गेल्या दहा वर्षात आपण वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रातल्या बातम्यांचा आढावा घेतला, तर गुजरातमध्ये काही विकास वा प्रगती झाली आहे; असे सांगणार्या बातम्या सहसा कुठे ऐकायला मिळालेल्या नाहीत वा वाचायला मिळालेल्या नाहीत. कदाचित गुजरातच्या वृत्तपत्रात किंवा मुंबईसारख्या शहरात प्रसिद्ध होणार्या गुजराती वृत्तपत्रात तशा आशयाच्या बातम्या आलेल्या असतील. पण आपण दहा वर्षात प्रामुख्याने अन्य भषातून गुजरातच्या बातम्या ऐकल्या वा वाचल्या त्या दंगली संबंधातील आहेत. म्हणजे तिथे दंगली चालू आहेत वा हिंसाचार माजला आहे, अशा बातम्या नाहीत. कारण गेल्या दहा वर्षात गुजरात हे बहुधा देशातील एकमेव राज्य असे असेल, की तिथे जवळपास दंगल होऊ शकलेली नाही. त्याच कालावधीमध्ये देशाच्या अन्य राज्यात शेकडो लहानमोठ्या दंगली झालेल्या आहेत. अगदी ताजे उदाहरण घ्यायचे तर ईशान्येकडील मोठे राज्य असलेल्या आसाममध्ये गेल्या ऑगस्ट महिन्यात भीषण दंगली उसळल्या व त्या अजून शमलेल्या नाहीत. आजही तिथे जवळपास तीनचार लाख निर्वासित छावण्यामध्ये नरकवासात जगत आहेत. पण आधी दोनतीन आठवडे आसाम बाहेरच्या कुठल्या वृत्तपत्रात वा वृत्तवाहिन्यांवर आसाम दंगलीच्या बातम्याच झळकल्या नाहीत. पण जेव्हा फ़ेसबुक वा इंटरनेटच्या माध्यमातून अशा बातम्या व माहिती छायाचित्रासह झिरपू लागली; तेव्हा मुख्यप्रवाहातील माध्यमांना नाईलाजाने आसामच्या त्या हिंसक दंगलीच्या बातम्या प्रसिद्ध व प्रक्षेपित कराव्या लागल्या होत्या. त्यावेळी आयबीएन वाहिनीचे सेक्युलर संपादक राजदीप सरदेसाई यांनी तर ट्विटरवर म्हटले होते; किमान हजारभर हिंदू मारले गेले, तरच आसामाच्या दंगलीचे महत्व सांगता येईल. ही सेक्युलर मानसिकता आहे. म्हणजेच दहा वर्षापुर्वी गुजरातमध्ये झालेल्या दंगलीचे महत्व आजसुद्धा आहे. पण बाकी कुठे दंगल होऊन हजारो लोक मारले गेले, तरी त्याला बातमीचे मूल्य नाही, ही आपल्या सेक्युलर माध्यमांची मानसिकता आहे. मात्र सत्य कितीही लपवले तरी बाहेर यायचे थांबत नाही. त्यामुळेच अन्य मार्गाने बातम्या झिरपू लागल्या आणि आसामच्या दंगलींना प्रसिद्धी देणे माध्यमांना भाग पडले. त्यातच मुंबईत मुस्लिमांचा हिंसक मोर्चा झाला आणि त्यातील हिंसाचाराने जगाचे लक्ष त्या मोर्चाकडे वेधले गेले. त्यातून आसामविषयक माध्यमांनी केलेली लपवाछपवी चव्हाट्यावर आली.
मुंबईचा मोर्चाच मुळात ब्रह्मदेश व आसामामधील मुस्लिमांची दंगलीत हानी झाली, त्याच्या विरुद्ध होता. ती दंगलही अर्थात हिंदू व मुस्लिम यांच्यातलीच होती. त्यातही मुस्लिमांचे नुकसान झालेलेच होते. पण तिथे सेक्युलर माध्यमांच्या दुर्दैवाने कॉग्रेसचा सेक्युलर मुख्यमंत्री सत्तेत होता. मग त्यावरून काहूर कसे माजवायचे? त्यामुळे दंगल फ़क्त हिंदूत्ववादी वा भाजपाच करतो, या थोतांडाचा मुखवटा फ़ाटला असता ना? म्हणून मग आसामच्या दंगलीविषयी सर्वच माध्यमांनी मौन धारण केले होते. पण त्यातील मुस्लिमांच्या हानी विरोधात मुंबईत मोर्चा निघाला आणि त्याच कारणाने आसाममध्ये दंगली पेटल्याचा खुप गवगवा झाला. तेव्हा लाजेकाजेस्तव आसाम दंगलीच्या छुटपुट बातम्या देऊन काम संपवण्यात आले. पण म्हणून तिथल्या दंगली अजून शमलेल्या नाहीत की निर्वासित छावण्यात जाऊन पडलेल्या दंगलग्रस्तांचे जीवन ठिकठाक होऊ शकलेले नाही. पण त्याविषयी अवाक्षर न बोलणारी माध्यमे आजही पुन्हा गुजरातच्या दंगलीचा राग आळवतच असतात. ज्या गुजरातमध्ये दहा वर्षात दंगली झालेल्या नाहीत आणि गेल्या वर्षभरात एकट्या उत्तरप्रदेशात किमान शंभरावर दंगली झालेल्या आहेत. पण कोणी अखिलेश यादव या मुख्यमंत्र्याला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आहे काय? अशा मुख्यप्रवाहातील माध्यमांकडून लोकांपर्यंत खर्या बातम्या जात नाहीत; तेव्हा त्या अन्य मार्गाने पोहोचत असतात. त्याच्या दंतकथा व कहाण्या तयार होत असतात. मोदींच्या गुजरातविषयी गेल्या दहा वर्षात म्हणूनच अशा शेकडो दंतकथा तयार झालेल्या आहेत. त्या कोणी तयार केल्या व कोणी पसरवल्या?
परवा एका कार्यक्रमात बोलताना मधू किश्वर नावाच्या एका महिला पत्रकाराने त्याचा तपशील मस्तपैकी कथन केला. कोणीही माणूस दुरचा प्रवास करून येतो, तेव्हा त्याची खबरबात लोक घेत असतात. कुठे गेला, काय झाले, काय पाहिले, असे गप्पांच्या ओघात सांगितले जात असते. पंजाव, दिल्ली, हरयाणा वा दक्षिणेतील अनेक राज्यांचे मालवाहतूक करणारे ट्रक देशभर फ़िरत असतात. हे ट्रकचालक कित्येक महिने आपल्या घरापासून दूर असतात. जेव्हा केव्हा दोनचार महिन्यांनी आठवड्याच्या रजेवर येतात; तेव्हा मित्रांना भेटून पोटभर गप्पा मारतात व आपले अनुभव कथन करत असतात. वाटेत फ़िरताना कुठे जेवायला विश्रांतीला ढाब्यावर मुक्काम करतात, तिथेही विरंगुळा म्हणून अनुभवकथन होतच असते. अशा गप्पांमध्ये आपोआप आपल्या व्यावसायिक समस्या व सुखदु:खाच्या गोष्टी येणारच. पोलिसांचा त्रास, रस्त्यावरचे खड्डे, टोलनाके व जकातनाके, लाचखोरी; या प्रामुख्याने अशा दूरपल्ल्याचा प्रवास करणार्या ड्रायव्हरसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यात मग जिथे चांगला सुखद अनुभव येतो, त्याची कहाणी होणारच. ते अशा ड्रायव्हरसाठी स्वर्गसुख असते. असे ड्रायव्हर अन्य राज्याप्रमाणेच गुजरातमधून येजा करतात. त्यांना अन्य राज्ये व गुजरातमध्ये येणारा अनुभव प्रचंड वेगळा असेल, तर त्याची कहाणी होणारच. त्यांचा प्रवास व वाहतुक गुजरातमध्ये सुखावह होत असेल, तर सगळीकडे तसाच कारभार व्हावा; असे त्यांना वाटणे स्वाभाविकच आहे. गुजरातच्या कारभारातील सर्वत सुखद अनुभव अशा ड्रायव्हर लोकांचे आहेत आणि त्याच्या कहाण्या गुजरात भोवतालच्या राज्यातून जाणार्या हायवेवरील ढाबे व तिथून प्रवास करणार्या ड्रायव्हरच्या तोंडी ऐकू येतात. किंबहूना गेल्या चारपाच वर्षात असे ड्रायव्हर हे प्रामुख्याने गुजरात व मुख्यमंत्री मोदींचे मोठेच प्रचारक झाले आहेत, असे मधू किश्वर या महिला पत्रकाराने सांगितले.
गुजरात म्हटला, की हल्ली मोदी असे माध्यमांच्या अपप्रचारामुळे एक समिकरण होऊन गेले आहे. त्यामुळेच मग असे देशभर फ़िरणारे ड्रायव्हर जेव्हा गुजरातचे रस्ते, तिथल्या टोलनाके व जकातनाके, पोलिस यांचा त्रास नसल्याचे सांगतात; तेव्हा ‘हे सगळे मोदीमुळेच झाले’ असेही अगत्याने सांगणारच ना? मग त्यांचे व्यवसायबंधू वा गावातले गप्पाष्टक रंगवणारे त्या कहाण्या अधिक रंगवून इतरांना सांगणार. ज्या देशात आजकाल साधा श्वास घ्यायचा तरी लाच देण्याची वेळ येऊन ठेपली आहे; अशा देशातले एक राज्य इतका सुटसुटीत कारभार असलेले, ही दंतकथा होऊन जाते. स्वप्नातला राजकूमार अथवा सुखाच्या गोष्टी असतात, अशाच या गोष्टी सामान्य गांजलेल्या लोकांना आवडणार. त्या खर्या किती व खोट्या किती, हा भाग वेगळा. पण आपल्या अनुभवाच्या तुलनेत मग लोकांना मोदी म्हणजे कुठल्याही अडचणी व समस्येवरला रामबाण उपाय वाटू लागतो. कारण तो व्यक्तीगत अनुभव त्यांना परिचित असलेल्या कोणी तरी सांगितलेला असतो. एका बाजूला आपण वाहिन्या व वृत्तपत्रातून गुजरात म्हणजे दंगली व मुस्लिमांवर अन्याय अत्याचार असे ऐकलेले असते आणि दुसरीकडे प्रत्यक्ष तिकडे जाऊन आलेला कोणी जवळचा परिचित सुखद अनुभव सांगतो, तेव्हा लोकांचा बातम्यांपेक्षा दंतकथांवर विश्वास बसत जातो. आज एका राज्यातल्या कौतुकास्पद कामामुळे मोदी देशाच्या अन्य भागात व राज्यांमध्ये लोकप्रियता का मिळवत आहेत; त्याचे असे हे एक कारण आहे. जो ड्रायव्हरचा अनुभव आहे तसाच तो गुजरातमध्ये जाणार्या व्यापारी व प्रवासी, पर्यटकांचाही अनुभव असतो. त्या अनुभवाने थक्क होण्याचे कारण समजून घ्यावे लागेल. देशाच्या अन्य राज्यात वा कुठेही अराजक व बेशिस्तीचा त्रासदायक अनुभव गाठीशी असला; मग गुजरातमधला थोडाफ़ार बरा वा चांगला अनुभव कौतुकास्पद होऊन जातो.
त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे ज्याला आपण हिंसक दंगलखोर राज्य असे बातम्यांमधून ऐकतो, तिथे प्रत्यक्षात जाऊन आलेल्यांचा अनुभव इतक्या दुसर्या टोकाचा चांगला असला, मग बातम्या अगदी खोट्या होऊन जातात. त्यावरचा विश्वास उडून जातो. दंगल व त्यात झालेले नुकसान, पडलेले बळी हे सत्य असले, तरी तसे अन्य राज्यातही कधीना कधी झालेले आहेच. पण दुसरीकडे गुजरातची प्रगती वा विकास अन्य कुठल्या राज्यात झालेला नाही. त्यामुळेच उलट्या बाजूने लोकांचा भ्रमनिरास वा अपेक्षाभंग होऊन जातो. दहा वर्षापुर्वीच्या दंगलीनंतर मोदी यांची जी राक्षसी प्रतिमा माध्यमांनी रंगवली होती, त्यापेक्षा असा मोदी हा सुखद धक्का असतो. तोच धक्का पाश्चात्य व अमेरिकन परदेशी लोकांना बसला व त्यांनी मोदींकडे नव्या नजरेने बघायला सुरूवात केली. कारण माध्यमे वा विरोधकांनी सांगितलेल्या कहाण्यांपेक्षा, तिथे जाऊन आलेल्या उद्योगपती व व्यापार्यांच्या कहाण्या थक्क करून सोडणार्या होत्या. तिथूनच उलटी चक्रे फ़िरू लागली. दंगल हा विषय बाजूला पडला आणि विकास म्हणजे गुजरात व पर्यायाने मोदी म्हणजे विकास; असे एक समिकरण आकार घेत गेले. आज मोदीविषयक जे औत्सुक्य व कुतूहलजन्य आकर्षण देशाच्या अन्य राज्यात दिसते; त्याची ही अशी कारणे आहेत. मात्र या नव्या लोकप्रियतेचे श्रेय एकट्या मोदींना वा त्यांच्या विकासकार्याला देता येणार नाही. त्यांच्या विरोधात अपप्रचार व खोट्यानाट्या बातम्या माध्यमांनी प्रसारित केल्या नसत्या, तर नुसत्या विकास व उत्तम कारभारामुळे मोदी इतकी लोकप्रियता व उज्वल प्रतिमा साध्य करूच शकले नसते. त्यातील गुजरातची दंगल हे थोतांड महत्वाचे आहे. त्याचेही पोस्टमार्टेम आवश्यक आहे. तेही पुढल्या काही लेखातून मी करणार आहे. ( क्रमश:)
भाग ( १४१ ) १४/४/१३
baavalat lekh aahe.
उत्तर द्याहटवा