कुठल्याही विषयावर तुम्ही मतप्रदर्शन करत असता किंवा विश्लेषण करायला बसता; तेव्हा त्यातल्या काही मूलभूत गोष्टी तरी तुम्हाला ठाऊक असायला हव्यात. शिवाय त्याच्याही आधी आपण कुठल्या विषयावर बोलत आहोत, त्याचेही भान असायला हवे. ‘माझा’ वाहिनीच्या त्या मतचाचणी विषयावरील दोन दिवसांच्या प्रदीर्ध चर्चेत सहभागी झालेल्यांना यातला गंधच नसल्याचे स्पष्टपणे दिसत होते. १९८० सालात प्रथम ‘इंडिया टुडे’ व प्रणय रॉय यांनी संयुक्तपणे असा मतचाचण्यांचा प्रयोग केला. त्याच्याही खुप आधीपासून अमेरिका इत्यादी पाश्चात्य पुढारलेल्या देशात अशा मतचाचण्या यशस्वीपणे नित्यनेमाने घेतल्या जात होत्या. पण त्याचा प्रयोग करायची इथे भारतात कोणी हिंमत केली नव्हती. त्याचे प्रमुख कारण म्हणजे इथली बहुपक्षिय लोकशाही होय. अमेरिका, ब्रिटन अशा देशाची लोकशाही द्विपक्षिय असल्याने, कोण जिंकणार व कोण हरणार; इतके सोपे समिकरण मांडून चाचण्या घेतल्या जाऊ शकत होत्या. पण भारतात मात्र ते शक्य नव्हते. एका बाजूला सर्वात मोठा व प्रस्थापित यशस्वी कॉग्रेस पक्ष व दुसर्या बाजूला आपापल्या राज्यात व प्रभावक्षेत्रात दिसणारे व अन्यत्र अजिबात नसलेले अनेक पक्ष; यांच्यातली निवडणुकीची लढाई मोजायची तरी कशी? त्यासाठीचे तर्कशास्त्र बनवायचे तरी कसे? त्यामुळेच कुठलेच निकष नसल्याने मतचाचणीच्या भानगडीत कोणी पडत नव्हता. पण १९८० च्या सुमारास प्रथम दोराब सुपारीवाला व प्रणय रॉय अशा दोन आकडे शास्त्रज्ञांनी त्यावरचा पर्याय असलेले तर्कशास्त्र शोधून काढले आणि जनता लाट ओसरत असतानाची पहिली यशस्वी मतचाचणी घेतली. पण तोपर्यंत असला प्रयोग झालेला नव्हता, म्हणूनच त्याची इथल्या राजकीय पंडितांनी दखलच घेतली नाही. त्याचे कारण त्यांच्या जुनाट व परंपरागत राजकीय तर्कशास्त्रात हे नवे मतचाचणीचे समिकरण बसायलाच तयार नव्हते. पण ‘इंडिया टुडे’चे मालक संपादक अरूण पुरी यांनी थोडे सावधपणे त्या प्रयोगाला प्रतिसाद देण्याची हिंमत केली. देशात यशस्वी राजकीय मतपत्र म्हणून नावाजलेल्या त्यांच्या पाक्षिकाची प्रतिष्ठा असल्या भाकितासाठी पणाला लावायची; ती हिंमतच म्हणायला हवी. अवघ्या तीन वर्षापुर्वी ज्या इंदिराजींना संपुर्ण उत्तर भारतात आणिबाणीच्या पापासाठी मतदाराने भूईसपाट केलेले होते, त्यांनाच पुन्हा त्याच पट्ट्य़ात प्रचंड यश मिळणार; असा निष्कर्ष रॉय-दोराब यांच्या चाचणीने काढला होता. पण तो राजकीय अभ्यासकांना पटायचा कसा?
आज दहा बारा वर्षांनंतर गुजरातच्या दंगलीला तिथले लोक व मतदार विसरून गेलेत आणि अगदी गुजरातचे मुस्लिमही त्याकडे पाठ फ़िरवून नव्याने जीवनाकडे पाहू लागलेत. बाकी देशातही लोक नव्याने विचार करू लागलेत. पण स्वत:ला राजकीय पंडित व अभ्यासक म्हणवणारी जी जमात आहे; त्यांना त्या दंगलीच्या स्मृती वा वादातून बाहेर पडायची बुद्धी होते आहे काय? मोदी वा गुजरात हे शब्द बोला नुसते, की हे राजकीय पंडित ताबडतोब दंगलीच्या जखमांवरची खपली काढू लागतात. म्हणून त्याच मोदींकडे बघण्याचा भारतीयांचा दृष्टीकोन तसाच राहिला आहे काय? तो कधीच बदलला आहे. नेमकी तीच ३३ वर्षापुर्वीच्या राजकीय पंडित पत्रकारांची अवस्था होती. मतदार व जनता आणिबाणीच्या जखमा सुकवून, वेदनेतून बाहेर पडली होती व बदलत्या परिस्थितीत नव्याने जीवनाचा विचार करू लागली होती. पण हे राजकीय अभ्यासक मात्र आणिबाणीतच अडकून पडले होते. म्हणूनच अवघ्या तीन वर्षात त्याच इंदिरा गांधींना मतदार माफ़ करील व पुन्हा देशाची सत्ता प्रचंड बहूमताने बहाल करील; यावर त्या अभ्यासकांचा विश्वास बसणार कसा? आणि रॉय व दोराब यांनी ‘इंडिया टुडे’च्या मदतीने घेतलेल्या मतचाचणीचा निष्कर्ष तर तेच सांगत होता. सहाजिकच त्यांनी केलेल्या देशातील त्या पहिल्याच लोकसभा मतचाचणीचा अहवाल व आकडेवारी राजकीय विनोद मानला गेला आणि त्याकडे पाठ फ़िरवली गेली. म्हणून ते निष्कर्ष खोटे पडले नाहीत. उलट तंतोतंत खरेच ठरले. तरीही कोणी राजकीय पंडित त्यातले तर्कशास्त्र व वास्तविकता मान्य करायला तयार नव्हता. त्यापेक्षा त्यांनी त्या मतचाचणीच्या आकडेवारीला योगायोग असा शिक्का मारून त्याकडे पाठ फ़िरवली होती. मात्र त्यामुळेच ‘इंडिया टुडे’ व अरुण पुरी यांची हिंमत वाढली होती. म्हणुनच मग पुढल्या म्हणजे १९८४च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी पुन्हा अशीच चाचणी रॉय व दोराब यांच्यावर सोपवून अधिकच धक्कादायक निष्कर्ष लोकांसमोर प्रत्यक्ष मतदानापुर्वीच मांडले होते. ते इतके धक्कादायक होते, की राजकीय पंडित अभ्यासकच काय; खुद्द कॉग्रेसजनांनाही त्यावर विश्वास ठेवणे अवघड झाले होते. इंदिराजी व पंडित नेहरू यांना आपल्या उमेदीच्या व लोकप्रियतेच्या काळात जितक्या जागा जिंकता आलेल्या नव्हत्या; तितके यश राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस मिळवणार, असेच ते भाकित होते.
तेव्हा लोकसभेच्या ५४३ पैकी ४०५ जागा कॉग्रेस जिंकणार असा अंदाज चाचणीनंतर रॉय-दोराब यांनी व्यक्त केला होता. तो अविश्वसनीय वाटण्याचेही योग्य कारण होते. पहिली बाब म्हणजे राजीव नवखे व तरूण पंतप्रधान होते. त्यांनी स्वबळावर कुठली सार्वत्रिक निवडणुक कधी लढवली व जिंकली नव्हती. त्यात पुन्हा आईच्या विश्वासातील प्रणबदा मुखर्जी यांच्यासारखा मुत्सद्दी नेता त्यांच्या विरोधात गेलेला होता. मग हे आकडे कशाच्या आधारावर निघालेले होते? तर त्या निवडणुकांपुर्वी दोनच महिने इंदिरा गांधी यांची त्यांच्या पंतप्रधान निवासात त्यांच्याच दोघा शीख अंगरक्षकांनी हत्या केली होती. त्यामुळेच दिल्लीत भीषण दंगल उसळली व हजारो शिखांची कत्तल झाली होती. देशभर लोक हवालदिल झाले होते. खलीस्तान दहशतवादाने उच्छाद मांडला होता. जणू आता पंजाब भारतात रहातो किंवा नाही, अशी स्थिती उदभवली होती. अकाली दल त्या खलीस्तानी दहशतीसमोर निवडणुका लढवायलाही घाबरत होते. थोडक्यात भारताच्या एकात्मकतेला आव्हान उभे ठाकल्याची व इंदिरा हत्येची पार्श्वभूमी १९८४ च्या निवडणुकीला होती. त्यात व्यक्तीला महत्व नव्हते तर देश कोण एकत्र ठेवू शकेल, त्या पक्षाच्या मागे ठामपणे उभे रहाण्याकडे लोकांचा कल होता. अगदी रा. स्व. संघासारख्यांनीही भाजपाला वार्यावर सोडून आपली ताकद कॉग्रेस निवडून आणण्यासाठी कामाला जुंपली होती, हे विसरता कामा नये. मात्र त्याच्या पुसटसाही अंदाज राजकीय अभ्यासकांना नव्हता. पण त्याच मानसिकतेचे प्रतिबिंब त्या मतचाचणीत पडलेले होते. सरकारचे, पक्षाचे आधीचे काम व कारभार यापेक्षा राष्ट्रीय एकजुटीला प्राधान्य मिळाले होते. त्यात लहानमोठे पक्ष, प्रादेशिक पक्ष बाधा आणण्याची शक्यता होती. तिला थारा मिळू नये असा एक सामुहिक विचार जनमानसात होता. मतचाचणीत त्याचे प्रतिबिंब पडले व धक्कादायक वाटणारे आकडे रॉय-दोराब यांनी लोकांसमोर मांडले.
सर्व आयुष्य राजकीय लिखाणात व त्याचे विश्लेषण करण्यात व नेत्यांच्या अवतीभवती घालवलेल्या पंडितांना मतचाचणीचे ते आकडे पोरखेळ वाटणे अगदी स्वाभाविक होते. कारण त्यांना त्यामागचे तर्कशास्त्र माहित नव्हते, की समजून घेण्याची इच्छाही नव्हती. सहाजिकच तेव्हा ‘इंडिया टुडे’ व रॉय यांची भरपूर टवाळी झाली. त्यांच्या निष्कर्षाची खिल्ली उडवण्यात राजकीय अभ्यासक आघाडीवर होते. मात्र प्रत्यक्षात मतदान व मतमोजणी झाल्यावर त्याच अभ्यासक व पत्रकारांची स्थिती केविलवाणी झाली. कारण त्या चाचणीने सांगितले होते, त्यापेक्षाही दहा जागा अधिक म्हणजे ४१५ जागा राजीवच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पक्षाने जिंकल्या होत्या. भाजपा, जनता पक्ष, डावी आघाडी, लोकदल अशा प्रमुख विरोधकांचा पुरता धुव्वा उडाला होता. त्यानंतर मग रॉय व ‘इंडिया टुडे’ यांच्या मतचाचणीकडे लोक गंभीरपणे बघू लागले. इतर अनेक तरूण अभ्यासक व आकडेशास्त्रज्ञ या क्षेत्राकडे वळले. अनेक संस्था त्यात पुढे आल्या व क्रमाक्रमाने कुठल्याही निवडणूकीआधी अशा चाचण्या करून निष्कर्ष मांडण्याचे प्रकार वाढत गेले. राजकीय अभ्यास व व्यासंग असलेल्या कुमार केतकरांना १९८४ची ती (चाचणीच्या उद्योगाचा पाया घालणारी) चाचणी आठवत नसेल; तर मग त्यांच्या राजकीय जाणकारीबद्दल शंका घ्यायला हवी. ‘एबीपी माझा’च्या चर्चेत त्यांनी राजीवच्या मोठ्या यशाचा अंदाज चाचणीकर्त्यांना का आला नाही, असा सवाल करावा, हे कुमारच्या अज्ञानाचे वा विस्मृतीचेच प्रदर्शन म्हणुनच म्हणायला हवे. बाकी आज तिशीत असलेल्या अनेक संपादक विश्लेषकांना त्यावेळी नाकाचा शेंबूडही पुसायची अक्कल नसेल, तर त्यांना तो तपशील माहित नसणे क्षम्य आहे. पण निदान त्याच विषयावर चर्चेत भाग घेताना जुना इतिहास प्रसन्ना व राजू खांडेकर यांनी थोडा अभ्यासायला हरकत नव्हती. मग अज्ञानाचे प्रदर्शन झाले नसते आणि बेताल बोलणार्या कुमारला हटकता तरी आले असते. पण सगळाच अडाण्याचा बाजार असला मग कसे व्हायचे? इतके नेमके आकडे काढण्यामागचे प्रणय रॉयचे तर्कशास्त्रही मजेशीर आहे व समजून घ्यायला हवे. (क्रमश:)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा