मोदी मुख्यमंत्री होईपर्यंत गुजरात भाजपामध्येही गटबाजीचा धुमाकुळ होता. सत्तास्पर्धेत गुंतलेले भाजपाचे नेते आपसात लढत होते. त्या सर्वांना लगाम लावून व निष्प्रभ करून मोदी यांनी पक्ष व सरकार यांच्यात मेळ घातला, उत्तम कारभार केला, विकास व प्रगती करून दाखवली. त्यातून त्यांनी लोकांच्या अपेक्षांना साकार करण्याची आपली कुवतच लोकांसमोर पेश केली. आज देशात सर्वात उत्तम कारभार असलेले व जनतेच्या तक्रारी कमी असलेले, गुजरात हेच एक राज्य मानले जाते. निदान तशी लोकांची समजूत आहे. आणि त्याच समजूतीने लोकांना मोदी नावाची भुरळ पडली आहे. ती समजूत किती खरी वा खोटी, हा भाग नंतरचा. पण तशी भुरळ पडली आहे व त्यातूनच पंतप्रधान पदासाठी दिल्ली बाहेरचे मोदी हे नाव अकस्मात समोर आलेले आहे. तर ते का येऊ शकले, त्याची कारणे शोधावी लागतील आणि त्याच्याच अनुषंगाने पुढील निवडणूकीत मोदी नावाची जादू चालेल की फ़सेल; त्याचा पडताळा घ्यावा लागेल. भाजपा आज देशातल्या किती राज्यात प्रभावी आहे, किंवा त्याची लोकप्रियता किती आहे, अशा गणितावर मोदींच्या पंतप्रधान होण्याचे समिकरण मांडता येणार नाही. मोदींच्या नेतृत्वाखालचा भाजपा व नुसताच भाजपा; यात खुप मोठी तफ़ावत आहे. ती आधी समजून घ्यायची असेल तर म्हणूनच चार दशकेमागे जावे लागेल. इंदिराजी समजून घ्याव्या लागतील. तेव्हाची राजकीय समिकरणे लक्षात घ्यावी लागतील. तेव्हाची राजकीय परिस्थिती, व निवडणुकातील मतदान; इत्यादी इतिहासाचे योग्य आकलन करावे लागेल.
थोडक्यात मोदींकडे बघण्याचा चष्मा गुजरात दंगल, हिंदूत्ववादी, संघाचा स्वयंसेवक, भाजपा यापैकी कुठलाही असून चालणार नाही. आजची राजकीय स्थिती, जनतेची मनस्थिती व अपेक्षा आणि लोकांसमोर उपलब्ध पर्याय; अशा नजरेने सर्वकाही बघावे लागेल. तरच त्यातले काही समजू शकेल व अनेक प्रश्नांची उत्तरे उलगडता येतील. आपण सेक्युलर भुलभुलैया निर्माण करून मोदींना मुख्यमंत्री पदावरून हटवायचा आटापिटा केलेला असताना, तो माणूस तिथेच कायम राहून थेट देशाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार का होऊ शकला; त्याचा विरोधकांना विचार करावा लागेल, त्यासाठीही आधी मोदी समजुन घ्यावा लागेल, त्याचे वस्तुनिष्ठ आकलन करावे लागेल. अगदी मोदींना पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधून पराभूत करायचे असेल, तरी मुळात त्या माणसाला समजून घेणे अगत्याचे आहे. तुम्ही ज्याला शत्रू मानता व हरवण्याची आकांक्षा बाळगता; त्याची बलस्थाने व दुबळेपणातर जाणून घ्यायला हवा ना? इथेच मोदीविरोधक पुरते फ़सले आहेत. ते खर्या मोदीला मोकाट सोडून, आपल्या कल्पनेतील भ्रामक मोदीशीच लढत असतात व मोदी बाजूला बसून हा खेळ मजेत बघत असतात. त्यामुळेच गेल्या पाच सहा वर्षात मोदी त्यांच्या प्रत्येक विरोधकावर सहजगत्या मात करून मुसंडी मारून राष्ट्रीय राजकारणात सर्वात महत्वाचा मोहरा बनून गेले आहेत. आणि अजून त्यांचे विरोधक भ्रमातून बाहेरही पडायच्या मनस्थितीत नाहीत. मोदींनी लोकमानसात इतके स्थान कसे मिळवले, त्याचाही पत्ता अनेकांना लागलेला नाही.
पक्षातील व पक्षाबाहेरील आपल्या विरोधकांना कोणता शह मोदींनी दिला? मुख्यमंत्री पदाची पहिली चारपाच वर्षे मोदींना सत्तेचे राजकारण समजून घेण्यातच गेली. पण एकदा त्याचा आवाका आल्यावर त्यांनी आपल्यावरच्या हल्ल्यांना परतून लावताना जे धडे घेतले; त्यातूनच त्यांनी पुढले राजकारण धुर्तपणे खेळत गुजरातचे राजकारण व्यक्तीकेंद्री होईल असे डाव जाणिवपुर्वक योजले. गुजरातच्या जनतेच्या आशाआकांक्षा आपल्या व्यक्तीमत्वाभोवती फ़िरतील, असे डावपेच खेळले. आपल्यावरच्या टिकेला त्यांनी गुजरातवरची टिका बनवण्यात यश मिळवले. आणि एक मान्य करावे लागेल, की गेल्या दहा वर्षात लोक ‘गांधीनू गुजरात’ विसरून गेले आहेत. आज ‘मोदीनु गुजरात’ अशी त्या राज्याची ओळख बनून गेली आहे. कोणी मान्य करावे किंवा अमान्य करावे, म्हणून फ़रक पडत नाही. त्यातूनच त्यांनी २००७ च्या निवडणुका सहजगत्या जिंकल्या. त्यानंतर मात्र त्यांनी आपली देशव्यापी प्रतिमा बनवण्याचा पद्धतशीर खेळ सुरू केला व त्यात आपल्या विरोधी सेक्युलर माध्यमांचा मोठ्या खुबीने वापर करून घेतला. त्यामुळेच जे मुर्ख मोदींची बदनामी करण्यात धन्यता मानत होते; तेच एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या कानाकोपर्यात बिनबोभाट घेऊन जात होते, गुजरात बाहेरच्या जनतेसमोर पेश करत होते. त्याच सेक्युलर माध्यमांनी गुजरातचा मोदी तमाम भारतीय जनतेसमोर नेऊन त्याच्याविषयीचे औत्सुक्य निर्माण केले. पण जेव्हा उत्सुकतेपोटी लोक मोदीविषयी माहिती मिळवू लागले वा गुजरातच्या विकासाची माहिती अन्य प्रकारे लोकांना मिळू लागली; तेव्हा त्यांच्या मनात मोदींची एक वेगळी उजळ प्रतिमा उभी रहात गेली. त्यातून मोदी यांनी काय साध्य केले? पुर्वाश्रमीच्या जनसंघ किंवा आज भाजपाच्या कुठल्याही नेत्याला जे शक्य झाले नव्हते; तसे राष्ट्रीय औत्सुक्याचे व्यक्तीमत्व म्हणून मोदींनी स्वत:ला भारतीय जनतेसमोर आणले. कुंभमेळ्याच्या कालखंडात त्याची पहिली वाच्यता हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी केली होती. पण त्यांच्या विधानातले तथ्य वा सत्य समजून घेण्य़ापेक्षा सेक्युलर माध्यमांनी त्यांची टवाळीच केली. सिंघल म्हणाले होते, मोदी हे नेहरूंसारखे आज लोकप्रिय आहेत. त्यांच्या त्या विधानाचा नेमका अर्थ काय? खरेच मोदींची लोकप्रियता इंदिरा गांधी वा पंडित नेहरू यांच्या इतकी वा त्यांच्यासारखी आहे काय? तशी लोकप्रियता म्हणजे तरी काय? (अपुर्ण)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा