशतवादाचा प्रणेता म्हणावा, असा ब्रिगेडीयर मलिकच दहशतवादाला म्हणजे जिहादला धर्माचाच भक्कम आधार असल्याची ग्वाही देतो आहे. आणि तेवढेच नाही तर जिहाद लढताना मुस्लिमेतरांच्या धर्मश्रद्धा मोडून काढल्या; तरच जिहादींची दहशत निर्माण करता येते, इतक्या स्पष्ट शब्दात मांडणी करतो आहे. मग आपण या समस्येचे निवारण कसे करणार आहोत? ती इथल्या हिंदू मुस्लिमातील तेढ म्हणून त्याकडे बघून चालेल काय? तसे केल्यास मग समस्येचे निदानच चुकते आणि म्हणून आपोआपच उपाय सुद्धा चुकतच जाणार, त्याचा परिणाम मिळण्यापेक्षा त्याचे दुष्परिणामच भोगावे लागणार ना? भारतातील हिंदू-मुस्लिम समस्या वेगळी आणि जागतिक जिहादचे भारताला बसणारे चटके वेगळे. एक साधी गोष्ट घ्या. ही हिंदू-मुस्लिम समस्या असेल तर इथल्या मुस्लिमांचे इथल्या ज्यु लोकांशी कुठले वैर आहे? त्याचा हिंदू-मुस्लिम वैमनस्याशी संबंध काय आहे? कसाबच्या टोळीने नरिमन हाऊस या ज्य़ुंच्या धार्मिक स्थळावर हल्ला करण्याचे कारण काय? पुण्यात जर्मन बेकरीनजिक जो स्फ़ोट करण्यात आला; त्याला लक्ष्य बनवण्याचे कारणही तिथून जवळ असलेल्या ज्यूधर्मियांच्या छबाड हाऊसशीच होता ना? मग त्याचा हिंदूंशी संबंध काय? ज्युधर्मियांचा गुजरातच्या दंगलीशी संबंध आहे काय? नसेल तर स्फ़ोट व जिहादी हल्ल्यात ज्यूधर्मियांचा संबंध कशाला आला? तर असे हल्ले हे भारतीय संदर्भातले नसून त्याच संबंध जागतिक जिहादशी आहे. म्हणूनच जिहादी हल्ल्याचा व दहशतवादाचा विचार करताना हिंदू-मुस्लिम विषय बाजूला ठेवून जागतिक जिहादच्या संदर्भात त्यावर विचार करण्याची गरज आहे. तो विषय एकूणच जगभर चाललेल्या जिहादी कारवायांशी संबंधित आहे. आणि इतके स्पष्टपणे विचार करू लागले, मग त्यातले योग्य संदर्भ समोर येतात.

   उदाहरणार्थ बंगलोर येथील कबील अहमद नावाचा उच्चशिक्षित मुस्लिम तरूण ब्रिटनमध्ये पुढील शिक्षणासाठी गेलेला होता. त्याने तिथे जॉर्डनच्या तरूण डॉक्टरशी संपर्क साधून इराकी युद्धाविरोधात स्कॉटलंड येथे विमानतळावर स्फ़ोटकांनी भरलेली जीप घुसवण्याचा प्रयास कशाला करावा? त्याचा गुजरात वा काश्मिरच्या मुस्लिमांशी काही संबंध होता काय? कबीलचा इराकच्या युद्धाशी संबंध काय? मुस्लिम असणे वगळता त्याचा एकूण प्रकरणाशी दुसरा संबंध जोडता येतो काय? म्हणजेच जसे काही हजारो मुस्लिम तरूण अफ़गाण जिहादसाठी आपल्या राष्ट्रीयत्वाला विसरून तेव्हा मुजाहिदीन व्हायला पाकिस्तानात पोहोचले, तसाच कबील स्कॉटलंडच्या विमानतळावर हल्ला करायला पोहोचला नाही काय? त्याच्या त्या घातपातामध्ये तो यशस्वी झाला असता तरी त्यामुळे इराकी मुस्लिमांना कोणता न्याय मिळणार होता? समोर दाखवता येईल असा कुठलाच न्याय विमानतळावरील निरपारध मारले गेल्याने इराकी जनतेला मिळणार नव्हता. पण त्यामुळे जिहादी दहशत स्कॉटलंडच्या लोकसंख्येमध्ये निर्माण होऊ शकली असती ना? ती दहशत कसली असणार होती? कबीलच्या धर्माचा शोध तपासामध्ये उघड झाल्यावर; तिथल्या जनतेमध्ये कसली दहशत निर्माण झाली असती? कुणाविषयी दहशत निर्माण झाली असती? इतका उच्चशिक्षित तरूण जेव्हा असा घातपात धर्मासाठी वा धर्मबांधवांसाठी करू शकतो; तेव्हा इस्लाम व मुस्लिमांबद्दल स्थानिक रहिवाशांमध्ये दहशत निर्माण होत असते व ती लोकसंख्या भयभीत होऊन तमाम मुस्लिमांकडे संशयाने व शंकेने बघू लागत असते. तीच तर अशा घातपात्यांची अपेक्षा असते. तसे होत गेले, की मुस्लिमांना आपोआप अन्य धर्मिय लोकसंख्येपासून वेगळे पाडता येत असते. आणि तेच तर जिहादी दहशतवादाचे मूळ उद्दीष्ट आहे. मुस्लिमेतरांच्या मनामध्ये एकूणच मुस्लिमांविषयी शंका व संशय निर्माण झाला; मग अलग पडणार्‍या मुस्लिमांना बहिष्कृत समाज म्हणून सहजगत्या संघटित करता येत असते. म्हणजे जिथे मिश्र धर्मिय लोकसंख्या असते; तिथे अशा प्रकारे अन्य धर्मियांच्या मनात शंका निर्माण करून त्यांना त्यांच्याच अवतीभवती वावरणार्‍या मुस्लिमांकडे संशयाने बघायला भाग पाडायचे आणि दुसरीकडे मुस्लिमांकडे संशयाने बघितले जाते; अशी बोंब ठोकत रहायचे, अशी एक रणनिती पद्धतशीरपणे राबवली गेलेली दिसेल.

   म्हणजे जिथे जिथे म्हणून जगात संमिश्र धर्मिय लोकसंख्या आहे; तिथे तिथे आपल्याकडे संशयाने बघितले जाते, अशी एक सार्वत्रिक तक्रार आपल्याला ऐकायला नेहमी मिळते. कशी गंमत आहे बघा, घातपाताचे बहुतांश बळी सामान्य नागरिक व मुस्लिमेतर असतात. पण त्याचे परिणाम म्हणून जो दुरावा निर्माण होतो, त्यातून उलट मुस्लिमच आपण संशयाचे बळी आहोत, अशी ओरड करताना दिसतील. आणि या गडबडीत जे सामान्य नागरिक खरोखरच बळी पडत असतात, त्यांच्या न्यायाचा विचारही होत नाही. त्याला किंमतही दिली जाताना दिसणार नाही. आता बघा, मुंबईत कसाबच्या टोळीने ज्यांचे मुडदे पाडले वा आधीच्या स्फ़ोट मालिकेमध्ये ज्यांचे शेकड्यांनी बळी गेले वा शेकड्यांनी जे कायमचे जखमी झाले, त्याबद्दल कुणाला फ़िकीरही दिसत नाही. पण त्या घटनांच्या आरोपांखाली ज्यांची धरपकड झाली, त्यांच्यावर मुस्लिम म्हणूनच अन्याय होतो, अशी तक्रार सातत्याने होताना दिसेल. पण जे बहुसंख्य त्यात मारले गेले ते मुस्लिमेतर म्हणूनच मारले गेलेले नाहीत काय? त्यात मुस्लिमही बळी पडले असतील तर एकूण लोकसंख्येच्या सुरात सुर मिसळून इथले मुस्लिमही जिहाद वा दहशतवादाच्या विरोधात आवाज उठवायला का समोर येत नाहीत? जेवढा संघटित आवाज धरपकड झालेल्यांच्या बचावासाठी उठवला जातो, तितका आवाज घातपाती हिंसेला बळी पडलेल्या मुस्लिमांसाठी का उठत नाही? ह्या शंका घेतल्या जाणे गैर कसे? असाच आवाज कोणी मालेगावच्या घातपातासाठी पकडलेल्या पुरोहित वा साध्वीसाठी उठवला, मग त्याच्यावर हिंदूत्ववादी असा आक्षेप घेतला जातो, मग जे मुस्लिम पकडले जातात, त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवणार्‍यांना इस्लामिस्ट का म्हटले जात नाही? इथे गल्लत होते की नाही?

   मग एक युक्तीवाद आपल्याला हमखास ऐकू येतो, जे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा द्यायलाच पाहिजे. मुस्लिम असला म्हणून माफ़ करायची गरज नाही. पण गुन्हा सिद्ध कसा होणार? संशय घेऊन, पुरावे गोळा करून, तपास खटल्याअखेरच गुन्हेगार असल्याचे सिद्ध होणार ना? मग धरपकड झाल्यापासून निर्दोष पकडल्याचा कांगावा कशाला होतो? आणि तसा कोणी साध्वीबद्दल केला, तर त्याच्यावर हिंदूत्ववादाचा आरोप कशाला होतो? कसाब किंवा अफ़जल गुरूबद्दल इतकी सहानुभूती कशाला असते? की त्यातून पुन्हा धार्मिक विभागणीचा पद्धतशीर प्रयत्न असतो? आरोपीकडे धर्माचा अनुयायी वा धर्मबांधव म्हणून बघायची काय गरज आहे? त्यातही धर्माचा अट्टाहास कशाला असतो? दहशतवादाचा धर्माशी संबंधच नसेल; तर ज्यांची धरपकड होते, त्यांच्या धर्माकडे कशाला बघितले जाते? त्यांच्यावर समजा अगदी अन्याय झाला असेल; तर तो भारतीय नागरिक म्हणून अन्याय झाल्याची भाषा कशाला नसते? मुस्लिमांवरच अन्याय झाला, असे अगदी ठळकपणे का म्हटले जात असेल? आणि असे आक्षेप व अशी भाषा केवळ भारतातच ऐकू येत नाही. जगातल्या ज्या देशामध्ये म्हणून जिहादी घातपाताच्या घटना घडत असतात; तिथे नेहमी धरपकड झालेल्या आरोपीत मुस्लिम असला मग मुस्लिमांनाच खड्यासारखे बाजूला काढून छळतात; अशी भाषा कानावर येत असते. याला योगायोग म्हणता येणार नाही. म्हणून अशा तमाम संदर्भांना ब्रिगेडीयर मलिक यांच्या जिहादी व्याख्येशी जोडूनच बघण्याची गरज आहे. कारण एका बाजूला जिहादी घातपात चालतात आणि दुसरीकडे त्यातून जिहादींना हवे तसे मुस्लिम अन्य मुस्लिमेतरांपासून अलिप्त पाडायचेही प्रयास यशस्वीरित्या पार पाडले जात असतात. जेणे करून त्यांनी स्थानिक लोकसंख्येशी फ़टकून वागावे आणि परिणामी एकूणच मुस्लिमेतरांनी त्यांच्याकडे अधिकच संशयाने बघावे. शिवाय माध्यमातूनही सेक्युलर असल्याचे नाटक रंगवण्यासाठी अशा कांगवखोर मुस्लिम नेत्यांना अधिक प्रसिद्धी दिली जात असते. जे खर्‍या शांत व धर्मांध नसलेल्या मुस्लिमांचा आवाज दाबून टाकत असतात. एकूणच मुस्लिमांबद्दल संशयाचे धुके अधिक दाट करीत असतात. ही काहीशी रणनिती असल्याप्रमाणे राबवली जात असते. त्यातून परिस्थिती अधिकच चिघळत गेलेली आहे. परस्पर विश्वास निर्माण होण्याऐवजी मुस्लिम व मुस्लिमेतरांमध्ये संशयाचे धुके दाट होत गेले आहे. याचे कारण ब्रिगेडीयर मलिक यांची रणनिती समजून न घेताच त्याच्याशी लढायचा केलेला अपयशी प्रयत्न आहे. किंबहूना जिहादी रणनितीला आवश्यक तशीच सेक्युलर व उदारमतवादाची धोरणे राबवली गेली; तर जिहादशी दोन हात व्हायचे कसे? त्याऐवजी मग अधिकाधिक मुस्लिम तरूण जिहादी होण्यासच हातभार लागतो आहे. म्हणूनच मलिक यांची रणनिती समजून घेऊन जिहादी दहशतवादाचा प्रतिकार करण्याची गरज आहे. आणि तो मार्ग सेक्युलर थोतांडाचा अजिबात नाही.   ( क्रमश:)
 भाग   ( ९८ )    २७/२/१३

२ टिप्पण्या:

  1. I am 100% agree with you AND ITS TRUE . You have opened real fact of muslim and their supporters .

    The same thing is about Human Rights ASSOCIATION at Kashmir and other parts of our country . This Human rights some times working against our country . You are requested to through a lights on this .

    प्रत्युत्तर द्याहटवा
  2. "एका बाजूला जिहादी घातपात चालतात आणि दुसरीकडे त्यातून जिहादींना हवे तसे मुस्लिम अन्य मुस्लिमेतरांपासून अलिप्त पाडायचेही प्रयास यशस्वीरित्या पार पाडले जात असतात. जेणे करून त्यांनी स्थानिक लोकसंख्येशी फ़टकून वागावे आणि परिणामी एकूणच मुस्लिमेतरांनी त्यांच्याकडे अधिकच संशयाने बघावे. शिवाय माध्यमातूनही सेक्युलर असल्याचे नाटक रंगवण्यासाठी अशा कांगवखोर मुस्लिम नेत्यांना अधिक प्रसिद्धी दिली जात असते. जे खर्‍या शांत व धर्मांध नसलेल्या मुस्लिमांचा आवाज दाबून टाकत असतात."
    सेक्युलर थोतांडाची खऱ्या अर्थाने बुरखेफाड

    प्रत्युत्तर द्याहटवा