नेता ही काय भानगड असते? पंडित नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, सरदार वल्लभभाई पटेल अशी नावे खुपच मोठी असतात. त्यांना राष्ट्रीय नेता मानले जाते. आपण नेहमी बघतो किंवा विविध नेत्यांची नावे ऐकत असतो. अगदी गाव गल्ली पातळीपासून थेट राष्ट्रीय स्तरापर्यंत हजारो, लाखो व्यक्तींचा नेता असा उल्लेख नित्यनेमाने आपल्या समोर होत असतो. त्यांना नेता कशाला म्हटले जाते? नेता होण्यासाठी अंगी कुठले गुण लागतात वा कौशल्य असावे लागते? मग तो एखाद्या देशाचा नेता असो किंवा अगदी छोट्या समाज घटकाचा नेता असो, किंवा एखाद्या गावाचे नेतृत्व करणारा असो. अशी काय वेगळी बाब त्या माणसामध्ये असते, की तुमच्याआमच्या सारखा सामान्य दिसणारा तो माणूस, नेता म्हटला जातो? साध्या भाषेत त्याला पुढारी असे संबोधले जाते. त्याच शब्दात त्याचे वर्णन आलेले आहे. जो पुढाकार घेतो, तो पुढारी म्हणजे नेता. जो आपल्या सभोवतालच्या लोकांच्या समान इच्छा आकांक्षा वा अपेक्षा पुर्तीसाठी पुढाकार घेतो व इतरांना आपल्या मागून स्वेच्छेने यायला भाग पाडतो, तोच असतो नेता. मग किती मोठ्या लोकसंख्या वा समाजाच्या गळी तो त्याचे नेतृत्व उतरवू शकतो; त्यानुसार त्याला गाव गल्लीतला किंवा देशाचा नेता म्हटले जात असते. त्याची मूळ गुणवत्ता किंवा कौशल्य असे असते, की त्याचे शब्द व भूमिका ही अनुयायांना त्यांची स्वत:ची इच्छा व आकांक्षा वाटत असते. तो बोलतो वा सांगतो, ते आपल्याच मनातले आहे, आपल्याला नेमके तेच करायचे आहे, असे मोठ्या लोकसंख्येला वाटते; असा माणूस त्या लोकसंख्येचा नेता असतो. मोजक्या शब्दात सांगायचे तर लोकांच्या अपेक्षा, आकांक्षा व संकल्पना काबीज करून; त्यावर स्वार होण्याची व मांड ठोकण्याची ज्याच्यामध्ये क्षमता असते, तोच माणूस नेता वा पुढारी होऊ शकतो. जितक्या अधिक लोकसंख्येच्या कल्पनाशक्तीवर त्याला स्वार होता येते; तितके त्याचे नेतृत्व मोठे वा निर्णायक स्वरूपाचे असते. एकदा असा नेता लोकांनी मनापासून स्विकारला, मग पुढे त्याला त्यांच्या इच्छाआकांक्षांनुसार बोलायची गरज उरत नाही. तो सांगेल वा बोलेल त्याच लोकांना त्यांच्या आशाअपेक्षा वाटू लागतात. चटकन असे विधान कोणाला पटणार नाही, पण एक उदाहरण दिले तर सहज लक्षात येऊ शकेल.
पंडित नेहरु यांच्या निधनाला आता पाच दशकांचा काळ उलटून गेला आहे. महात्मा गांधींचा निर्वाणालाही सहा दशकांचा कालावधी उलटला आहे. जवळपास तितकाच कालखंड डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणाला झालेला आहे. पण आजही आपण त्यांच्या स्वप्नातला भारत अशी भाषा ऐकत असतो की नाही? त्यांच्या स्वप्नातला भारत म्हणजे काय? तर त्यांनी देशाचे जे स्वप्नील चित्र रंगवले, तेच आपल्या संपुर्ण भारतीय जनतेचे स्वप्न असते, असेच त्यामागचे गृहीत आहे. पन्नास साठ वर्षे उलटून गेल्यावरही आपण त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची भाषा कशाला बोलत असतो? तर आपल्या वतीने त्यांनी स्वप्ने बघितली आणि तीच आपली सर्वांची स्वप्ने आहेत; असे त्यामागचे गृहीत आहे. या नेत्यांनी कधी प्रत्येक भारतीयाला त्याच्या अपेक्षा आकांक्षा विचारून, त्याची चाचणी घेऊन कुठला विचार व संकल्पना मांडल्या नव्हत्या. आपल्या बुद्धी व विचारांच्या आधारावर तार्किक अभ्यास करून समस्त समाजाच्या कल्याणाच्या व सुखीसमाधानी जीवनाच्या कल्पना मांडल्या होत्या. त्या कल्पना वा स्वप्ने विविधांगी व अफ़ाट आकाराची होती. पण त्यांच्याच विचारात व त्यांनी दाखवलेल्या मार्गाने त्यांचा पाठपुरावा होऊ शकतो, यावर मोठ्या लोकसंख्येने विश्वास व निष्ठा दाखवली. म्हणून त्यांची स्वप्नेच लोकांची होऊन गेली. लहानमोठ्या पातळीवर असेच नेते होऊन गेले वा आजही हयात आहेत. त्यांनी मांडलेले विचार, भूमिका व कार्यक्रम योजना यातून लोकांच्या सुखसमाधानाच्या संकल्पनांवर या नेत्यांनी प्रभाव पाडलेला असतो. व्यक्तीगत स्वप्नांचा व अपेक्षांचा सहभाग सामुहिक स्वप्नात दाखवण्याची त्यांची क्षमताच, मग त्यांना नेता बनवत असते. इंदिराजी ह्या अशाच लोकप्रिय नेता होत्या. पंतप्रधान झाल्यावर राजकारण करताना, आपल्या पायात पक्षाच्या संघटनात्मक बेड्या आहेत व आपण सत्तेच्या समिकरणासाठी निवडून येणार्या विविध प्रांतातील प्रभावी नेत्यांवर विसंबून आहोत, याची त्यांना जाणिव झाली. त्यामुळेच त्या बेड्यांमधून मुक्त व्हायचे. तर आपल्याला प्रांत, भाषा व पक्षाच्यापलिकडे थेट जनतेचा पाठींबा मिळवावा लागणार, याची जाणिव त्यांना झालेली होती. जर आपल्या कल्पना व स्वप्ने साकार करायची; ती लोकांच्या कल्याणाची असली तरी त्यासाठी जे सत्तेचे पाठबळ आवश्यक आहे, ते सहकारी नेत्यांकडून मिळतेच असे नाही. मिळणार नसेल तर ते थेट सामान्य भारतीय जनतेकडून गोळा करावे लागेल; हे इंदिराजींच्या लक्षात आले. तेव्हाच त्यांनी थेट जनमानसात आपला व्यक्तीगत प्रभाव पाडायचा पवित्रा घेतला. त्यांनी पक्षाचे जोखड झुगारण्याचा जुगार खेळताना ‘गरीबी हटाव’ नावाचे स्वप्न लोकांना दाखवले. लोक त्याच्या आहारी गेले. कारण तेव्हा देश आजच्या इतका प्रगत नव्हता, की सुखवस्तू झालेला नव्हता. दोन वेळच्या अन्नाला दाही दिशा वाडगा घेऊन फ़िरावे लागणारी मोठी लोकसंख्या देशात होती. तिच्यासाठी स्वातंत्र्यापेक्षाही गरीबी हटवणे हे सर्वात मोठे स्वप्न होते. इंदिराजींनी अवघ्या दोन शब्दात लोकांच्या मनाला गवसणी घातली आणि मग ते साध्य करण्यासाठी इंदिराजींना हवे असलेले अधिकार, त्यांच्या डोक्यातील कल्पना, योजना हेच लोकांचेही सामुदायिक स्वप्न होऊन गेले. थोडक्यात त्या दोन शब्दातून इंदिराजी जनमानसाच्या इच्छाआकांक्षांवर स्वार होऊन गेल्या. अल्पावधीत कॉग्रेस पक्षाच्या बहूमतावर चालणार्या पंतप्रधान राहिल्या नाहीत. त्या राष्ट्रीय नेता होऊन गेल्या.
सामान्य माणुस गांजलेला असतो. दोन वेळच्या पोटाच्या आगीला विझवताना त्याचे आयुष्य पणाला लागलेले असते. अशावेळी त्यात दिलासा देणारे शब्द कोणी बोलला, तरी त्याला अर्धे कष्ट कमी झाले असे उगाच वाटत असते. इंदिराजींच्या त्या घोषणेने व पुढल्या राजकारणाने गरीबी खरेच किती हटली वा लोकांचे जीवन किती सुसह्य होऊ शकले; हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. पण नुसती आशा वा स्वप्न दाखवणाराही लोकांना आवडत असतो. राजकारणात असा अशक्यप्राय स्वप्ने दाखवणारा माणूस म्हणूनच लोकांना खुप आवडतो. आणि राजकारणातच कशाला, अगदी व्यवहारी जीवनातही फ़सव्या योजना कल्पना लोकांना हव्याच असतात. अलिकडेच बंगालच्या खेड्यापाड्य़ात रक्कम दुप्पट चौपट करून देणार्या चिटफ़ंडाचे प्रकरण चव्हाट्यावर आलेले आहे. देशातले तसे ते पहिलेच प्रकरण नाही. कित्येक वर्षे व विविध राज्यात नेहमीच अशी बनवेगिरीची प्रकरणे उघड होत असतात. पण त्यात फ़सणार्यांची संख्या कमी झाली आहे काय? नवा कोणी स्वप्ने दाखवणारा पुढे येतो आणि आपली घाम गाळून केलेली कष्टाची कमाई लोक जुगारासारखी त्याच्या घशात टाकून मोकळे होतात. ते लोक मुर्ख नसतात. ते सुखापेक्षा सुखाच्या कल्पनेवर भारावणारे व भुलणारे असतात. नुसती सुसह्य जीवनाची, सुखाची भ्रामक कल्पनाही लोकांना जीव ओवाळून टाकावा इतकी आवडत असते. हवीहवीशी वाटत असते. राजकीय नेत्यांच्या योजना, आश्वासने, स्वप्ने वा कल्पना त्यापेक्षा अधिक वास्तववादी असतातच असे नाही. त्या कल्पना योजना स्वप्नवत असतात. तरी व्यवहारी जरूर असतात. पण जितक्या अल्पावधीत त्या पुर्ण होण्याचे स्वप्न दाखवले जात असते; तितक्या लौकर त्या स्वप्नांची पुर्तता अशक्यच असते. पण निदान कोणी स्वप्न दाखवतो, तेच लोकांना हवे असते. वयात आलेली मुलगी जशी प्रेमात पडायला उतावळी झालेली असते, तशीच काहीशी, रंजली गांजलेली सामान्य जनता नेहमी स्वप्ने दाखवणार्याच्या शोधात असते. त्यात पुन्हा आधीच कोणी तिची फ़सगत केलेली असेल, तर तीच जनता नव्या स्वप्नांच्या सौदागराची अधिक उतावळेपणाने प्रतिक्षा करीत असते. त्यालाच जनतेच्या, लोकांच्या आशाआकांक्षा म्हणतात. ते जनमानस ओळखून व्यवहार्य वाटतील असे विचार, भूमिका, योजना वा कल्पना लोकांसमोर माडू शकणारा व त्यांचा विश्वास संपादन करू शकणाराच नेता होऊ शकत असतो. (अपुर्ण)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा