सोमवार, ६ मे, २०१३

कळपाच्या सामुहिक भयगंडातून दंगल उदभवते




सामुहिक भयगंड प्राण्यांच्या कळपामध्ये उपजत समुह मनोवृत्तीची जाणिव उत्पन्न करत असतो आणि मग त्यामुळे जे आपल्या कळपातले नाहीत असे वाटते, त्यांच्या विरोधा्त भयंकर क्रुर प्रतिक्रियेचा उदभव होतो - बर्ट्रांड रसेल

   रसेल हा विसाव्या शतकातला जगप्रसिद्ध विचारवंत चिंतक मानला जातो. त्याच्या या विधानातला नेमका अर्थ समजून घेतला, तर आपल्याला भारतात वारंवार होणार्‍या दंगलीचे योग्य विश्लेषण करता येईल. पण दुर्दैव असे आहे, की आपल्याकडे सगळ्या चर्चाच उथळपणे चालतात. त्या जम्मूच्या तुरूंगातला भारतीय कैदी असा अमानुष का वागला; त्याचे मानसिक विश्लेषण होण्याची गरज असते. अशा प्रकरणाचा निचरा करण्यासाठी त्याचा उपयोग नसतो. पण अशा घटनांची पुनरावृती होऊ नये, यासाठी असे विश्लेषण उपयोगी असते. त्यामुळे कुठल्या परिस्थितीचा सामान्य माणसावर किंवा कैद्यावर कसा प्रभाव पडतो आणि त्यांच्याकडून कशा प्रतिक्रिया उमटू शकतात; त्याचा आधीच अंदाज येऊ शकत असतो. म्हणूनच रसभरीत सनसनाटी वाद रंगवण्यापेक्षा, अशा घटनांचे काटेकोर मानसिक विश्लेषण अगत्याचे असते. गेल्या वर्षी दिल्लीत कृषीमंत्री शरद पवार एका कार्यक्रमाला चालले असताना कोणा शीख तरूणाने त्यांना थप्पड मारण्याचा प्रसंग घडला होता. त्याचे गांभिर्य माध्यमांनी किती समजून घेतले? दिवसभर त्याचे सतत प्रसारण चालू होते. त्याचा निषेध संसदेतही झाला. त्यावेळी बोलताना संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी नेमके दुखण्यावर बोट ठेवलेले होते. ‘मारणार्‍याने एकच थप्पड मारली होती. पण माध्यमांनी व वाहिन्यांनी हजारो, थपडा मारून घेतल्या’ असे यादव म्हणाले. त्यांचे हे विश्लेषण कुणा वाहिनीवरच्या शहाण्याने विचारात तरी घेतले काय? दिवसभर असा कल्लोळ माध्यमातून झाल्यावर पवारांच्या समर्थकांना घरात बसून रहाणे शक्य राहिले नाही. आपल्या सर्वोच्च नेत्याच्या अपमानावर लोकांना दिसेल अशी प्रतिक्रिया देणे त्यांना भाग होऊन गेले. मग पुण्याचे महापौरही शहराचे कारभार बंद पाडायला रस्त्यावर उतरले होते. तर हीच माध्यमे त्या महापौराला आरोपी बनवत होती. पण त्याला व अन्य पवार समर्थकांना रस्त्यावर यायला कोणी भाग पाडले? त्याचा शोध कोणी घ्यायचा?

   माणूस कसा विचार करतो आणि कसा प्रवृत्त होतो; याचे जाणकारांनी म्हणूनच भान ठेवावे लागत असते. कुणी घरात, कुटुंबात दुबळ्या मनाचा असेल तर त्याला दु:खाची घटना लगेच सांगत नाहीत. तसेच तापट स्वभावाचा कोणी असेल तर त्याच्या मनाचा तोल जाणारी घटना त्याच्यापासून लपवली जात असते. कारण नुसती अशी माहिती शांतपणे स्विकारणे व तारतम्याने त्यावर व्यक्त होणे; त्या लोकांना शक्य नसते. समजून घेण्याची प्रत्येक व्यक्तीची कुवत व क्षमता वेगवेगळी असते. सभ्य विचारी माणुस शब्दात निषेध व्यक्त करतो आणि मुखदुर्बळ माणूस हातात सापडेल ते घेऊन हिंसक प्रतिक्रिया देत असतो. म्हणूनच अशा प्रतिक्रियांचा विचार करूनच हाती आलेली माहिती पुढे पाठ्वायची असते. शरद पवारांवरील हल्ल्याची बातमी तेवढी गंभीर नव्हती. ती प्रासंगीक घटना होती. पण त्याचे प्रसारण सतत होऊन ज्या प्रतिक्रियांचे माहोल उभे करण्यात आले. त्यातून जणू त्यांच्या अनुयायांना डिवचण्यात आलेले होते. त्या सततच्या बातम्या जणू त्या अनुयायांना हिणवत होत्या, ‘काय षंढ तुम्ही? तुमच्या नेत्याला हाणले आणि बसलाय गप्प?’ मग व्हायचे तेच झाले. अण्णा हजारे आज गांधीवादी मानले जात असले तरी तो एक सामान्य ग्रामिण गावकरी आहे व त्यांची वैचारिक कुवत खेडूतासारखीच असते. त्यांना कोणा वाहिनीच्या पत्रकाराने पवारांची ती बातमी सांगितली आणि प्रतिक्रिया विचारली. अण्णा सहजगत्या म्हणाले, ‘एकही मारा’. झाले मग त्यावर काहूर माजवण्यात आले. इथे अण्णांची विचारशक्ती वा आवाका विचारात घेतला; तर त्यांची पर्तिक्रिया खेडूताची होती, हे सहज लक्षात येते. पण जगातले तमाम लोक एकाच बुद्धीचे आहेत, असे गृहित धरून जर सर्वांना तेच सांगितले आणि भिन्न प्रतिक्रिया उमटल्या; तर दोष गृहित धरणार्‍यांचा असतो.

   म्हणूनच सर्वजीतच्या हल्ला व मृत्यूनंतर माध्यमांनी माजवलेले काहूर पुढल्या सर्वच उफ़राट्या प्रतिक्रियांना कारणीभूत होते. विविध कळपाच्या मनोवृत्तीचे गट समाजात एकत्र नांदत असतात. त्यांच्यात परस्परांतील विश्वासाचा अभाव असतो. आपला व परका अशी धारणा असतेच. कधी ती मराठी बिगरमराठी अशी, तर कधी हिंदू बिगर हिंदू अशी असते. कधी घाटी कोकणी अशीही असते. कधी उच्चभ्रू व सामान्य अशीही असते. त्यांच्यातल्या त्या धारणांना धक्का लागेल, अशी माहिती असली, मग जपून समोर आणावी लागते. त्यात एका गटाच्या हळवेपणाला धक्का लागत असेल व दुसर्‍या गटापैकी कोणी त्यामध्ये जबाबदार असेल; तर हळव्या भावनांचा कळप ताबडतोब दुसर्‍या कळपाच्या त्या आरोपी व्यक्तीपेक्षा, एकूणच त्याच्या कळपाला गुन्हेगार ठरवत असतो. त्यामुळे तसाच व्यक्त होत असतो. अशी कळपाची मानसिकता नसावी व सहिष्णूता असावी, हा आदर्श विचार आहे. पण एकूण समाज म्हणजे लोकसंख्या तशी वागत नसते वा जगत नसते. ती वेगवेगळ्या कळपांनी तह केल्याप्रमाणे एकमेकांशी सहकार्याने नांदत असते. ते सहकार्य अतिशय नाजूक असते. काचेच्या वस्तूला धक्का लागला तरी तिचे तुकडे होतात, तसेच समाज गटातील परस्पर विश्वासाचे असते. सर्वजीतचा पाकिस्तानी तुरूंगात पाक कैद्यांनी खात्मा केला म्हटल्यावर इथे पाकिस्तानी कैदी आपल्या मर्जीवर जगतो आणि त्याला मारूनच हिशोब चुकता केला पाहिजे; असा विचार सामान्य बुद्धीची माणसे करीत असतात. त्यांच्या लेखी प्रत्येक पाकिस्तानी सर्वजीतचा म्हणजे भारतीयाचा खुनीच असतो, म्हणून त्याला शिक्षा होणे अगत्याचे असते आणि आपण ती शिक्षा देणे म्हणजेच मोठे राष्ट्रकार्य, धर्मकार्य, पवित्र पुण्यकर्म अशी एक उर्मी जागी होते. तिथून गडबड होऊन जाते. ती होऊ नये याची काळजी म्हणूनच माध्यमातल्या शहाण्यांनी घ्यायची असते. ती काळजी सर्वजीतच्या घटनेनंतर घेतली गेली नाही आणि तितकाच बेजबाबदारपणा दहा वर्षापुर्वी गोध्राच्या घटनेनंतार झाला होता. गोध्रा रेल्वेस्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेस अडवून त्यात बसलेल्या कारसेवकांचाच डबा हजारोंच्या मुस्लिम जमावाने पेट्वून दिला; ही बातमी कोणत्या सौहार्दाच्या भावनांना प्रोत्साहन देणारी होती? की दोन सामाजिक मानसिकतांमध्ये परस्परांबद्दल द्वेष वाढवणारी होती?

   २७ फ़ेब्रूवारी २००२ रोजी गोध्राची घटना घडल्यावर वाहिन्यांनी जे चित्रण प्रसारित केले व जी माहिती लोकांपर्यंत अखंड पाठवली; ती चिथावणीखोर नव्हती काय? मुस्लिम जमावाने रेल्वेगाडीतून प्रवास करणार्‍या कारसेवकांना जिवंत जाळले, अशी बातमी कोणत्या भावना उत्पन्न करते व कशाला चिथावणी देत असते? शरद पवार यांना कोणा माथेफ़िरूने दिल्लीत थप्पड मारली; म्हणून पुण्यापासून ठाण्यापर्यंत त्यांचे चहाते रस्त्यावर उतरून जनजीवन विस्कळीत करतात. तर गोध्राच्या घटनेनंतर हिंदू म्हणून जगणार्‍यांना कुठल्या भितीने पछाडले असेल? त्या हिंदूंच्या मनात असा भयगंड मुस्लिमांविषयी वाढवण्याचे काम वाहिन्यांनी केले नव्हते काय? अशी बातमी मनाला व भावनांना जखम करणारी असते. पण ती सतत दाखवत राहिले; मग जखमा अधिक खोल होतात व भळभळा वाहू लागतात. त्यातून कोणती प्रतिक्रिया उमटू शकते? कुठल्याही वाहिनीच्या संपादक पत्रकाराला त्याचे भानच नव्हते काय? थोडक्यात ज्यांनी डोके ठिकाणावर ठेवून बातमीदारी व पत्रकारिता करावी, त्यांचेच भान सुटले होते. आणि अशा प्रसंगी ज्यांचे भान सुटण्याचा धोका असतो, नेमक्या त्या सामान्य माणसाचे डोके ठिकाणावर ठेवून वागावे; अशी अपेक्षा करता येईल काय? माध्यमांनी नुसती अशी आग पसरवली नाही, तर हिंदू व मुस्लिमांच्या मनातला संशय अधिकाधिक वाढेल, असेच काम त्यावेळी केले. लंका जाळणार्‍या मारुतीची शेपूट पेटलेली होती आणि तो जिथे जिथे उड्या मारत गेला तिथे तिथे आग पसरत गेली. नेमके तसे गुजरात पेटवण्याचे काम त्या काळात माध्यमे व वाहिन्यांनी केले. म्हणजे एका बाजूला मुख्यमंत्री मोदी दंगल आवरत नाहीत असे बोलायचे आणि दुसरीकडे दंगल कुठे कुठे पसरत चालली आहे. कोण कोणावर हल्ले करतो आहे, त्या आगीत तेल ओतायचे काम माध्यमे तेव्हा करत होती. एकूणच गुजरात दंगलीचा घटनाक्रम आणि बारकावे तपासले, तर ही दंगल माध्यमांनी पेटवली व पसरवली; असे ठामपणे म्हणता येऊ शकते. जसे परवा सर्वजीतच्या बदल्याला कोट बहावल तुरूंगातल्या कैद्याला माध्यमांनी प्रवृत्त केले; तशीच गुजरातची दंगल माध्यमांनी घडवून आणली, असेही म्हणता येईल. मात्र ती आग हाताबाहेर गेल्यावर त्याचे खापर मुख्यमंत्र्याच्या डोक्यावर फ़ोडताना हीच मंडळी आघाडीवर होती. त्यानंतरही दहा वर्षे सेक्युलर माध्यमे, पक्ष व संस्था यांना हिंदू मुस्लिमांत हिंसा न उफ़ाळल्याची वेदना असावी. कारण सेक्युलर दुकान धंदा हिंसेवरच चालतो ना?              ( क्रमश:)
 भाग   ( १६२)    ७/५/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा