इंदिराजींच्या हत्येमुळे १९८४ अखेरीस झालेल्या निवडणुकीत नेहरू वा इंदिराजींपेक्षा मोठे यश राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसने मिळवले तरी देशाचे राजकारण त्यांच्याच भोवती घुटमळत राहिल; असे कर्तृत्व राजीव कधीच दाखवू शकले नाहीत. त्यामुळेच इंदिराजींच्या हत्येनंतर पुन्हा देशाचे एकूणच राजकारण विविध पक्ष, त्यांच्या विचारधारा व प्रभावक्षेत्र यात विभागले गेले. त्या राजकारणाला आपल्या भोवती फ़िरवण्याची वा त्याचे धृवीकरण करण्याची क्षमता; राजीव गांधींमध्ये नव्हती आणि अन्य कुणाही पक्षाच्या नेत्यापाशी नव्हती. त्यामुळेच नेहरू-इंदिराजी यांच्यानंतर विकेंद्रीत झालेले व्यक्तीकेंद्री राजकारण तीन दशकांपुर्वीच अंतर्धान पावत गेले. पुढल्याच म्हणजे १९८९ च्या निवडणुकीत त्याची साक्ष मिळाली. राजीवनी बहूमत व सत्ता गमावली आणि अगदी त्यांचीच ऐन निवडणुकीत हत्या होऊनही कॉग्रेसला त्या हौतात्म्याच्या भांडवलावर पुन्हा बहूमत मिळवणे शक्य झाले नाही. कॉग्रेस इतकी पांगळी होऊन गेली होती, की नेहरू वारसाशिवाय आपल्या पायावर चालायचेही तो पक्ष विसरून गेला आहे. त्यामुळेच १९९१ ते १९९८ या कालखंडात नरसिंहराव पंतप्रधान व पक्षाध्यक्ष झाले, तरी राजकारणापासून अलिप्त असलेल्या सोनियांची मान्यता वेळोवेळी मिळवायला धडपडत होते. राव यांनी १९९६ सालात बाजूला होऊन सीताराम केसरी यांना पक्षाशी सुत्रे सोपवली. त्यांनाही पक्ष सावरता आला नाही आणि शेवटी १९९८ सालात सोनिया गांधींना कॉग्रेसची सुत्रे सोपवण्यात आली. तेव्हापासून पुन्हा देशाचे राजकारण त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती घुमवण्याचा खुप प्रयास सर्वच साधने व माध्यमे वापरून झाला; तरी त्यातून काहीच साधलेले नाही. गेली पाचसात वर्षे त्यांच्याऐवजी राहुलभोवती राजकारणाचे धृवीकरण करण्याचे प्रयास फ़सले आहेत.
सोनिया गांधी कॉग्रेस अध्यक्ष झाल्यावर त्या परदेशी नागरिक आहेत, त्यांचा जन्म भारतातला नाही; असा खेळ भाजपाने करून खरे तर त्याच जुन्या व्यक्तीकेंद्री राजकारणाला खतपाणी घालण्यात कॉग्रेसला मोठीच मदत केली होती. काही प्रमाणात त्याचा लाभही सोनिया व कॉग्रेसला मिळाला. पण सोनिया व राहुल यांच्यापाशी नेहरू व इंदिराजी यांच्यातली गुणवत्ता वा मुत्सद्देगिरी नसल्याने; त्या संधीचा त्यांना कुठलाच लाभ उठवता आला नाही. म्हणूनच सत्ता कॉग्रेसच्या हाती आणण्यात यशस्वी झाल्या, तरी सोनियांना व्यक्तीकेंद्री राजकारणाचे पुनरूज्जीवन करता आले नाही, की कॉग्रेसचा जिर्णोद्धार करता आलेला नाही. उलट याच काळात देशाचे राजकारण अधिकाधिक विस्कळीत होत गेले आणि विविध पक्ष व प्रादेशिक नेत्यांमध्ये विकेंद्रीत होत गेले. त्यातूनच देशाचा कोणी असा खंबीर राष्ट्रीय नेताच उरला नाही. अर्थात मोठा पक्ष असून कॉगेसमध्ये असा नेता निपजण्याची अपेक्षाच करता येत नाही. नेहरू वारसाशिवायची कॉग्रेस ही कल्पनाच कॉग्रेसजनांना भयभीत करणारी असल्यावर दुसरे काय व्हायचे? दुसरीकडे अन्य पक्षातही तशी महत्वाकांक्षा व राष्ट्रीय दृष्टीकोन असलेला कोणी नेता नसल्यामुळे, आज मनमोहन सिंग यांच्यासारखा कठपुतळी माणूस देशाचा पंतप्रधान होऊन बसला आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपण बघत आहोत. आपल्या मंत्रीमंडळात कोण असावे, कोणाला काढावे, अमुक बाबतीत कोणता निर्णय घ्यावा, तेही स्वत: ठरवू न शकणार्या व्यक्तीच्या हाती आज देशाचा संपुर्ण कारभार आहे. त्याचा कोणीही कितीही इन्कार केला, तरी सामान्य जनतेला ते दिसते आहे व कळते आहे. त्यातूनच मग पर्याय शोधण्याची प्रक्रिया सुरू होत असते. ज्या कारणास्तव स्वातंत्र्योत्तर काळात नेहरू वा पुढल्या काळात इंदिराजींच्या रूपात लोकांनी पक्षिय भूमिका झिडकारून व्यक्तीवादी राजकारणाची कास धरली होती; त्याच अनुभवातून आजचा भारतीय समाज जातो आहे, आणि त्यातूनच मग कोणा तरी खंबीर व ठोस निर्णय घेणार्या नेत्याचा शोध गेली काही वर्षे लोक करीत आहेत. सामान्य लोक विद्वानांप्रमाणे तात्विक निर्णय घेत नाहीत, त्याची व्यवहार्यता तपासून बघत असतात. चांगले हवेच, पण ते उपलब्ध नसेल, तर त्याच्या नजीकचा पर्याय लोक स्विकारत असतात. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे नाव तसेच लोकांच्या कल्पनाविश्वात घुसले आहे.
गेल्या तीनचार वर्षापासून सगळीकडे हळुहळू नरेंद्र मोदी हा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली. गंमतीची गोष्ट म्हणजे त्यांचे नाव भाजपाने म्हणजे त्यांच्या पक्षाने पुढे आणलेले नाही. आधी त्यांचे नाव भलत्याच राजकारणबाह्य लोकांकडून पुढे आणले गेलेले आहे. आणि त्याची टर उडवणार्या त्याच भाजपाच्या नेत्यांना आता त्याचा इन्कारही करणे अशक्य झालेले आहे. कशी गंमत आहे बघा. १९७० नंतर सतत ‘अबकी बारी अटलविहारी’ असा प्रचार करणार्यांनाच आज आपल्या लोकप्रिय नेत्याचे नाव बाकीचे लोक घेत असताना मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब करणे अवघड जाते आहे. पण म्हणून मोदींचे नाव मागे पडायला तयार नाही. दिवसेदिवस विविध व्यासपीठावरून किंवा चाचण्यांमधून ते अधिकच पुढे येते आहे. मात्र विरोधी पक्षांना, भाजपासह अनेक राजकीय अभ्यासकांना, ते वास्तव स्विकारणे अवघड जाते आहे. याचे काय कारण असेल? तर गेल्या तीस वर्षात लोक व्यक्तीकेंद्री राजकारण, त्यातून मतांचे होऊ शकणारे धृवीकरण व व्यक्तीकेंद्री निवडणुकांचे जुने वास्तव पुरते विसरून गेले आहेत. लागोपाठच्या सात लोकसभा निवडणुकांमध्ये कुठल्याच पक्षाला बहूमत मिळू न शकल्याने, आता एकपक्षिय बहूमताचा जमाना संपला हे आजच्या राजकीय अभ्यासक, विश्लेषकाचे गृहीत आहे. एकदा ते गृहीत पायाभूत मानले; मग त्यानुसारच तर्क सुरू होतो. मग आघाडीच्या राजकारणाचे युग, अशी भाषा सुरू होते आणि ती भाषा सुरू झाली, की व्यक्तीकेंद्री राजकारणाचा विचारही मनाला शिवत नाही. जे इंदिरा गांधी व नेहरूंच्या बाबतीत होते, त्या पातळीचा नेता व नेतृत्व देशात पुन्हा पैदाच होणार नाही; हे गृहीत असेल तर तसा नेता समोर उभा असला तरी दिसायचा कसा व बघायचा कोणी? आज देशात सर्वच क्षेत्रात मोदी या नावाची चर्चा चालू आहे, तर ती कशाला चालली आहे? त्याचे विश्लेषण करायचे तर तशी चर्चा कोणाची व्हायची, तो इतिहास अभ्यासूनच नवे विश्लेषण करावे लागेल. तुलना वाजपेयी यांच्याशी करून त्याचे उत्तर मिळणार नाही, की निष्कर्ष काढता येणार नाहीत. आणि काढलेले निष्कर्ष बिनबुडाचे व फ़सवेच असणार.
