या लोकप्रियतेला दुसरी बाजूसुद्धा आहे. गेल्या दहा बारा वर्षात नरेंद्र मोदी या माणसाविषयी माध्यमातून लोकांसमोर मांडलेली प्रतिमा अत्यंत क्रुर व नालायक अशीच आहे. ती खरी असेल तर लोकांमध्ये मोदीविषयक अत्यंत कटूता व प्रतिकुल मत असायला हवे. पण गेल्या दोनतीन वर्षात क्रमाक्रमाने जितके मोदींच्या विरोधात बोलले व लिहिले जाते आहे; त्याची उलटीच प्रतिक्रिया उमटते आहे. गुजरातबाहेर अजून कुठलेही कार्य वा कर्तृत्व गाजवलेले नसून देखिल देशाच्या अन्य भागात मोदीविषयक आकर्षण वाढतच चालले आहे. अशावेळी आपल्या मताशी व विश्लेषणाशी सुसंगत मतचाचण्यांचे निष्कर्ष येत नसतील; तर मग आपले विश्लेषण व त्याचे निकष जाणकारांनी नव्याने तपासून बघण्याची गरज असते. पण सत्य तपासण्यापेक्षा आपल्याच गृहीत व समजुतींना चिकटून बसले; मग विरोधाभास अपरिहार्य असतो. मोदींच्या बाबतीत बहुतांश माध्यमे, पत्रकार व अभ्यासकांची तीच दुविधा होऊन गेली आहे. सहाजिकच एका बाजूला हे विश्लेषक चाचण्या घेऊन मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेचे हवाले देतात आणि दुसरीकडे त्यामुळे पंतप्रधान होणे सोपे नाही, असाही अजब निष्कर्ष पेश करतात. त्याचे प्रमुख कारण यातले बहुतांश पत्रकार व विश्लेषक १९९० नंतरच्या काळात राजकीय जाण आलेले वा अभ्यासाला लागलेले आहेत. त्यातल्या बहुतांश लोकांना लोकमताची लाट किंव त्सुनामी कशी येते व राजकीय आडाखे व समजुती कशा उध्वस्त करते, त्याचा अनुभवच नाही. त्यांनी तो जुना इतिहास तपासलेला नाही. त्यांना व्यक्तीकेंद्री राजकारणाचा वा निवडणुकांचा अंदाजही नसावा, असे माझे ठाम मत आहे. किंबहूना १९८९ पुर्वीच्या चार लोकसभा निवडणुका अभ्यासल्या, तरच त्यांना मोदींच लोकप्रियता समजून घेता येईल, उमगू शकेल, याची मला खात्री आहे.
मोदींविषयी आज मतचाचण्यांमध्ये जे आकडे दिसतात, ती त्यांना मिळणारी मते असतील असे नाही तो नुसता लोकांचा कल आहे. राष्ट्रीय पातळीवर नसलेल्या कुणा नेत्याला कशाला लोक असा कौल देत असतील का? ज्या पक्षाचा हा नेता आहे, त्याच पक्षाचे आज व दिर्घकाळ संसदेतले काही ज्येष्ठ नेते उपलब्ध आहेत, त्यांना असा कौल मतदार का दाखवत नाहीत? अशी कुठली परिस्थिती उदभवली आहे, की लोक एका राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे देशाचा भावी नेता म्हणून उत्सुकतेने बघू लागले आहेत? आपल्या देशात पक्षाची निवड होते आणि मगच त्यातून पंतप्रधानाची निवड केली जाते. कारण भारतात संसदीय लोकशाही आहे आणि लोकांचे निवडून आलेले प्रतिनिधी आपला नेता निवडतात. लोक थेट देशाचा नेता निवडून त्याच्या हाती कारभार सोपवत नाहीत. मग लोकांनी असे एका कुणा नेत्याला झुकते माप दिल्याने, त्याचा मतदानावर प्रभाव पडू शकतो काय? अशा अनेक प्रश्नांची त्यासाठी उत्तरे शोधावी लागतील. हे सगळे कागदोपत्री खरे आहे. पण तशी सुविधा लोकांना उपलब्ध नसली; म्हणून त्यावर पर्याय शोधून लोक तशीच देशाच्या नेत्याची निवड करणार नाहीत, असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. ज्याला पंतप्रधान वा देशाचा नेता म्हणून लोकांना निवड करायची असेल त्यालाच बहूमताने पाठींबा देतील, असे प्रतिनिधी निवडण्याचा लोकांना पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे असे, की लोकसभेत वा विधानसभेचे बहुसंख्य सदस्य ज्याला नेता म्हणून निवडतात, तोच शेवटी पंतप्रधान वा मुख्यमंत्री होतो ना संसदीय लोकशाहीत? मग जे थेटमार्गाने शक्य नसेल, त्यावर लोक तसा पर्याय शोधून काढत असतात. ज्यावेळी पक्षाचे श्रेष्ठी वा प्रतिनिधी लोकांना हवा असलेला पंतप्रधान वा मुख्यमंत्री निवडून सत्तेवर बसवणार नाहीत; तेव्हा लोकांसमोर दुसरा पर्याय असतो, तो नेत्याला समर्थन देतील असेच प्रतिनिधी निवडून आणायचा. मग त्यासाठी ज्यांना असा लोकप्रिय नेता उमेदवारी देतो, त्याला लोक निवडून देतात. थोडक्यात लोकप्रिय नेत्याने शेंदूर फ़ासलेल्या दगडाला लोक मते देतात, असा अनुभव आहे, तसा इतिहास आहे. आणि अशी स्थिती येते, तेव्हा मग नेता महत्वाचा होतो आणि पक्ष दुय्यम होऊन जातो. मग आज मोदी हे भाजपाचे नेता आहेत. म्हणून ते पंतप्रधान होऊ शकतात काय?
हा प्रश्नच मुळात फ़सवा आहे. प्रश्न अशासाठी फ़सवा आहे, की मोदी यांना भाजपाने कधीच पंतप्रधान पदाचा उमेदवार मानलेले नाही. जेव्हा सगळीकडून तो विषय विचारला जातो आहे, तेव्हा मोदी पक्षाचे सर्वाधिक लोकप्रिय नेता आहेत; असे गुळमुळीत उत्तर दिले जाते. याचा अर्थच असा, की पक्षातच मोदींना पुरेसा एकमुखी पाठींबा नाही. म्हणून मोदींची अडचण होणार आहे काय? लोकांना मोदी पंतप्रधान व्हावे असे वाटत असेल, तर भाजपा त्यांना अड्वू शकतो काय? भाजपामध्ये सत्तांतराची राजकीय क्षमता असती, तर मागल्याच निवडणूकीमध्ये कॉग्रेसला इतके मोठे यश मिळाले नसते. ते मिळू शकले, कारण भाजपा पर्याय देण्यात अपेशी ठरला होता. युपीए वा कॉग्रेसचे सरकार मोठे यशस्वी नव्हते. पण त्यांच्यासमोर भाजपाने संघटनात्मक वा नेतृत्व पातळीवर प्रभावी पर्याय सादर केला नव्हता. त्यामुळेच लोकांनी कठपुतळी असलेल्या मनमोहन सिंग यांनाच पुन्हा सत्ता बहाल केली होती. अगदी लालकृष्ण अडवाणी सतत सिंग यांना सर्वात दुबळा पंतप्रधान म्हणून हिणवत होते. ते लोकांनाही मान्य होते. पण त्यापेक्षा समर्थ नेता वा सरकार देण्याची क्षमता अडवाणींना दाखवता आलेली नव्हती. देशाचा वा लोकांचा जो नेता असतो, त्याच्यात व्यक्तीगत आत्मविश्वास असावा लागतो. तिथेच अडवणींचे पारडे हलके होते आणि मोदींचे पारडे जड आहे. आज बाकीच्या भाजपा नेत्यांचे पारडे हलके आहे. मोदींवरचे अनेक आक्षेप लोकांना मान्य आहेत. पण त्याचवेळी त्या दोषांच्या पलिकडे या माणसामध्ये अतिशय उपयुक्त असा नेतृत्वाचा गुण आहे. तो गुण म्हणजे त्याच्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास आहे. गेल्या दहा बारा वर्षामध्ये माध्यमांनी व तमाम विरोधी पक्षांनी मोदी विरोधात जी अपप्रचाराची आघाडी उघडली, त्याच्या समोर टिकून रहाणेच अवघड होते. अगदी स्वपक्षातलेही बहुतांश नेते मोदींच्या समर्थनाला कधी पुढे आले नाहीत. तो प्रतिकुल कालखंड मोदींना एकट्याने संघर्ष करीत आपले नेतृत्व आणि खंबीरपणा एकाकीपणे सिद्ध करावा लागला आहे. त्यामुळेच त्यांची तुलना अन्य कुठले मुख्यमंत्री, स्वपक्षातले नेते वा अन्य राष्ट्रीय पक्षाचे नेते इत्यादींशी करता येणार नाही. आज नुसत्या घोटाळ्यांच्या गर्तेत सापडल्यावर कॉग्रेसच्या नेतृत्वासह पंतप्रधानांची उडालेली तारांबळ बघितली; तरी मोदी कोणत्या अग्नीदिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेत, त्याचा अंदाज येऊ शकतो. ज्याचा स्वत:वर विश्वास आहे, त्याला इतकी मजल मारणे शक्य आहे. त्याच हिंमतीमुळे मोदी लोकांच्या कल्पनाशक्तीवर स्वार होऊ शकले आहेत.
आपली प्रतिमा बदनाम करून डागाळण्याच्या मागेच तमाम माध्यमे व पत्रकार लागलेले आहेत, हे लक्षात आल्यावर मोदी यांनी त्यांचे समाधान करण्यात वेळ दवडला नाही. त्यांनी आपल्याविषयी चांगले लोकमत निर्माण होण्यासाठी अन्य मार्ग चोखाळले. त्यांनी लोकांच्या नजरेत भरेल असे उत्तम काम, कारभार, विकास व पर्याय उभे करण्यावर लक्ष केंद्रित केले. प्रसिद्धीअभावी त्यांच्या त्या यश व गुणांचा प्रचार होऊ शकला नाही. पण जसजसे त्यांच्या त्या प्रयत्नांना यश येत गेले; तसतसे मोदींचे कर्तृत्व लपवणे माध्यमांच्याही आवाक्यातले राहिले नाही. उत्तम कारभार, विकास, प्रगती, जनहित, अशा नागरिकांना सुखावणार्या गोष्टी गुजरात बाहेर येत गेल्या व मोदीविषयी देशभर लोकमत बदलत गेले. पाच वर्षापुर्वी ज्याच्याकडे माध्यमांच्या अपप्रचारामुळे दंगलखोर वा धर्मांध म्हणून बघितले जात होते; त्याच्याकडे लोक विकासाचा नवा प्रेषित म्हणून बघू लागले. एका बाजूला मोदींच्या विकास-प्रगतीच्या कहाण्या गुजरातबाहेर येऊ लागल्या होत्या; त्याच काळात नेमक्या युपीए कॉग्रेस सरकारच्या कारभाराच्या भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली जाऊ लागली होती. त्याचवेळी युपीए सरकार नालायक असले तरी विरोधातल्या भाजपामध्ये परिवर्तन करण्याची कुवत नाही, असाही घोषा लावला जात होता. सहाजिकच लोकांना भाजपाच्याही पलिकडे जाऊन पर्याय शोधण्याखेरीज पर्याय नव्हता. कॉग्रेस नको आणि भाजपा पांगळा असेल, तर लोकांनी पाचपन्नास लहानमोठ्या पक्षांचा सावळागोंधळ सत्तेवर आणायचा काय? काय करावे लोकांनी? जो पक्षातील वा सत्तेतील बेदिली भ्रष्टाचार मोडून काढू शकतो व खंबीरपणे सरकार चालवून राजकीय स्थैर्य देऊ शकतो, असाच नेता लोक शोधणार ना? (अपुर्ण)
atyant abyaasapurN lekh
उत्तर द्याहटवा