गुरुवार, २ मे, २०१३

सेक्युलर कॉग्रेस आणि मोदी यांच्यातला फ़रक




   भाजपाचा मुख्यमंत्री आणि ज्याच्या कारकिर्दीत दिड वर्षापुर्वी गुजरातमध्ये दंगल झाली होती; अशा नरेंद्र मोदी यांना जाफ़रभाई पहिल्यांदा भेटणार होता. कुठल्याही मंत्र्याला भेटण्याचा त्याचा मुस्लिम म्हणून अनुभव काय होता? जाफ़रभाईच नव्हेतर गुजरातच्या मुस्लिमांचा कॉग्रेस मुख्यमंत्र्य़ाचा अनुभव काय होता? १९६९ सालपासूनच्या दंगली बघत जाफ़रभाई मोठा झाला होता. कधी कुठल्या कॉग्रेसी मुख्यमंत्र्यानेही अगत्याने दंगलपिडीत मुस्लिमांना आस्थेने जवळ बसवून त्यांच्या वेदना व समस्या समजून घेतल्याचे त्याला आठवत नव्हते. आणि मोदी तर उघड शत्रूच होता. त्याच्याशी काय व कसे बोलायचे; अशी जाफ़रभाईला विवंचना होती. विशेषत: १९९२ च्या दंगलीनंतर जाफ़रभाई अशा गोष्टीत व्यक्तीगत भाग घेऊ लागला होता. तेव्हा बाबरी पाडली गेल्यावर उसळलेल्या दंगलीत उध्वस्त झालेल्या मुस्लिमांना न्याय मिळावा, म्हणून जे शिष्टमंडळ पंतप्रधान नरसिंहराव यांना भेटायला गेले; त्यात जाफ़रभाईचा चुलता सहभागी झाला होता. त्या शिष्टमंडळात गुजरातच्या मुस्लिम व्यापार्‍यातले दिग्गज समाविष्ट केलेले होते. आणि ती पंतप्रधानांची भेट कोणी ठरवली होती? ज्यांना जिवंत जाळले गेले म्हणून आजही कोर्टात चौथ्यांदा मोदी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आटापिटा चालू आहे; त्या कॉग्रेसचे माजी खासदार अहसान जाफ़री यांनी ही नरसिंहराव यांची वेळ घेतलेली होती. महिना रमझानचा म्हणजे मुस्लिमांच्या सार्वत्रिक उपास पाळण्याचा होता. पण ठरलेल्या दिवशी नरसिंहराव यांनी भेट दिली नाही आणि या गुजरातच्या (१९९२) दंगलपिडीत शिष्टमंडळाला ताटकळत ठेवले होते. तब्बल चार दिवस हे शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून दिल्लीत प्रतिक्षा करीत बसले होते. पण कॉग्रेसच्या सर्वोच्च नेत्याला त्यांच्या वेदनेवर फ़ुंकर घालायला वेळ मिळत नव्हता. शेवटी त्या शिष्टमंडळात सहभागी असलेले जाफ़रभाईचे काकाही कंटाळून अहमदाबादला निघून आले. चौथ्या दिवशी त्यांना कॉग्रेस अध्यक्ष व पंतप्रधान नरसिंहराव यांनी कृपावंत होऊन भेट दिली. भेट म्हणजे काय? दोन मिनीटांसाठी नरसिंहराव भेटले, त्यांनी सर्वांना नमस्कार केला आणि त्यांच्या मागण्या व अर्ज असतील ते आपल्या सचिवाकडे द्यायचे सांगून शिष्टमंडळाला परत पाठवून दिले. चार दिवस प्रतिक्षा केल्यावर मुस्लिम दंगलपिडीतांना मिळाली होती अवघी दोन मिनीटे. असा अनुभव गाठीशी असल्यावर जाफ़रभाईने शत्रूवत असलेल्या व परदेश दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्र्याकडून किती वेळाची, म्हणजे किती मिनीटांची अपेक्षा करावी? पाचदहा मिनीटापेक्षा मोदी आपल्याला अधिक वेळ देणार नाहीत, असा त्याचा अंदाज होता. आणि त्यात गैर काहीच नव्हते. परदेशी दौर्‍यावर आलेला मुख्यमंत्री सेकंद मिनीटाचे गणित मांडूनच कार्यक्रम योजत असतो. वेळापत्रकाच्या बाहेर कुणाला किती वेळ द्यावा, याला मर्यादा असतातच ना? त्यामुळे मिळू शकतील त्या दहा मिनीटाची पंधरा वीस करून त्यात आपला मुद्दा मुख्यमंत्र्याच्या गळी कसा उतरवायचा, अशी विवंचना जाफ़रभाईला सतावत होती. कारण मोदी आपल्याला मुस्लिम म्हणून शत्रू मानतो आणि खटला केला म्हणून आपल्यावर रागावलेला असणार; हे जाफ़रभाईचे गृहीत होते.

   जेम्स कोर्ट या मोदींचा मुक्काम असलेल्या जागी जाफ़रभाई पोहोचला, तेव्हा असेच काहीसे विचार त्याच्या मनात घोळत होते. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला लाचार होऊन मोदींसमोर गयावया करायच्या नव्हत्या. हक्क व न्याय मागायचा होता. त्या भेटीला आपल्या इंग्लंडमधल्या घरातून निघण्यापुर्वीच भारतातून जाफ़रभाईला एक फ़ोन आलेला होता. महेश भट्ट यांनी शेवटच्या क्षणी फ़ोन करून त्याला बजावले, ‘मोदींच्या नजरेला नजर भिडवून न्यायाशिवाय शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे सांगण्याची हिंमत तुझ्यात नसेल, तर तू मोदीला भेटायचे अजून टाळू शकतोस’. त्यावर जाफ़रभाई उत्तरला, मोदी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या हाती सत्ता आहे. ते आम्हाला भेट म्हणून किती वेळ देतात, त्यावर सगळे अवलंबून आहे. दोन मिनीटेच मिळाली तर बोलणार काय आणि किती? भट्ट त्यावर म्हणाले, ‘तुम्हाला अधिक वेळ मिळो अशी आपण प्रार्थना करू.’ बस्स अशा प्रस्तावनेने जाफ़रभाई जेम्स कोर्ट येथे पोहोचला होता. जेव्हा त्या इमारतीच्या लिफ़्ट्मध्ये तो वर चालला होता, तेव्हा त्याच्या काळजात धडधड चालू होती. पुढे काय वाढून ठेवले आहे, त्याची फ़िकीर होती. पण लिफ़्ट थांबली आणि दरवाजा उघडला, तेव्हा जाफ़रभाई आश्चर्याने थक्क होऊन गेला. त्याच्या स्वागताला लिफ़्टसमोर गुजरातचा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी साक्षात उभा होता. क्षणभर पाऊल बाहेर टाकावे, की नाही हे सुद्धा जाफ़रभाई विसरून गेला. ‘आवो यार’ अशा शब्दात त्याचे मोदींनी स्वागत केले. हात पुढे करून मोदींनी जाफ़रभाईशी हस्तांदोल्न केले व त्याला बाहेर घेतले. तो अशा स्वागताने अवाक झाला. शब्दही त्याला सुचेनात. तसाच त्याला हाताला धरून मोदी सर्वांना आपल्या खोलीत घेऊन आले. तिथे एक झोपाळा होता. त्यावर बसत त्यांनी जाफ़रभाईला आपल्या शेजारीच बसवून घेतले. सगळे अनपेक्षित व अघटित घडत होते. त्यामुळे जे काही जाफ़रभाई ठरवून आलेला होता, त्याची त्याला नव्याने जुळवाजुळव करावी लागत होती. कारण आपल्या डोक्यातली मोदींची प्रतिमा आणि प्रत्यक्षात समोर असलेला मोदी; यात प्रचंड तफ़ावत होती. पण आपला सर्व धीर व हिंमत गोळा करून जाफ़रभाईने मनातले बोलायला सुरूवात केली. त्याला कुठेही न अडवता मोदी शांतपणे त्याचे म्हणणे ऐकत होते. तितका त्याचा धीर वाढत गेला. त्याने मनातले सर्व फ़टाफ़टा बोलून घेतले. खोलीत आठदहा माणसे होती, त्यात इंडिया टिव्हीचा संपादक रजत शर्माही होता. जाफ़रभाई वेळ संपण्याच्या भयाने भराभरा बोलतच गेला.

     ‘मोदीसाहेब, तुम्ही इथे व्हायब्रंट गुजरातची कल्पना घेऊन आलेला आहात. त्यात गुजरातच्या आर्थिक विकासाचा मुद्दा आहे. पण न्यायाशिवाय आर्थिक विकास पोकळच कल्पना राहिल. पाश्चात्य देश जगावर राज्य करतात, कारण ते आपल्या नागरिकांना न्याय मिळेल याची खात्री करून घेतात. आपल्या देशात सगळा सावळा गोंधळ आहे आणि मी फ़क्त मुस्लिमांबद्दल बोलत नाही. सर्वांनाच भारतात अन्याय सोसावा लागतो. न्यायाशिवाय शांतता कशी प्रस्थापित होऊ शकेल? तुम्ही जेव्हा गुजरात अस्मितेची भाषणे करता आणि पाच कोटी गुजराती असे म्हणता; तेव्हा त्यात साठ लाख मुस्लिम असतात का? जर तुमचे उत्तर होय असे असेल; तरच आपण पुढे बोलण्यात अर्थ आहे. पण तुम्ही जर असे म्हणत असाल, की तुम्ही केवळ पाच कोटी गुजराती हिंदूंचे मुख्यमंत्री आहात, तर मग आम्हाला तुमच्याशी काही बोलण्यासारखे शिल्लक उरत नाही.’

   एका दमात जाफ़रभाईने मनातली जळजळ सांगून टाकली. मोदी शांतपणे त्याचे बोल ऐकत होते. याच दरम्यान तिथे बसलेले एक भारतीय उद्योजक सारखे घड्याळाकडे बघत होते. कारण ते मोदींच्या समवेत व्हायब्रंट गुजरातसाठी आलेले होते. ठरलेल्या कार्यक्रमाला हजर रहायला उशीर होतोय, हेच तो सुचवत होता आणि त्याची अस्वस्थता मोदींच्या लक्षात आलेली होती. त्याच्याकडे वळून मोदी त्याला म्हणाले, ‘घड्याळाकडे पुन्हा पुन्हा बघू नका. जितका वेळ ही मंडळी बोलणार आहेत, तितका वेळ मी इथेच थांबणार आहे.’ त्यामुळे जाफ़रभाई व त्याच्या सोबतच्या मौलाना इसा मसूरी यांना खुप धीर आला. जाफ़रभाई थांबला तिथून मौलानांनी सुरूवात केली. त्यांनी अत्यंत कठोर भाषेत न्याय व माणुसकीवर मोदींना प्रवचनच दिले. पण त्यांना कुठेही न थांबवता मोदी शांतपणे त्यांची बाजू ऐकत होते. तुम्हाला जे काही सांगायचे ते मनसोक्त बोला, असेच मोदींनी त्याना सांगितले होते. साधारण एक तास असा गेला. मग जाफ़रभाईने दंगलीचा विषय काढला. दंगल पेटली व हिंसा सुरू झाली; तेव्हा मोदी काय करत होते? पुढे आठ वर्षांनी सुप्रिम कोर्टाने नेमलेल्या एस आय टीने जे प्रश्न मोदींना विचारले, तेच प्रश्न २००३ साली इग्लंडच्या पहिल्या भेटीत जाफ़रभाईने अत्यंत बेदरकारपणे मोदींना विचारले. कदाचित दंगल झाल्यापासून मोदींना इतके थेट असे प्रश्न दुसर्‍या कोणी विचारले नव्हते. गोध्राची जळीत घटना घडल्यापासून हा माणूस मुख्यमंत्री म्हणून काय करीत होता? असे प्रश्न विचारून अनेक पत्रकार संपादकांनी स्वत:च त्याची उत्तरे दिली आहेत. पण कोणीही तेच प्रश्न मुख्यमंत्री म्हणून मोदी त्या काळात काय करत होते, त्याची उतरे मिळवली नव्हती. त्यापेक्षा त्याबद्दल आपल्याच मनातल्या गोष्टी सांगून गैरसमज मात्र निर्माण करून ठेवले आहेत. पण त्यामुळे प्रश्न सुटलेले नाहीत, राजकारण खुप खेळले गेले आहे. म्हणूनच त्याच जाफ़रभाईने त्याच प्रश्नांना थेट हात घातला होता. त्याला थेट मुख्यमंत्र्याकडून प्रश्नांची उत्तरे हवी होती. त्याच्या मनातले भय कुठल्या कुठे गायब झालेले होते.

   खरेच त्या दंगलीचे पहिले सात आठ दिवस मुख्यमंत्री म्हणून मोदी काय करत होते? रोम पेटले असताना नीरो फ़िडल वाजवत होता, असे म्हटले जाते. मोदी सुद्धा तेच करत होते अशी खुप टीका झालेली आहे. गुजरात व अहमदाबादसह अनेक शहरे धडधडा पेटत असताना राज्याचा मुख्यमंत्री काय करत होता? खरोखर तो निष्क्रिय बसला होता? की तोच दंगेखोरांना चिथावण्या व प्रोत्साहन देत होता? फ़िडल वाजवत ऐषाराम करत होता? मुख्यमंत्री मोदी त्या दिवसात कुठल्या अवस्थेत होता, कुठल्या परिस्थिती व मानसिक स्थितीत होता? कोणी तरी अशा प्रश्नांची उत्तरे शोधली वा मिळवली आहेत काय? काय करत होते मोदी दंगल पेटली तेव्हा? २७ फ़ेब्रूवारी २००२ रोजी सकाळी गोध्रा रेल्वेस्थानकावर साबरमती एक्सप्रेसचा डबा पेट्वून ५९ कारसेवकांची जाळून हत्या करण्यात आली, तेव्हा मोदी कुठल्या स्थितीत होते? दहा वर्षे त्या दंगलीवर सतत बातम्या रंगवणार्‍यांनी कधीतरी या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत का? ( क्रमश:)
 भाग   ( १५९ )    ३/५/१३

२ टिप्पण्या:

  1. क्रमश कशाला लिहलाय लेख , आता पुढचा भाग लगेच द्या .

    उत्तर द्याहटवा
  2. भाऊंची एक हातोटी आहे ते सर्व पाने एकदम उघडून दाखवायची घाई करत नाहीत. शिवाय इतके तपशीलवार वर्णन करायला व वाचायला मिळणे फार कमी वेळा मिळते असो. पुढे काय झाले...

    उत्तर द्याहटवा