बारा वर्षापुर्वी गुजरातच्या दंगलीनंतर ज्याची अखंड बदनामी करण्यात आली व ज्याचे नाव घेण्य़ाची भाजपालाही लाज वाटू लागली; तोच माणुस आता देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकतो, असा अनेक विश्लेषकांना सतावणारा प्रश्न आहे. कारण विश्लेषक व अभ्यासक पत्रकारांनी मोदींच्या विरोधात ज्या अपप्रचार व बदनामीच्या आघाड्या उघडल्या; त्याचा प्रभाव जनमानसावर पडला होता हे नक्की. पण असा प्रभाव कायमचा नसतो. हा माणुस खरेच इतका धर्मांध व हिंसाचारी असेल, तर पुन्हा कसा निवडून येतो, असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो. त्या प्रश्नाचे पटणारे उत्तर देता आले पाहिजे. ते उत्तर विश्लेषकांना अजून सापडलेले नाही वा सामान्य भारतीयापा पटवता आलेले नाही. पण दुसरीकडे सामान्य माणसाने अन्य मार्गाने जी उत्तरे शोधली आहेत, ती समजून घेण्यात विश्लेषकच तोकडे पडले आहेत. त्यामुळेच मतचाचण्या घेऊन मोदींच्या लोकप्रियतेचे जे आकडे समोर येतात, ते सामान्य माणसाला पटणारे असले; तरी तेच आकडे जमवणार्यांना मात्र समजून घेता येत नाहीत. मग आपणच शोधलेल्या आकड्यांना खोटे पाडण्यापर्यंत अशा विश्लेषक, अभ्यासकांची मजल जाते. दोन वाहिन्यांनी अलिकडेच चाचण्या घेऊन मोदीच देशव्यापी सर्वाधिक लोकप्रिय नेता असल्याचे निष्कर्ष काढले आहेत. मात्र त्यानुसार मोदी पंतप्रधान व्हायला किती अडचणी आहेत, त्याचेच विवेचन त्या वाहिन्यांच्या कार्यक्रमात बघताना हसू आले. असेच असेल तर त्या चाचण्या घ्यायच्या कशाला? लोकमत कसे बनते व कसे झुकते वा बदलते; त्याचा अभ्यास करून मगच विश्लेषण करणे शक्य असते. त्यात पक्ष व लोकप्रिय नेता अशी गल्लत करून चालत नाही. म्हणून भाजपाचे आजवरचे लोकप्रिय नेता मानले गेलेले वाजपेयी यांच्याशी मोदींची तुलना चुकीची आहे. कारण पंतप्रधान होईपर्यंत वाजपेयी यांची सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रीय नेता अशी प्रतिमा कधीच नव्हती. उलट आज मोदींची नेमकी तशी प्रतिमा आहे. १९९८ वा २००४ सालातील वाजपेयींची लोकप्रियता ते पंतप्रधान असतानाची आहे. पण त्याआधी म्हणजे १९९१ किंवा १९९६च्या निवडणुकीपुर्वी वाजपेयींची लोकप्रियता सर्वाधिक होती का? त्याचे उत्तर नकारार्थी आहे. त्यामुळेच मोदी व वाजपेयी ही तुलनाच चुकीची आहे. (अपुर्ण)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा